Friday, 29 December 2023

असं झालं तर...




चालता चालता अचानक लहान मुल रस्त्यात पडतं. रडतं, तिथेच थांबतं. त्या क्षणी त्याला ठेच लागलेली असते. आईच्या हाती त्याचा हात असतो. ती त्याला जवळ घेते. बिलगते. मिठी मारते. कावरे बावरे ते मुल शांत झाले की ती मिठी सैल होते. झालेल्या जखमांवर ती अलगद फुंकर घालते. जखम आपोआप काही दिवसात भरून निघते. तेव्हाची ती फुंकर आणि मिठी आपल्या जखमेवरचे औषध होते. आयुष्यभर लक्षात राहते. लहानपणी प्रेम म्हणले कि आठवते ती फुंकर आणि ती मिठी. मोठे झालो तरी लहानपणीची ती फुंकर मात्र मोठेपणी मन शोधत राहते. थोडे चालू लागल्यावर, पुढे धावू लागल्यावर आपण मोठे होतो पण मन ते लहान मुल जपत असतं.

कवयित्री शांता शेळके बाईंनी लिहिलेल्या कवितेत मला ती मायेची फुंकर दिसते. पाना फुलातून सांगत असते,

सहज फुलू द्यावे फुल,

सहज दरवळावा वास

अधिक काही मिळवण्याचा

करू नये अट्टाहास

सुवास, पाकळ्या, पराग, देठे

फुल इतकीच देते ग्वाही

अगल अलग करू जाता

हाती काहीच उरत नाही

फुलाप्रमाणे सहज मनाशी मनाचे नाते जोडले जावे. त्यात सोबतीचा दरवळ असावा. फार काही न मागता सहवासाचा आनंद द्यावा. इतकं सोपं आणि सहज प्रेम कळी फुलात उतरत जाते. अशीच आणखी एक कविता माझ्या वाचण्यात आली आणि आठवणीत राहिली.

झाकले दरवाजे असता आत कोण घेत

कोण जाणे त्या कळ्यांना रंग कोण देत

काय रंग असेल कळीचा रोपटयाला नाही ठाव

रोप उगाच बहरून येत आणते माहीत असल्याचा आव

एक खंत आहे कळीला स्वतः ला पाहता येत नाही

जन्म देणार झाड स्वतः कळीला जवळ घेत नाही

- चैत्या

लहानसं रोपटं असतं. त्याची लहान पानं, लहान मूळ, छोटंसं खोड पण सगळं सोबत घेऊन ते मोठं होतं. त्याच्या डोक्यावर एक इवली कळी येते. आजवर जमवलेलं, मिळवलेलं सगळं जात त्या कळीकडे. फुललेल्या त्या कळीला आधार देणारं खोड, मूळ, झाड त्या कळीला पाहू ही शकत नाही. इतकी सुंदर ती कळी स्वतःला फुलताना पाहू शकत नाही. फुलताना पाहू शकत नाही म्हणून झाड काही रुसत नाही. बहरून येते. फुलाला सुद्धा जन्म देते. ज्याला मोठं होताना पाहू ही शकत नाही अशा सुंदर फुलाला जन्म देणार ते झाड आणि कळी प्रेम शिकवते.

आपल्या मनात असंच एक प्रेमाचं फुल आहे, ज्याला सुवास आहे, रंगीत पाकळ्या आहेत. त्या फुलाला फुलण्यासाठी सांभाळणारे झाड आपण झालो तर...मनातल्या जखमेवरची फुंकर आपण झालो तर...मायेची ती उबदार मिठी आपण झालो तर...


Sunday, 24 December 2023

ऐतिहासिक भेट



इतिहासातल्या वाटा आकाशाला भिडणाऱ्या बुरुजाच्या, भक्कम तटबंदीच्या, गड किल्ल्यांच्या, राजे महाराजांच्या, वाडा वसाहतीच्या, दगड मातीतल्या क्रांतिकारकांच्या असतात.

इतिहासातले एक पाने पुन्हा उघडण्यासाठी, बंद दारामागे असलेला इतिहास पुन्हा प्रकाशात आणण्यासाठी, निर्जीव भासणाऱ्या भिंतींना पराक्रमी योध्याचे पोवाडे ऐकवून जिवंत करण्यासाठी इतिहासातल्या वाटा शोधत काही जण येतात. त्या मातीत रुजलेला बलिदानाचा अंकुर मोठा करत प्रवास पुढे नेतात.

