Tuesday, 27 January 2026

" काव्यजुई " पुस्तक प्रकाशन

दीपावलीच्या प्रकाशमान पर्वाला सुरुवात झाली तसे " काव्यजुई " हे पुस्तक या दीप पर्वात प्रकाशित होण्याचे वेध लागले. काव्यजुई हा माझा पहिला कविता संग्रह. आठवणीतल्या कविता घेऊन " काव्यजुई " पुस्तक तयार झाले. प्रकाशन आणि कवी - कवयित्रींचे संमेलन एकत्र पनवेल येथे आयोजित केले. आपल्या पहिल्या वहिल्या कवितेच्या संग्रहाचे अनावरण करताना तो आनंद इतरांसोबत वाटून साजरा करण्याचा हा एक प्रयत्न. नवे कोरे पुस्तक हाती आले तसे या दिवसाची उत्सुकता दिवसागणिक वाढत होती. कार्यक्रमाला डोंबिवली, मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथून कवी रसिक आले होते. कवितेशी त्यांची बांधलेली नाळ हे अंतर कमी करून एक ऋणानुबंध जोडून गेली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दीपा ठाणेकर या कोकण मराठी साहित्य परिषद कार्यवाह, कु. स्नेहा वाघ - को. म. सा. प उत्तर कोकण युवा प्रमुख, पुस्तकाचे प्रयोजक श्री. आनंद दातार, श्री. निशिकांत महाकाळ - को.म. सा. प. कळवा शाखा प्रमुख, त्याच सोबत मान्यवर कवी श्री सुभाष कुडके - अध्यक्ष- कोमसाप पनवेल, श्री नागनाथ डोलारे - उपाध्यक्ष - कोमसाप पनवेल, जेष्ठ कवी श्री शिवाजी मोटे सर उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली. आलेल्या कवी - कवयित्रींनी काव्य संमेलन फुलवले. 

आपल्या वहीच्या मागच्या पानावर लिहिलेल्या ओळी एका पुस्तकात पाहिल्यावर त्या प्रत्येक कवितेमागची गोष्ट, तेव्हाच्या भावना, ती तगमग आणि सुख दुःखाचे क्षण सारे डोळ्यासमोरून गेले. या पुस्तकाविषयी सांगताना माझ्या आयुष्याचे एक पान वाचून दाखवते असे वाटले. सर्वांनी या पुस्तकाला भरभरून शुभेच्छा दिल्या. माझ्या शाळेतले शिक्षक प्रीती धोपाटे, विजया शिंदे मॅडम या कार्यक्रमासाठी आवर्जून आल्या. त्यांना ऐकताना माझे शाळेचे दिवस आणि या प्रवासात आपली कुठून कशी सुरुवात झाली होती? याचा धावता आढावा घेतला. दीपा मॅडम ज्यांची या पुस्तकाला प्रस्तावना मिळाली. त्यांच्या कडून शाबासकी म्हणजे माझ्यासाठी माझे साहित्यातले माहेरघर. अशी जागा जिथे आपण मुक्तपणे कधी चालतो, कधी धावतो, कधी पडतो पण पुन्हा धावण्यासाठी आपली ताकद बनून कोणी तरी असते. असे पाठीशी असणारे कुटुंब आणि कुटुंब प्रमुख - दीपा मॅडम. " जुई " हे अल्लड, बागडणारे जर फुलपाखरू तर त्याच्या विविध रंगाची जाणीव करून देणारे माझ्या आयुष्यातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच - दीपा मॅडम. विद्यार्थ्यामधली बलस्थान आणि कमजोरी ओळखून त्यांना घडवणे ही शिक्षकांची दृरदृष्टी मला कायम त्यांच्यात दिसली. त्यातून मी ही शिकत गेले. आज त्यांनी मला लेक म्हणल्यावर माझ्या लिहिण्याला खोलवर अर्थ प्राप्त झाला. पाय जमिनीवर ठेवून आणखी प्रगती करण्याचे बळ मिळाले. निशिकांत सरांच्या येण्याने आणि त्यांनी तिकिटावर लिहून आणलेल्या कवितेत मांडलेल्या फुलांनी कार्यक्रमाला बहार आली. लेखन, नियोजनाचे काही धडे त्यांनी ही माझ्यात रुजवले. त्यामुळे साहित्य विषयात खतपाणी मिळाले. माझी मैत्रीण स्नेहा, ती सुद्धा या सोहळ्यासाठी आली होती. तिची माझी मैत्री युवाशक्तीच्या कट्ट्या मध्ये झाली. हळूहळू तिच्यातील कलाकार, वाचक, वक्ता मला दिसत गेला. समजत गेला. संघर्ष, चिकाटी, कलात्मकता मला भावली. तिचा प्रवास प्रगतीच्या दिशेने उत्तरोत्तर वाढत जावा अशी माझी इच्छा आहे म्हणून च तिचे येणे हे माझ्यासाठी दोन मैत्रिणींची भावनिक भेट होती. या पुस्तकाचे स्वप्न जसे मी पाहिले तसेच ते आनंद दातार यांनी ही पाहिले. त्यांची मदत आणि माझी आवड याची सांगड घालत हे कार्य सिद्धिस गेले. त्यांनी केलेली मदत ही माझ्यासाठी माझी स्वप्नपूर्ती असली तरी ती माझ्यासाठी आयुष्यभराची प्रेरणा आहे. ही साहित्यिक सेवा फक्त आपली स्वतः ची नसून ती सर्वांचीच एक विचारधारा आहे. जी पुढे जाऊन इतरांना प्रेरणा देईल. आणखी एकाची कविता कोळसाच्या खाणीतून हिऱ्यासारखी लखलखत समोर येईल. त्यासाठी आपण कार्यरत असायला हवे हा मूक संदेश त्याच्यात दडला आहे. पुस्तकाची सुबक बांधणी अक्षरदाणी प्रकाशन यांच्या माध्यमातून झाली. प्रज्ञा पळसूले यांनी ते प्रत्यक्षात आणले. जुईच्या फुलानीं सजलेला काव्यजुई संग्रह मान्यवरांनी उघडला तेव्हाचा क्षण म्हणजे " ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास " असा काहीसा होता. प्रथमेशच्या सुलेखानाने रंगमंचाचे सौंदर्य अधिक वाढले. अक्षरांना वळण आले कि त्यांचे सौंदर्य अधिक वाढते आणि आपली साधी कविता ही देखणी होते हे मला कायम त्याच्या कलाविष्कारातून जाणवले. यामुळे माझ्या कवितेला त्याचे अक्षर मिळावे अशी माझी इच्छा होती. ती त्याने लिलया पेलली. या संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रबद्ध सूत्रसंचालनाची जबाबदारी अनुकूलने आपल्या खांद्यावर घेतली आणि बहारदार कवितांच्या माध्यमातून प्रत्येकाची मने जिंकली. नावाप्रमाणे काव्यमय वातावरण सर्वांसाठी अनुकूल केले. त्याच्या सूत्रसंचालनात भावनिक आंदोलने होती. आनंद होता. शब्दांची समय सूचकता, मधेच एखादे विनोदी वळण होते.

