Friday, 20 February 2026

निवडुंग


खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवरून हात फिरवताना मनात विचार आला. झाडांत आणि आपल्यात कसे साम्य आहे?  त्यावर जो विचार मनात आला तो मी लिहून काढला. तर त्याची सुरुवात एका गोष्टीने झाली.

एकदा एका शाळेत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जात होता.  शाळेच्या मैदानात विद्यार्थी सोबत आणलेली इवली इवली रोपं मातीत रोवत होते. हा दिवस होता " जागतिक वृक्षारोपण दिन." त्यात सगळ्यांनी आपापल्या घरून एक एक झाड आणले होते.  गुलाब, मोगरा, झेंडू, चिकू, आंबा, वडाचे झाड अशी वेगवेगळी झाडं होती.

दिनूने निवडुंगाचे झाड आणलं होतं. ते इतर झाडांपेक्षा वेगळं होतं. ते झाड लावताना सुद्धा मुलांना त्याचे काटे लागले. शेवटी बाईंनी ते काळजीपूर्वक लावले. दिनूचे झाड इतर झाडांपासून वेगळे थोडया अंतरावर लावण्यात आले. त्यावर तो निराश होऊन एकटाच शिडीवर जाऊन बसला. यावर त्याच्या बाई त्याला म्हणल्या. "  निवडुंगाचे झाड सुद्धा इतर झाडांसारखं झाड आहे... दिनू , त्याला सुद्धा पान, मूळ आणि खोड आहे बघ... प्रत्येक झाड त्याचं वेगळेपण घेऊन येतं. कोणी अगदीच लहान, कोणी अगदी मोठं.  फुलं आणि काटे हे झाडाचे वेगवेगळे भाग आहेत. ते गुलाब पहा. त्याला सुद्धा काटे आहेत. स्वतःला जपण्यासाठी त्याने हे काट्याचे आवरण स्वतःकडे घेतले. तसंच हे तुझं वेगळं झाड... आपण ते सुद्धा लावलं आहे आणि त्याचं पण वेगळं महत्व आहे. तु त्याची काळजी घेशील तसं ते वाढणार. आता मुलांनो तुम्ही जशी काळजी घेणार आणि त्याला जपणार ते झाड तसं वाढणार, म्हणजे तुमचं काम अजून पूर्ण झालं नाही. " सर्व मुलांनी एका स्वरात "हो... " म्हणले. मुलं झाडं लावून आपल्या वर्गात परत गेली.
 
खरंच जशी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत. त्यांच्यात दडलेलं त्यांचं वेगळेपण आहे. तसेच आपले वेगवेगळे स्वभाव असतात. आपलं एक वेगळेपण असतं. कधी सुंदर, कधी औषधी, कधी स्थिर, कधी प्रवाही, कधी तीक्ष्ण, कधी कोमल तर कधी सावलीसारखे शीतल आणि शांत. झाडातले वेगळेपण शोधता शोधता आपल्यातल्या वेगळ्या गोष्टी आपसूक कळू लागल्या. त्यांच्यातलं आणि आपल्यातलं साम्य कळत गेलं. ऋतूप्रमाणे बदलणारी ती झाडं आणि परिस्थितीनुसार बदलणारे आपण... हा निसर्गाचा नियम प्रत्येकाला लागू पडतो. झाडाची एक विशिष्ट जागा असते जिथे त्याला सुपीक माती आणि वातावरण मिळते, तिथे ते सहज वाढते. आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात, आवडीच्या जागी तेवढेच सहज रूळतो आणि प्रगती करतो.

निवडुंगाला काटे का असतात? त्याच्या संरक्षणासाठी, दुष्काळी वातावरणात तग धरून ठेवणारे हे झाड.  अडचणीच्या काळात स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकवणारे हे झाड म्हणजे निवडुंग. 

आपण आपल्या भोवताली संघर्ष करणारी माणसे पाहतो. त्यांना यशस्वी होताना पाहतो. ती वेळ आणि त्यांचे संघर्ष म्हणजे कुठे तरी हे काट्याचे आवरण म्हणूयात. जे त्यांचे संरक्षण करत असते. त्याचे ते वेगळेपण कशासाठी आणि कशामुळे हे समजलं कि आपण त्या काट्यात ही सौंदर्य शोधतो. तेव्हा वेगळे वाढलेले झाडं ही आकर्षक वाटू लागते. 

