तेव्हा लिहिताना कभी कभी चित्रपटातलं “ मेरे घर आई एक नन्ही परी “ हे गाणं गुणगुणत होते. लहानपण हा आपल्या आयुष्यात आलेला खळाळता झराच नाही का ! ज्याच्या धो धो बरसण्यातच त्याची श्रीमंती आणि गोडी लपलेली असते. हा झरा पाहता पाहता नदीला जाऊन मिळतो पण आपली ती तहान काही भागत नाही. पुन्हा पुन्हा अनुभवावीशी वाटते. तो झरा योगायोगाने येतो ही. नव्या रुपात. नव्या उत्साहात. आपल्याच घरात. आपल्याच माणसात. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात.
आज मी लिहिते ते आपल्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या बालपणावर.
छोटी छोटी अनुभवाची पुंजी गोळा करून एक मांडलेला बालपणीचा खेळ आणि नियतीने घडवून आणलेला भावनिक मेळ. घरी आपल्या पेक्षा लहान कोणी येणार याचे कौतुक कोणाला नसते! कधी कडू गोड आठवणी, पथ्य पाणी, जबाबदारी, कुतूहल सगळंच असतं. अगणित इच्छा अपेक्षामधली ही एक सामान्य आणि माफक इच्छा...बालपण.
मी गणपतीच्या मंदिरात गेले होते. तिथला हा अनुभव. कोणी तरी सगळ्यांच सगळं ऐकणारी शक्ती आणि व्यक्ती तिथे असते. पुरी करो न करो पण ती आपली लांब लचक विशलिस्ट समजून घेते. असा अगदी साधा विचार करून गाभाऱ्यात पाऊल टाकले होते. गेल्यावर अचानकच गर्दी झाली. गर्दी म्हणजे लॉॅकडाऊन नंतर थोडा चिंतेचाच विषय, पण तेव्हा आरतीची वेळ होती. सोशल डिस्टनसिंग किती ही पाळलं तरी त्याच्या समोर सारी जमलेली मंदियाळी भक्तीच्या आणि श्रद्धेच्या बांधिलकीने सोबतच उभी होती. प्रत्येकाची आपली आपली विशलिस्ट घेऊन.
मागून कुठून तरी छोटीशी मुलगी पुढे आली. डोळ्यावर भिंगाचा चष्मा आणि वय तीन चार असेल. तिच्या हालचाली आणि बोलण्यावरून स्पेशल चाईल्ड असावी अशी शंका आली. स्पेशल कारण तिथे जमलेल्या सगळ्यांपेक्षा वेगळी. आईच्या कडेवरून खाली टुणकन उतरून वाट काढत ती पुढे आली. ती पुढे आणि आई मागे. मी मागेच उभी होते. गणपतीचे मंदिर म्हणजे पुढे उंदिरमामा हात जोडून असतातच. तिथे ही होते. त्यांच्या शेजारी ती उभी. जसा घंटानाद वाढला, टाळ्यांचा आवाज वाढला तसं तिने आपल्या चिमुकल्या हातांनी त्या उंदीरमामाचे कान झाकले. तुम्हा आम्हासाठी मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी सदैव तत्पर उभे त्याचे कान काही काळ तिनेच विश्रांती साठी बंद केले असावे. असंच काहीसं. नंतर थोड्या वेळातच त्याच आरतीच्या ठेक्यावर ती पायाचा ताल धरून नाचू ही लागली. मागून तिची आई तिचा हा बाप्पाशी सुरु असलेला भावनिक संवाद पाहून हसू लागली. प्रसादाला मिळालेल्या साखरेच्या दोन दाण्यापैकी एक उंदीर मामा समोर ठेवून तिने त्याचे ही पोट भरले. एक दाणा जमिनीवरच्या एका रेषेत चालणाऱ्या काळ्या मुंग्यांच्या ही नशिबी आला. मिळालेलं सारं वाटून साखरेचा गोडवा मात्र तिच्याकडे राहिला. तिच्या वागणुकीतून ती मला खरंच इतरांमध्ये स्पेशल वाटली. परत जायची वेळ आली तशी ती “ तो उंदीर मामा मला हवा आहे. “ म्हणून आईकडे हट्ट करू लागली. बाल हट्टासमोर देव ही हात टेकवतो. काय करावं? शेवटी प्रसादात चढवलेला एक नारळ तिथल्या गुरुजींनी घेतला. केशरी गंध लावून उंदीर मामाचे रूप त्यात साकारले. मुलगी नारळ घेऊन हसत हसत गाभाऱ्यातून बाहेर गेली. पाठमोरी तिची आकृती दूर जाताना “ देव पहावा कुणी कुठे “ या ओळी तेव्हा मनात आपसूक सुचल्या. जशी आरती झाली. त्या नंतर माझ्या समोर दहा वर्षाचा मुलगा फुलं वाटत आला. तो मंदिरातल्या भटजींचा नातू होता. ते त्याचे आजोबा आणि एका अपघातात आपल्या आई वडिलांपासून दुरावलेला तो ती फुल वाटताना जगण्याची प्रबळ इच्छा, विश्वास आणि सुगंध वाटतं होता. जाता जाता भटजींनी त्याची ओळख करून देताना हे सांगितल्यावर मला त्याच्या फुलं वाटण्याचं ही कौतुक वाटलं. “ देणाऱ्याने देत जावे...घेणाऱ्याने घेत जावे...” म्हणत इतक्या लहान वयात हा फुलांचा आणि विश्वासाचा सुगंधच वाटत होता. त्याच्या जवळच्या चार फुलातले एक फुल त्याच्या ही आयुष्यात बहर आणणार अशी आशा मनात ठेवून मी तिथून निघाले. चार फुले आणि एक नारळ याची ही कथा इथेच संपत नाही. त्या मंदिराच्या बाहेर फुल माळा, पूजेचे साहित्य विकणारे दाम्पत्त मला भेटले. त्यांना मुलबाळ नाही हे एकदा त्यांनी मला सांगितलं होतं. माझी वरचे वर फेरी असल्याने माझ्याशी ते मोकळेपणाने बोलायचे. ते ही त्या आरतीला मागे उभे राहून त्यांच कुटुंब पूर्ण होण्याचे एक व्रत देवासमोर मांडत असायचे. तो गाभऱ्यातून सारं सारं पाहत होता.
आपले हरवलेले बालपण एकमेकांत पाहणारी ही भावनिक साखळीच नाही का ! रोजचाच दिनक्रम, आपल्या गाभाऱ्यातला हा निराळा खेळ आणि गुंतवून ठेवलेली ही प्रेमाची, अदृश्य नात्यांची वीण तोच जोडत असतो.
गर्दी सरली आणि निघताना शेजारच्या घरातल्या स्वयंपाक घरातून गाण्याचा आवाज कानावर पडला. अष्टविनायक चित्रपटातलं मुधुसूदन कालेलकर यांचं हे गाणं “ देवा सरु दे माझे मी पण...तुझ्या दर्शने उजळो जीवन..नित्य कळावे तुझेच चिंतन...तुझ्या धुळीचे भाळी भूषण...सदैव राहो ओठांवरती ...तुझीच रे गुणगाथा....तू सुखकर्ता, तू दुःख हर्ता ...तूच कर्ता आणि करविता ....”
9 comments:
मस्त लेख आहे
खूपच सुंदर लिहले
सुंदर
जुईली, दिवसागणिक तुझे लेखन अधिक वाचनीय होतेय.
Thank you 😊
Thank you 😊
खूपच छान
मस्तच लिहिलयं
धन्यवाद 😊
Post a Comment