Monday, 31 August 2020

विघ्नहर्ता



       गणेशोत्सव म्हटला की पहिले आपल्या डोळ्यासमोर येते, ते बाप्पाचे सिंहासनावर आरूढ झालेले रूप, गणांचा अधिपती ...गणपती. आपण त्याची लेकरं आपापल्या श्रद्धेप्रमाणे, अनुभवावरून त्याला विविध रुपात आणि नावाने आभूषित करतो. तो रचनाकार आहे, कधी तो न्यायाधीशाप्रमाणे प्रत्येकाचा  न्याय करणारा हरिश्चंद्र आहे, तर कधी लहान मोठ्या चुकांना पदरात घेणारी माऊली, कधी मित्रत्वाच्या प्रेमाने आपल्या अडचणी ऐकणारा सुदामाचा कृष्ण आहे, तर कधी गड जिंकायला शिकवणारा शिवबा आहे. कधी बुद्धीच्या जोरावर बाजी मारणारा बिरबल आहे तर कधी नव्याची निर्मिती करणारा संशोधक. एक ना अनेक विविध रुपात समोर येणारा....गणपती बाप्पा.

कालची गोष्ट आहे, बाप्पाच्या विसर्जनाला जोरजोरात ढोल, ताशाच्या ठेक्यावर नाचणाऱ्या लहानग्यांच्या टोळीत एक चिमुरडी अचानक घेरी येऊन पडली, जवळपास साखर लिंबू पाणी असे काही नव्हते. शेवटी बाप्पाला वाहिलेला प्रसाद तिच्या तोंडात पडला आणि क्षणभरात उठली. उत्साहात चिमुरडी बाप्पाला निरोप ही देऊन आली. " पुन्हा कधी येणार बाप्पा " असे आर्जवी प्रश्न ही विचारू लागली. अचानक कुठून ही शक्ती आली ?  जेव्हा तो येतो, कोणत्या रुपात माहीत नाही पण येतो तसा आपले गडबडलेले, विस्कटतलेले सावरून जातो. नुकताच झालेला पावसाचा प्रकोप आणि त्यातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी मिळालेले मदतीचे हात कोणी पाहिले, पण मदत करणारे दानशूर हात आपोआप एकत्र येतातअनोळखी नात्याच्या आधाराने का होईना आपल्या ताटातली भाकरी दुसऱ्याच्या ताटात घालावी वाटते. असा हा विघ्नहर्ता  विघ्न आणत नाही असे नाही, पण त्यातुन बाहेर पडण्यासाठी हात ही तोच देतो. सुखांची गणती तेव्हाच होते जेव्हा विघ्न दारात उभी असतात अन देव्हाऱ्यात  बाप्पा हे सारं पाहत असतो. जेव्हा विदारक दुःखातून त्याच्या असण्यावर शंका घेणारे नास्तिक मन व्हायला लागते तेव्हा आणि तेव्हाच या शक्तीची प्रचिती येते आणि मग इलाज करून थकलेले आई- वडील त्याच्या मुलाला बरे होताना , निर्विकार हसताना पाहतात. गरिबीचे चटके बसलेले हात लक्ष्मीने भरून वाहू लागतात. आईच्या मायेला पोरके झालेल्या कुणाला मातृत्वाचे छत्र मिळते. वासनेच्या आहारी गेलेले मन बाप्पाच्या नामस्मरणात मग्न होते. कोरडे पडलेले अंगण मुलाबाळांनी भरून निघते. उदासीनता संपून उत्साहाला उधाण येते. विघ्नहर्ता तेव्हा फक्त मूर्तीत नाही तर माणसात, या निसर्गात किंवा निर्जीव वस्तू मध्ये ही दिसायला लागतो. असा हा विघ्नहर्ता प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी भेटतो. गरज असते त्या विश्वासाची आणि श्रद्धेची, म्हणून एके ठिकाणी म्हटले आहे,

गणाचा गणपती, विघ्नाचा विघ्नहर्ता, तू सुखकर्ता, तूच कर्ता आणि करविता

Sunday, 30 August 2020

पूर्णब्रह्म

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होता नाम घेता फुकाचे, जीवन करीची जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म " मधल्या सुट्टीची एकदा बेल झाली की एकसुरात ही प्रार्थना म्हणायची आणि प्रत्येकाच्या डब्यावर ताव मारायचाआपल्या पोटाला आणि घरी आईला खुश करून रिकामा डबा पुन्हा घरी जायचा. आपला डबा उघडण्याची उत्सुकता आणि मित्रमैत्रीणीच्या राऊंडात बसून एक एक करत सगळे जेवण व्हायचे. आज कँटीन मध्ये डबा उघडला, आणलेली खिचडी पाहिली. शेजारी बसलेल्या ताईंनी आज संकष्टी का? “ विचारलं.

खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी लहानपणीपासूनच उपवासाची आणि व्रत वैकल्याची वाट पाहायला लागायची. घरच्या गृहिणीची आणि देवाची साथ असेल तर खिचडी  ठरलेली.

आता नुकत्याच सुरू झालेल्या दिवाळी सणाची रंगत वाढवण्यातही फराळाचे अनन्य साधारण महत्व आहे. चकली, चिवडा, करंजा, लाडू अशी भरगच्च पौष्टीक मेजवानी दिवाळीत असते. मोदकाशिवाय गणपती, पुरणपोळी शिवाय होळी, तिळगुळ आणि संक्रात, वेगळंच त्याच्यात नात, अशी सणाची आणि या खाद्यपदार्थांची जोडगोळीच म्हणावी लागेल. " खाणार त्याला देव देणार " अशी आपली भारतीय सण समारंभाची रेलचेल, त्यामुळे " मस्त खा आणि मस्त राहा " इतकं साधं जगण्याचं लॉजिक फोलो करणारे आपण ताटातील वरण भात ही तितक्याच आत्मीयतेने खातो. जेवणाविषयी किंवा आपल्या रोजच्या आहाराविषयी बोलायचे झाले की हमखास निघणारा विषय म्हणजे वजन आणि डाएट... वाढलेले शारीरिक आणि मानसिक आजार याची जर एखाद्याने कारण शोधली तर त्याचे मूळ हे आपल्या ताटात आणि पोटात मिळते. बऱ्याच वेळा आपल्याला त्या पदार्थाची नक्की चव ही कळत नाही, फक्त पोट भरत. पदार्थाची चव तेव्हाच कळते जेव्हा डोळे, जीभ, नाक, आणि शेवटी पोट अशा सगळ्यानी चाखून पहिले जातेखाल्यावर पुढची दहा मिनिटं तरी त्याची चव जिभेवर  रेंगाळत राहते " पोट भरलं पण मन नाही " अशी दाद आपोआप समोरून येते. तेव्हा कुठे ताटातले अन्न पूर्णब्रह्म होते.  

Friday, 28 August 2020

ग्लोबल बाप्पा

   

“ ऐकलं का मामा, ही लांबच्या लांब रांग कसली म्हणायची ? मी आताच गावच्या येष्टीने ह्या समोरच्या आगारात उतरलोय ? तिथून सापशीडीच्या डावा परमाने खुनांनी बोर्ड रंगवल्यात, ती बघत बघत हित पोचलो. हित कोणी पुढारी येणारे का ? की कोणी शारुक, सलमान...." सदाभाऊ रांगेत उभ्या असलेल्या समोरच्या व्यक्तीला उत्सुकतेने विचारू लागले.

त्यावर समोरच्या व्यक्तीने पहिला प्रश्न विचारला " तुम्ही मुंबईचे दिसत नाही, चतुर्थीच्या दिवसात मुंबईला येणे झाले नसावे तुमचे ?"

" न्हाय न्हाय मागल्या सनाला आलतो ? तवा चटदिशी आलो, अन पटदिशी वापीस गेलतो, आता हित शेजारच्या गल्लीत मित्राकड जायचं हाय. बाप्पाच्या दर्शनाला कवा पासन यायचं व्हत. मंग घेतली चार कापडं अन बसलो येष्टीत.."

समोरची ती व्यक्ती कौतुकाने सगळं काही ऐकत होती. एक स्मितहास्य मात्र चेहऱ्यावर कायम होतं.

सदाच बोलणं थांबलं, आणि ती व्यक्ती त्याला सांगू लागली " ही समोर पाहताय ना ती राजाची लाईन आहे, राजा म्हणजे आपला बाप्पा आणि इथला राजा, तुमचे मित्र नक्की राहतात कुठे ? रस्ता चुकलात का ? पत्ता असेल तर द्या मी तुम्हाला वाट दाखवतो.

त्यावर सदाच उत्तर आलं " पत्ता त्यो तर न्हाय? येक नंबर दिलता, त्यो बी आता हुडकावा लागेल या गाठूड्यात. फकस्त येष्टीतन उतरल्यावर डाव्या बाजूला सफेद बोर्ड दिसलं त्याच्या माग माग यायचं, त्यो बाप्पा घराकडं आनेल, हितकच बोलला बन्या. अन तसाच आलोया मी हित."

समोरच्या व्यक्तीने गोंधळलेल्या सदाला धीर दिला आणि बोलला " ठीक आहे, काळजी करू नका, हा राजा पोहोचवेल तुम्हाला मित्रा जवळ. या तुम्ही पण...आलाय तर दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहा."

सदा भाऊसाठी सगळंच नवं नवं होतं त्यामुळे त्यांनी प्रश्नांची सरबत्ती चालू केली.

" हित येवढी गर्दी असते का ओ बाप्पाला बघायला? आमच्या इथं तर नेत्यांच्या भाषणाला न्हायतर पाण्याचा टँकर येतो तवा होती. आन तिथं कोपऱ्यात सगळी काय मागतायत ? आमच्यात जत्रेला गावातल्या बायका फुल नारळ घेऊन बसत्यात ती बी वलीत..."

