Saturday, 9 September 2023

बोलण्याची कला


बोलणं कधी सहज सोपं असतं. आपल्याच माणसात, गर्दीत, कटट्यावर, मित्र मैत्रिणीसोबत. तितकच ते नव्या चेहऱ्यासमोर अवघड होते. गर्दीतून जेव्हा आपण वेगळे होतो तेव्हा ते वेगळे होते. कधी कधी शांततेतून आपण बोलत असतो. कधी चेहऱ्यावरच्या आठ्या बोलतात तर कधी आनंदी चेहरे बोलतात. कधी डोळे बोलतात. बोलते होणारे आपले मन वेगवेगळ्या माध्यमातून एका ठिकाणी येऊन स्थिरावते. ती जागा योग्य वेळी मिळाली की संवादाची घडी बसू लागते. समूहात बोलताना बोलण्यातला भावनिक काठ, तटस्थपणा आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात चित्र बनत जाते.


जसे आपण घरापासून थोडे दूर जातो तसे आपले बोलणे फक्त आपल्या परिघातील राहत नाही. त्यात बदल होत जातात. माणसे भेटत जातात आणि हे बदल आपल्या ही नकळत आपल्यात झिरपत जातात. जेव्हा आपल्याला कळू लागते. बोलण्याचा समूहात प्रभाव पडतोय यावर विचार केला जातो. तेव्हा आपण आपले विचार आणखी प्रभावी आणि अचूक करून मांडण्याचा प्रयन्त करू लागतो. जेवणाची पथ्ये असतात ना तस काहीसं हे बोलण्याचे पथ्य आपण समजू लागतो. त्याची ही जबाबदारी घेऊ लागतो. हळूहळू सवय ही होते.

कधी कधी बोलण्यापेक्षा “ ऐकणे “ ही फार मोठी समस्या होऊन बसते. ऐकण्यासाठी कान शोधणे हे दुःखद वास्तव बदलता येऊ शकते. माणसे, कथा, कविता किंवा लिहिण्यासाठी नवा विषय शोधण्यासाठी कान आणि मन यातले अंतर कापता येणं जमायला हवं. ते ही गाठण्यासाठी बोलण्या आणि ऐकण्यातलं हे वर्तुळ पूर्ण करणे गरजेचे असते. आपण ऐकू लागतो तेव्हा बोलण्याचे वर्तुळ पूर्ण होते.
आज तरुणाईला बोलते करणारे विषय समोर आहेत. नवा जॉब, नवीन सुरुवात, नवीन समस्या, नवी आव्हाने. ही नवीन आव्हाने तेव्हाच घेतली जातील जेव्हा नव्याचे नवे पण स्विकारले जाईल. ते स्वीकारण्याची पहिली पायरी कदाचित अजून ही ऐकणारे कान शोधते.

Art of public speaking : ispeak च्या online भेटीतुन आदित्य दवणे सर आणि टीम यांनी घेतलेल्या या वेबीनार मध्ये वेगवेगळ्या वयोगटातील दूर दूरचे मित्र मैत्रिणी एकत्र आले आणि संवादाच्या, मुलाखतीच्या माध्यमातून भावनिक, सामाजिक घटकामध्ये वावरताना बदललेलं संवादाचे समीकरण समजून घेता आलं. या वेबिनारच्या दरम्यान भेटलेले नवे मित्र मैत्रिणी रसिका, स्मृती ताई, अनघा, विनायक आणि त्याचें अनुभव ऐकताना कान आणि मनातलं अंतर नकळत कमी झाले. बोलण्याची कार्यशाळा श्रवणीय झाली.

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...