Thursday, 19 February 2026

लोक कल्याणकारी समाजसुधारक : छत्रपती राजर्षी शाहू महाराज

        छत्रपती – राजर्षी शाहू महाराज , कोल्हापूर संस्थानाचे लोक कल्याणकारी समाजसुधारक. त्यांच्या कर्मभूमीत म्हणजे कोल्हापुरात मी काही दिवस वास्तव्याला होते. त्यांच्या विषयी आणखी जाणून घेण्यासाठी नामी संधी होती. जेव्हा मी तिथला भोवताल पाहिला, तेव्हा तिथली लोकांची मातीशी जोडली गेलेली नाळ प्रकर्षाने जाणवली आणि तिथल्या मातीत भिनलेला झुंझारपणा प्रत्येक ठिकाणी दिसला. आज यावर लिहीताना ती ऊर्जा मला आणि माझ्या लेखणीला ही मिळाली. एक संपूर्ण दिवसाचे नियोजन होते. त्यात एका दैदीप्यमान व्यक्तिमत्वाचा अभ्यास सुरु होता.
राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी सांगायचे तर त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अस्पृश्यता निवारण, बहुजन शिक्षण, समान न्याय हक्क, सामाजिक समानता, आंतरजातीय विवाह, शेती आणि विकासकामे अशी असंख्य समाजपयोगी कामे केली. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना “ राजर्षी “ पदवी बहाल केली. त्यांचा जन्मदिवस २६ जून हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्याविषयी अधिक माहिती मला या पुढच्या प्रवासात मिळाली.
कोल्हापूरचे एक प्रसिद्ध ठिकाण... ऐतिहासिक दस्तऐवज जिथे संग्रही ठेवले आहेत असे एक भव्य संग्रहालय असलेले न्यू पॅलेस पाहण्याचा योग याच दरम्यान आला. तिथे पोहोचल्यावर भव्य प्रवेशद्वारातून आत जाताना मी कधी त्या काळात गेले कळले नाही. तिथे पाहिलेल्या प्रत्येक वास्तूवरचे नक्षीदार कोरीव काम असामान्य होते. सौंदर्य आणि सुबकता याचा सुरेख संगम इथे पाहायला मिळाला. त्यांनी वापरलेल्या लहानात लहान वस्तूपासून ते त्याच्या भव्य सागवानी बैठकीपर्यंत सगळे ऐतिहासिक वारसा जपत होते. एका हुबेहूब खोलीची रचना तिथे केली होती. जागच्या जागी सर्व मांडलेले होते. नक्षीदार आणि उंच असा आरसा तिथे ठेवलेला होता. त्या भव्य आरशामध्ये राजेशाही पेहरावात आपले तेजस्वी व्यक्तिमत्व न्याहाळणारा छत्रपती आजही तिथे असल्याचा भास होत होतो. नंतरच्या दालनात युद्धासाठी लागणाऱ्या सर्व शस्त्राची मांडणी केलेली होती. त्या काळच्या लहान मोठ्या बंदुका, वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी, ढाली, खंजीर, दांडपट्टा, वाघनखे, तोफा, दारुगोळा, लाठीकाठी आणि असे बरेच काही त्यांच्या लढवय्या व्यक्तिमत्वाचे दाखले देत होते. राज्याची सुरक्षितता आणि श्रीमंती या दालनात कळली. त्या काळी प्राण्यांची शिकार करणे सुद्धा योद्धाचे लक्षण मानले जात. त्यामुळे शेजारी असलेल्या दालनात टॅक्सीडर्मी पद्धतीने जतन केलेले प्राण्यांचे अवशेष मांडलेले होते. त्यात रानगेंडे, रान गवा, डुक्कर, जंगली मांजर, वाघ, हरणे असे प्राणी पहायला मिळाले. शाहू महाराजांनी खेळांना आणि कलाकारांना मानाचे स्थान दिले. त्या वेळी खेळले जाणारे खेळ जसे सारीपाट, कवड्या, लाठीकाठी, बुद्धिबळ, भालाफेक, दांडपट्टा, गोफण तिथे पाहायला मिळाले. पुढच्या दालनात छत्रपती शाहूंनी काढून घेतलेले तैल चित्र, पोट्रेट होते. तेव्हाचे चित्रातले रंग आज ही ठळक आणि उठावदार होते. त्यावेळची कलाकारांची त्यातील सूक्ष्म दृष्टी असामान्य होती आणि आश्चर्य चकित करत होती. पुढच्या भव्य महालात सागवानी फर्निचर आणि काचेच्या झुंबराखाली आखीव-रेखीव मांडलेले सभा मंडप होते. समोर नक्षीदार सिंहासन होते. ते शाहू महाराजांच्या तिथल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते.
पूर्ण संग्रहालय पाहून झाले. या प्रवासात छत्रपती शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व समजत गेले. त्यांची राजनैतिक आणि समाजाभीमुख कारकीर्द कळली आणि क्रांतीची ज्योत आणि सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन आम्ही माघारी आलो.

Tuesday, 27 January 2026

" काव्यजुई " पुस्तक प्रकाशन

दीपावलीच्या प्रकाशमान पर्वाला सुरुवात झाली तसे " काव्यजुई " हे पुस्तक या दीप पर्वात प्रकाशित होण्याचे वेध लागले. काव्यजुई हा माझा पहिला कविता संग्रह. आठवणीतल्या कविता घेऊन " काव्यजुई " पुस्तक तयार झाले. प्रकाशन आणि कवी - कवयित्रींचे संमेलन एकत्र पनवेल येथे आयोजित केले. आपल्या पहिल्या वहिल्या कवितेच्या संग्रहाचे अनावरण करताना तो आनंद इतरांसोबत वाटून साजरा करण्याचा हा एक प्रयत्न. नवे कोरे पुस्तक हाती आले तसे या दिवसाची उत्सुकता दिवसागणिक वाढत होती. कार्यक्रमाला डोंबिवली, मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथून कवी रसिक आले होते. कवितेशी त्यांची बांधलेली नाळ हे अंतर कमी करून एक ऋणानुबंध जोडून गेली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दीपा ठाणेकर या कोकण मराठी साहित्य परिषद कार्यवाह, कु. स्नेहा वाघ - को. म. सा. प उत्तर कोकण युवा प्रमुख, पुस्तकाचे प्रयोजक श्री. आनंद दातार, श्री. निशिकांत महाकाळ - को.म. सा. प. कळवा शाखा प्रमुख, त्याच सोबत मान्यवर कवी श्री सुभाष कुडके - अध्यक्ष- कोमसाप पनवेल, श्री नागनाथ डोलारे - उपाध्यक्ष - कोमसाप पनवेल, जेष्ठ कवी श्री शिवाजी मोटे सर उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली. आलेल्या कवी - कवयित्रींनी काव्य संमेलन फुलवले. 

