Thursday, 26 May 2022

पुस्तक मनोगत : अमृतवेल

मज अधिक राहाया नको
तु आग्रह आता करू
कारण या जगतावर
मी केवळ वाटेकरू....
या पुस्तकातल्या काही ओळी कथेचा संपूर्ण प्रवास सांगत असतात. उमललेल्या कळ्यांची फुले होताना पहावं. ती फुलता फुलता सुंदर होणारा तिचा भवताल पहावा. हळूहळू बहरलेली ती वेल. त्या वेलीवरची फुले अचानक सुकून जावी. गळून पडावी. पुन्हा ती वेल नव्या कळ्यांनी बहरत जावी. तितकीच ती पुन्हा सुंदर दिसावी. अशी “ वि. स खांडेकर “ यांची ही “ अमृतवेल “
पूर्ण पुस्तक वाचल्यावर मनातले भाव विश्व इथे मांडायला घेतले. एखाद्या रंगमंचावर सुरु असणारे सादरीकरण पाहताना एके ठिकाणी आपण अभिनय पाहतो. त्याच्या मागे पडदा. पडद्याआड वेगळे विश्व असते. समोर सुरू असते ते आपल्या दृष्टीस पडते. त्यावर विचार होतो. आपली मते तयार होतात. रंगमंचावरचे सादरीकरण झाले की पडद्याआड जाऊन पाहिले की कधी कधी कथा आणखी वेगळ्या रुपात समोर येते. पूर्ण चित्र कळते. हे पुस्तक वाचताना कथा कधी पडद्याच्या अलीकडे तर कधी पलीकडे अशी रंगत गेली. वाचताना हा आड पडदा सतत दूर करत पूर्ण चित्र शेवटच्या पत्रात दिसले.
या कथेतील पात्र नंदा, वसुंधरा, माधुरी, देवदत्त, दादा, बापू हे मुख्य सूत्रधार. शेखर, दासबाबू, देवदत्तचे आई, वडील, सावित्री हे पडद्याआडचे कथा रंगवणारे सूत्रधार. प्रत्येकाची भूतकाळात एक दुखरी बाजू असते. कठीण भिंतच असते. ती ओलांडून एक तर काही जण पुढे येतात. काहींचे विश्व् त्या भिंती पलिकडेच थांबते. ही भिंत म्हणजेच तो पडदा. कधी कधी ती भिंत ओलांडणे आणि पूर्ण चित्र / पूर्ण सत्य पाहणे कसे गरजेचे असते. हे या कथेतून समजते. देवदत्तला उशिराने मिळालेल्या पत्रातून ते कळते.
भूतकाळाच्या भिंतीला धरून बसलेल्या नंदाला दादांचे म्हणणे कानापासून मनापर्यंत पोहोचण्यासाठी काय दिव्य करायला लागते? प्रियकराच्या वियोगाने समुद्रात जल समाधी घेणाऱ्या नंदाच्या आयुष्यात देवदत्तच्या येण्याने काय होते ? देवदत्तला मिळालेले वसूचे प्रेम का समजू नये ? प्रेम विवाह करून ही दोघांच्या आयुष्यात दुरावा का येतो? आणि लहानपणीच्या भूतकाळातील लाजिरवाणे वाटणारे सत्य पूर्णपणे समोर आल्यावर देवदत्तची पाऊले वाड्या बाहेर का पडतात ? अशा प्रश्नांची उत्तरे ही कथा पूर्ण वाचता वाचता मिळत जातात.
माणसाच्या मनात असंख्य विचार येत असतात. सतत. कोणत्या तरी विचारावर येऊन आपण स्थिर होतो. “ मैत्री “ आणि “ मृत्यू “ या दोन अक्षरी शब्दांचे अर्थ सांगणारी भाव विश्व इथे सतत समोर येतात. कधी काळी आत्महत्येसाठी जवळ केलेल्या समुद्राजवळ जेव्हा नंदा पुन्हा जाते. तेव्हा तिच्या मनातली “ मृत्यू “ ची जागा मैत्री ने घेतलेली असते. देवदत्त मध्ये पाहिलेली मैत्री, वसू मध्ये पाहिलेली मैत्री. देवदत्त वरचे तिचे निस्वार्थी प्रेम
अधोरेखित होते.
आपण स्वप्न पाहतो. त्याचा पाठलाग करतो. त्याला गाठतो. जिवलग व्यक्तीची साथ सुटते. स्वप्न भंगते. काळाच्या पडद्याआड ती व्यक्ती जाते. सगळे संपल्यावर ही भूतकाळातील आठवणीना सोबत घेऊन आपण उभे राहतो. पुन्हा चालू लागतो. धावू लागतो. आंतरिक ओढ खुणावत राहते. त्या पडद्याआडच्या विश्वातून आपण बाहेर पडतो. जशी नंदा पडली होती. देवदत्त ही पडला. हे चक्र सुरू राहते. “ अमृतवेल “ निष्पर्ण होत नाही. ती तरीही बहरत राहते.