समोरची व्यक्ती उत्तरली " अहो हा बाप्पा इथला राजा मग राजेशाही थाट हवाच ना ? आत मध्ये जाऊया तिथं तुम्हाला राजाचा राजमहाल ही दिसेल. खूप सुबक आणि सुंदर कोरलाय. आणि ती पुढे गर्दी दिसतेय ना ती फुलं नारळासाठी नव्हे, तिथे राजाच्या दरबारात लवकर जाण्यासाठी कुपन्स मिळतात. त्यामुळे दर्शन वेळेत होते. इथे कोणाला थांबायला वेळ नसतो ना मग हे कुपन घ्यायचे कि थेट दर्शन.

सदा पुढे बोलू लागला " गावी आमच्यात एक गाव एक गणपती असं असतंय, त्याला तेवढी चार डोकी येत्यात अन राजा बिजा नसतो तिथं. गावात चार सालापासून दुष्काळ हाय. समद सुकलेय तवा राजा बी न्हाय रहायचा तिथं जास्त वेळ. गावच्या पाटीलकडे तेवढा असतो गणपती. त्यो बी वर्गनी मागून बसवत्यात चौकात. इथं भारीच हाय, एकदा बघतो राजाला. अन त्यालाच पत्ता इचारतो. "

"हो हो, अजून बरंच आहे. रात्री इथे रोषणाई असते. वेगवेगळे स्टोल्स लागतात. लोक रात्र रात्र या बाप्पाच्या रस्त्यावर आरामात फिरू शकतात. इथूनच जवळ स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे. तो नवसाला पावतो. मूर्ती लहान आहे, पण कीर्ती महान. लोक चार चार तास रांगेत उभे राहून त्याचे नवस फेडतात. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला इथे ही नवसाची स्पेशल लाईन दिसेल. बाप्पाला ही वाटत त्याच्याकडे भक्तांनी यावं म्हणून तो ही सगळ्यांना तसे कारण देतो. आता तर परदेशी पाहुणे पण येतात राजाला पाहायला, तो बघा तिथे उंच आणि गोरा माणूस दिसतोय ना तो कुपन्सच्या लाईन मध्ये...त्यालाही बोलावलं बाप्पाने "

त्यावर सदाभाऊ बोलले " व्हय व्हय त्यो का हाफ प्यांट वाला, राजाला बघायला असा कसा आला ह्यो पर, खुळी जनता दिसती हितली, अरे ह्यो दरवाजा इतका म्होटा... अन किती फुल टाकली हायेत रस्त्यात...लय म्होटा अन राजेशाही दरबार हाय बाबा तुमच्या राजाचा..."

"हो, हळूहळू बाप्प्पालाही ग्लोबल केलंय त्यामुळे थोडा लवाजमा वाढलाय. या सगळ्याच इंशोरन्स पण काढतात माहिती आहे का तुम्हाला. "

“ काय म्हणला ...काय काढतात " हसत हसतच समोरून उत्तर आले

" इंशोरन्स म्हणजे या सगळ्या सजावटीचा सगळा जमा खर्च ... राजाचे किंवा त्याच्या दरबारात चुकून नुकसान झालं तर पुन्हा करता येत त्यात...आज मंगळवार आहे त्यामुळे गर्दी जरा जास्तच आहे. सगळे भक्त चांगला दिवस पाहून येतात. आम्ही मंडपाच्या शेजारीच राहतो आणि खिडकीतून सार काही पाहत ऐकत असतो. कधी कोण vip आला की आम्हाला खिडकीतून बाप्पा सोबत त्याचे पण मुखदर्शन होते. नाहीतर आपण कुठे पाहणार समोरासमोर. रात्री महाप्रसादाला लांब लांबून आलेले भक्तगण थांबतात आणि दुसऱ्या दिवशी निघतात. बरेच जण देणगी आणि दान ही करतात. आपल्याला जमेल तस आणि जमेल ते. कोण रोख रक्कम, कोण प्रसाद, कोण सोन्याच्या वस्तु किंवा वह्या पुस्तक, जस जमेल तस. राजाच्या जीवावर बऱ्याच जणांची पोट अवलंबून आहेत त्यामुळे त्याच्याच कृपेने इथे भरभराट झाली आणि राजा ग्लोबल झाला. “

“ असं व्हय!” सदा कौतुकाने सारे ऐकत होता.

“ कोल्हापुरात झालेल्या महापुरात राजाच्या भक्तांनी ही मदत केली, तेवढाच खारीचा वाटा ? राजा आपल्याला मोठं करणार आणि त्याला आपण मोठं करायचं. बघा पाहता पाहता आपण राजाच्या चरणाशी आलो, आपल्याला कळलेच नाही."

भव्य राजाच्या मूर्तीकडे सदा एक सेकंद पाहतच राहिला. तेवढ्यात शेजारून आवाज आला " चला पुढे, चला पटापट, आगे बढो, आगे बढो...." आणि सदा आणि ती व्यक्ती बाहेर आले. बाहेर येताच त्या अपरिचित माणसाने शेजारीच असलेल्या त्याच्या घरी नेलं, चहा नाष्टा दिला अन सदा तिथून निघाला. जाता जाता त्याने विचारले,

 " तुमचं नाव काय म्हणला....पाव्हन? ती व्यक्ती बोलली " गजानन विघ्नहर्ते. "

सदा खूप खुश होता. राजाचा थाट पाहून डोळे दिपले होते त्याचे. म्हणून मनापासून आभार मानून तिथून निघाला. वरून खिडकीतून विघ्नहर्ते पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य अजून ही तसच होतं. तेवढ्यात एक माणूस सदाला भेटला.

" मित्रा तू कुठे होतास घर मिळालं ना, निघालास कुठे हे बघ माझी मुलगी खेळतेय समोर..." त्यावर सदा समोरूनच पुढे येता येता बोलला

" कुठं.....परत चाललेलो गावी, राजाला पाहून. तुझं घर काय घावत नव्हतं. शेवटी ते शेजारी राहणारे गजानन मामा नी मला इथे घरी आनलं अन चाय देऊन पाउनचार केला, अन तितक्यात तू हित भेटला."

" कोण गजानन ? हित नाय रे कोण गजानन, तुला फशीवला कोणीतरी चल घरला...बायकोला मस्त तुपातला शिरा करायला सांगतो...चल चल." सदाने मागे वळून पाहिले. आता ही मागेच खिडकी होती पण खिडकीत तेव्हा कोणीच नव्हते.


Thursday, 27 August 2020

प्रेमाची गोष्ट

   प्रेम जे प्रत्येकासाठी वेगळे, सुंदर विश्व् असते. मग ज्याच्यासोबत राहून हसावस वाटत किंवा रडावस वाटत. ज्या व्यक्तीची किंवा कोणत्याही गोष्टीची सोबत आयुष्यभर राहावी म्हणून आपण त्याची जीवापाड काळजी घेतो, त्याला आपल्यापासून दूर नेण्याच्या कल्पनेने मनात धडकी भरते. पण फक्त मला ती आवडते किंवा तो आवडतो यावर हे गणित सुटत नसते. ती आवडते यात ही मनात बरेच संभ्रम असतात. आवडते मग ती आपलीच का ? आणि आपली नसली तर त्यामागे उसने दुःख ही ओघाओघात आले. मग आपले नाही ते मिळवण्याची धडपड आणि स्पर्धा.
पुढे या सगळ्या लहान सहान आवडी निवडी लग्नापर्यंत आल्या तरी हा पेच काही सुटत नाही. काहीही झालं तरी एखादी वस्तू किंवा व्यक्ती फक्त आवडते किंवा नाही आवडत मग ती जवळ असते, पुढे लहान मोठी वादळे येऊन जातात, दुरावा येतो आणि उरते ते प्रेम.
मला कधी कधी प्रश्न पडतो, खरच प्रेम ही भावना क्षणभंगुर आहे का? तसे असते तर पहाटेच्या अंधारात प्रकाशाची नवी किरणे अंगा खांद्यावर घेताना पक्षांनी निष्पर्ण झाडाच्या बुंध्याचा आणि फांद्यांचा आधार का घेतला असता? कोणतेही रूप नसलेले फांद्याच्या सापळ्या सारखे भासणारे हे झाड पहाटे पक्षी जवळ करतात, त्यांचा किलबिलाट आणि साजिरे दिसणारे सकाळचे दृश्य, त्या दिसण्यातली सुंदरता मागे सारून अनुभवातले साजरेपण अधिक आवडू लागते. जेव्हा एखाद्याचे वास्तव्य आपल्याला आजूबाजूला जाणवते किंवा नसतानाच त्याची उणीव किंवा रिकामपणा जाणवतो ती आठवण. माफी आणि दया, बदलाची सुरवात, परत माघारी येणं, प्रामाणिक असणं, समजून घेणं आणि समजून सांगणं यात लपलेलं प्रेम. जिवलग होण्यासाठी एवढं पुरेसे असू शकते.
कधीतरी चुकीच्या रस्त्यावरून दटावून पुन्हा मार्गस्थ करण्यात, काळजी आणि माया दोन्हीचा संगम, कधी कधी एकमेकांवर अवलंबून असणं, न केलेल्या, कधी न पटणाऱ्या गोष्टी कधी कधी स्वीकारणं. प्रदर्शन नाही किंवा स्पर्धा नाही, असतो तो संयम आणि प्रामाणिकपणा. जसे सोनं दागिन्यांत सजवलेलं असो किंवा नाण्यात, कोणत्याही आकारात, रुपात ते चमकणारच, तसे प्रेम जाणवते, कधी डोळ्यात तर कधी स्पर्शात. असे हे प्रेम आणि अशी एका प्रेमाची गोष्ट.