आपल्या वहीच्या मागच्या पानावर लिहिलेल्या ओळी एका पुस्तकात पाहिल्यावर त्या प्रत्येक कवितेमागची गोष्ट, तेव्हाच्या भावना, ती तगमग आणि सुख दुःखाचे क्षण सारे डोळ्यासमोरून गेले. या पुस्तकाविषयी सांगताना माझ्या आयुष्याचे एक पान वाचून दाखवते असे वाटले. सर्वांनी या पुस्तकाला भरभरून शुभेच्छा दिल्या. माझ्या शाळेतले शिक्षक प्रीती धोपाटे, विजया शिंदे मॅडम या कार्यक्रमासाठी आवर्जून आल्या. त्यांना ऐकताना माझे शाळेचे दिवस आणि या प्रवासात आपली कुठून कशी सुरुवात झाली होती? याचा धावता आढावा घेतला. दीपा मॅडम ज्यांची या पुस्तकाला प्रस्तावना मिळाली. त्यांच्या कडून शाबासकी म्हणजे माझ्यासाठी माझे साहित्यातले माहेरघर. अशी जागा जिथे आपण मुक्तपणे कधी चालतो, कधी धावतो, कधी पडतो पण पुन्हा धावण्यासाठी आपली ताकद बनून कोणी तरी असते. असे पाठीशी असणारे कुटुंब आणि कुटुंब प्रमुख - दीपा मॅडम. " जुई " हे अल्लड, बागडणारे जर फुलपाखरू तर त्याच्या विविध रंगाची जाणीव करून देणारे माझ्या आयुष्यातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच - दीपा मॅडम. विद्यार्थ्यामधली बलस्थान आणि कमजोरी ओळखून त्यांना घडवणे ही शिक्षकांची दृरदृष्टी मला कायम त्यांच्यात दिसली. त्यातून मी ही शिकत गेले. आज त्यांनी मला लेक म्हणल्यावर माझ्या लिहिण्याला खोलवर अर्थ प्राप्त झाला. पाय जमिनीवर ठेवून आणखी प्रगती करण्याचे बळ मिळाले. निशिकांत सरांच्या येण्याने आणि त्यांनी तिकिटावर लिहून आणलेल्या कवितेत मांडलेल्या फुलांनी कार्यक्रमाला बहार आली. लेखन, नियोजनाचे काही धडे त्यांनी ही माझ्यात रुजवले. त्यामुळे साहित्य विषयात खतपाणी मिळाले. माझी मैत्रीण स्नेहा, ती सुद्धा या सोहळ्यासाठी आली होती. तिची माझी मैत्री युवाशक्तीच्या कट्ट्या मध्ये झाली. हळूहळू तिच्यातील कलाकार, वाचक, वक्ता मला दिसत गेला. समजत गेला. संघर्ष, चिकाटी, कलात्मकता मला भावली. तिचा प्रवास प्रगतीच्या दिशेने उत्तरोत्तर वाढत जावा अशी माझी इच्छा आहे म्हणून च तिचे येणे हे माझ्यासाठी दोन मैत्रिणींची भावनिक भेट होती. या पुस्तकाचे स्वप्न जसे मी पाहिले तसेच ते आनंद दातार यांनी ही पाहिले. त्यांची मदत आणि माझी आवड याची सांगड घालत हे कार्य सिद्धिस गेले. त्यांनी केलेली मदत ही माझ्यासाठी माझी स्वप्नपूर्ती असली तरी ती माझ्यासाठी आयुष्यभराची प्रेरणा आहे. ही साहित्यिक सेवा फक्त आपली स्वतः ची नसून ती सर्वांचीच एक विचारधारा आहे. जी पुढे जाऊन इतरांना प्रेरणा देईल. आणखी एकाची कविता कोळसाच्या खाणीतून हिऱ्यासारखी लखलखत समोर येईल. त्यासाठी आपण कार्यरत असायला हवे हा मूक संदेश त्याच्यात दडला आहे. पुस्तकाची सुबक बांधणी अक्षरदाणी प्रकाशन यांच्या माध्यमातून झाली. प्रज्ञा पळसूले यांनी ते प्रत्यक्षात आणले. जुईच्या फुलानीं सजलेला काव्यजुई संग्रह मान्यवरांनी उघडला तेव्हाचा क्षण म्हणजे " ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास " असा काहीसा होता. प्रथमेशच्या सुलेखानाने रंगमंचाचे सौंदर्य अधिक वाढले. अक्षरांना वळण आले कि त्यांचे सौंदर्य अधिक वाढते आणि आपली साधी कविता ही देखणी होते हे मला कायम त्याच्या कलाविष्कारातून जाणवले. यामुळे माझ्या कवितेला त्याचे अक्षर मिळावे अशी माझी इच्छा होती. ती त्याने लिलया पेलली. या संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रबद्ध सूत्रसंचालनाची जबाबदारी अनुकूलने आपल्या खांद्यावर घेतली आणि बहारदार कवितांच्या माध्यमातून प्रत्येकाची मने जिंकली. नावाप्रमाणे काव्यमय वातावरण सर्वांसाठी अनुकूल केले. त्याच्या सूत्रसंचालनात भावनिक आंदोलने होती. आनंद होता. शब्दांची समय सूचकता, मधेच एखादे विनोदी वळण होते.

