Sunday, 10 October 2021

स्पर्श


   स्पर्श... कधी शब्दांचा...कधी आधाराचा...कधी प्रेमाचा.. कधी अन्यायाचा तर कधी मायेचा...देवाने कुणाला पाहण्याची, ऐकण्याची क्षमता दिली नसेल तिथे त्याने स्पर्श दिला.
     रोजचेच उदाहरण घेतले तर एखाद्या आवडत्या पदार्थाचा आपल्या जिभेला झालेला स्पर्श, सुरकुतलेल्या हाताचा भाकरीच्या पिठाला झालेला स्पर्श त्यातून बनवलेली गोरीपान भाकरी. आनंदाच्या भरात गुलाबी गालाला झालेला स्पर्श आणि आदराने वाकून कोणाच्या पायाला केलेला स्पर्श. सारे गणित स्पर्शाचे...
      टचिंग लाईन्स अँड टचिंग माईंड्स... काही गोष्टी स्पर्शाने खुप सहज बोलल्या जातात. जेव्हा ऐकणाऱ्या कानांपर्यंत आवाज जात नाही किंवा डोळे ही भ्रमित होऊन जातात. अशा वेळी स्पर्श विश्वासू होतात.
        हा लेख लिहिण्याचे कारण की, कधी कधी आपल्याला माणसाचे गणित समजत नाही. मनात द्वंद्व सुरू असते. रोज नवीन नवीन गोष्टी समोर येत असतात. काही जुने चेहरे, काही नवीन तर काही जुनेच नव्याने उमगणारे. अशा वेळी पहिला स्पर्श शब्दांनी आणि मग हातानी होतो. समजणे सोपे होते. सोबत, विश्वास, गरज आणि प्रेम या वेगवेगळ्या दगडावर आपले पाय घट्ट रोवण्यासाठी एक मायेचा स्पर्श पुरेसा असतो.
       मला आलेला एक अनुभव इथे नक्की सांगेन. लहानपणी मावशीकडे सुट्टीत गेल्या असतानाची गोष्ट. तिथे एक मनीमाऊ, रोज दुपारी जेवणाच्या वेळी शेजारी येऊन बसायची. मग तिच्या पाठीवर हात फिरवत तिला थोडा वेळ गोंजारत बसायचं, तिच्या मऊ मऊ पाठीवर हाताचा स्पर्श झाला कि ती समोरची दुध भाकरी संपवायची. एक दिवस आम्ही जेवायला बसलो. सर्वांची जेवणं झाली तरी ती आलीच नाही. संध्याकाळ झाली तरी तिचा पत्ता नाही. डोळ्यात पाणी आले. अंगणात बसल्या असताना ती कुठून तरी समोर देवासारखीच प्रकट झाली. दिवसभर कुठेतरी लपून बसलेली आणि आता भूक लागली म्हणून आवाज करून बोलवत होती. आजीने तिच्या समोर दुध भाकरी ठेवली. मी ही तिथेच शेजारी बसले. तिने फक्त त्या ताटाकडे पाहिले. मी लहान होते. समजत नव्हते काय करावे. मागून माझी आजी आली. तिने माझा हात तिच्या पाठीवरून फिरवला. आमचे दोघींचे हात तिला गोंजारत होते. तशी तिने मान खाली केली आणि मटामट खाऊ लागली. आजी म्हणाली, “ तूच सवय लावली ना तिला... बघ आता कशी लाड करून घेते ती “
आता वाटते “ ती मांजर होती...स्पर्शाची भाषा तिला इतकी खोलवर समजली आपण तर माणसे आहोत. “

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...