Wednesday, 26 August 2020

फुललेला गुलमोहर एक गुपित

   

'माझ्या अंगणातील झाड आणि प्रेम' ऐकायला थोडे वेगळे वाटेल पण त्यात ही गंम्मत आहे. आपण सिनेमामध्ये  प्रेमकथा नक्की पाहिल्या असतील पण ही जगावेगळी अजब गजब प्रेमकथा आणि ती ही त्या बहरलेल्या गुलमोहराशी. हो, मी पाहिली आणि ती शब्दात रेखाटण्याचा प्रयत्न केला. आम्ही शेरवली पाड्यावर एकदा ट्रेकिंग आणि कॅम्पला गेलो होतो. तेव्हा मला ती  भेटलेली. तिथेच पाड्यावर. गाणी म्हणत आम्ही सगळे बसलेलो. ओघाओघामध्ये तिथल्या आजू बाजूच्या हिरव्या गार वनराईवर विषय पोहोचला, तेव्हा ती आमच्या समोरून उठून मागे गेली. तिथूनच मागच्या बाजूला एक मोकळं रान होतं. माझी तिची गट्टी छान जमली होती. त्यामुळे तिच्या पाठोपाठ मी ही गेले, तिच्याही नकळत. एक टक मातीकडे पाहत ती निराश होऊन विचारात गुरफटलेली, 'काय झालं तुला? ' माझा प्रश्न ऐकल्यावर आणखीनच गोंधळली. काहीही न बोलता तशीच ती आत तिच्या खोलीत गेली आणि पुस्तकात काही तरी शोधू लागली. मग मलाच खजील झाल्यासारखे वाटून तिथून मी काढता पाय घेतला आणि आमच्या वस्तीच्या जवळ येऊन बसले. आमची सगळ्याची चार दिवसांची जेवणाची सोय तिच्याच घरी केली होती. पुन्हा रात्री तिच्याशी बोलण्याचा योग आला. सहजच मी तिच्या खोलीत गेले. तेव्हा न राहून पुस्तक आणि त्यात काय शोधते विचारले. तिने उडवा उडवीची उत्तर देऊन वेळ मारून नेली पण आल्या आल्या पाहिलेला तिचा चेहरा आणि नंतरचे त्यावर बदललेले रंग मला नक्की काहीतरी सुचवत होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती तिथेच भेटली पण तेव्हा मातीला आंजारत गोंजारत त्यावर पाणी घालत असताना मी तिला पाहिलं. आता मात्र मी तिचे या मातीत दडलेलं गुपित हुडकून काढण्यासाठी हट्टच धरला. आमची वयं जवळपास सारखीच होती. त्यामुळे बोलण्यातली मोकळीक लगेच गवसली. तिच्या त्या दडून ठेवलेल्या गोष्टीची सुरवात तिच्या शिक्षणावरून झाली.

गावाबाहेर तिची वस्ती असल्याने शाळा मिळणे मुश्किल त्यात कॉलेजातले शिक्षण म्हणजे अशक्यच. म्हणून पुढच शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती गाव सोडून आलेली. अनोळखी शहरात सगळ्यात जवळचा तेव्हा तोच होता. तिच्या खोलीच्या खिडकीच्या आड लपलेला गुलमोहर!

दिवसाची सुरवात आणि शेवट त्याच्या डोकावणाऱ्या फांद्यांनी व्हायची. सगळेच नवे नवे असताना ती त्याच्या ग्रीष्मात फुललेल्या पिवळ्या नारंगी रंगानी सजलेल्या पाकळ्यांच्या, विस्तीर्ण पसरलेल्या फांद्यांच्या प्रेमात पडली. त्यावर येणाऱ्या रोजच्या चिमण्या पाखरानी जणू त्याचा रूबाब आणखी वाढायचा. एकदा  एकटेपणाच्या गर्तेत तिने त्याच्या पायाशी पडलेल्या बहुरंगी पानांच्या सड्यात त्याला घट्ट मिठी मारली होती. आपल्या आईच्या पदरची माया, वडिलांचा आधार, बंधुप्रेम आणि प्रियकराला वाटावी अशी ओढ आपसूक तिच्या आणि गुलमोहराच्या त्या झाडामध्ये  निर्माण झाली होतीनवे ऋणानुबंध जोडत होते. त्यानंतर ती नेहमीच तिच्या दिवसाचा जास्तीत जास्त वेळ तिथे द्यायची. अगदी जेव्हा एकटे वाटेल, जेव्हा परके वाटेल, जेव्हा स्वतः ला शोधावेसे वाटेल, जेव्हा पुन्हा प्रेमात पडावेसे वाटेल तेव्हा तेव्हा. कधी दिवसा, कधी रात्री त्याच्या फुललेल्या फांद्याच्या कुशीत आणि केशरी पिवळ्या पाकळ्यांच्या सतरंजीवर आरामात तासभर ती रमायची. त्याच्या सौंदर्याने तिच्या प्रतिभेला नवीन ओळख दिली आणि त्यातून तिने ही आपली स्वतः ची लहानशी जागा या दोघांच्या विश्वात निर्माण केली. दिवसामागून दिवस गेले तिचे शिक्षण पूर्ण झाले तशी तिच्या परतीचा योग जवळ आला. परीक्षा संपल्या. आपली खोली आणि त्या खोली बाहेर फुललेला तो गुलमोहर तिला विसरणे शक्य नव्हते. सोबत साठवलेल्या त्या आठवणी तिला काही केल्या पाय काढू देईनात तरीही मनाची एखाद्या लहान मुलाप्रमाणे समजूत घालून तिने परतीची तयारी केलीच. पुन्हा तिथे जायचे नाही ठरवून ही जाता जाता आपसूक तिची पाऊले त्या गुलमोहराच्या झाडाजवळ गेली. एव्हाना ग्रीष्म सरला होता, त्यामुळे गुलमोहराच्या झाडाचीही पानगळ झाली होती. निष्पर्ण झालेला गुलमोहर पाहून ती ही त्याला मिठी मारून एखाद्याने कानात गुपित सांगावं तस काहीसं बोलून गेली." तुलाही विरह सहन नाही झाला ना, म्हणूनच कदाचित कधी काळी रंगात नटलेला तू आज तुझे ही रंग उतरले, तुझेही अश्रू आज त्या फांद्यावरून गळून गेले बघ. आता तुझ्या या फांद्यावर खेळायला, बागडायला, तुझ्या पायाशी बसायला, तुझ्या सावलीत रमायला मी नाही, तू माझ्या घराच्या अंगणात असाच बहरून का नाही येत? फुललेला तुझा तो पिसारा मला माझ्या घरीही का नाही देत? पुढच्या ग्रीष्मात माझा प्रियकर बनून तू माझ्या घरामागच्या पडवीत नक्की ये. तुझी सावली माझ्या घराला आणि मला नक्की जवळ करेल. फक्त एकदा फुलून ये, आणि प्रेमाने माझा आता निरोप घे. नाही तर माझं ही मन आता तुझ्या पानासारखं गळून जाईल आणि तुला ते पहावणार ही नाही. इतकं बोलताच एक वाऱ्याची झुळूक येऊन तिच्यावर होत्या नव्हत्या चार दोन पाकळ्यांचा प्रेमाचा वर्षाव करून गेली आणि ती ही वेडी त्या पडलेल्या पानांना, पाकळ्यांना एकत्र करून आपल्या राहिलेल्या सामानासारख पुस्तकाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवत होती. तिचा गुलमोहर ती साठवून ठेवत होती अगदी हक्काने...

आज ही तिने त्या पाकळ्या जपल्या आहेत. अगदी तशाच. अजून ही त्या ताज्या आहेत, अगदी तेव्हा होत्या तशाच. आज ही त्या आठवणी आहेत तशाच फक्त गुलमोहर काही फुलला नाही पुन्हा तसा... बहरला नाही...नटला नाही तसाच. अंगण अजून ही वाट पाहते त्या फुललेल्या गुलमोहराची आणि ग्रीष्मातल्या प्रियकराची.

तिला आणि त्या ग्रीष्मात फुलणाऱ्या गुलमोहरात तीच माया, प्रेम आणि ओढ जाणवली जी आपण प्रेमाचं प्रतीक वगैरे समजतो. आता या अगतिक होणाऱ्या तिच्या मनाला ती च रिकामी जागा भरण्यासाठी पुन्हा गुलमोहर फुलवायचा आहे. वाढवायचा आहे. जगवायचा आहे. मी तिचे बोलणे ऐकून, त्या पुस्तकात लपवलेली ती फिक्या रंगाची पान न्याहाळली. तिच्या प्रेमाचे संकेत घेऊन आलेली पावसाची सर मला तिथे जास्त वेळ राहु देईनात. शेवटी आम्ही वाढणाऱ्या पावसाला शरण जाऊन ती रात्र तिच्याच घरी काढण्याचा निर्णय घेतला.

आज तिचे चेहऱ्यावरचे तेज काहीतरी वेगळेच सांगत होते. कालच्या तिच्या चेहऱ्यावरचे रहस्यमय स्मितहास्य मी बराच वेळ न्याहाळले होते. नेहमीपेक्षा वेगळी वाटली ती काल. आज ही ती तशीच प्रसन्न चेहऱ्याने आली माझ्या समोर. काही सांगायच्या आत ती माझे मनगट पकडून मला अंगणात घेऊन गेली. ती तिथेच उभी राहिली. मीच उत्सुकतेने पुढे पावले टाकली. तिथे एक सोहळा रंगला होता...पुनर्जीवनाचा...नव्या उमेदीचा...पालवी फुटण्याचा...मातीआडून एक हिरवे पिवळे कोंब जन्माला येत होते. त्याचाच तो आनंद सोहळा...मी अलगद त्यावरून हात फिरवला. तो पर्यंत ती ही आली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली " माझा प्रेमाचा गुलमोहर आज माझ्या अंगणात फुलला बघ."