कधी मैत्रीण म्हणून, कधी कवयित्री म्हणून तर कधी आपली बहीण मानून त्याने माझ्यासाठी ज्या रचना घेतल्या. त्या ऐकताना आपसूक माझ्या डोळ्यात पाणी आले, ही च ती कवितेची ताकद असावी जी जोडण्याचा धागा होते. आपल्या लहान भावाप्रमाणे त्याचे कौतुक वाटले. कवी संमेलनाची सांगता जयेशच्या गाण्याने झाली. जयेश आणि मी अनेकदा कवितेच्या कट्ट्यासाठी एकत्र असायचो. त्याचा प्रवास ही संघर्षातून यशाकडे असंच म्हणावं लागेल. माझ्या साठीचे सरप्राईज म्हणजे त्याची "चाफा बोलू लागला " ही कविता. चाफ्याने सुंगधी सदाबहार सांगता झाली. चाफा मनाला स्पर्शून गेला. मित्र मैत्रिणीच्या सोबत शेयर केलेली आपली कविता आज ऐकण्यासाठी समोर आलेले रसिक पाहून संतुष्टी मिळाली. या संपूर्ण प्रवासात पडद्यामागची माणसे म्हणजे माझे आई बाबा, माझा भाऊ - वैभव आणि माझे यजमान - विद्याधर यांची साथ, सर्वांच्या आशीर्वादाने प्रकाशनाचा कार्यक्रम सुफळ संपूर्ण साजरा झाला. काव्यजुई पुस्तकावर आपली सही करून देताना मनात समाधानाचे फुलं फुलत होते. त्याचा दरवळ आयुष्यभर माझ्या सोबत असणार आहे. आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून अनेकांना नवी सुरुवात मिळून जाते. त्याचेच फलित म्हणजे " काव्यजुई " आणखी एक काव्यमय आठवणीतले पान.


Monday, 26 January 2026

आजीची सखी


सखी चतुर्थीच्या सुट्टीची दरवर्षी आतुरतेने वाट पाहायची. गणपती बाप्पा हे एक आकर्षण होतेच पण त्याहून मोठे आकर्षण म्हणजे गणपतीची सुट्टी सुरु झाली कि आजोळी कुडाळला धूम ठोकायची. आजी आजोबांच्या टूमदार कौलारू घराचे दरवाजे चतुर्थीला सखीची वाट पाहत असायचे. सखीचे बालपण शहारातल्या सुखवस्तू त्रिकोणी कुटुंबात गेल्याने अपार्टमेंटच्या बाहेरचे गावपण तिला आजोळी सापडायचे. आवडायचे ही.

यंदा सखी पाचवीच्या वर्गात गेली होती. हळूहळू परिसर ज्ञान तिच्या अभ्यासात वाढत होते. त्यामुळे आजूबाजूच्या जीवसृष्टीविषयी, वेगवेगळ्या परिसंस्था, ऊर्जा, नैसर्गिक चक्र या घटकांविषयी तिच्या मनात कुतूहल होते. यंदा आजोळी गेल्यावर आजीला हे सगळे सांगायचे, आता पर्यन्त जे जे नवीन शिकले त्याची उजळणी आजीकडे करायची हे तिने मनोमन ठरवले. बघता बघता सुट्टी सुरु झाली. सखीने आजोळी कुडाळला जाण्याचा हट्ट सुरु केला. सखीच्या इच्छे खातर आई बाबा सुट्टी घेऊन आजोळी आले. सखीने आल्या आल्या आजी आजोबांना साष्टांग नमस्कार केला. सखीची आजी आणि ती म्हणजे मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी त्यावर तुपाची धार. त्या जोडीशिवाय पोळीची गोडी नाही तसेच काहीसे यांचे नाते. तपकिरी सुती नववार, गळ्यात तुळशी माळ, डोळ्यांवर मोठ्या भिंगाचा चष्मा, हातात हिरव्या बांगड्यांची मूठ, नाकात मोठी नथ आणि लहानसा अंबाडा त्यावर एक सोन चाफ्याचे फुलं. आजीचे हे प्रेमळ रूप सखी डोळ्यात साठवत होती. आजीने सखीसाठी कौतुकाने बेसनाचे लाडू तयार केले होते. पितळ्याच्या डब्यातून आजीने सर्वांसाठी लाडू आणले. एक अखंड लाडू सखीला भरवला. लाडू तोंडात असताना सखीचे गाल टम्म फुगले होते. तशीच तिने आजीला मिठी मारली. मोठ्यांच्या गप्पा सुरु होत्या. सखी तिच्या नादात घरभर हिंडत होती. तशीच ती घरामागच्या अंगणात गेली. अंगणात गेल्यावर सखीचा तिथून पायच निघेना. मागच्या लाकडी दरवाज्यातून अंगणात जायचा रस्ता होता. रस्त्याच्या कडेनेच शिस्तीत काळ्या मुंग्याची रांग जात होती. ती थेट जांभळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून मुळाशी असलेल्या मातीच्या वारूळात दाखल होत होती. आजीला फुलांची, वेलींची भारीच आवड. त्यामुळे एखाद्या गृहिणीने आपले स्वयंपाक घर जसे नेटके ठेवावे तशीच ही जागा आजीने जपली होती. तशीच देखभाल या अंगणातल्या झाडांची, फुलांची आजी ठेवत असे. घराच्या कुंपणावरून धावणारी गडद जांभळ्या, फिकट पांढऱ्या रंगाची गोकर्णाची वेल एकमेकांत सुबकपणे मिसळली होती. एका कोपऱ्यात तीन चार फुट वाढलेला पिवळा, केशरी झेंडू ही तसाच भरभरून फुलला होता. दाराजवळ असलेला सुगंधी पारिजातक फुलांच्या पायघड्या घालत होता. खिडकीशी फुलणारी नाजुक पांढरी जाई, जुई खिडकीचे सौंदर्य वाढवत होती. एका बाजूला अनंत तर दुसऱ्या बाजूला रातराणी. फुलण्यासाठी उत्सुक असणाऱ्या, अंगणाच्या मधोमध असलेल्या लाल बुंद जास्वंदीच्या कळ्या. दिवस रात्र सुगंधाची आणि रंगांची उधळण करणारी ही मंडळी आजीने मनापासून जपली होती. सखी कुतूहलाने प्रत्येक झाड न्याहाळत होती. पानाचे आकार, फुलाचे रंग, त्याच्या पाकळ्या, त्यांची रचना आणि त्यात दडलेलं कुतूहल.

