Friday, 24 February 2023

पैठणीची गोष्ट



चित्रपटाचे नाव “ गोष्ट एका पैठणीची “ गोष्ट स्वप्नांची. आशा – निराशेची. सामान्य घरातील विचार सरणीची. चित्रपट पाहताना आपल्यातलीच एक कथा आहे असे वाटेल. पैठणी हा खरं तर प्रत्येक मैत्रिणीचा जिव्हाळ्याचा विषय. एकदा तिच्या तलम कपड्याचा स्पर्श झाला. सोनेरी धाग्यांची भुरळ पडली. नक्षीदार पदराच्या प्रेमात पडलो कि नंतर आयुष्यभर तिला जीवापाड जपावे. हेच तिचे सूत्र. आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्ती सारखं.

“ पैठणीची गोष्ट “ ही अशीच होती. पैठणीसोबत प्रत्येकाला नव्याने जोडण्याचा प्रवास. ज्या प्रमाणे एक एक धाग्याला जोडून ती तलम पैठणी तयार होते. तसाच प्रत्येक धाग्याला जोडून कुटुंब होण्याचा प्रवास. वेगवेगळ्या माणसांसोबतचा आपला प्रवास यात पहायला मिळतो. त्याचा नक्षीदार काठ आणि तितकीच सोनेरी चमकणारी जर दृष्टीस पडते आणि एका सामान्य घरापासून या चित्रपटाची सुरुवात होते. कमळाच्या नक्षीदार पदरावर भाळलेले एक सामान्य जोडपे. तिची फक्त एकदा ती पैठणी नेसण्याची इच्छा. त्यामुळे त्याला आलेली भावनिक कड. या आनंदात खडबडून जागे करणारा त्या पैठणीवर पडलेला तेलाचा डाग. तेलाच्या डागामुळे समोर तयार झालेला सव्वा लाखाचा खड्डा. तो बुजवायचा कसा ? या प्रश्नावर येऊन सुरू होणारा हा प्रवास...

चारशे ऐंशी रुपयांचा फटाक्यांचा मुलाने केलेला हट्ट. त्यातला त्याचा आनंद. एकीकडे त्याचा आनंद आणि दुसरीकडे आनंदाच्या भरात समोर आलेला हा निराशेचा डाग. येवला, कोकण, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती. पैठणीचा शोध. येवल्यात बनताना पाहिलेली नवी कोरी पैठणी. त्या मागची वर्षभराची तपश्चर्या. एके ठिकाणी आपल्या फॉरेनच्या सुनेला देऊ केलेली पैठणी. ऑनलाईन नेसून तिला दाखवताना परदेशी पोहोचलेल्या पैठणीचे दर्शन. तशीच पैठणी डोळ्यासमोर येते पण हातात येत नाही. दोन वेगळ्या संस्कृतीना जोडणारी पैठणी असे काही यावेळी वाटून जाते. तिकडून ती निघते आणि पोहोचते कुठल्याशा वाड्यावर. एक घरंदाज बाई. पुन्हा तशीच पैठणी मिळवण्याचा प्रयत्न. पण तो ही प्रयत्न हुकतो. पैठणीमुळे नात्यात आलेला दुरावा त्या ठिकाणी जाणवतो.

हताश होऊन ती परतीच्या प्रवासाला निघताना नियती पुन्हा आशा दाखवते. पुन्हा ती पैठणी समोर दिसते शेवटच्या प्रवासाला निघालेल्या सहचारिणीवर ठेवलेली. सर्रकन असण्या नसण्या मधला फरक अंगावर काटा आणतो.

शेवटी घरी परतून ती च डाग लागलेली पैठणी परत करण्याचा विचार मनाशी ठाम करते. फुलांचे दुकान विकून सव्वा लाखाचा खड्डा भरण्याचा प्रयत्न जोडीदार करणार असतो. मुलाने मागितलेले फटाके द्यायचे असतात. दोघे पैठणी घेऊन तिच्या मालकीणीकडे जातात. जिने ती पैठणी घेतलेली असते. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून ती आणखी काल्पनिक डाग त्या पैठणीवर पाडते. आपली बाजू मांडायचीच ठरवून आलेले ते जोडपे खरी हकीकत सांगते. आम्ही हे सांगितलं नसतं तर आम्हाला रात्री झोप आली नसती. आपल्या पश्चात आपल्याबद्दल चांगल्या कारणांनी आपली आठवण ठेवावी यासाठी केलेला हा खटाटोप. त्या रात्री त्यांच्या घरात फटाक्यांची दिवाळी साजरी होते. दुरून पैठणीची खरी मालकीण हे सारं पाहते. तिची भाची जेव्हा विचारते “ खोटा कल्पना विस्तार का केला त्याच्या समोर ? तेव्हा ती म्हणते “ आपल्याकडे आज जितके आहे त्यातून तशीच पैठणी पुन्हा घेता येईल पण अशी माणसे परत मिळणार नाहीत... “ त्यांची दिवाळी इतक्या लांबून पण चमकून दिसते. त्याचा प्रकाश दूर तिच्या घरापर्यंत पोहोचतो. चित्रपटाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक उदाहरणातून कथा एक आयुष्याचे गुपित सांगून जाते ते म्हणजे “ आयुष्यात भाळणे क्षणभराचे असते. एकदा भाळणे सरले की उरते ते सांभाळणे यातच सारी गमंत आहे. मग ती पैठणी असो किंवा जीवनात येणारी माणसे. “


निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...