Monday, 24 August 2020

ऑनलाईन शाळा

पावसाळा सुरू झाला होता. जून महिन्याची पहिल्या वहिल्या पावसाची जशी आपल्याला आतुरता असते तशीच आतुरता घराघरातील लहान मुलांना शाळेची. नव्या वर्गाची. नव्या पुस्तकांची. नव्या शिक्षकांची असते. यावेळी लॉकडाऊन मध्ये मात्र मान्सून काहीतरी वेगळीच शाळा घेतोय.
नेहमी राष्ट्रगीताने सुरू होणारी शाळा आज घरून सुरु झाली. रोजचे तास घर बसल्या पहायची ऐकायची वेळ यंदा जूनच्या सरींसोबत आली. थोड्या फार प्रमाणात हे शिवधनुष्य धारण करण्यात शिक्षक आणि विद्यार्थी यशस्वी झाले ही. पण याच ऑनलाइन शाळेत जेव्हा मुलांची आणि त्यात ही खोडकर विद्यार्थ्यांची एन्ट्री झाली तेव्हा एवढ्याशा फोन मध्ये सुद्धा वेगळेच नाट्य दिसले. कसे ते पाहण्यासाठी ही ऑनलाईन शाळा.
सकाळ सकाळीच मुलांनी शाळेला जायची तयारी केली. एरवी जिथे तासभर लागतो जायला आता एका मिनिटात वर्गात पोहोचले. शंभर टक्के चार्ज करून ठेवलेला फोन आणि फक्त एका बटनाच्या अंतरावर वर्ग आणि शाळा. शाळेत नवा तास सुरू झाला की सहसा बेल होते. यावेळी फोनवर अलार्म वाजला, नोटिफिकेशन आले आणि तास सुरू झाला. मॅडम आणि शाळकरी मुले उत्साहात तयार. वर्ग सुरू झाला तसे मॅडमनी विचारले, गृहपाठ केला का? चेहरे दाखवा तुमचे… प्रश्न कसे विचारायचे मग…. " तेवढयात रोहित जागेवरच उभा राहिला आणि “गुड मॉर्निंग टीचरर…” म्हणला तेही तालासुरात. मॅडम अजूनच संतापल्या. "अरे वाजले किती बघ. बारा कधीच वाजून गेले. मधली सुट्टी असते आता ..."
रोहित गडबडून म्हणला " सॉरी टीचररर… "
मॅडम पुढचा प्रश्न घेऊन तयारच होत्या " मित्र कुठे आहे तुझा ? “ “नेहमी तर सोबत असतो ना आता सोशल डिस्टन्स ठेवायचे ठरवले वाटतं. “
रोहित गालातल्या गालात हसत म्हणला " हो टीचर, म्हणून आता मी इथे झूम वर आणि तो फेसबुक वर आहे...किती अंतर आहे बघा आमच्यात. मी घेऊन येऊ का त्याला वर्गात "
मॅडम म्हणल्या " हो सांग त्याला तास सुरू झाले आणि तुमची वेगळी मिटिंग सुरू करू नका म्हणजे झालं "
" चला बाकीच्यांनी सांगा लॉक डाऊनच्या सुट्टीत काय काय केलं ? "
सुदर्शनने सुरवात केली " मी जेवण केलं मॅडम ..."
सखी दबक्या आवाजात म्हणली " ते आम्ही रोजच करतो "
मॅडम म्हणल्या " केलंस की बनवलं आणि काय काय बनवलं "
सुदर्शन अगदी उत्साहात म्हणला " डाळ भात आणि पापड "
सगळेच हसले.
सुधीर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये म्हणला " त्यात काय एवढं ...हे मला पण तर येत "
मॅडम म्हणाल्या " असे का ? सांग मग काय काय लागत साहित्य ? "
सुधीर पुन्हा त्याच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये डाळ, तांदूळ आणि एक होकिन्सचा कुकर. पापड ते पण लिज्जतचे "
सगळे पुन्हा हसले. स्पीकर ऑन असल्यामुळे प्रत्येकाच्या घरून आवाज येत होता.
सुदर्शन म्हणला " मॅडम डाळ कोणती वापरायची होती ओ विसरलो. "
मॅडम कधी त्यांच्या या खानावळीत शिरल्या कळले ही नाही नंतर त्या ही मास्टर शेफच्या भूमिकेत गेल्या. " त्यात तूर डाळ नाही तर मूग डाळ लागते सुदर्शन ...इथूनच सुरवात आहे अजून " मॅडम हसल्या.
समीर म्हणला " मॅडम आणि तीन शिट्या ना ..."
मॅडम होकारार्थी मान हलवत म्हणल्या " हो ...चला आता चर्चा बास "
सुधीर म्हणला " मॅडम उद्या बिर्याणी आणि रायता घेऊया "
मॅडमनी कपाळाला हात लावला.
सुदर्शन म्हणला " माझी भाजी शिजली मी बंद करून असा गेलो आणि असा आलो कुठेही जाऊ नका पाहत राहा..... "
मॅडम संतापल्या. चार जी बि नेट मुलाच्या खानावळीतच कधी संपून गेले कळले ही नाही. म्हणल्या " चला आता पुढे जाऊया ...सुधीर अरे तो कॅमेरा तरी समोर ठेव. आजूबाजूचे बिल्डिंगचे टेरेस का दाखवतोय . माहिती आहे पाऊस येतो ते. सुधीर म्हणला " मॅडम ते वर पत्राच्या दिशेने नेटवर्क येत.." पुन्हा एकदा मॅडमनी कपाळाला हात लावला. आणि म्हणल्या " अरे वा जास्वंदी चे पण झाड आहे का टेरेसवर…छान छान ...रोज एक गणपतीला वाहत जा ...दहावीला आहेस ना "
सुधीर म्हणला " हो टीचर यावेळी मीच मंडळाचा अध्यक्ष आहे...vip पास देतो ..दर्शनाला या "
मॅडम म्हणले " नको रे बाबा, या वेळी vip पास दिलास तरी काळजी घेतली पाहिजे. " घरी राहा, सुरक्षित राहा. "
सुमित म्हणला " मॅडम तो बोलवायला गेला, आलाच नाही अजून ...आपला डाळ भात पण रेडी झाला..."
मॅडम म्हणल्या " अरे हो उद्या पाहते त्याला ...त्याच्या कडूनच प्रश्नांची सुरवात करूया…आता माझा डेटा पण संपला तर उद्या तास घेऊ "
सखी म्हणली " हो मॅडम उद्या डायरेक्ट बिर्याणीची रेसिपी विचारू त्याला."
मॅडम आलेले मेसेज पाहिले आणि मोठ्याने म्हणल्या " हा मेसेज कोणी लिहिला इथे like करो share करो ...आगाऊ कुठचे ..."
बोलवायला गेलेला रोहित आला आणि त्याने त्याचा खोडकरपणा तिथेच दाखवला. त्याच क्षणी तो म्हणला " हे गणिताचे पुस्तक राहू दे… मॅडम ते बिर्याणीचा फिक्स आहे ना मला पण शिकायचे ..." त्याच क्षणी मॅडमनी त्याला रिमुव्ह केलं आणि तास ही संपला.

Monday, 17 August 2020

महाड ते महड


     

बऱ्याचदा आपण अनप्लॅन ट्रिप केल्या असतील. काहीच नियोजन नसताना लहर आली की आपले छोटेसे बस्तान घेऊन निघालो. कधी कधी ठिकाण ही निश्चित नसते. वाट मिळेल तिथे, वळणे नेतील तसे जायचे. बऱ्याचदा ही अनप्लॅन आणि अनियोजित ट्रिप आपल्याला कायमची लक्षात राहते. धडा देऊन जाते. या ट्रिपची सुरवात ही अशीच झाली होती. वीस ते पंचवीस मिनिटांवर असलेले अपेक्षित " फायनल डेस्टिनेशन " दोन दिवसावर कसे गेले याची ही कथा.

तासाभरातच महडच्या वरदविनायक गणपती मंदिराला भेट देण्याचे योजले होते. आदल्या दिवशी महड च्या वाटेवर पाहिलेली ती सुंदर कमान. अनायसे सुट्टी होतीच त्यामुळे जायचे ठरलेच. माझा उत्साह चंद्रावर यान पाठवायच्या आधी वैज्ञानिकांचा असतो अगदी तसाच. आम्ही जेवणानंतर निघालोच. सुरवातीला एस टी आगारात बस असेल नसेल ही शंका होती. तीच पहिली धोक्याची घंटा झाली. बस आगारात न जाता आम्ही " महाड माणगाव " ओरडणाऱ्या प्रायव्हेट गाड्यांच्या गराड्यात गेलो. चांगले तासभर खाजगी टॅक्सी मधून डोंगर वळणावरून एफ एमची बहारदार गाणी ऐकत प्रवास सुरू होता. पंधरा वीस मिनिटांचा रस्ता तासाभरात संपलाच नाही म्हणून विचारपूस केली. त्यावर अजून दोन तास लागतील असे उत्तर पुढे बसलेल्या गाणे गुणगुणत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर दिले. थोड्या वेळासाठी गोंधळले. त्यावर आम्हाला गणपतीला जायचे त्याला सांगितले तर चौकात सोडतो म्हणून तो म्हणाला. चौक वगैरे तिथे काहीच नाही हे मला माहिती होते. मग नक्की कुठल्या ग्रहावर चाललो आहोत म्हणून गुगल मॅपवर नजर फिरवली. त्यावर मला कळले, पुढच्या पंधरा वीस मिनिटात पेण येणार होते. आम्ही होतो अलिबागच्या घाटातल्या रस्त्यावर. " अरे देवा...ही वाट दूर जाते पण भलत्याच ठिकाणी नेते!” इन्स्टंट रिऍक्टशन होती. समोरच एक सह प्रवासी बसला होता. आमचा गोंधळ न्याहाळत होता. मिश्कीलपणे हसून म्हणला " तिथे जवळच रायगड किल्ला आहे तिथे जरूर भेट द्या. " रायगड किल्ला… हे कुठे किल्ल्यावर घेऊन जात आहेत ? “ तेव्हाच त्या ड्रायव्हरने एका ढाबा कम हॉटेल जवळ टॅक्सी थांबवली. रायगड किल्ल्याचा संदर्भ देणारे सहप्रवासी तेव्हा अचानक शेजारी येऊन बसले आणि हे ड्रायव्हर अलिबागच्या महाडला निघाले आहेत याचा खुलासा करून दिला. त्यांच्या बोलण्यावरून यांना आमची चुकामुक आधीच कळली असावी हे जाणवले. मी परत गुगल मॅप वर पाहिले नक्की कुठल्या कोपऱ्यात हे महाड आहे ? तेव्हा कळले अजून दोन अडीच तासाचा प्रवास आहे. पुन्हा गाडी निघायला लागली आणि आता वेगळा ड्रायव्हर गाडीत बसला. मी त्याला झालेला गोंधळ सांगितला. त्यावर आम्हीच कसे चुकीचे सांगितले आणि बसलो हे आम्हाला तो समजवायला लागला. नागोठणे जवळ वाकण फाट्यावर सोडतो म्हणाला. जुना ड्रायव्हर तो पर्यंत नो दों ग्यारह झाला होता. नव्या ड्रायव्हरला समजवता समजवता संध्याकाळचे पाच वाजले होते. रायगड किल्ला सांगणारा सह प्रवासी पुन्हा शेजारी आला आणि वाकण फाट्यावरून पाली गाव जवळ आहे म्हणला. " बल्लाळेश्वर गणपती मंदिर छान आहे नक्की भेट द्या." वाकण फाट्यावर आल्यावर ढगाळ वातावरण झाले होते. चाळीस पन्नास रुपयांचा प्रवास इथवर येई पर्यंत एक माणसी दोनशे असा झाला होता. सूर्य अस्ताला गेला होता. द्रुतगती मार्गावर तेव्हा वाद घालणे ही सोयीचे नव्हते. तेव्हा पुन्हा त्या सह प्रवासी माणसाने त्या ड्रायव्हरला समजावले. काय करावे कळत नव्हते. समोर फक्त रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारी वाहने. त्यावेळी ही त्या सह प्रवासी व्यक्तीने पालीच्या गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता दाखवला. अगदीच जवळ आल्यामुळे आम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला.तिथे राहायची व्यवस्था कशी आहे वैगेरे थोडी फार माहिती ही त्यांनी दिली. थोड्या वेळासाठी हे अन प्रेडिक्टेबल व्यक्तिमत्व कळलेच नाही. पण ही व्यक्ती कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहणार हे मात्र नक्की कळले होते. तेव्हाच तिथल्या सिक्स सीटरने अंदाजे सातच्या सुमारास आम्ही पालीच्या रस्त्याला लागलो. त्या गाडीत काचेवर लिहिले होते. " जीवन एक यात्रा है ...चलाने वाला मत देखो ...तुम्हे चलते जाना है. " माझी नजर पुन्हा ड्रायव्हरवर गेली.