कधी मैत्रीण म्हणून, कधी कवयित्री म्हणून तर कधी आपली बहीण मानून त्याने माझ्यासाठी ज्या रचना घेतल्या. त्या ऐकताना आपसूक माझ्या डोळ्यात पाणी आले, ही च ती कवितेची ताकद असावी जी जोडण्याचा धागा होते. आपल्या लहान भावाप्रमाणे त्याचे कौतुक वाटले. कवी संमेलनाची सांगता जयेशच्या गाण्याने झाली. जयेश आणि मी अनेकदा कवितेच्या कट्ट्यासाठी एकत्र असायचो. त्याचा प्रवास ही संघर्षातून यशाकडे असंच म्हणावं लागेल. माझ्या साठीचे सरप्राईज म्हणजे त्याची "चाफा बोलू लागला " ही कविता. चाफ्याने सुंगधी सदाबहार सांगता झाली. चाफा मनाला स्पर्शून गेला. मित्र मैत्रिणीच्या सोबत शेयर केलेली आपली कविता आज ऐकण्यासाठी समोर आलेले रसिक पाहून संतुष्टी मिळाली. या संपूर्ण प्रवासात पडद्यामागची माणसे म्हणजे माझे आई बाबा, माझा भाऊ - वैभव आणि माझे यजमान - विद्याधर यांची साथ, सर्वांच्या आशीर्वादाने प्रकाशनाचा कार्यक्रम सुफळ संपूर्ण साजरा झाला. काव्यजुई पुस्तकावर आपली सही करून देताना मनात समाधानाचे फुलं फुलत होते. त्याचा दरवळ आयुष्यभर माझ्या सोबत असणार आहे. आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून अनेकांना नवी सुरुवात मिळून जाते. त्याचेच फलित म्हणजे " काव्यजुई " आणखी एक काव्यमय आठवणीतले पान.


Monday, 26 January 2026

आजीची सखी


सखी चतुर्थीच्या सुट्टीची दरवर्षी आतुरतेने वाट पाहायची. गणपती बाप्पा हे एक आकर्षण होतेच पण त्याहून मोठे आकर्षण म्हणजे गणपतीची सुट्टी सुरु झाली कि आजोळी कुडाळला धूम ठोकायची. आजी आजोबांच्या टूमदार कौलारू घराचे दरवाजे चतुर्थीला सखीची वाट पाहत असायचे. सखीचे बालपण शहारातल्या सुखवस्तू त्रिकोणी कुटुंबात गेल्याने अपार्टमेंटच्या बाहेरचे गावपण तिला आजोळी सापडायचे. आवडायचे ही.

यंदा सखी पाचवीच्या वर्गात गेली होती. हळूहळू परिसर ज्ञान तिच्या अभ्यासात वाढत होते. त्यामुळे आजूबाजूच्या जीवसृष्टीविषयी, वेगवेगळ्या परिसंस्था, ऊर्जा, नैसर्गिक चक्र या घटकांविषयी तिच्या मनात कुतूहल होते. यंदा आजोळी गेल्यावर आजीला हे सगळे सांगायचे, आता पर्यन्त जे जे नवीन शिकले त्याची उजळणी आजीकडे करायची हे तिने मनोमन ठरवले. बघता बघता सुट्टी सुरु झाली. सखीने आजोळी कुडाळला जाण्याचा हट्ट सुरु केला. सखीच्या इच्छे खातर आई बाबा सुट्टी घेऊन आजोळी आले. सखीने आल्या आल्या आजी आजोबांना साष्टांग नमस्कार केला. सखीची आजी आणि ती म्हणजे मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी त्यावर तुपाची धार. त्या जोडीशिवाय पोळीची गोडी नाही तसेच काहीसे यांचे नाते. तपकिरी सुती नववार, गळ्यात तुळशी माळ, डोळ्यांवर मोठ्या भिंगाचा चष्मा, हातात हिरव्या बांगड्यांची मूठ, नाकात मोठी नथ आणि लहानसा अंबाडा त्यावर एक सोन चाफ्याचे फुलं. आजीचे हे प्रेमळ रूप सखी डोळ्यात साठवत होती. आजीने सखीसाठी कौतुकाने बेसनाचे लाडू तयार केले होते. पितळ्याच्या डब्यातून आजीने सर्वांसाठी लाडू आणले. एक अखंड लाडू सखीला भरवला. लाडू तोंडात असताना सखीचे गाल टम्म फुगले होते. तशीच तिने आजीला मिठी मारली. मोठ्यांच्या गप्पा सुरु होत्या. सखी तिच्या नादात घरभर हिंडत होती. तशीच ती घरामागच्या अंगणात गेली. अंगणात गेल्यावर सखीचा तिथून पायच निघेना. मागच्या लाकडी दरवाज्यातून अंगणात जायचा रस्ता होता. रस्त्याच्या कडेनेच शिस्तीत काळ्या मुंग्याची रांग जात होती. ती थेट जांभळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून मुळाशी असलेल्या मातीच्या वारूळात दाखल होत होती. आजीला फुलांची, वेलींची भारीच आवड. त्यामुळे एखाद्या गृहिणीने आपले स्वयंपाक घर जसे नेटके ठेवावे तशीच ही जागा आजीने जपली होती. तशीच देखभाल या अंगणातल्या झाडांची, फुलांची आजी ठेवत असे. घराच्या कुंपणावरून धावणारी गडद जांभळ्या, फिकट पांढऱ्या रंगाची गोकर्णाची वेल एकमेकांत सुबकपणे मिसळली होती. एका कोपऱ्यात तीन चार फुट वाढलेला पिवळा, केशरी झेंडू ही तसाच भरभरून फुलला होता. दाराजवळ असलेला सुगंधी पारिजातक फुलांच्या पायघड्या घालत होता. खिडकीशी फुलणारी नाजुक पांढरी जाई, जुई खिडकीचे सौंदर्य वाढवत होती. एका बाजूला अनंत तर दुसऱ्या बाजूला रातराणी. फुलण्यासाठी उत्सुक असणाऱ्या, अंगणाच्या मधोमध असलेल्या लाल बुंद जास्वंदीच्या कळ्या. दिवस रात्र सुगंधाची आणि रंगांची उधळण करणारी ही मंडळी आजीने मनापासून जपली होती. सखी कुतूहलाने प्रत्येक झाड न्याहाळत होती. पानाचे आकार, फुलाचे रंग, त्याच्या पाकळ्या, त्यांची रचना आणि त्यात दडलेलं कुतूहल.