बराच वेळ झाला तरी सखी घरात आली नाही म्हणून आजीच तिची नक्षीदार काठी टेकवत शोधत शोधत अंगणात आली. आजीने सखीला पाहिले आणि विचारले,
" एवढी आवडली ही फुलं सखीला..." सखीने होकारार्थी मान हलवली. आजीने त्यावर तिला सांगितले, " त्यातली बरीच झाड ही तुझ्या पणजी आजी पासुन आहेत बघ, अजून तशीच आहेत. "

सखीला आश्चर्य वाटले. तिने आजीला विचारले " ही झाड एवढे दिवस जगली कशी आजी, तू त्यांची कशी काळजी घेतलीस? "
त्यावर आजी म्हणाली, " मी काही विशेष केलं नाही ग... तीच झाडं एकमेकांना जपत मोठी झाली. इथे येणारी फुलपाखरे, भुंगे, मधमाश्या त्यांना त्यासाठी मदत करतात. आणि मी त्यांच्या वाढण्यात ज्या गोष्टी बाधा आणतात, जसे हे बघ ही जंगली झुडपे, तण, वाढलेले गवत ते मी काढून टाकते. मग ही झाड त्यांची त्यांचीच वाढत जातात. " एवढे बोलून आजीने सखीला घरात यायला सांगितले.

अंधार पडू लागला होता. बघता बघता रात्र झाली. सर्वांची जेवणं झाली. सखी आजीसोबत झोपायला आली. आजीसोबत मनसोक्त गप्पा मारून झाल्या. परिसर ज्ञान ते विज्ञान याची उजळणी ठरवल्याप्रमाणे आजीकडे झाली. गप्पाच्या ओघात आजीने सखीला तिचे अनुभव गोष्टीतून सांगायला सुरुवात केली. सखीने आजीला विचारले " आजी, तूला कधी भीती वाटली तर तेव्हा तू काय करतेस ? "
आजीने सांगितले, " सखी, एखादी नवीन गोष्ट समोर आली कि सुरुवातीला भीती वाटतेच, चुकीचे विचार मनात येतात. तेव्हा मी काय करते माहितीये, घरामागले ते अंगण आठवते. श्रावणात एवढी सुंदर फुलं येतात, अंगण वेगवेगळ्या रंगानी अक्षरशः रंगून जाते. पण त्या सोबतच पावसाळ्यात तिथे गवत सुद्धा वाढते. त्यात साप, सरडे येण्याची शक्यता असते . मग अशा वेळी आपण काय करतो. नको असलेली झुडपे, गवत काढून टाकतो. त्यामुळे इतर झाड पण वाढतात आणि साप सरड्यांची भीती पण कमी होते. तसेच आपल्या मनातली भीती, चुकीचे विचार वेळीच काढून टाकले तर फक्त चांगल्या विचारांची बाग फुलते.

मी या घरात येण्यापूर्वी शाळा शिकले नव्हते. पण लग्नानंतर आजोबांनी घरी सतत पुस्तक आणून आणून मला शिकण्यासाठी तयार केले. त्यात काय बरे असेल? त्या उत्सुकतेने मी पण शिकले. मला हे जमेल का? या प्रश्नाचे उत्तर आजोबांनी कधीच " नाही " म्हणून दिले नाही. आपण शिकत शिकत सुजाण होताना येणाऱ्या या नकारात्मक थांब्याना वेळीच छाटले तर पुढे जाण्यासाठी आपला मार्ग मोकळा होतो. जे चांगले ते उगवते आणि वाढते. आपले आपणच आपसूक शिकत जातो. अगदी गोकर्णाच्या वेलीवरच्या फुलाप्रमाणे फुलत जातो." आजीने सखीकडे पाहिले. मांडीवर डोके ठेवून सखी आजीच्या बोलण्यावर विचार करत होती. आज आजीच्या बोलण्यातून ती पुस्तकाबाहेरचे परिसर ज्ञान शिकली होती.



