Sunday, 25 April 2021

रिंगण



“ मार्ग दावतेस ठायी ठायी, माझे सावळे विठाई !” रिंगण चित्रपटातले हे शब्द. आयुष्याच्या एका वळणावर कधी जर मागे वळून पाहिले तर या प्रवासात प्रत्येक वेळी वेगवेगळे चित्र समोर आले असले तरी जिथून सुरवात केली ती जागा आपला पाठलाग सहसा कधी सोडत नाही किंवा माग काढत कधी कधी आपणच स्वतः हुन तिथे परत येतो किंवा नियती आणते. कधी कधी असे ही होते जेव्हा आपण आपल्या परिस्थितीमध्ये बदल करू शकत नाही तेव्हा त्यातुन बाहेर पडण्यासाठी पळवाट शोधतो. पण ती च पळवाट फिरून पुन्हा त्याच जागी आपल्याला आणून सोडते.
विषय असा की, नक्की कुठून बाहेर पडता येईल ? याची नेहमी चिंता असणाऱ्या आपल्यासाठी हे आयुष्य एक रिंगण असते. रिंगण यासाठी कारण कधी आपल्याला त्याच्या केंद्र बिंदूकडे जायचे असते तर कधी त्या वर्तुळाच्या बाहेर. काही जणांची ओढ त्यात जाऊन काही तरी मिळवण्याची असते. तर कधी त्यातुन बाहेर पडण्याची असते.
“ रिंगण “ हे चित्रपटाच नाव, पण नाव आणि कथा याचा संदर्भ लावला तर एक गोष्ट लक्षात येईल की चित्रपट शेतकऱ्यांच्या आयुष्यावर असला तरी त्याच्या समोरचे भले मोठे रिंगण आज प्रत्येकाच्या आजूबाजूला आहे. ते असतेच. या कथेत शेतकऱ्याचे कर्जबाजारी आणि खडतर जीवन आहे. सारे जग जरी थांबले तरी तो त्या रिंगणात राहून आपले कर्तव्य करतोच आहे. जग धावते असो वा थांबलेले काळ्या मातीवर चालणारा नांगर सहसा थांबत नाही. थांबला तरी सुखाच्या शोधात हातपाय मारणे त्याचे सुरूच असते. या कथेत असाच एक शेतकरी वडील आपल्या हक्काची काळी माती मिळवण्यासाठी. आपली जमीन मिळवण्यासाठी निघतो. लहान वयातच आईला पोरका झालेला त्याचा मुलगा आईच्या शोधात पंढरपुरात दाखल होतो. क्षणिक हव्यासापोटी पकडलेल्या पळवाटेवरून परततांना वडील चंद्रभागेच्या तीरावर हरवलेले मुल वडिलांचे नाते पुन्हा नव्याने शोधून काढतात. दुरून पाहिलेले आईचे क्षणिक सुख तो मुलगा जगू शकत नाही. जगाच्या विदारक चित्राने तो ही हादरून जातो. तरीही हरवलेलं काही तरी गवसल्याचे समाधान दोघांच्या ही चेहऱ्यावर असते. सुखाच्या कळसाला पाहत आणि वाहणाऱ्या चांदभागेच्या संथ लाटांवर गोष्ट संपते.
गोष्ट इथे च संपते पण यात आलेल्या काही गोष्टी या कथेला जिवंत ठेवतात. अगदी शेवटपर्यंत. आईला लिहिलेल्या पत्रात त्या मुलाचे आई विषयीचे कुतूहल कळते. त्यातल्या काही सुरवातीच्या ओळी “ प्रिय आईस,समदे म्हणत्यात मी आईसारखा दिसतो. असतो. मला तुझी लय आठवण येतेय ... “ आणि त्यानंतरचा तिचा शोध. अचानक चोरीला गेलेल्या सामानाची चिंता. पोलीस चोरलेल्या, हरवलेल्या गोष्टी शोधून देतात. “ मग माझ्या आईला शोधून देतील हे...! या निरागस उत्तरावर सुरू झालेली सुखाची आणि प्रेमाची शोधयात्रा.
मंदिराबाहेर रांगेत मोकळ्या हाताने शेजारीच पाहिलेली विठ्ठलाची मूर्ती. भेटत गेलेले एक एक व्यक्ती त्यातून सांगितलेली एक छोटीशी गोष्ट “ आपण चमत्काराची अपेक्षा करतो पण तो घडत नसतो. घडवायला लागतो. “असा संदेश देत कथा शेवटाला येते.
“ आला डोळ्यात उजेड, झाली मनात पहाट
आज घावली घावली. पावलांना नवी वाट.
हे उधळल काळजात रंग आनंदाचा दाट.
आज हसऱ्या गंधान वारा वाहतो भन्नाट...
मन आतुर आतुर घेण्या सपानाची गाठ.
ओढ लागलीया गोड. पाय चालली जोमात.”
या चित्रपटातल्या ओळी मनाला स्पर्श करतात.
पळवाट काढता काढता पूर्ण प्रवास करून पुन्हा त्याच काळ्या मातीत तो येतो. तेव्हा जमीन ही त्याची असते. घर ही आणि ते रिंगण पूर्ण होते. शेवटी मुलाच्या रिंगणात आईरुपी बाप भेटतो. बापाच्या रिंगणात एक शेतकरी आणि मुलाचे स्मित हास्य भेटते.
चित्रपटातल्या काही लक्ष वेधून घेणाऱ्या ओळीवर हा चित्रपट नक्कीच यशाचं रिंगण पार करतो. सरतेशेवटी एक गोष्ट सांगावीशी वाटते, आपले रिंगण हे आपण निर्माण करतो. कधी कधी ते आपसूक तयार होते. त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग समोरच असला तरी तो दिसत नाही. समजत नाही. तेव्हा त्याच अस्तित्व स्वीकारावं लागतं. एकरूप होऊन त्या वाटेवर चालावं लागतं तेव्हा कुठे प्रवास सुखकर होतो. आणि या ओळी मनात कोरल्या जातात.
“ मार्ग दावतेस ठायी ठायी, माझे सावळे विठाई !
कसा होऊ उतराई, माझे सावळे विठाई , माझे सावळे विठाई “

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...