बराच वेळ झाला तरी सखी घरात आली नाही म्हणून आजीच तिची नक्षीदार काठी टेकवत शोधत शोधत अंगणात आली. आजीने सखीला पाहिले आणि विचारले,
" एवढी आवडली ही फुलं सखीला..." सखीने होकारार्थी मान हलवली. आजीने त्यावर तिला सांगितले, " त्यातली बरीच झाड ही तुझ्या पणजी आजी पासुन आहेत बघ, अजून तशीच आहेत. "

सखीला आश्चर्य वाटले. तिने आजीला विचारले " ही झाड एवढे दिवस जगली कशी आजी, तू त्यांची कशी काळजी घेतलीस? "
त्यावर आजी म्हणाली, " मी काही विशेष केलं नाही ग... तीच झाडं एकमेकांना जपत मोठी झाली. इथे येणारी फुलपाखरे, भुंगे, मधमाश्या त्यांना त्यासाठी मदत करतात. आणि मी त्यांच्या वाढण्यात ज्या गोष्टी बाधा आणतात, जसे हे बघ ही जंगली झुडपे, तण, वाढलेले गवत ते मी काढून टाकते. मग ही झाड त्यांची त्यांचीच वाढत जातात. " एवढे बोलून आजीने सखीला घरात यायला सांगितले.

अंधार पडू लागला होता. बघता बघता रात्र झाली. सर्वांची जेवणं झाली. सखी आजीसोबत झोपायला आली. आजीसोबत मनसोक्त गप्पा मारून झाल्या. परिसर ज्ञान ते विज्ञान याची उजळणी ठरवल्याप्रमाणे आजीकडे झाली. गप्पाच्या ओघात आजीने सखीला तिचे अनुभव गोष्टीतून सांगायला सुरुवात केली. सखीने आजीला विचारले " आजी, तूला कधी भीती वाटली तर तेव्हा तू काय करतेस ? "
आजीने सांगितले, " सखी, एखादी नवीन गोष्ट समोर आली कि सुरुवातीला भीती वाटतेच, चुकीचे विचार मनात येतात. तेव्हा मी काय करते माहितीये, घरामागले ते अंगण आठवते. श्रावणात एवढी सुंदर फुलं येतात, अंगण वेगवेगळ्या रंगानी अक्षरशः रंगून जाते. पण त्या सोबतच पावसाळ्यात तिथे गवत सुद्धा वाढते. त्यात साप, सरडे येण्याची शक्यता असते . मग अशा वेळी आपण काय करतो. नको असलेली झुडपे, गवत काढून टाकतो. त्यामुळे इतर झाड पण वाढतात आणि साप सरड्यांची भीती पण कमी होते. तसेच आपल्या मनातली भीती, चुकीचे विचार वेळीच काढून टाकले तर फक्त चांगल्या विचारांची बाग फुलते.