कालाय तस्मै नमः



वेळ हि कोणासाठी अगदी लहान सुईसारखी तर अगदी लांब हनुमानाच्या शेपटी सारखी आहे. कोणासाठी त्यांचे कामाचे नियोजन म्हणजे वेळ तर कोणासाठी आयुष्याचे रिकामपण म्हणजे वेळ. कोणी मिनिटावर ती कमावतो तर कोणी तासावर. कोणी तिच्या मागे हि धावणारा, कोणी तिच्या पुढे हि धावणारा, कोणी भूतकाळात थांबलेला तर कोणी भविष्यात रमणारा. प्रत्येकासाठी वेळ हि वेगळे रूप घेऊन येते. वेगळे अनुभव घेऊन येते, तरीही वेळ कोणासाठी थांबत नाही. मग हि वेळ कधी बंद गुहा वाटते जी भरपूर रहस्यांनी भरलेली असते. कधी ती वादळीवाऱ्यासारखी वाटते, अमर्याद वेगात येणारी आणि सर्वदूर जाणारी. क्षणात विलुप्त होणारी. आपत्तीसारखी परीक्षा घेणारी आणि शांत झाल्यावर सारे मळभ दूर करणारी.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वेळेचे महत्व सांगताना म्हणतात, वेळ हि नदी सारखी आहे, नदीचा प्रवाह सतत बदलल्याने तुम्ही त्याच पाण्याला दुसऱ्यांदा स्पर्श करू शकत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही तेव्हा आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. हे सांगताना ते पाण्याचेच उदाहरण देतात ज्याप्रमाणे पूर आल्यावर मासे कीटकांना खातात त्याउलट दुष्काळ पडल्यावर कीटक मासे खातात. वेळ हि प्रत्येकासाठी संधी घेऊन येते. आपल्याला त्या संधीची वाट पाहता आली कि बदल दिसतो. अपयशाचे रूपांतर यशस्वी जीवनात होते. निराशेच्या जागी आशावादी विचार येतात. दुर्लक्षित गोष्टी प्रकाशात येतात. आणि हि जादू फक्त आपण दिलेल्या वेळेत असते. वेळ मला हि वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहासारखी वाटते. ज्याप्रमाणे नदी सतत प्रवाही असल्याने नदीला नवं निर्मितीचे वरदान आहे. तसेच वेळ सुद्धा पुढे पुढे सरत जाते, नवनिर्मितीचे वरदान घेऊन येते. नदीचा प्रवाह लहान असो किंवा मोठा तो मधेच थांबला तर त्याचे डबके होते तसेच वेळेचे आहे. कोणी वेळेसाठी थांबले तर हळूहळू निष्क्रियतेचे डबके झाल्याशिवाय राहत नाही. असा हा वेळेचा महिमा आपल्याला अनेक उदाहरणांवरून समजत जातो. आपले आजूबाजूचे जग, आपली दैनंदिन कामे, असंख्य पुस्तके या वेळेचे गणित आपल्या समोर मांडत असतात. आपण रोज ते आव्हान स्वीकारत असतो. त्यातून शिकत असतो.

कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी वेळ लागत नाही, वेळ लागतो तो त्याचे निष्कर्ष समोर येण्यासाठी. त्यातूनच आपण संयम शिकत जातो. त्याचे महत्व निसर्ग सुद्धा पावलो पावली आपल्याला सांगत असतो. वेळेचे महत्व सांगण्यासाठी ऋतुचक्राचे जाते फिरते. दिवसाची रात्र होते. रात्रीचा दिवस होतो. रोपट्याचे झाड होते. कळीचे फुल होते. जेव्हा मातीत बी पेरली जाते तेव्हापासून ते त्याचे झाड होण्यापर्यंत, त्याला फळे , फुले येण्यापर्यंतचा प्रवास हि वेळ सांगत असते.

वेळेविषयी आणखी उलगडून सांगणारे अनेक संत महात्मे मला आठवतात, उदाहरणच द्यायचे झाले तर लहानपणासून ऐकण्यात आलेले श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक या वेळेविषयी किती सुंदर अर्थबोध सांगतात ,

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।

अकस्मात होणार होऊनि जाते॥

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।

मतीमंद तें खेद मानी वियोगें॥

आपण आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला थोपवून ठेवू शकत नाही. कधी सुखाचे क्षण तर कधी अडचणींचे प्रसंग येतच असतात. अशा वेळी चिंताग्रस्त झालेल्या मनाला दिलासा देणारे सत्य म्हणजे जे विधिलिखित ते होणारच आहे, त्यामुळे त्याचा स्वीकार करून जगणे, मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड, खेद, आकस न बाळगता त्या वेळेला शरण जाणे त्यातून तरून जाणे हेच जीवनाचे सार आध्यात्मापासून ते वैज्ञानिक विचारधारेतून सांगितले आहे.

अँपल चे सह संस्थापक स्टीव्ह जॉब वेळेचे गणित सोडवताना एके ठिकाणी म्हणतात, तुम्हाला मिळालेली वेळ हि मर्यादित आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणासारखे जगण्यात वाया घालवू नका. इतरांच्या विचार सरणीचा परिणाम तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या ध्येयावर होऊ देऊ नका. तुमच्या क्षमता इतरांच्या मतावर ठरवू नका. आणि सगळ्यात महत्वाचे तुमच्या मनाचा आवाज ऐका, कारण त्याला बरोबर माहिती असते, तुम्हाला नक्की काय हवे. यावर जेव्हा आपण विचार करू लागतो त्यानंतर हा आत्मशोध आपल्याला तिथवर नेऊन पोहोचवतो जिथे हि वेळ आपल्या सोबत असते. आपली ओळख होऊन, आपली जवळची मैत्रीण होऊन, एका आनंदी जगात ती स्थिर होते.