तिथे ही एफ एमची सदाबहार गाणी लागली होती. योगायोग म्हणा किंवा नियती. तेव्हाच्या गाण्याचे बोल ही साजेसे होते. " गोलमाल है भाई सब गोलमाल है...सिधे रस्ते की ये टेढी ही चाल है...." अजून काय काय पहायचे आहे याचाच विचार डोक्यात सुरू होता. हो नाही म्हणता म्हणता गर्द डोंगरात लपलेल्या " पाली " या गावी साडे सातच्या सुमारास आम्ही पोहोचलो. गणपतीचे दर्शन झाले आणि परतीच्या प्रवासाचे काय करायचे प्रश्न पडला. रात्री पुन्हा नागोठणेच्या जंगली रस्त्यावरून गाडी आहे. ती ही नियमित नसते. पुन्हा दुसऱ्या दिवशीच गाडी आहे हे ही तिथेच कळले. काळ्या मिट्ट काळोखात तिथे जाणे अशक्य वाटले. शेवटी तिथलीच एक खोली रात्रीसाठी घेतली. मोबाईल मधल्या आधार कार्डच्या फोटोच्या आधारावर आम्हाला ती खोली मिळाली होती. मोबाईल ची रेंज आणि व्यवस्थित बॅटरी होती याच ही तेव्हा कौतुक वाटलं. एवढी मोठी रपेट मारून बिस्किटाच्या पुडा घेऊन त्याच्याच भरवशावर रात्र काढली. डोळे मिटले तरी " महाड माणगावचे " ओरडण्याचे सूर कानी वाजत होते. सकाळचे उत्साही उड्डाण भलत्याच ग्रहावर आणि भलत्याच मार्गाने झाले याची क्षणा क्षणाला प्रचिती येत होती. सकाळच्या दुलईदार धुक्यात पुन्हा पालीच्या बल्लाळेश्वराच्या गणपती मंदिरात गेले. एकटीच होते. सुरवातीच्या धुंडी विनायकाच्या मंदिराजवळ मला एक वृद्ध गृहस्थ भेटले. मी गाभाऱ्यात जाणार इतक्यात त्यांनी मला थांबवले आणि हातात दहाची नोट ठेवली. त्या क्षणी काहीच कळले नाही. मला फक्त ती नोट आत दान पेटीत टाकायला सांगितली. माझ्या सोबत तेव्हा कोणीच नव्हते. मी ही एका मिनिटात नमस्कार करून ती नोट नीट पाहिली ही नाही आणि दान पेटीत टाकून आले. ती व्यक्ती क्षणभरात तिथून निघून गेली. समोरचा रस्ता अगदी मोकळा. मागून माझा भाऊ आला आणि कोणीच बाहेर नसल्याचे म्हणाला. चमत्कारिक भासले. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात गेले तेव्हा बाप्पाचे मोहक रूप पाहून आता पर्यंतची झालेली दमछाक कुठल्या कुठे पळाली. जणू काही त्यानेच बोलावले असावे. लांबची प्रदक्षिणा घालून ये म्हणला असावा कदाचित. गाभाऱ्यासमोरच असलेल्या तलावाजवळ एक इसम त्या मंदिराच्या कळसाचा फोटो काढण्यासाठी सारखा सुचवत होता. बराच वेळ त्या तलावपाशी मी बसले होते. त्या व्यक्तीचे त्या कळसाकडे पाहणे ही तेव्हा मला आश्चर्यकारक वाटले. सगळे मंदिर आणि त्या मंदिराची आखीव रेखीव बांधणी मन भरून पाहिली आणि आवडली ही. पुन्हा येण्याची नक्कीच इच्छा झाली. फक्त पुढच्या वेळी येताना पुन्हा ही प्रदक्षिणा रायगड किल्याला किंवा रायगड जिल्ह्याला नसावी ही बाप्पा चरणी प्रार्थना केली. कळसाच्या मागच्या बाजूला माकडांची मोठी टोळी होती. बाहेर वडापावच्या गाडीवर गरम वडे आणि चहा घेऊन कळसाला नमस्कार करत तिथून काढता पाय घेतला. तेव्हा ही समोर प्रवेशद्वारावर एक माकड टकमक पाहत होते. त्या वेळी पोटासाठी काय पण म्हणून पहिल्यांदाच तो वडापाव त्या माकडापासून लपवून संपवला असेल. भूक म्हणजे काय याची प्रचिती तेव्हा माकडाने करून दिली.

बस स्टॉपवर आल्यावर पुन्हा घर वापसी करावी ठरले होते. तेव्हाच कळले खोपोलीला जावे लागेल. डायरेक्ट गाडी नाही. दहा पंधरा मिनिट थांबल्यावर प्रायव्हेट गाडीचा मार्ग निवडला असता पण प्रवासाच्या सुरवातीचा प्रायव्हेट गाडीचा अविस्मरणीय अनुभव गाठीशी होता. त्यामुळे तो पर्याय मनातून कायमचा दूर गेला होता. तेवढ्यात फॉर्मल कपड्यात एक इसम जवळ आला आणि खोपोलीची गाडी असल्याचे सांगू लागला. ती गाडी येईपर्यंत तो इसम तिथेच स्टॉपवर फोनवर बोलत थांबला होता. गाडी ही आली आणि तो इसम चढला ही नाही. भलत्याच ठिकाणी निघून गेला. जणू काही आम्हाला च गाडी येण्याचे सांगण्यासाठी हे योजले असावे. तिथे रस्त्यात एक गाव लागले होते. गावाच्या स्टॉपवर एक छोटेसे मंदिर पाहिले. त्यावर एक पाटी होती " श्री जननी, कलेश्वरी, वाघजाई, महाकाली, हनुमान देवस्थान , शेमडी. नाव वाचताच क्षणी भन्नाट वाटले. एकाच पाटीवर तेहतीस कोटी देव असणारे हे ते आगळे वेगळे गाव असणार. अशाच पाट्या वाचत खड्यांमधून रस्ता काढत खोपोलीला पोहोचलो. स्टँड वर जाण्याऐवजी पुन्हा हायवेला उतरलो. तिथे ही शेयरच्या रिक्षाची लांबच्या लांब रांग लागली होती. सगळ्या रिक्षा जात होत्या ते ठिकाण होते " महडचे वरद विनायक मंदिर " फिरून फिरून याच ठिकाणी यायचे होते. वेळ ही अशी होती की काहीच ठरवून होत नव्हते. आणि यावेळी ठरवायच्या आधीच त्या रिक्षातल्या काकांनी बसवले आणि आम्ही त्याच कमानीच्या प्रवेश द्वारापाशी पोहोचलो. जो पाहून तिथे येण्यासाठी मी उत्सुक होते. तेच ते नक्षीदार प्रवेशद्वार. येता येता या मंदिराचा सगळा इतिहास त्या काकांनी सांगितला. " जवळच गगनगिरी महाराजांचे मठ होते तिथे नक्की भेट द्या " ते म्हणाले. माझ्या डोळ्यासमोर आदल्या दिवशीचा त्या टॅक्सी मधला सह प्रवासी आला. पुन्हा दर्शन घेऊन येईपर्यंत थांबण्याची तयारी त्या रिक्षा चालकांनी दाखवली. पण दर्शनाला आलोच तर थोडे थांबावे म्हणून आग्रह केला नाही. वरद विनायकाच्या दर्शनाने ही आगळी वेगळी महाड ते महड ट्रिप पूर्ण झाली. तिथून पुढे मुख्य रस्त्याला पुन्हा काळी पिवळी टॅक्सी सहज मिळाली आणि जीव भांड्यात पडला आणि व्यवस्थित घर गाठले.

खर तर देव पूजा ही मनाच्या शांतीसाठी करावी इतपत मी देव भोळी आहे पण या प्रवासात भेटलेल्या एक एक व्यक्तीला पाहता आणि त्या परिस्थितीवरून खरंच विधी लिखित म्हणून काही तरी असावे यावर विश्वास बसायला लागला. अशा वेळी आपले कर्म आपल्याला त्यातून मार्ग दाखवते हे मात्र नक्की.