मी या घरात येण्यापूर्वी शाळा शिकले नव्हते. पण लग्नानंतर आजोबांनी घरी सतत पुस्तक आणून आणून मला शिकण्यासाठी तयार केले. त्यात काय बरे असेल? त्या उत्सुकतेने मी पण शिकले. मला हे जमेल का? या प्रश्नाचे उत्तर आजोबांनी कधीच " नाही " म्हणून दिले नाही. आपण शिकत शिकत सुजाण होताना येणाऱ्या या नकारात्मक थांब्याना वेळीच छाटले तर पुढे जाण्यासाठी आपला मार्ग मोकळा होतो. जे चांगले ते उगवते आणि वाढते. आपले आपणच आपसूक शिकत जातो. अगदी गोकर्णाच्या वेलीवरच्या फुलाप्रमाणे फुलत जातो." आजीने सखीकडे पाहिले. मांडीवर डोके ठेवून सखी आजीच्या बोलण्यावर विचार करत होती. आज आजीच्या बोलण्यातून ती पुस्तकाबाहेरचे परिसर ज्ञान शिकली होती.



कालाय तस्मै नमः



वेळ हि कोणासाठी अगदी लहान सुईसारखी तर अगदी लांब हनुमानाच्या शेपटी सारखी आहे. कोणासाठी त्यांचे कामाचे नियोजन म्हणजे वेळ तर कोणासाठी आयुष्याचे रिकामपण म्हणजे वेळ. कोणी मिनिटावर ती कमावतो तर कोणी तासावर. कोणी तिच्या मागे हि धावणारा, कोणी तिच्या पुढे हि धावणारा, कोणी भूतकाळात थांबलेला तर कोणी भविष्यात रमणारा. प्रत्येकासाठी वेळ हि वेगळे रूप घेऊन येते. वेगळे अनुभव घेऊन येते, तरीही वेळ कोणासाठी थांबत नाही. मग हि वेळ कधी बंद गुहा वाटते जी भरपूर रहस्यांनी भरलेली असते. कधी ती वादळीवाऱ्यासारखी वाटते, अमर्याद वेगात येणारी आणि सर्वदूर जाणारी. क्षणात विलुप्त होणारी. आपत्तीसारखी परीक्षा घेणारी आणि शांत झाल्यावर सारे मळभ दूर करणारी.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वेळेचे महत्व सांगताना म्हणतात, वेळ हि नदी सारखी आहे, नदीचा प्रवाह सतत बदलल्याने तुम्ही त्याच पाण्याला दुसऱ्यांदा स्पर्श करू शकत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही तेव्हा आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. हे सांगताना ते पाण्याचेच उदाहरण देतात ज्याप्रमाणे पूर आल्यावर मासे कीटकांना खातात त्याउलट दुष्काळ पडल्यावर कीटक मासे खातात. वेळ हि प्रत्येकासाठी संधी घेऊन येते. आपल्याला त्या संधीची वाट पाहता आली कि बदल दिसतो. अपयशाचे रूपांतर यशस्वी जीवनात होते. निराशेच्या जागी आशावादी विचार येतात. दुर्लक्षित गोष्टी प्रकाशात येतात. आणि हि जादू फक्त आपण दिलेल्या वेळेत असते. वेळ मला हि वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहासारखी वाटते. ज्याप्रमाणे नदी सतत प्रवाही असल्याने नदीला नवं निर्मितीचे वरदान आहे. तसेच वेळ सुद्धा पुढे पुढे सरत जाते, नवनिर्मितीचे वरदान घेऊन येते. नदीचा प्रवाह लहान असो किंवा मोठा तो मधेच थांबला तर त्याचे डबके होते तसेच वेळेचे आहे. कोणी वेळेसाठी थांबले तर हळूहळू निष्क्रियतेचे डबके झाल्याशिवाय राहत नाही. असा हा वेळेचा महिमा आपल्याला अनेक उदाहरणांवरून समजत जातो. आपले आजूबाजूचे जग, आपली दैनंदिन कामे, असंख्य पुस्तके या वेळेचे गणित आपल्या समोर मांडत असतात. आपण रोज ते आव्हान स्वीकारत असतो. त्यातून शिकत असतो.

कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी वेळ लागत नाही, वेळ लागतो तो त्याचे निष्कर्ष समोर येण्यासाठी. त्यातूनच आपण संयम शिकत जातो. त्याचे महत्व निसर्ग सुद्धा पावलो पावली आपल्याला सांगत असतो. वेळेचे महत्व सांगण्यासाठी ऋतुचक्राचे जाते फिरते. दिवसाची रात्र होते. रात्रीचा दिवस होतो. रोपट्याचे झाड होते. कळीचे फुल होते. जेव्हा मातीत बी पेरली जाते तेव्हापासून ते त्याचे झाड होण्यापर्यंत, त्याला फळे , फुले येण्यापर्यंतचा प्रवास हि वेळ सांगत असते.

वेळेविषयी आणखी उलगडून सांगणारे अनेक संत महात्मे मला आठवतात, उदाहरणच द्यायचे झाले तर लहानपणासून ऐकण्यात आलेले श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक या वेळेविषयी किती सुंदर अर्थबोध सांगतात ,

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।

अकस्मात होणार होऊनि जाते॥

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।

मतीमंद तें खेद मानी वियोगें॥

आपण आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला थोपवून ठेवू शकत नाही. कधी सुखाचे क्षण तर कधी अडचणींचे प्रसंग येतच असतात. अशा वेळी चिंताग्रस्त झालेल्या मनाला दिलासा देणारे सत्य म्हणजे जे विधिलिखित ते होणारच आहे, त्यामुळे त्याचा स्वीकार करून जगणे, मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड, खेद, आकस न बाळगता त्या वेळेला शरण जाणे त्यातून तरून जाणे हेच जीवनाचे सार आध्यात्मापासून ते वैज्ञानिक विचारधारेतून सांगितले आहे.

