सानिया आणि तिच्या सर्व भावांडानी दुपारी आजीच्या कपाटातून जुने अलबम बाहेर काढले. काही रंगीत, काही काळे - पांढरे असे वेगवेगळ्या रंगात, आकारात फोटो त्यात चिकटवलेले होते. आपले फोटो, आपल्या आई बाबांचे फोटो यावरून तिथे चर्चा सत्र भरले होते. तेव्हा कोण कोणासारखे दिसत होते? कोणाचे नाक, कोणाचे डोळे, कोणाचा चेहरा किती बदलला? किती सारखा यावर बराच वेळ चर्चा झाली.
" ती सानू बघ एकदम बाबाची कार्बन कॉपी " अस म्हणत आजी ही तिथे येऊन बसली. सानिया गालातल्या गालात हसू लागली. मग आजी फोटो मधल्या प्रत्येकाबद्दल सांगू लागली. सगळी नातवंड ते ऐकण्यात रमुन गेले. मग एकेकाने पुढे येऊन मोठ्यांची नक्कल करायला सुरुवात केली. त्यावरून कोण ते ओळखायचे असा टास्क होता. नक्कल करण्यात प्रत्येक जण अव्वल निघाला आणि सगळेच अंदाज बरोबर निघाले. खेळ चांगलाच रंगला. आजी सकट सर्व मुलांनी त्याचा आनंद घेतला.
लहानपणी एकदा तरी आपण नक्कल केली असेल. नकला किंवा अनुकरण करणे, कॉपी करणे यांचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम पाहिले असतील. अनुभवले असतील. परीक्षेत कॉपी करणे, नक्कल करून निंदा करणे या गोष्टी चुकीच्या हे आपण लहानपणी च शिकलो. त्यानंतर निकाल लागल्यावर कधीतरी त्याच्या सारखी मेहनत कर, अभ्यास कर यावर आपल्या पालकांकडून बाळकडू ही घेतले असेल. थोडक्यात काय त्याचे अनुकरण. म्हटले तर नक्कल. नक्कल करून चित्रपट ओळखण्याचा खेळ. एखादे प्रभावी व्यक्तिमत्व पाहून नकळत तसे बोलणे, चालणे किंवा एखाद्या सवयीची केलेली नक्कल. शाळेत, कॉलेजात असताना शिक्षकांच्या गैर हजेरीत त्यांची केलेली नक्कल. कुणाच्या हसण्याची, कुणाच्या रडण्याची, कोणाच्या दिसण्याची नक्कल. आरशात पाहून कुणाला तरी आठवून त्याची केलेली नक्कल. कोणीतरी आपल्या गैरहजेरीत आपली केलेली नक्कल. एखाद्याची नक्कल करता करता त्याच नावाने आपली ओळख बनवणारे ही काही जण असतात.
एखाद्याचं दिसणं, एखाद्याचं हसणं, बोलणं, हालचाली, सवयी आणि व्यक्तिमत्व साऱ्या गोष्टी टिपल्या जातात. निरीक्षणातून जन्माला येणारी ही कला वाईट नाही पण हा खेळ फार काळ खेळता येत नाही. स्वतः ला विसरून जाणे काही काळ सुखावणारे असू शकते. पण स्वच्छ पाण्याने चेहरा धुतल्यावर आपल्या समोर आरशात आपलेच प्रतिबिंब दिसते ते स्वीकारणे ही या खेळाची गंम्मत. हे लिहिता लिहिता हिंदीत काही ओळी यावर सुचल्या, त्याही उतरून काढल्या. त्या अशा होत्या...
चाहे रंग वही या रूप वही
चाहे मिले किसी से शकल
फर्क तो तभी होगा जब
दिखे स्वभाव ओर अकल
मंच पे ही होगी तालिया
करोगे तुम किसी कि नकल
जिंदगी का एकसा पन्ना
ढुंडने मे क्या तुम होंगे सफल?
चाहे रंग वही या रूप वही