महाड ते महड हा प्रवास पूर्ण करून आल्या आल्या जर काही केलं असेल तर या अनुभवावरून पुढच्या कोणत्याही अन प्लॅन ट्रिपच्या वेळी लागणाऱ्या अति आवश्यक गोष्टीची डायरीत यादी करून ठेवावी मग बाहेर पडावे ही गोष्ट मनावर कोरून ठेवली.


नियती

वर्गात गेल्यावर आज सर्व विद्यार्थी  अभ्यास करताना दिसले.  शांततेत आपापल्या गृहपाठाच्या वह्या समोर आणून ठेवल्या. सगळ्यांच्या वह्या चेक करत असताना सुमुखच्या वहीमध्ये मला नचिकेतचे नाव दिसले. दोघांना समोर बोलवून विचारले असता कळलं की नचिकेतने गृहपाठाची वही आणली नव्हती म्हणून शिक्षेपासून वाचण्यासाठी सुमुखच्या वहीचे पान दुमडून त्यावर नचिकेत ने स्वतः चे नाव लिहिले. सुमुखला याची कल्पना ही नव्हती.  नचिकेतला समोरच उभे राहण्यास सांगितले. याच आशयाची एक कथा माझ्या ऐकण्यात आली होती. ती मी त्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना सांगितली. ज्याचे तात्पर्य नचिकेतला सांगायचे होते.

एकदा एका माणसाला गाढ झोपेत असताना अचानक दार वाजवल्याचा आवाज आला, तो घाबरून उठला आणि त्याने दार उघडले. पाहता क्षणी त्याला समोर यमराज दिसले आणि त्यांच्या हातात भली मोठी यादी. यमराजाला पाहून माणसाला घाम फुटला आणि त्याने त्याला विचारले " तू इतक्या लवकर का बरं आला आहेस ?" तेव्हा यमराज म्हणले " माझ्या यादीत तुझं पहिलं नाव आहे आणि तुला वर यमलोकांत न्यायला मी आलो आहे." घाबरलेला माणूस त्याला म्हणला " तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. आज तुम्ही पाहुणे म्हणून आलेले आहात तर मी तयार केलेली कॉफी तुम्ही आधी प्यावी एवढंच.." त्यावर यमराज होकारार्थी मान हलवून घरात आले. घाबरलेला माणसाने दोन झोपेच्या गोळ्या घालून कॉफी तयार करून दिली आणि ती प्यायल्यावर यमराज झोपी गेले. तेवढ्यात त्या माणसाने आपले यादीतील पहिले नाव खोडुन शेवटी टाकले. यमराज थोड्या वेळेत उठून त्या माणसाला म्हणाले " तू बनवलेली कॉफी आणि माझा केलेला पाहुणचार पाहून मी खूप खुश झालो आता मी यादी शेवटून सुरू करणार. तो माणूस हे ऐकून रडायला लागला आणि आपली चूक त्याने कबूल केली.

जेव्हा एखादी गोष्ट किंवा घटना आपल्या बरोबर घडते आणि त्याला कोणीही बदलू शकत नाही. ती विधिलिखित असते. किंवा आपल्याच कृतीचे ते आपल्याला मिळालेले फळ असते. त्याचे बरे वाईट परिणाम आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपली तयारी हवी. त्यातून पळवाट काढली कि आपणच फसतो. हेच ही गोष्ट आपल्याला सांगते.

जस की पहा, पोपट आणि कावळा जेव्हा आपले रूप देवाकडे मागायला गेले तेव्हा देवाने पोपटाला हिरवा रंग दिला तर कावळ्याला काळा.  कावळा निराश होऊन देवाला म्हणला " असं का...?" तो देवासमोर रडायला लागला, देवाला त्याच्यावर दया आली आणि तो त्याला समजावू लागला " पोपट कितीही सुंदर असला तरी तो पिंजऱ्यात कैद आहे आणि तू रंगाने काळा असलास तरी तू आकाशात उडण्यासाठी मुक्त...आता तूच ठरव जगायचं कसं?

पोपट आणि कावळ्याच्या उदाहरणावरून एक गोष्ट नक्की आहे. आपल्या डोक्यात येणाऱ्या का साठी कधी कधी q उत्तरे नसतात. तेव्हा  झाल्या घटनेचे कारण शोधत बसू नये.  बऱ्याचदा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नसतील पण त्या तुमच्या चांगल्यासाठी असतील तेव्हा त्यातून शिकण्याचा प्रयत्न करूयात. नचिकेतने आपली चूक कबूल करून सुमुखची माफी मागितली. पुन्हा आपली चूक झाकण्यासाठी दुसऱ्याला अडचणीत टाकणार नाही असा शब्द दिला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला.

 

Saturday, 15 August 2020

सत्य

   प्रत्येक घटनेमागे, व्यक्तीमागे, प्रत्येक बोलण्या वागण्यामागे काहींना काही कारणं असतात. हो असतात. एक सत्य असते. जे कधी अंधारात लपलेले असतं नंतर ते झगझगीत लख्ख प्रकाशात दिसतं. हेच सत्य शोधण्यासाठी माणसाची बुद्धी, त्याच मन कधी कधी सैरभैर होतं.
सत्य म्हणजे नक्की काय? असा प्रश्न कोणी विचारला तर कोणी व्याख्या देऊ शकेल का ? आपण बोलतो ते सत्य, ऐकतो ते सत्य, पाहतो ते सत्य, मी सांगते ते कदाचित सत्य, कुणीतरी मला सांगेल ते सत्य. या गोंधळात नक्की सत्य म्हणजे काय ? कधीतरी असं ही वाटलं असेल, आपण ज्यावर विश्वास ठेवतो तेच सत्य किंवा कदाचित ते अर्ध सत्य किंवा असत्य असेल तर... हे सत्य असत्यच गणित सोडवायला ना एक छोटीशी गोष्ट आहे...
गोपाल वर्गातला जिज्ञासू मुलगा त्याला असेच जगावेगळे प्रश्न पडायचे आणि एकदा सुरू झाले की ते हनुमानाच्या शेपटी सारखे वाढतच जायचे. वर्गात झालेल्या छोट्याशा वादावरून त्याच्या पी टी च्या बाईंनी त्याला प्रश्न विचारला " तू खरं बोलतोय ना ?" त्यावर तो " होय मॅडम, तुम्हाला खरं वाटत नाही का " एवढं बोलला. जवळपास तासभर खरं काय झालेलं ते शोधण्यात गेला आणि वाद सुटला. गोपाल ची चूक नव्हती हे शेवटी समोर आले.
तास झाल्यावर त्याने येऊन बाईंना विचारलं " खरं म्हणजे नक्की काय बाई? मी खरं बोललो तरी ते खर वाटत नाही ...मग खरं म्हणजे नक्की काय ? " तेव्हा बाईंनी सांगितलं " खरं म्हणजे सत्य, जे कोणी बदलू शकत नाही " त्यावर त्याचे परत प्रति प्रश्न सुरू झाले " पण ते बदलत नाही म्हणून सत्य असे का ? त्याच प्रश्नाला घेऊन गोपाल शाळेत पूर्ण दिवस बसला. खेळाच्या तासाला ही त्याचा तोच प्रश्नार्थक चेहरा पाहिला. म्हणून जवळ बोलवून त्याला काय झालं म्हणून बाईंनी विचारपूस केली. "एव्हढ्याशा मेंदूमध्ये कसले बर प्रश्न पडतात गोप्या सांग ? "
गोप्या तिथे पुन्हा सुरू " सत्य म्हणजे नक्की काय बाई तुम्ही अजून मला याच नीटसे उत्तर दिले नाही. " " अरे एवढेच ना , तो बघ सूर्य कुठे उगवतो सांग बरं... आणि कुठे मावळतो ? " "पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. " गोपालने शहाण्या बाळासारखं उत्तर दिलं ” हो…बरोबर म्हणजे नेहमी सूर्य पूर्वेला उगवतो आणि हे कोणी बदलू शकत नाही म्हणजे ते सत्य आहे. " पुन्हा एक त्याच्याकडून प्रश्न " पूर्व दिशा हीच कशावरून ? बाईंना कळेना आता गोपाल ला कसे सांगावे. तात्पुरती त्या प्रश्नातून सुटका करण्यासाठी बाईंनी " उद्या सांगते " म्हणले.
दुसऱ्या दिवशीच्या पी टी च्या तासाची गोपाल वाट पाहत होता. उत्कंठा शिगेला पोहोचली होती. आणि गोपाल ही उत्साहात उत्तर ऐकायला समोर हजर. बाई आल्या सगळ्यांना नेहमीप्रमाणे मैदानावर घेऊन गेल्या. फुलपाखरासारखी मुलं सगळ्या मैदानात उडायला लागली. किलबिलाट करायला लागली. गोपाल फक्त एक संधी शोधत होता बाईंना गाठण्याची. नेमका तेव्हाच खेळता खेळता तो पडला. गुडघ्याला आणि पायाला बरेच ठिकाणी खरचटले होते. तात्काळ त्याला पाणी देऊन मलमपट्टी करण्यासाठी वर्गात आणले. वर्गात आल्यावर त्याचे रडणे थांबले. मलमपट्टी करताना त्याला होणाऱ्या वेदना बाईंना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. त्याला शांत करत करतच बाई त्याला सांगू लागल्या. " गोपाल तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांगू, तुझी जखम मला दिसते, त्यातून वाहणारे रक्त ही मला दिसते. पण तुला आता होणाऱ्या वेदना खरं तर मला दिसत नाही ते फक्त तुला जाणवते तू मलम लावताना ही झोंबल्यावर मुसु मुसु रडतोस पण तुझ्या रडण्यामागचे कारण मला कळणार नाही. तुझी जखम किंवा रडणे खरेच आहे पण त्यामागे असलेले कारण मात्र तुलाच माहिती आहे. कोणीही कितीही नाकारले तरी ते सत्य तुझ्या मनाला माहिती आहे. ते कधी ना कधी जगाला स्वीकारावे लागतेच आणि म्हणून पडल्यावर सगळ्यात आधी तू ते स्वीकारले आणि नंतर ते सगळ्यांना कळले. " गोपालला अजून ही जे सांगायचे होते ते कळले की नाही हे ही बाईंसाठी कोडे होते.
बाईंनी हसत हसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला म्हणले " हे बघ गोपाल, तूला झालेली जखम काय किंवा त्याच्यामुळे तुझ्या डोळ्यात येणारे अश्रू यातलं सत्य काय माहिती आहे. तुला लागल्यानंतर आणि त्यावर औषध लावताना तुला झालेल्या वेदना. तू सोसलेल्या कळा, ज्या फक्त तू अनुभवल्यास. कितीही मला सांगितले तरीही हे सत्य फक्त तुला माहीत आहे. ते तुला माहिती असेल आणि तुझ्या त्या वेदनेला. बाकी कोणाला ही नाही. तेव्हा सत्य काय हे शोधत बसू नकोस ते तू अनुभवतोस आणि जे तुझ्या जवळ आहे तेच सत्य. कळलं का गोप्या. आणि दगड मातीतून ही आपल्याला सत्य काय हे शिकता आलं. हे कधीही विसरू नकोस. " गोपालला सत्य म्हणजे काय सांगता सांगता बरेच काही सांगितले. जग असेच असते नाही का...आभासी ...काल्पनिक ...प्रथम दर्शनी न कळणारे. पण त्यामागचे सत्य खरंच हे आहे का ? आपण ते अनुभवले आहे का ? आपल्याही आयुष्यात सत्य काय हे शिकवायला ...समजवायला दगड धोंडे येतातच की... पण मग तेव्हा आपल्यातला मास्तर आपल्याला काय म्हणतो तेव्हा आपण ते कान देऊन ऐकलंय का...?