जसा काळ जातो, तसे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे चित्र बदलत जाते. कुणाचे जुने सल भरून निघतात, कुणी नवी नाती जोडतात. कोणासाठी तोच तो प्रवास असतो, कुणासाठी आयुष्याची नव्याने सुरुवात असते. कोणी अडचणीतून पुढे येताना दिसतो, कोणी नवा शोध लावतो. या प्रवासात कोणाचा नव्याने शोध लागतो. चित्र बदलत जातात. माणसे बदलत जातात, कारण वेळ बदललेली असते. अल्बर्ट आईनस्टाईन वेळेचे कारण सांगताना म्हणतात, " सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला होऊ शकत नाही म्हणूनच वेळ हि महत्वाची. " या काळाच्या, बदलत्या वेळेच्या शक्तीला वंदन करून येणारा प्रत्येक क्षण भरभरून जगूया.



जागतिक पुरुष दिन : मोव्हेंबर


नोव्हेंबर महिन्याचे एक विशेष महत्व म्हणजे १९ नोव्हेंबर हा " जागतिक पुरुष दिन " म्हणून ओळखला जातो. पूर्वीपासूनच समाजात आणि कुटुंबात पुरुषांचे स्थान हे अढळ आहे. ज्या प्रमाणे स्त्री वर्गाची समाजाप्रती, आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रती नैतिक जबाबदारी असते. तशीच जबाबदारी पुरुषांची आहे. सततच्या व्यस्थ नियोजनात ते दिसत असते. समाजात वावरताना काही बंधने स्त्रियांना आहेत तशीच ती पुरुषांना ही आहेत.  अशा समाजात स्त्रियांप्रमाणे पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी, त्यांनी एकत्र येणे तसेच  त्यांच्या प्रति आदर भाव समाजात, कुटुंबात वृद्धिंगत होणे ही जरुरीचे आहे. त्यासाठी हा दिवस कधी रॅली काढून तर कधी  पथनाट्यतून संदेश देत साजरा केला जातो.


समाज सुशिक्षित व विकसित होण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातील माणसे एकत्र येतात तेव्हाच हे साध्य होते. विकसित देशात सातत्याने कार्यरत असणारे आणि उच्च स्थान गाठणारे यशस्वी पुरुष किंवा खेडेगावात मोलमजुरी करणारे मजूर कुठल्या ना कुठल्या मानसिक व शारीरिक व्याधीनी ग्रस्त आहेत. त्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक निराषेतून आत्महत्येची पायरी गाठली जाते. अशा वेळी त्यांना साहाय्य करण्यासाठी त्यांचे कुटुंब असते. त्यासोबत अनेक संस्था, समुपदेशक पुढे येतात.  जागतिक पुरुष दिनानिमित्त पुरुषांच्या आरोग्यासाठी हा दिवस जगात साजरा होतो.

जगभरात हा संपूर्ण महिना  वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा केला जातो. मोवेंबर फाउंडेशन यात सक्रिय योगदान देते. याची सुरुवात २००३ मध्ये मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे  झाली. ३० जणांच्या साहाय्याने सुरु केलेली ही वाटचाल आता ६ दशलक्ष लोकांपर्यंत पर्यंत पोहोचली आहे. त्या संस्थेमार्फत पुरुष वर्गात मानसिक, शारीरिक स्वास्थ्याविषयी जनजागृती केली जाते. त्यात मुख्यत्वे पुरुषांना होणारे गंभीर आजार जसे टेस्टीक्युलर कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, वाढते आत्महत्येचे प्रमाण, नैराश्य व अन्य विकार यांचा समावेश आहे. यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याचे लवकर निदान करून त्यावर वेळीच उपचार करणे, गरजूना मदत करणे अशी कामे या संस्थेमार्फत होतात. ऑस्ट्रेलिया मध्ये पुरुष संपूर्ण महिनाभर मिशा वाढवतात. मिशी  वाढवणे ही त्याची खूण मानली जाते. त्यांच्या भाषेत मो म्हणजे मिशी. पुढे या नोव्हेंबर महिन्याला मोवेंबर संबोधले गेले. हळूहळू याची दखल इतर देशात ही घेतली गेली. त्यात डेंमार्क, कॅनडा, जर्मनी, स्पेन, न्यूझीलंड, नॉर्वे, यू. के, यू. स, स्विडन, आयरलंड या सारख्या देशांचा समावेश आहे. जगभरातून या कार्यासाठी देणगी दिली जाते. या फाउंडेशन च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात, ज्यात लोक सहभागातून माणसे एकमेकांशी जोडले जातात. त्यांचे हे कार्य पुरुषांच्या प्रति समाजात सकारात्मक विचार रुजवत आहे.

निरोगी समाजाचा पाया म्हणजे स्त्री आणि पुरुष. धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे ही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी उचललेले हे एक पाऊल येणाऱ्या आव्हानासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

संदर्भ : Movember Foundation
Movember - changing the face of men's health - movember

जादुचे पेन

जादूचे पेन ही मूळची इंग्रजी कथा. इमा नावाच्या मुलीला लिहिण्याची आवड होती. तिची एक स्वतःची वही होती, ज्यात तिने साहसी कथा, परिकथा आणि गुढ गोष्टी लिहून ठेवल्या होत्या.

