एक आनंदी चेहरा कितीतरी जणांसाठी औषध होऊ शकतो. सकाळी चालायला गेल्या असताना आजी नातवाचे बोलणे सुरु होते. न कळत मी आजीकडे पाहिले. हसत हसत आजी आपल्या नातवाचे कुठल्याशा कारणावरून कौतुक करत होती. तो ही त्या कौतुकाने खुश होत होता. ते आनंदी चेहरे पाहून मनात सहज एक विचार आला. आजवर डोळ्यासमोर आलेल्या आनंदी चेहऱ्यांची झलक झर झर समोरून गेली. देव प्रत्येकाला काही तरी विशेष देतो ना, एखाद्याच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य ही तो तसेच देतो. कारण पुढे जाऊन ती ही त्यांची ओळख होऊ शकते. असे चेहरे पाहण्याची पुढे सवय लागते.
मला आठवते चौथीत असताना आमच्या वर्ग शिक्षिका जशा वर्गात यायच्या तसे आम्हाला डोळे बंद करून भगवतगीतेतले अध्याय म्हणायला लावायच्या. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी ती स्माईल असायची. जेव्हा सगळे डोळे बंद करायचे तेव्हा मध्ये मध्ये म्हणताना मी डोळे उघडून गुपचूप त्यांच्याकडे पहायचे. त्यामुळे दिवसाची सुरुवात भारी होते असं तेव्हा मला वाटायचं. एखादा दिवस त्या वर्गांवर आल्या नाहीत कि चुकल्या चुकल्या सारखं ही वाटायचं. पुढे शाळा संपली पण आज ही या आठवणी अजून ही तशाच ताजा आहेत. कालच घडल्या सारखे.
शाळा शिकायचे दिवस गेले. नंतर मी शाळेत शिकवायला जायला लागले. तिथे ही असे आनंदी चेहरे होते. त्यात ही आमच्या शाळेतल्या मावशी. त्यांच्या हसण्यामागची सकारात्मकता कधी च संपू नये असे मला वाटायचे. दिलखुलास हसणे म्हणजे मावशी असे समीकरण मी मनात करून घेतले होते. जो पर्यंत मी तिथे शिकवायला होते क्वचितच मी त्यांना चिंतेत पाहिले. घरी असंख्य अडचणी असल्या तरी त्या कायम उत्साह आणि आनंदच वाटायच्या. कालांतराने मी शाळा सोडली आणि काही वर्षांनी कळले, त्या मावशींना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. पहिला विचार मनात आला की तो चेहरा आता बदलेल का ? सुदैवाने त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. कदाचित जे त्याच्याकडे आनंदी राहण्याचे औषध होते ना त्यानेच त्यांना शक्ती मिळाली.
आज जेव्हा मी विद्यार्थ्यांशी बोलत असते तेव्हा त्यांच्यात असेच आनंदी चेहरे असतात. धावणाऱ्या विश्वाला थोडे थांबवून आनंद घ्यायला शिकवत असतात. तरी कधी ती चेहऱ्यावरची स्माईल डोक्यावरच्या आठ्या मध्ये रूपांतरित होते ते आपले आपल्यालाच कळत नाही. अशा वेळी हे आनंदी चेहरे हा बदल पाहतात किंबहुना आपुलकीने विचारतात. हरवलेल्या गोष्टी यातच मिळून जातात.
कधी ते विचारतात “ आम्हाला विसरणार नाही ना, आमचे कॉलेज संपल्यावर? “ तेव्हा त्यांना माहीत नसते की एक वेळ शिकवलेले, पाठांतर केलेले विसरले जाईल. पण या गोष्टी विसरल्या जात नाहीत. उलट मोकळ्या वेळात त्या गोष्टी आठवून आठवून आपण चघळत राहतो. आणि नवीन सुरुवात करण्यासाठी तेच पुरवून पुरवून उद्यासाठी ठेवत असतो.
असे हे आनंदी चेहरे किती जणांसाठी औषध असतात. गरज असतात. मी टाटा कॅन्सर हॉस्पिटल खारघर येथे जेव्हा प्रोजेक्ट करत होते. तेव्हा तिथे व्हील चेअर वरच्या लहान मुलांना पाहून, तिथे येणाऱ्या वृद्ध आजी आजोबांना पाहून वाटलं इथे या औषधाची गरज आहे. त्यांनतर मी कॉलेजच्या एन एस एस च्या माध्यमातून कॅम्पला गेल्या असताना वृद्धाश्रमाची भेट घेतली. तिथल्या अंधाऱ्या वातावरणाला पाहून वाटले इथे या औषधाची गरज आहे. जेव्हा मी मंदिराच्या बाहेर अपंग तरुण व्यक्तीला याचना करताना पाहते तेव्हा वाटते इथे ही गरज आहे. शिकायला आलेल्या मुली संसार सावरत कसरत करत परीक्षेला येतात तेव्हा ही वाटते. फार काही नाही. आनंदी चेहऱ्याचे हे दान. सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला सहज देता येणारे हे दान आहे. ज्याची किती तरी ठिकाणी गरज आहे. अन्नदान, ज्ञानदान, अर्थ दान तर आपण करतो पण हे दान किती जणांना सुखावून टाकते. तक्रारी किती कमी होतात? अचूकतेकडे प्रवास करताना चुकून घडलेला एखादा विनोद, एखादा प्रसंग आपण किती जगतो? नुसते निर्वीकार, निरागस हसणारे मुलं केवढे सौंदर्य घेऊन येते!
आपण फोटो काढताना म्हणतोच की “ स्माईल प्लिज. “ कधी कधी बोलताना , ऐकताना ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला टिपत असते. न कळत त्या चेहऱ्याचा फोटो काढतच असते आणि आयुष्य भर तो चेहरा मनात सेव्ह करत असते, ज्याची आपल्याला साधी कल्पना ही नसते. शब्दांनी ज्या गोष्टी जुळून येत नाहीत. बोलण्याने ही ज्या गोष्टी अपूर्ण राहतात. त्या गोष्टी कधी कधी हसऱ्या चेहऱ्याने सहज शक्य होतात. तेव्हा स्वतः साठी, इतरांसाठी कधी सहज आपण म्हणू शकतो,
“ स्माईल प्लिज ... “