आवडी निवडीचे गणित

    शेवटचा गणिताचा तास होता. वर्गात खूप गोंधळ सुरू होता. त्यात गणिताची आकडेमोड घेणे म्हणजे आणखी मोठे युद्ध. शेवटी एक गमतीशीर गोष्ट सांगितली. मी शाळेत असताना एकदा अशीच एका तासाला माझ्या शिक्षकांकडून ऐकली होती. गोष्ट अगदीच लहान होती पण त्यावर मुलांकडून मिळालेली उत्तरं त्याहून मजेशीर होती.
एका गावात एक सुधीर नावाचा मुलगा राहायचा. त्याच्या घरची स्वतः ची उसाची शेती होती. थोडा ऊस व्यवसायासाठी ठेवून, उरलेला गूळ बनवण्याच्या कामात वापरला जायचा. लहानपणापासूनच गोडाची आणि गोड पदार्थाची सुधीरला आवड होती. ताजा केलेला गूळ लहानपणी त्याची आई त्याला चाखायला द्यायची. बघता बघता याची त्याला सवय लागली. आणि प्रत्येक वेळी जेवणात, नाश्त्याला नाहीतर असाच तो गूळ खाऊ लागला. त्याच्या या सवयीमुळे त्याच्या सोबत घरच्यांना ही याचे परिणाम दिसायला लागले. एखादा दिवस गूळ नसेल तर सुधीर सैरभैर व्हायचा. गोंधळ करायचा.
बारा तेरा वर्षाचा सुधीर गुळासाठी एवढा हट्ट करतोय हे पाहून आई बैचेन व्हायची. न राहवून तिने तिच्या शेजारी राहणाऱ्या तिच्या मैत्रीणीला याबद्दल सांगितले. त्या बाईने कुठल्याशा मठाचा पत्ता दिला आणि तिथे जाऊन सुधीर बद्दल सांग म्हणाली. दुसऱ्या दिवशी सुधीरला घेऊन ती मठात गेली. तिथे डेरेदार वृक्षाखाली बसलेले महात्मे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान बुद्ध होते. ज्याची कीर्ती तेव्हा दूर दूर पसरली होती. दुसऱ्याच दिवशी ती सुधीरला घेऊन तिथे गेली. मठ किंवा भव्यदिव्य मंदिर असे काहीच दिसले नाही. लहानशी झोपडी होती. एका बहरलेल्या वडाच्या झाडाच्या सावलीत भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना शिकवत होते. काय सुरू आहे ते पाहण्यासाठी सुधीर तिथे गेला. बुद्धानी त्याला ही तिथे सोबत बसायला सांगितले. मुलाची शाळा संपली. सुधीर सगळीकडे न्याहाळत होता, तेव्हा त्याची आई समोर आली आणि सुधीरच्या हट्टी स्वभावांविषयी आणि गूळ खाण्याच्या सवयी विषयी सांगू लागली. तिचा काळजीपोटी अस्वस्थ झालेला चेहरा भगवान बुद्धांनी वाचला. सुधीरला जवळ बोलवले आणि एकदा निरखून पाहिले. काही तरी दैवी शक्ती असावी या आशेने त्याच्या आईने त्यांच्याकडे पाहिले. सुधीरला ते बरे करतील अशी आईला अपेक्षा होती. म्हणून ती ही शांत उभी होती. सुधीरच्या खिशात हात घातला तरी त्यातून गुळाचे तुकडे मिळाले. भगवान बुद्धांनी त्यांना आठवड्याने यायला सांगितले. बरोबर एक आठवड्याने पुन्हा सुधीर आपल्या आईसोबत पुन्हा आला. तेव्हा कुतूहलाने आईने विचारले " एवढा वेळ घेतला म्हणजे नक्की जालीम औषध असणार " भगवान बुद्ध म्हणाले. " औषध माझ्याकडे नाही तुमच्याकडेच आहे, एक आठवड्याचा वेळ तर मी माझ्यासाठी घेतला. इथे आम्ही जे पक्वान्न बनवतो त्यात ही बरेचदा गुळ वापरतो. मला ही गूळ खायला आवडतो. मग जर मलाच त्या गोष्टीची आवड असेल , सवय असेल तर मी कसे बर याला सांगणार, नको खाऊस म्हणून."
" जेव्हा समोरची व्यक्ती आपण करतो तशीच कृती करते तेव्हा ते चूक आहे हे सांगणं बरोबर आहे का ? " त्याच बरोबर तुम्ही लहानपणी दिलेली गुळाची वडी आज त्याची सवय झाली याला फक्त तो एकटाच जबाबदार आहे का ? सुधीरच्या आईचा गंभीर झालेला चेहरा पाहून बुद्ध पुढे म्हणाले " जर गुळाची गोडी त्याला तुम्ही लावू शकता तर दुसऱ्या कशाची का नाही? "
" एकदा आपले स्वतःचे परीक्षण केले की झालं. तेच स्वभावावरचे जालीम औषध." गोष्ट इथेच संपली. नेहमी प्रमाणे काय शिकलो या प्रश्नावर मुलांकडुन उत्तर आले. " गुळाच्या ऐवजी जेवणात साखर वापरावी ! " पुन्हा एकदा सगळ्यांचे हसरे चेहरे झाले. मी त्यांना त्या गोष्टीचे तात्पर्य सांगितले. " एखादा बदल तुम्हाला समोरच्या मध्ये घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतः पासून करा. जग आपोआप बदलेल. आणि असे नाहीच झाले तरी ही स्वतः मध्ये तो बदल केल्याने ते कोणाला अशक्य वाटणार नाही. " तास संपला. शाळा सुटली. वर्गातून निघताना मानसने त्याचीही अशी साखर खाण्याची वाईट सवय आहे हे स्वतः समोर येऊन सांगितले आणि त्या सुधीर प्रमाणे त्याला ही घरी आई ओरडते. पण त्यासाठी आता तो कुणाकडे जाणार नाही. कारण त्याचा उपाय त्याच्याच कडे आहे. असं तो मला जाता जाता सांगून गेला. त्याची पाठमोरी आकृती पाहून आजचा तास नेहमीप्रमाणे नवे शिकवल्याचे समाधान देऊन गेला.

Friday, 7 August 2020

होडी


     तू एक अनुभवाच्या समुद्रात नुकतीच दाखल झालेली होडी आहेस अस समज. ती होडी कागदाची की लाकडी हे त्या येणाऱ्या लाटा ठरवतील. एक लहानशी होडी...जहाज पण नाही...होडीच. कारण जहाजाचा मार्ग ठरलेला असतो. त्याला थांबायला एक बंदर हवं असतं. ते आलं की झालं. या समुद्रात आपली दिशा ठरवण्याचा अधिकार नक्की कोणाचा हे ही ती कागदाची की लाकडी यावरच अवलंबून. म्हणजे बघ ना, या खोल समुद्राची लांबी, रुंदी, खोली काहीच माहीत नाही, तरीही ती होडी पुढे पुढे निघाली. कधी वारा नेईल त्या दिशेने तर कधी लाटा येतील त्या दिशेने. या समुद्रात नीळ निरभ्र आकाश ही आहे तर काळ्या ढगांनी भरलेलं आकाश ही आहे. कधी विजांचा कडकडाट तर कधी वादळी वाऱ्याची साथ. कधी भोवऱ्यात अडकेल तर कधी किनाऱ्याला धडकेलं. समुद्रात येणारी हर एक लाट या होडीला लागून जाईल. स्वतः सोबत तिला ही घेऊन जाईल.
लहान मोठ्या वेगवेगळ्या आकाराच्या लाटा, वेगवेगळ्या स्वभावाच्या लाटा वेगवेगळ्या वेगात येऊन धडकून जातील. या लाटांवर स्वार होताना कदाचित तिला कळेल ही कागदाची की लाकडी. लाटा जरी अनोळखी असल्या तरी होडीचा प्रवास सुरूच आहे. याच निळ्याशार समुद्रात कुठेतरी बंदराला जाणारे भव्यदिव्य जहाज तिच्या नजरेस पडते. त्याच अनोळखी लाटांना कापत पुढे जाणाऱ्या होडीचा कधी कधी ते मार्ग मोकळा करते. सुलभ करते. समुद्रात हरवलेली होडी तेव्हा कुठे आपला प्रवास पूर्ण करते. किनाऱ्याला येते.
ती कागदाची असती तर जहाज तिनं हेरलं नसतं. सुरवातीच्या लाटांनीच तिला घेरलं असतं. धारदार त्याच्या वेगाने कदाचित चिरलं असतं. उसळणाऱ्या समुद्रात जहाज शोधायचं मनात तिच्या आलंच नसतं. अर्धा रस्ता पार केला तेव्हाच तिला कळलं असावं. आपली होडी कागदाची नाही. तिची धाव जहाजाकडे जाई. किनारा तिला बोलवत राही. प्रश्न आता उरला नाही, आपली होडी कागदाची की लाकडी.