एकदा खूप पाऊस पडत असताना इमा दुपारी तिच्या आजीच्या खोलीत आली. तिने तिच्या आजीच्या कपाटातील एक गुप्त कप्पा उघडला. तो कप्पा आवरताना तिला त्याच्यात एक सोनेरी रंगाचे पेन पडलेले दिसले. उत्सुकतेने तिने ते पेन हातात घेतले आणि निरखून पाहिले. त्या पेनाच्या एका बाजूला कोरले होते ते तिने वाचले " या पेनाचा योग्य वापर करून लिहा आणि ते शब्द खरे होतील " हे वाचल्यावर आश्चर्यचकित होऊन तिने ते पेन आपल्या खोलीत आणून एक कथा लिहायला घेतली. त्या कथेत एका लहान मुलीला तिच्या अंगणात एक मौल्यवान खजिना मिळतो. असा त्या कथेचा शेवट होता. कथा लिहून झाल्यावर चमत्कारिक गोष्टी घडायला सुरुवात झाली. बाहेरच्या अंगणातील जमीन हलायला लागली आणि थोड्याच वेळात एक सोनेरी पेटी तिथे प्रकट झाली. ती पेटी पाहून चकित झालेली इमा बाहेर अंगणात धावत आली. तिने ती पेटी हातात घेतली आणि उघडली. त्यात तिला चमकणारे आकर्षक असे खडे मिळाले. ती तिच्या खोलीत धावत आली. ती मनातल्या मनात म्हणाली, "खरंच हे पेन लिहिलेल्या सर्व गोष्टी खरे करेल?"

पुढच्या काही दिवसात इमाने वेगवेगळ्या गोष्टी लिहून पाहिल्या. तिने एका कुत्र्याशी मैत्री करण्याबद्दल लिहिले आणि त्याच दिवशी एक गोंडस कुत्र्याचे पिल्लू तिच्या दाराशी आले. नंतर तिने प्रकाशमान दिवसांविषयी लिहिले आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी सुरु असलेला पाऊस थांबला आणि स्वच्छ निरभ्र आकाश दिसू लागले.

एकदा इमाने तिच्या या जादुई पेनाबद्दल आपल्या जिवलग मित्राला मॅक्सला सांगायचे ठरवले. एका संध्याकाळी तो घरी आला. तेव्हा तिने त्याला ते पेन दाखवले. त्या पेनाची जादू सांगितली. मग दोघांनी मिळून कलात्मक, सुंदर, संवेदनशील गोष्टी लिहायला सुरुवात केली, जसे की त्यांच्या शाळेत फुलझाडे लावणे, एकटे पडलेल्या माणसांना मित्र भेटणे अशा अनेक गोष्टी त्यांनी लिहिल्या.

अचानक एके दिवशी इमा आणि मॅक्स यांच्यामध्ये भांडण झाले. पुढचा मागचा विचार न करता इमाने त्या पेनाने लिहिले " जोपर्यंत मॅक्स माझी माफी मागत नाही, तोपर्यंत त्याचा आवाज बंद होईल " त्या क्षणी मॅक्सचे बोलणे थांबले. तो अचानक शांत झाला. तो शांत झाल्याने इमा पुरती घाबरली होती. त्याचा आवाज कायमचा जावा असे तिला अजिबात वाटत नव्हते. लगेच तिने त्याची माफी मागितली आणि वहीवर लिहिले " मॅक्स चा आवाज पुन्हा यावा " मॅक्स पुन्हा बोलू लागला. तोही सुरुवातीला घाबरला होता. नंतर दोघेही हसायला लागले. तेव्हाच त्यांनी या पेनाने दुसऱ्याच्या हिताचे आणि चांगलेच लिहायचे ठरवले. नंतर बरीच वर्ष गेली. इमाने ते पेन सुरक्षित आणि गुप्त ठेवले जेव्हा एखाद्याला चांगल्या कामासाठी त्याची मदत होईल तेव्हाच तिने ते वापरले. इमाकडे असलेले पेन जरी जादूई आणि अद्भुत असले तरी खरी जादू ही संवेदनशील शब्दात आणि इतरांना मदत करण्यात आहे हे इमाला कळले होते.