अँपल चे सह संस्थापक स्टीव्ह जॉब वेळेचे गणित सोडवताना एके ठिकाणी म्हणतात, तुम्हाला मिळालेली वेळ हि मर्यादित आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणासारखे जगण्यात वाया घालवू नका. इतरांच्या विचार सरणीचा परिणाम तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या ध्येयावर होऊ देऊ नका. तुमच्या क्षमता इतरांच्या मतावर ठरवू नका. आणि सगळ्यात महत्वाचे तुमच्या मनाचा आवाज ऐका, कारण त्याला बरोबर माहिती असते, तुम्हाला नक्की काय हवे. यावर जेव्हा आपण विचार करू लागतो त्यानंतर हा आत्मशोध आपल्याला तिथवर नेऊन पोहोचवतो जिथे हि वेळ आपल्या सोबत असते. आपली ओळख होऊन, आपली जवळची मैत्रीण होऊन, एका आनंदी जगात ती स्थिर होते.

जसा काळ जातो, तसे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे चित्र बदलत जाते. कुणाचे जुने सल भरून निघतात, कुणी नवी नाती जोडतात. कोणासाठी तोच तो प्रवास असतो, कुणासाठी आयुष्याची नव्याने सुरुवात असते. कोणी अडचणीतून पुढे येताना दिसतो, कोणी नवा शोध लावतो. या प्रवासात कोणाचा नव्याने शोध लागतो. चित्र बदलत जातात. माणसे बदलत जातात, कारण वेळ बदललेली असते. अल्बर्ट आईनस्टाईन वेळेचे कारण सांगताना म्हणतात, " सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला होऊ शकत नाही म्हणूनच वेळ हि महत्वाची. " या काळाच्या, बदलत्या वेळेच्या शक्तीला वंदन करून येणारा प्रत्येक क्षण भरभरून जगूया.



जागतिक पुरुष दिन : मोव्हेंबर


नोव्हेंबर महिन्याचे एक विशेष महत्व म्हणजे १९ नोव्हेंबर हा " जागतिक पुरुष दिन " म्हणून ओळखला जातो. पूर्वीपासूनच समाजात आणि कुटुंबात पुरुषांचे स्थान हे अढळ आहे. ज्या प्रमाणे स्त्री वर्गाची समाजाप्रती, आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रती नैतिक जबाबदारी असते. तशीच जबाबदारी पुरुषांची आहे. सततच्या व्यस्थ नियोजनात ते दिसत असते. समाजात वावरताना काही बंधने स्त्रियांना आहेत तशीच ती पुरुषांना ही आहेत.  अशा समाजात स्त्रियांप्रमाणे पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी, त्यांनी एकत्र येणे तसेच  त्यांच्या प्रति आदर भाव समाजात, कुटुंबात वृद्धिंगत होणे ही जरुरीचे आहे. त्यासाठी हा दिवस कधी रॅली काढून तर कधी  पथनाट्यतून संदेश देत साजरा केला जातो.


समाज सुशिक्षित व विकसित होण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातील माणसे एकत्र येतात तेव्हाच हे साध्य होते. विकसित देशात सातत्याने कार्यरत असणारे आणि उच्च स्थान गाठणारे यशस्वी पुरुष किंवा खेडेगावात मोलमजुरी करणारे मजूर कुठल्या ना कुठल्या मानसिक व शारीरिक व्याधीनी ग्रस्त आहेत. त्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक निराषेतून आत्महत्येची पायरी गाठली जाते. अशा वेळी त्यांना साहाय्य करण्यासाठी त्यांचे कुटुंब असते. त्यासोबत अनेक संस्था, समुपदेशक पुढे येतात.  जागतिक पुरुष दिनानिमित्त पुरुषांच्या आरोग्यासाठी हा दिवस जगात साजरा होतो.

जगभरात हा संपूर्ण महिना  वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा केला जातो. मोवेंबर फाउंडेशन यात सक्रिय योगदान देते. याची सुरुवात २००३ मध्ये मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे  झाली. ३० जणांच्या साहाय्याने सुरु केलेली ही वाटचाल आता ६ दशलक्ष लोकांपर्यंत पर्यंत पोहोचली आहे. त्या संस्थेमार्फत पुरुष वर्गात मानसिक, शारीरिक स्वास्थ्याविषयी जनजागृती केली जाते. त्यात मुख्यत्वे पुरुषांना होणारे गंभीर आजार जसे टेस्टीक्युलर कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, वाढते आत्महत्येचे प्रमाण, नैराश्य व अन्य विकार यांचा समावेश आहे. यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याचे लवकर निदान करून त्यावर वेळीच उपचार करणे, गरजूना मदत करणे अशी कामे या संस्थेमार्फत होतात. ऑस्ट्रेलिया मध्ये पुरुष संपूर्ण महिनाभर मिशा वाढवतात. मिशी  वाढवणे ही त्याची खूण मानली जाते. त्यांच्या भाषेत मो म्हणजे मिशी. पुढे या नोव्हेंबर महिन्याला मोवेंबर संबोधले गेले. हळूहळू याची दखल इतर देशात ही घेतली गेली. त्यात डेंमार्क, कॅनडा, जर्मनी, स्पेन, न्यूझीलंड, नॉर्वे, यू. के, यू. स, स्विडन, आयरलंड या सारख्या देशांचा समावेश आहे. जगभरातून या कार्यासाठी देणगी दिली जाते. या फाउंडेशन च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात, ज्यात लोक सहभागातून माणसे एकमेकांशी जोडले जातात. त्यांचे हे कार्य पुरुषांच्या प्रति समाजात सकारात्मक विचार रुजवत आहे.

