Sunday, 5 December 2021

रेतीवरचा किल्ला

    खळाळत्या लाटांची गाज ऐकत समुद्र किनारी लाटांच्या सहवासात वेळ घालवायची संधी मला मिळाली. तिथलीच एक आठवण. सुरेश वाडकरांच्या आवाजात “ दूर किनारा राहिला, बेभान वारा धावला ...माझी रे...माझी रे “ गाणं कानात सूरु होते. त्यात लाटांचा आवाज. मी त्यात तल्लीन झाले.

    सुख म्हणजे नक्की काय ! आजूबाजूला जग धावत असतं. समुद्र ही शांत नसतो. तरी पण आपलं मन स्थिर असतं. बराच वेळ त्याच अशांत लाटांवर शांत मन रमत जातं. अशा वेळी नव्या कोऱ्या कपड्यांना लागलेली वाळू ही तिथल्या आठवणींसोबत घरी नेण्याची इच्छा होते.

    मी बसलेले तिथून थोड्या अंतरावर दोघांचा किल्ला बनवण्याचा उपक्रम सुरू होता. “ रेतीवरचा किल्ला “ बनवत होते.

    बराच वेळ गाण्याच्या धुंदीत रमून झाल्यावर मी त्यांच्याजवळ गेले. तयार होत असलेला किल्ला पाहिला. “ वा ...काय भारी किल्ला केला! “ म्हणले. किल्ल्याच्या समोर वाळूतच त्यांनी त्या किल्ल्याचं नामकरण केलं होतं. उभ्या आडव्या रेषा काढून तिथं “ रेतीवरचा किल्ला “ त्यांनी लिहिलं होतं. त्याला तिथल्याच गारगोटी दगडांनी सजवलं होतं. काही तरी वेगळं, इंटरेस्टिंग वाटलं मग तिथेच थांबले. शेजारी बसले. पुढे काय करतात ते पाहत होते. किल्ला जवळ जवळ तयारच होता. तोंड ओळख झाल्यावर मी किल्ल्याविषयी त्यांना विचारले.

    खरंतर किल्ला म्हणजे वाळूचा भला मोठा डोंगरच होता. ज्यावर वाळूचीच छोटीशी विहीर होती आणि टोकावर एक लांब दांड्याचे पान त्या किल्ल्याचा झेंडा झाला होता. बाजूला वाळूचीच तटबंदी वजा कुंपण. त्यालाही तिथे हुडकून काढलेल्या शिंपल्याची सजावट. किल्ला अगदीच लक्षात राहण्यासारखा झाला. त्याचे कारागीर दहा बारा वर्षाचे होते.

    तो किल्ला आणि तो तयार झाल्याचा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या दिवसाची आठवण म्हणून सोबत होता. किल्ला जवळून पाहिला. त्या किल्ल्याला वाट कुठून दिसत नव्हती. मी त्यांना विचारले, “ किल्ला छान झाला पण त्याला वाट आणि दरवाजा नाही. आजूबाजूचे लोक पाहायला आत येणार कसे ! त्यावर एक जण म्हणला “ किल्ला तर आता तयार झाला. वाट आणि दरवाजा केला तर पूर्ण किल्ला कोसळेल; त्यापेक्षा राहू दे तसा ... तो रेतीवरचा किल्ला आहे. पाणी जसे जसे जवळ येईल रेती हळूहळू वाहून जाईल आणि आपोआप वाट तयार होईल. “

    मी हसायला लागले. खर तर ते पटण्यासारखे उत्तर होते. वाट निर्माण करता नाही आली तरी ती मिळण्याची वाट पहावी. तो किल्ला ही पाहण्यासाठी लोक “ वाट “ मिळण्याची “ वाट “ पाहतील. तोपर्यंत लाटांना त्याच्या जवळ येण्यासाठी शर्यत करू दे ! असं मनात येऊन गेलं.

   किल्ल्याच्या शेजारी चार शिंपल्यांची एकमेकांवर रचून छानशी होडी केली होती. त्या होडी विषयी विचारलं तर ती होडी म्हणजे त्या रेतीवरच्या किल्ल्याची “ दर्याची राणी. “ भारी मेहनतीने ती बनली होती. तिला किल्ल्याच्या बाहेर का ठेवले विचारलं तर “ लोक जेव्हा किल्ला पाहायला येतील तेव्हा पहिलं या राणीला पाहतील आणि मग रेतीवरचा किल्ला. “ “अशी मौलवान होडी मग ती किल्ल्यात सुरक्षित राहिली असती “ अस मी म्हणलं तर त्यातला एक जण म्हणला “ तिला समुद्र पाहायचा असतो ना ! इथून तिच्या सतत डोळ्यासमोर राहील. म्हणून तिला बाहेरच ठेवले.

    होडी शिंपल्याची जरी असली तरी तिची ओढ समुद्राकडे ...कारण तिला पहिल्यांदा तिथेच त्या मुलांनी पाहिलं होतं. हे आणि असं बरंच मनात रचलं होतं. समजलं होते. तेव्हा दुरून एक बाई टोपली घेऊन जवळ आली. त्या दोन मुलांना घेऊन जाण्यासाठी त्यांची आई आलेली. त्यांची आजची मोहीम संपली होती. त्यांच्या परतीची वेळ होती. जाता जाता त्यांना म्हणले “ उद्या येणार ना परत इथे ? “ लाटांचे पाणी आत आले तर ? “ मुलं म्हणली “ हो उद्या येऊ परत ...राणीला घेऊन जातो फक्त, ती या किल्ल्याची शान आहे. रेतीवरच्या किल्ल्याला लाटांची सवय आहे. पाणी आलं तर पुन्हा बनवू. चल बाय बाय ताई “
   पाठमोऱ्या त्यांच्याकडे मी किल्ल्याशेजारी उभं राहून पाहत होते. इतक्यात एक लाट आली. लाटांचे पाणी जवळ आलंच होतं. पण आत आलं नाही. कुंपण मोडून आत येण्याचा हट्ट त्यांनी केला नाही. कदाचित किल्ल्याच्या आत जाण्याची वाट त्यांनाही मिळाली नसावी.



निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...