Friday, 23 January 2026

खारी बिस्कीट


          संध्याकाळी लाल नारंगी झालेल्या आकाशात धुसर काही दिसत होते. लांबून काळ्या ठिपक्यांच्या रंगोळीप्रमाणे भासणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याचे निरीक्षण सुरू होते. हातातला चहाचा कप बिस्कीटची वाट पाहत होता. वाफळलेल्या चहामध्ये बिस्कीटाने बुडी घेतली. लिहिण्यासाठी समोर एक विषय होता... खारी बिस्कीट.
          चित्रपटगृहात पाहिलेल्या खारी बिस्किटची आठवण झाली. लहान असो किंवा मोठे, स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य आणि काल्पनिक विश्वात रंगून जायचं वरदान देवाने प्रत्येकाला दिले. त्याच आभासी विश्वावर एक कुटुंब, एक घर, एक गाव किंवा हे विश्व चालतं याची जाणीव चित्रपटातील पात्र पाहून होत होती.
          आपले शरीर आणि इंद्रिये अशी अस्थिर स्वप्न स्थिर करण्यासाठी असतात. सत्यात आणण्यासाठी असतात. कानांनी ती ऐकलेली असतात. नाकपुड्यात त्यांचा दरवळ साठवता येतो. डोळ्यात ती पूर्ण होताना दिसतात. जिभेने त्याच कौतुक होत तर स्पर्शाने ती स्मरणात राहतात. याची सुरवात कुठे होते माहिती आहे ? ही जादू मनात कुठल्यातरी कोपऱ्यात जपून ठेवलेली असते. जेव्हा त्या मनाची कवाडे उघडली जातात, तेव्हा अशा खऱ्या, खोट्या आभासी स्वप्नाची एन्ट्री व्हायला सुरवात होते. सभोवती होणारी अदलाबदल तेव्हा आपोआप अंधुक होत जाते किंवा आपण ती नजरेआड करतो. पण हो या गोष्टीची जाणीव करून देणारा कोणी तरी आपल्याला वारंवार या प्रवासात भेटत असतो. तरीही ती स्वप्न पूर्ण करण्याचा आणि आपल्या डोळ्यात साठवण्याचा हट्ट आपला काही सुटत नाही मग ते स्वतः साठी पाहिलेलं असो किंवा दुसऱ्यासाठी पाहिलेलं स्वप्न.
            साध्या सरळ आणि बेताची परिस्थिती असलेल्या कुटुंबाची गोष्ट. स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या अंध बहिणीची ही कथा. कधी क्षुल्लक तर कधी मौल्यवान वाटणाऱ्या इच्छा आकांशाची कथा. बहिणीची स्वप्न पूर्ण करणारा भाऊ. आईने जाता जाता दिलेला कानमंत्र “ ती आपली प्रिन्सेस आहे, तिला फक्त चांगल्या गोष्टी दाखवायच्या “ हे वाक्य समाजात दडलेल्या अप्रिय रूपाची जाणीव करून देते.
बहीणीच्या स्वप्नांचा पाठलाग करताना “ विमानाने केलेला प्रवास येताना पायी चालत चालत कसा संपला “ खोटं होत ना सगळं “ या बहिणीच्या वाक्यावर भावाचे गहिवरणे प्रेक्षकांना भावुक करून जाते.
        “Better luck next time” हे त्यांना लागणाऱ्या लॉटरीच्या तिकीटावरच वाक्य आपल्याला गुडलक वर विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडते. कसे माहिती आहे ? कमी खर्चात सलमान, शाहरुख आणि सचिनची भेट. आपलं गुडलक त्यांना ही मिळावं म्हणून केलेली धडपड. कदाचित बुद्धीला पटणार नाही पण मनाला नक्कीच पटेल. न पाहता वर्ल्ड कप जिंकण्याच दृश्य रंगवून सांगण्याचे आणि ते मैदानावर जाऊन पाहण्याचे धाडस ही स्वप्न पूर्ण करण्याची धडपड पूर्ण चित्रपटात दिसते.
          इथे लोक खोट बोलतात. खोट्या आशेवर राहतात. त्यासाठी ती राबतात. रडतात. हसतात. आपली सगळी जिंदगी काढतात आणि हे ही तितकेच खरे आहे जोपर्यन्त त्या आशेवर आहेत तोपर्यंत त्यांचे जग सुरू आहे. Better luck next time हे वाक्य आपल्याला आपल्याच रोजच्या कटकटीतुन पुढे जाण्याच बळ देते आणि आपण लगेच स्वतः ला त्यासोबत रिलेट करू लागतो.
             “ Better luck next time “ लिहिलेलं स्क्रॅच कार्ड बरेचदा आपल्याला ही येत, तरीही स्वप्नांना पूर्ण करता करता कधी सेंच्युरी होते कळत नाही. आपले स्वप्नाचे विमान उंच उडवायचे म्हणजे डोळस मनाची आणि गुडलकची सोबत. म्हणजेच खारी बिस्कीट. भावाबहिणीची शब्दात बांधलेली आणि डोळ्यात साठवलेली रंगीत स्वप्नाची माळ जपत चित्रपटाचा शेवट होतो.