पनवेल या शहराला मिळालेला ऐतिहासिक वारसा. स्वातंत्र्य लढ्यात असामान्य योगदान देणारा योद्धा, आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण या गावी दिलेली भेट आणि तिथला हा अनुभव. तिथल्या इतिहासातल्या वाटा शोधण्यासाठीचा प्रवास...
३१, मार्च २०२४, पनवेल जवळ शिरढोण या ठिकाणी कवी कट्टा आयोजित करण्यात आला. को म सा प युवाशक्ती मुंबई, रायगड, ठाणे वेगवेगळया ठिकाणावरून या कट्ट्यासाठी कवी, कवयित्री आणि साहित्यिकांनी हजेरी लावली होती. कट्ट्याचे ठिकाण हे ऐतिहासिक वेगळेपण घेऊन आले होते. ज्या मातीत क्रांतिकारकांचे वास्तव्य होते अशा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मगावी हा कट्टा संपन्न झाला आणि त्याला एक झुंझार, शौर्याचे रूप आले.

प्रवासाला निघालो. शिरढोण गावाच्या वेशीवरच त्यांच्या नावाने लिहिलेली कमान दिसली. पलीकडच्या गावाचा ती इतिहास सांगत होती. स्वातंत्र्याची लढाई आणि झुंझार योध्याचे गाव. शेजारीच शहर असून ही आपले गावपण जपणारं, वाडा आणि कौलारू घरांची वस्ती असलेलं ते गाव कमानीच्या पलीकडे होतं. आम्ही फडके वाडा पाहिला. त्याची डागडुजी सुरू होती. आत गेल्यावर त्यातली भव्यता अनुभवता आली. तिथल्या खिडकी दरवाजांवर, भिंतीवर नवा साज चढलेला होता. नवा रंग चढलेला होता. ऐतिहासीक वास्तू नव्याने उभी राहताना वाड्याचे दार आमचे स्वागत करत होते. वाड्यात प्रवेश केल्या केल्या अंगणात तुळस सांभाळणारे त्या काळचे दगडी तुळशी वृंदावन पाहायला मिळाले. कोरीव काम केलेले ते तुळशी वृंदावन वाड्याचे पावित्र्य जपत होते. त्याच्या समोर एक शिव पिंड, एक मिणमिणता दिवा ठेवलेला होता. जवळ आल्या आल्या आपसूक हात जोडले गेले. तिथले सागवानी महाद्वार आणि वाड्याच्या समोरच बहरलेला चाफा तिथल्या सजीव अस्तित्वाचे दाखले देत होता. तिथल्या विहिरी, त्यातलं पाणी, त्यांची हत्यारे, अवजारे, रोजच्या वापरातल्या वस्तू आणि क्रांतिकारकाच्या आठवणी स्मृतीत जपले गेले.
तिथल्या भव्य दालनातून डोकावणारा क्रांतीचा संघर्ष स्फूरण घेऊन आला होता. आजही बऱ्याच ठिकाणी असा एक क्रांतिकारक पोहोचण्याची वाट हे जग पाहत आहे पण एक आशावादी चित्र तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या सादरीकरणात दिसत होते.

फडकेंचा इतिहास सांगणारे तिथले संग्रहालय कित्येकांसाठी इतिहासाची पाने पुन्हा उघडून देत होते. अचानक आलेली ही दर्दीची गर्दी, वेडे कलाकार आणि साहित्यिक, त्यांचा उत्साह पाहून ते ही आनंदून गेले होते.

तिथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे क्रांतिकारकांच्या प्रति कौतुक, जाणून घेण्याची उत्सुकता, कृतन्यता, बदलाची इच्छा आणि युवा सहभाग असे आशावादी चित्र पाहून कुठे तरी क्रांतीवीर ही खुश झाले असतील.

वाडा पाहून झाल्यावर वाड्याच्या बाहेर असलेल्या दगडी पायऱ्यांवर थोडा वेळ बसलो. तेव्हा भविष्याचे स्वप्न रंगवणारे माझे मन पाठीशी असणाऱ्या दरवाजातून कधी आत गेले आणि इतिहासाच्या वाटा चालू लागले कळत ही नाही. बराच वेळ तिथेच रमून गेले.


