खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवरून हात फिरवताना मनात विचार आला. झाडांत आणि आपल्यात कसे साम्य आहे? त्यावर जो विचार मनात आला तो मी लिहून काढला. तर त्याची सुरुवात एका गोष्टीने झाली.
एकदा एका शाळेत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जात होता. शाळेच्या मैदानात विद्यार्थी सोबत आणलेली इवली इवली रोपं मातीत रोवत होते. हा दिवस होता " जागतिक वृक्षारोपण दिन." त्यात सगळ्यांनी आपापल्या घरून एक एक झाड आणले होते. गुलाब, मोगरा, झेंडू, चिकू, आंबा, वडाचे झाड अशी वेगवेगळी झाडं होती.
दिनूने निवडुंगाचे झाड आणलं होतं. ते इतर झाडांपेक्षा वेगळं होतं. ते झाड लावताना सुद्धा मुलांना त्याचे काटे लागले. शेवटी बाईंनी ते काळजीपूर्वक लावले. दिनूचे झाड इतर झाडांपासून वेगळे थोडया अंतरावर लावण्यात आले. त्यावर तो निराश होऊन एकटाच शिडीवर जाऊन बसला. यावर त्याच्या बाई त्याला म्हणल्या. " निवडुंगाचे झाड सुद्धा इतर झाडांसारखं झाड आहे... दिनू , त्याला सुद्धा पान, मूळ आणि खोड आहे बघ... प्रत्येक झाड त्याचं वेगळेपण घेऊन येतं. कोणी अगदीच लहान, कोणी अगदी मोठं. फुलं आणि काटे हे झाडाचे वेगवेगळे भाग आहेत. ते गुलाब पहा. त्याला सुद्धा काटे आहेत. स्वतःला जपण्यासाठी त्याने हे काट्याचे आवरण स्वतःकडे घेतले. तसंच हे तुझं वेगळं झाड... आपण ते सुद्धा लावलं आहे आणि त्याचं पण वेगळं महत्व आहे. तु त्याची काळजी घेशील तसं ते वाढणार. आता मुलांनो तुम्ही जशी काळजी घेणार आणि त्याला जपणार ते झाड तसं वाढणार, म्हणजे तुमचं काम अजून पूर्ण झालं नाही. " सर्व मुलांनी एका स्वरात "हो... " म्हणले. मुलं झाडं लावून आपल्या वर्गात परत गेली.
खरंच जशी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत. त्यांच्यात दडलेलं त्यांचं वेगळेपण आहे. तसेच आपले वेगवेगळे स्वभाव असतात. आपलं एक वेगळेपण असतं. कधी सुंदर, कधी औषधी, कधी स्थिर, कधी प्रवाही, कधी तीक्ष्ण, कधी कोमल तर कधी सावलीसारखे शीतल आणि शांत. झाडातले वेगळेपण शोधता शोधता आपल्यातल्या वेगळ्या गोष्टी आपसूक कळू लागल्या. त्यांच्यातलं आणि आपल्यातलं साम्य कळत गेलं. ऋतूप्रमाणे बदलणारी ती झाडं आणि परिस्थितीनुसार बदलणारे आपण... हा निसर्गाचा नियम प्रत्येकाला लागू पडतो. झाडाची एक विशिष्ट जागा असते जिथे त्याला सुपीक माती आणि वातावरण मिळते, तिथे ते सहज वाढते. आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात, आवडीच्या जागी तेवढेच सहज रूळतो आणि प्रगती करतो.
निवडुंगाला काटे का असतात? त्याच्या संरक्षणासाठी, दुष्काळी वातावरणात तग धरून ठेवणारे हे झाड. अडचणीच्या काळात स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकवणारे हे झाड म्हणजे निवडुंग.
आपण आपल्या भोवताली संघर्ष करणारी माणसे पाहतो. त्यांना यशस्वी होताना पाहतो. ती वेळ आणि त्यांचे संघर्ष म्हणजे कुठे तरी हे काट्याचे आवरण म्हणूयात. जे त्यांचे संरक्षण करत असते. त्याचे ते वेगळेपण कशासाठी आणि कशामुळे हे समजलं कि आपण त्या काट्यात ही सौंदर्य शोधतो. तेव्हा वेगळे वाढलेले झाडं ही आकर्षक वाटू लागते.