Wednesday, 5 August 2020

बकेट लिस्ट


    

       

एकदा कवितेच्या काही ओळी लिहिताना बकेट लिस्ट हा विषय मनात घर करून गेला. कवितेच्या ओळी होत्या " म्हणलं असतं मी कदाचित, गेले राहून अपुरे स्वप्न " त्यावरून मी " बकेट लिस्ट " या विषयावर कधी आली कळलंच नाही.

लहानपणी शाळेत कधीतरी आपल्याला कोणीतरी विचारलेले असते " मोठं होऊन काय होणार ? " पासून सुरू होणारी ही लिस्ट " वयाची साठी सत्तरी आली की " आपले हे करायचे राहिलेच कि..." पर्यंत लांब वाढत असते. आपल्यातले काही “ पदरी पडले पवित्र झाले.” या विचार सरणीचे, मिळेल त्यात समाधान मानणारे तर काहींची ही यादी संपत नाही. याची सुरुवात करताना आपण आज वर काय काय केले याची आठवण होतेच. सोबत काय काय नाही केले आणि पुढे काय करायचे हे ही पाठोपाठ आलेच. लहान मुलाच्या समोर जर आपण दोन चॉकलेट ठेवली. एक छोटं आणि एक मोठं तर छोटं सोडून मोठं मिळवण्यासाठी ची धडपड म्हणजे ही बकेट लिस्ट ची सुरुवात. हे अगदीच साधं उदाहरण आहे. ज्याची सुरवात चॉकलेटने झाली. हळूहळू त्याच चॉकलेटचा बंगला या बकेट लिस्ट मध्ये कधी येतो आपल्याला कळत ही नाही. आपण आजवर जे काही मिळवले. केले. अनुभवले त्यात आपली बकेट नक्की किती भरली याचा विचार आपण केला तर हा मार्ग आणखी योग्य दिशेने जाऊन पूर्ण करता येईल. माझ्या या बकेट मध्ये कविता होत्या. खूप सारे अनुभव आणि खूप साऱ्या गोष्टी. पुढे काय लिहायचे ते हळूहळू उमजत गेले. माझ्या त्या सुरुवातीच्या कवितेचा शेवट ही तसाच केला. " आता मुळीच म्हणणार नाही, राहिले होते एक अपुरे स्वप्न." कदाचित ते पुरे व्हायचे होते आज किंवा आता पासून.


Monday, 3 August 2020

मृगजळ


     
   मृगजळ...भास आभासाचे विश्व. जे कधी असते कधी दुरून भासते आणि जे दिसते ते नसतेच. भास आभासाच्या या लपंडावात जिथे सीता ही सुवर्ण मृगाच्या मोहात पडली, असे मोहित करणारे रंगीत चित्र म्हणजे मृगजळ. कल्पनांची किनार घेऊन हे मृगजळ स्वप्नी यावे. दुष्काळातही पावसाची चाहूल घेऊन यावे. रिकाम्या ताटी भरलेली ओटी घेऊन यावे. उन्हात पावसाच्या शिडकाव्यात तुषारानी आकाशात सुंदरशी कमान घेऊन यावे.
समुद्राकाठी अलगद उतरणारा नारंगी, केशरी रंगाचा सोन्याचा गोळा पाहुन सुखवणारे डोळे आणि भरून येणारे मन म्हणजे मृगजळ.. मृगजळ पाहण्याचे असे योग प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असतात. कधी ते दुसऱ्या अनोळखी जागेसाठी तर कधी अनोळखी व्यक्तीसाठी असतात. अनाथाश्रमात बागडणाऱ्या मुलांसाठी आई वडिलांचा सहवास हे हि मृगजळ. एखाद्या गोष्टीसाठी केलेला हट्ट आणि ती गोष्ट अचानक समोर येणे हे मृगजळ असू शकते. एकंदरीत पाहिलं तर मृगजळ ही कल्पना नाही. ती स्वप्न आहेत. जी आपण भास आभासाच्या विश्वात पूर्ण होताना बघतो. आणि हीच स्वप्न आपल्याला भुरळ पाडत जातात. कधी गरज म्हणून बोलवत राहतात, तर कधी मोहित करून घेतात. पहाडी कड्यावरून उंच आकाशात विहार करणाऱ्या घारीची लहानशा सावजावर असलेली रोख ठोक नजर. हे ही धाडसी मृगजळ. सुकलेल्या बुंध्यातून आलेल्या आंब्याच्या डहाळीला आलेला मोहोर हे ही निर्मितीचे मृगजळ. एकाच मातीत दिवसा फुललेल्या जाई जुईचा आणि रात्रीच्या रातराणीचा एकाच वेळी आलेला सुगंध हे ही सुगंधित मृगजळ.

Saturday, 1 August 2020

मैत्री


    

    मैत्री दिनावर लिहायचे ठरवले. मैत्रीवर लिहिण्यापेक्षा म्हणलं आज थोडे विश्वासावर लिहावं. कदाचित त्यातच कुठेतरी मैत्रीचा अर्थ भेटून जाईल. लहानपणी आपल्या जवळच्या मैत्रिणीसोबत बसण्यासाठी कितीदा आपण हट्ट केले असतील. जवळच्या तीन मैत्रिणी असतील तर आणखी पंचाईत. कितीतरी वेळा असं व्हायचं. सगळा वर्ग भरलेला असला तरी आपली जिवाभावाची मैत्रीण आली की नाही हेच आपल्या नजरा शोधायच्या. कधी कधी चुकून धक्का लागून डबा पडला कि मधल्या सुट्टीत आग्रहाने मैत्रिणीच्या डब्यावर ताव मारणे असायचे. शाळा सुटल्यावर एकत्र घरी येणं. येताना मजा मस्ती करणे. गप्पा, कधी कट्टी बट्टीचे वाद. गणपती, दिवाळी सुट्टीत केलेली छोटीशी पार्टी. शाळेच्या दिवसातले मैत्रीचे दिवस होते. नंतर जसे कॉलेजला आले, कॉलेजची मजा शाळेपेक्षा वेगळी होती. चांगल्या वाईट गोष्टीकडे समजून उमजून पाहण्याची क्षमता तेव्हा हळूहळू येऊ लागली होती. नंतर बरेच नवे मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या. कॉलेज, क्लास सगळे विश्व निराळे होते. रंगबेरंगी होते. प्रत्येकाची वेगळी ओळख आणि आठवण तयार होत होती. शेवटच्या वर्षाला शेवटचा पेपर देऊन मी आणि मैत्रिणीने केलेली पार्टी मला अजून आठवते. रस्त्यात जे पहिले दुकान दिसेल तेथे जाऊन पेटपूजा करायची. शेवटच्या पेपर मधून सुटल्याचा आनंद तर होताच पण तासभरात गेल्या तीन वर्षाचे सगळे बोलून आम्ही मोकळे झालो होतो. एम एस सी ला तीच जागा होती. मैत्रिणी वेगळ्या. तेव्हाचे लॅब मधले करामती आणि नंतर कॉलेज सुटल्यावर शेवपुरी, पाणीपुरी आणि सोबत रंगवलेल्या गप्पा . रात्रीच्या आठ वाजेपर्यंत कॉलेजच्या लॅब मध्ये केलेले प्रयोग. नंतर शिक्षण संपले पण शिक्षण देणे सुरू झाले. शाळेत जॉब करताना सगळ्या सहकारी शिक्षकांकडून रोजचे काही ना काही शिकणे सुरु होते. वयाने आणि अनुभवाने मी लहान होते. विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबत त्याच्याकडून ही नेहमी शिकत होते. आमच्यातले वयाचे अंतर मैत्रीच्या नात्याने कमी केले. त्यात ही एकत्र घेतलेला शनिवारचा वडापाव आणि बस स्टोप वरचा बर्फाचा गोळा ही खाऊ ची सुट्टी असायची. एकत्र घेतलेला मसालेदार चहा, एकत्र मिळून पूर्ण केलेले प्रत्येक मिशन मग ते कधी पेपर तपासणे असो किंवा मुलांकडून करुन घेतलेला एखादा उपक्रम आणि बरच काही. रोजचे नवे सोहळे सुरूच असायचे. या सगळ्याच गोष्टी आणि या सारख्या असंख्य आठवणी मला आणि माझ्यातल्या व्यक्तीला अनुभवाची शिदोरी देतात. ती कायम माझ्या स्मरणात राहते. कधी कधी आपले अंदाज चुकतात. आपण मांडलेली गणिते चुकतात. अशा वेळी कोणीतरी अशी व्यक्ती सावलीसारखी मागे असते. जी आपल्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते. समोर नसले तरी त्याचे अस्तित्व आपल्याला बळ देते. अशी व्यक्ती माझ्या ही आयुष्यात आहे तीच जाणीव असावी मैत्री. याची दखल घेणारी गोष्ट म्हणजे लेखणी. माझे शब्द आणि छोटीशी ओळख. विश्वास या शब्दाचा अर्थ मला याच सगळ्या मित्र, मैत्रिणींनी दिला.
निराशेतून प्रकाशाकडे नेणारे असे मैत्रीचे नाते. विश्वासाचे, प्रेमाचे. प्रामाणिकपणाचे नाते. माझ्या लेखणीशी असलेले, कवितेशी जुळून आलेले नाते. असे मैत्रीचे नाते…

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...