Tuesday, 10 May 2022

अंतर

   तो बाक आजकाल मला वाकलेला भासतो. त्याचा कणा मोडल्यासारखा. रोज पाहते. वेगवेगळ्या चेहऱ्याची, स्वभावाची, विचारांची माणसे येतात. बसतात. निघून जातात. पुन्हा येतात. एक निरीक्षण गेले काही दिवस मी करते. अनुभवते. ऐकते. वाकलेल्या बाकाची गोष्ट.
    आठवड्याच्या सुरवातीच्या दिवसात एक विनोदी जोडपे येऊन बसते. कदाचित आधीचे घनिष्ठ मित्र मैत्रीण असावेत. तिचा सततचा हसणारा चेहरा आणि त्याचा एक हसवणारा चेहरा. त्याच्यासोबत तो बाक ही तेव्हा हसतो. दोन दिवस उलटले की त्याच बाकावर बसायला येते एक असे जोडपे. धाडस करत, काटेरी गुलाब आणणारी बिनधास्त ती आणि गुलाबाचे काटे लागू नये म्हणून काळजीपूर्वक ते बाजूला करणारा तो. एकमेकांना अगदी विरुद्ध पद्धतीने प्रतिसाद देत असतात. पण त्यात ही गंमत असते. बाक त्यांची ही मजा घेत असतो. आठवड्याच्या पुढच्या दोन दिवसात एक कुटुंब येते. तिघांचे. सोबत येणारी लहान मुलगी सुकलेल्या पानांचा ढीग करून समोर खेळत बसलेली असते. तिथल्या वाळूत ती रमते. मातीत खेळते. बाकाच्या दोन्ही टोकाला ते दोघे बसतात. मधले अंतर फार असते. त्यात बाक ही लांब लचक. दोन टोकांचा संवाद मात्र नसतो. खेळणाऱ्या मुलीला हे अंतर तेव्हा कळत नसते. येतात आणि थोड्या वेळात निघून जातात. बाक थोडा थोडा उदास वाणा भासतो.
      आज पून्हा तिथे पाहिले. चित्र थोडे वेगळे होते. नवल वाटले. सुट्टीचा दिवस म्हणून कुटुंब पुन्हा आले. मुलगी पुन्हा पुढ्यात पाला पाचोळा घेऊन बसली. पुन्हा बाकाची दोन्ही टोके भरली. पण झाले असे की ते दोन हसरे चेहरे नेमके त्याच वेळी तिथे बसायला आले. त्याच बाकावर. तेच आधी पाहिलेले चेहरे. हसरे चेहरे. त्यांच्या जागेसाठी या दोन टोकावरच्या कुटुंबाने आपले टोक सोडले. थोडे अंतर कमी केले. आता शेजारी हसणारे चेहरे आले. त्यांना पाहून सुकलेल्या पाला पाचोळ्यात रमलेली ती त्यांच्याकडे आली. पुढच्या काही वेळेत आणखी एक जोडपे आले. तेच पूर्वीचे गुलाबी चेहरे. ते येऊन दुसऱ्या टोकाला बसले. पुन्हा थोडे अंतर कमी झाले. दोन्ही टोक वेगवेगळ्या विचारांनी भरलेली दिसू लागली. आता अंतर फार कमी उरलेले पण तरीही ते होतेच. गुलाबाचे फुल घेऊन ती त्यांच्या जवळ आली आणि अंतर मिटून गेले. बाक भरला. एकमेकांशी संवाद झाला. बाक थोडा वाकला ही असेल. पण यावेळी तो हसत होता कारण आता माणसांचे ओझे नव्हते. नात्याचे वजन होते.

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...