कट्ट्यासाठी केलेले नियोजन, त्यात ही अनेकांनी स्वेच्छेने घेतलेला सहभाग, तिथल्या नियोजनात मदत करणाऱ्या कानिटकर काकू. सकाळ सकाळी कल्याणच्या खिडकी वडापावची न्याहरी आणणारे दातार काका, दुपारी जेवणानंतर मुरुडच्या खाजाची गोड आठवण सोबत घेऊन आलेला कवी गझलकार सिद्धेश दादा, या कट्ट्यासाठी प्रोत्साहन देणारे, मदतीला पुढे येणारे मित्र मंडळ त्यात पार्थ तसेच प्रथमेश, विश्वासाने आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या, अनुभवाची शिदोरी आम्हा युवासाठी रीती करणाऱ्या प्रा.दीपा ठाणेकर मॅडम, सूत्रसंचालनातून कवितेच्या ओळींची, शब्दांची सोनेरी झालर देणारे हेमंत बारटक्के सर. जेष्ठ साहित्यिक, नेते, समाजसेवक एल बी पाटील सर उपस्थित होते. या सर्व गोष्टी आमलात आणताना चाफ्याच्या फुलांनी कट्ट्याला लावलेली हजेरी आणि त्यामुळे सुगंधाने दरवळणारी ही मैफिल, सारेच एकमेकांत समरसून गेले आणि या कट्ट्याला वेगळेपण आले. कट्टा यशस्वी झाला. पुन्हा भेटू या भावनेने सर्व परतीच्या मार्गाला लागले. आम्ही ही निघालो, आलेल्या रसिक मित्र मैत्रिणींसोबत पाटील काकांच्या रिक्षातून आम्ही पनवेल पर्यन्त पोहोचलो. येताना मात्र बहरलेला चाफ्याचा सुगंध, तुळशीचे वृंदावनाचे हिरवेपण आणि क्रांतिवीरांच्या आठवणी घेऊन आम्ही माघारी आलो.


Sunday, 3 December 2023

अंकुर

लहानपणी आजीकडूनच प्रवासाला निघालेल्या आजीची गोष्ट ऐकली होती. एक आजी प्रवासात लहानपणी आजीकडूनच प्रवासाला निघालेल्या आजीची गोष्ट ऐकली होती. एक आजी प्रवासात रेल्वेमध्ये खिडकीशेजारी बसून बाहेर थोड्या थोड्या अंतरावर फळाच्या बिया टाकत असते. तिला तिच्या शेजारी बसलेला नातू विचारतो “ ही बी मातीत रुजून त्याच मोठं झाडं व्हायला, त्याला फळं यायला अजून भरपूर वेळ जाईल मग तेव्हा तू नसलीस तर... “ त्यावर आजी त्याला म्हणते “ या आधी ज्यांनी कोणी झाड लावले त्याची फळे मला मिळाली कि, ही दोन्ही बाजूनी वाढलेली झाडं बघ किती सावली देतात. प्रवास किती छान होतोय...मग माझ्या मागून येणाऱ्या तुला आणि इतरांना ही फळे मिळायला हवीत ना, अशी आणखी झाडं हवीत म्हणून मी या बिया टाकते. बाजूला बसलेला नातू आता खिडकीशी येऊन तो ही फळ खाऊन बिया काढून टाकू लागला.

दया भाव, दातृत्व, प्रामाणिकपणा, निष्ठा, सत्कर्म हे शब्द आजीने न सांगता ही कृतीतून त्यांची ओळख करून दिली. मनात रुजवली. आपल्याला फळे मिळणार कि नाही याची चिंता बाजूला ठेवून सत्कर्म करत राहिली.

बरेचदा आपले मन जेव्हा स्वतःमध्ये गुंतलेले असते तेव्हा हा चिंतेचा झरा कोसळत असतो, ज्याला थांबवणे कधी कधी कठीण होऊ शकते. अशा वेळी स्वतः ला सत्कार्माच्या प्रवाहात वाहून घेणे गरजेचे असते. श्री रामदास समर्थ मनाच्या श्लोकात लिहितात,

मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।

अकस्मात होणार होऊन जाते ॥

घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।

मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥

आपले मन न घडलेल्या घटनांची चिंता करते. घडलेल्या घटनाची कारणे शोधते. गोष्टी घडत जातात. त्या आपल्या हातात नसतात. बऱ्याचदा आपल्या कृतीतून, विचारातून आपल्याला बरे वाईट फळं मिळत असते. अशा प्रसंगी दुबळे झालेले मन दुःख करत बसते.

वाहणाऱ्या पाण्याने मातीशी जोडलेले नाते किती ही घनिष्ठ असले तरी ते वाहत पुढे जाते. मैदानातल्या खेळाडूने जखमांची हळहळ करायची नसते. त्यातूनच त्याला मैदान जिंकायचे बळ मिळते. हिरव्यागार झाडावरचे पिकले पान कधी तरी गळून पडणार त्याचे झाडाने दुःख करायचे नसते. नव्या आलेल्या पानासोबत त्याला सगळे ऋतू पहायचे असतात.

आजीबाईंच्या कथेत सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा एखादे “ बी “ पेरतो ना तेव्हा आपल्याला मिळणारे फळ हे गोड की बेचव या प्रश्नावर न थांबता आपल्या हातात जे फळ असेल त्या फळाची “ बी “ संपूर्ण झाड निर्माण करू शकते या विश्वासावर ते रुजवणे म्हणजे जीवन...


निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...