निरोगी समाजाचा पाया म्हणजे स्त्री आणि पुरुष. धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे ही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी उचललेले हे एक पाऊल येणाऱ्या आव्हानासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

संदर्भ : Movember Foundation
Movember - changing the face of men's health - movember

जादुचे पेन

जादूचे पेन ही मूळची इंग्रजी कथा. इमा नावाच्या मुलीला लिहिण्याची आवड होती. तिची एक स्वतःची वही होती, ज्यात तिने साहसी कथा, परिकथा आणि गुढ गोष्टी लिहून ठेवल्या होत्या.

एकदा खूप पाऊस पडत असताना इमा दुपारी तिच्या आजीच्या खोलीत आली. तिने तिच्या आजीच्या कपाटातील एक गुप्त कप्पा उघडला. तो कप्पा आवरताना तिला त्याच्यात एक सोनेरी रंगाचे पेन पडलेले दिसले. उत्सुकतेने तिने ते पेन हातात घेतले आणि निरखून पाहिले. त्या पेनाच्या एका बाजूला कोरले होते ते तिने वाचले " या पेनाचा योग्य वापर करून लिहा आणि ते शब्द खरे होतील " हे वाचल्यावर आश्चर्यचकित होऊन तिने ते पेन आपल्या खोलीत आणून एक कथा लिहायला घेतली. त्या कथेत एका लहान मुलीला तिच्या अंगणात एक मौल्यवान खजिना मिळतो. असा त्या कथेचा शेवट होता. कथा लिहून झाल्यावर चमत्कारिक गोष्टी घडायला सुरुवात झाली. बाहेरच्या अंगणातील जमीन हलायला लागली आणि थोड्याच वेळात एक सोनेरी पेटी तिथे प्रकट झाली. ती पेटी पाहून चकित झालेली इमा बाहेर अंगणात धावत आली. तिने ती पेटी हातात घेतली आणि उघडली. त्यात तिला चमकणारे आकर्षक असे खडे मिळाले. ती तिच्या खोलीत धावत आली. ती मनातल्या मनात म्हणाली, "खरंच हे पेन लिहिलेल्या सर्व गोष्टी खरे करेल?"

पुढच्या काही दिवसात इमाने वेगवेगळ्या गोष्टी लिहून पाहिल्या. तिने एका कुत्र्याशी मैत्री करण्याबद्दल लिहिले आणि त्याच दिवशी एक गोंडस कुत्र्याचे पिल्लू तिच्या दाराशी आले. नंतर तिने प्रकाशमान दिवसांविषयी लिहिले आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी सुरु असलेला पाऊस थांबला आणि स्वच्छ निरभ्र आकाश दिसू लागले.

एकदा इमाने तिच्या या जादुई पेनाबद्दल आपल्या जिवलग मित्राला मॅक्सला सांगायचे ठरवले. एका संध्याकाळी तो घरी आला. तेव्हा तिने त्याला ते पेन दाखवले. त्या पेनाची जादू सांगितली. मग दोघांनी मिळून कलात्मक, सुंदर, संवेदनशील गोष्टी लिहायला सुरुवात केली, जसे की त्यांच्या शाळेत फुलझाडे लावणे, एकटे पडलेल्या माणसांना मित्र भेटणे अशा अनेक गोष्टी त्यांनी लिहिल्या.

अचानक एके दिवशी इमा आणि मॅक्स यांच्यामध्ये भांडण झाले. पुढचा मागचा विचार न करता इमाने त्या पेनाने लिहिले " जोपर्यंत मॅक्स माझी माफी मागत नाही, तोपर्यंत त्याचा आवाज बंद होईल " त्या क्षणी मॅक्सचे बोलणे थांबले. तो अचानक शांत झाला. तो शांत झाल्याने इमा पुरती घाबरली होती. त्याचा आवाज कायमचा जावा असे तिला अजिबात वाटत नव्हते. लगेच तिने त्याची माफी मागितली आणि वहीवर लिहिले " मॅक्स चा आवाज पुन्हा यावा " मॅक्स पुन्हा बोलू लागला. तोही सुरुवातीला घाबरला होता. नंतर दोघेही हसायला लागले. तेव्हाच त्यांनी या पेनाने दुसऱ्याच्या हिताचे आणि चांगलेच लिहायचे ठरवले. नंतर बरीच वर्ष गेली. इमाने ते पेन सुरक्षित आणि गुप्त ठेवले जेव्हा एखाद्याला चांगल्या कामासाठी त्याची मदत होईल तेव्हाच तिने ते वापरले. इमाकडे असलेले पेन जरी जादूई आणि अद्भुत असले तरी खरी जादू ही संवेदनशील शब्दात आणि इतरांना मदत करण्यात आहे हे इमाला कळले होते.

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...