Thursday, 22 January 2026

क्षमा



वंदनाचा वाढदिवस होता. विजय आणि मैत्रेयी सेलिब्रेशनच्या तयारीत होते. वंदना आणि विजय यांची मुलगी मैत्रेयी असे हे त्रिकोणी कुटुंब पुण्यात राहत होते. विजय खुप चांगला आर्टिस्ट – चित्रकार होता. वेगवेगळे पोर्ट्रेट काढून त्याचे प्रदर्शन तो आर्ट गॅलरीत भरवत असे. लोक आवडीने त्यानी काढलेली चित्र विकत घेत असत. वंदना म्हणजेच मैत्रेयीची आई, गायिका होती. शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम ती करत असे. विशेष म्हणजे यंदा वाढदिवसाच्या दिवशी तिचा गाण्याचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमात तिचा जाहीर सत्कार ही होणार होता. विजयला वंदनाच्या गाण्याचे आणि आवाजाचे कौतुक होते. वंदनाच्या आवाजाच्या प्रेमातच तो सुरुवातीला पडला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिचा सत्कार होणार म्हणून तो ही खुश होता. त्यामूळे त्या दिवसाची तिची जोरदार तयारी सुरू होती. तिला आपण रात्री बाराला सरप्राईज देऊ असा विजयचा बेत होता. त्यासाठी विजय वंदनाची नजर चुकवून ती तयारी करत होता. वंदना तिच्या कार्यक्रमाची तालीम करत होती. मैत्रेयी तशी अजून फार लहान होती. अजाणती होती. त्यामुळे बाबा सांगेल ते छोटं छोटं काम करून ती सेलिब्रेशन मध्ये हातभार लावत होती. बघता बघता रात्रीचे साडे अकरा वाजले. बाहेरच्या लॉन मध्ये सगळी मांडणी करून झाली. मैत्रेयी झोपाळ्यावर खेळत बसली होती. शेजारी त्यांचा कुत्रा रुसी आपले पाय दुमडून झोपला होता. अवघ्या काही क्षणात वंदना तिथे येणार होती. टेबलावर सुरेख असा केक आणून ठेवला होता. केकच्या बाजूने आकर्षक मेणबत्याची रोषणाई केली होती. त्यामुळे केक अधिक उठून दिसत होता. बाजूला रंगीत फुलं ठेवली. झोपाळा ही सजवला. आता फक्त एकच गोष्ट राहिली. आपण स्वतः तयार केलेली भेट आणायला तो घरात गेला. मैत्रेयी झोपाळ्यावर बसून केककडे पाहत होती. तिला कधी एकदा वंदनाला सांगते असे झाले होते.
जसा विजय तिथून गेला. झोपाळ्यावरून उतरून ती पळतच वंदनाकडे गेली. वंदना खोलीत तिचा तंबोरा नीट करत होती. मैत्रेयीने तिला हाक मारली. वंदना तिच्या कामात इतकी व्यस्त होती, की तिचे मैत्रेयीकडे लक्ष गेले नाही. मैत्रेयीने शेवटी तिचा एक हात धरला आणि बाहेर येण्यासाठी खेचू लागली. या झटापटीत वंदनाच्या हातून तंबोरा सुटला. त्याची एक तार तुटली. तिला काही सुचेना. त्याच क्षणी तिने मैत्रेयीला बाहेर जायला सांगितले. तिचा चढलेला पारा बघून मैत्रेयी रडत रडतच बाहेर लॉन मध्ये आली. आली तशी समोर सजवून ठेवलेल्या टेबलाला येऊन धडकली. टेबलावरचे मांडलेले सगळे उलटे पडले.
अचानक टेबलवर ठेवलेल्या पेटत्या मेणबत्तीमूळे त्या लाकडी टेबलाने ही पेट घेतला. मैत्रेयी थोड्या अंतरावर तिकडेच पडली. आग लागलेली पाहून ती बावरली आणि बेशुद्ध झाली. रुसी त्यांचा पाळीव कुत्रा मोठ्याने भुंकू लागला. बघता बघता मैत्रेयीच्या कपड्याने पेट घेतला. रुसी मोठ्याने भुंकत वंदना जवळ आला. हातातला तंबोरा तिकडेच टाकून वंदना पळत बाहेर आली. बाहेर तुटलेला टेबल, विस्कटलेला केक आणि पेटलेली ठिणगी, त्यात पडलेली मैत्रेयी तिला दिसली. मैत्रेयीला तसेच कडेवर घेऊन तिने तडक जवळचे हॉस्पिटल गाठले.
थोड्याच वेळात त्या लॉन मध्ये विजय आला. विजयने तिथे जळलेले, तुटलेले टेबल पाहिले. उलटा पडलेला केक आणि हलणारा मोकळा झोपाळा पाहिला. ज्यावर त्याने मैत्रेयीला बसायला सांगितले होते. पण आता तिथे मैत्रेयी नव्हती. मनातला गोंधळ सावरे पर्यन्त रुसी तिथे आला. विजयला काही तरी खुणावू लागला. रुसीच्या मागोमाग विजय हॉस्पिटल पर्यन्त पोहोचला. तिकडे मैत्रेयीची चौकशी केली. रिसेप्शनला बसलेल्या बाईंनी विजयला तिसऱ्या मजल्यावर जायला सांगितले. धापा टाकत तो तिथवर पोहोचला. मैत्रेयी त्याला पहिल्याच रूम मध्ये बेशुद्ध पडलेली दिसली. वंदना तिथे पाठमोरी उभी होती. विजय आत आला. रडत रडतच ती विजयला म्हणाली “ इतका वेळ तू कुठे होतास ? “ वंदना घाबरली होती. तिला काहीच सुचत नव्हते. तशीच ती मैत्रेयीच्या बाजूला जाऊन बसली. विजय दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून मान खाली घालून तिथेच उभा होता. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तिथल्या डॉक्टरांनी विजयला ओळखले होते. “ तुम्ही विजय सबनीस ना...पेंटींग्ज खूप छान असतात तुमचे... ही तुमची मुलगी का? “ ते विजयला म्हणले. विजयला मैत्रेयीच्या अपघाताने धक्का बसला होता. विजयने त्यांच्याकडे पाहून म्हणले, “ डॉक्टर ही माझी मुलगी, मैत्रेयी... ती ठीक आहे ना... तिला प्लीज तुम्ही शुद्धीत आणा. “ डॉक्टर त्याच्याकडे पाहत त्याला धीर देत म्हणाले, “ मैत्रेयीला हाताला थोडे भाजले... ती शुद्धीत आली की लगेच आपण उपचारांना सुरुवात करूया. ती आता ट्रॉमा मध्ये आहे, मैत्रेयी विल बी ऑल राईट.. डोन्ट वरी... “ तेवढ्यात मैत्रेयीने हालचाल केली. ती शुद्धीवर आली तशी वंदनाने तिला घट्ट मिठी मारली. डॉक्टरांनी तिच्या हाताला मलम पट्टी केली. तिचं बी पी चेक केलं. मैत्रेयी आता स्टेबल आहे असे सांगून डॉक्टर तिथून निघून गेले. मैत्रेयीचा लालसर झालेला हात वंदनाने हातात घेतला. तिच्याकडे पाहताना वंदनाचे डोळे भरून आले होते. मैत्रेयीला त्या दिवशी हॉस्पिटलमध्येच ठेवले होते. पूर्ण दिवस विजय आणि वंदना दोघे ही तिच्या जवळ होते. वंदनाने तिचा कार्यक्रम रद्द केला. विजय स्वतःला त्या अपघातासाठी दोषी मानत होता. त्याच्या डोळ्यांसमोर वंदनाचा सत्कार, त्याने सजवलेली भेट आणि बेशुद्धावस्थेत असलेली मैत्रेयी होती.
संध्याकाळ झाली. मैत्रेयीचे उपचार आता पूर्ण झाले होते. तिला घरी जाण्याची ही संमती मिळाली. तिघे ही घरी आले. वंदना मैत्रेयीला तिच्या खोलीत घेऊन गेली. विजय गाडी पार्क करायला गेला. वंदना मैत्रेयीच्या खोलीतून बाहेर आली. तिने बाहेर विस्कटलेले टेबल पाहिले. तिकडे सजवून ठेवलेले एक मोठे फलक तिला दिसले. रुसी तिच्या पायाशी आला. नंतर त्या फलकाकडे जाऊन ते फाडण्याचा पर्यन्त करू लागला. वंदनाने ते उघडून पाहिले. त्यात तिघांचे हसरे चेहरे रंगवलेले होते. त्यावर विजयची सही. विजयने वंदनाला भेट द्यायचे म्हणून ते पेंटिंग तयार केलेले होते आणि तेच आणण्यासाठी तो गेला होता हे वंदनाच्या लक्षात आले. तिची ही चूक झाली होती हे तिला तेव्हा जाणवले. ती तशीच आपल्या खोलीत गेली. तिकडे तिचा तुटलेल्या तारांचा तंबोरा होता. ती विजयला शोधत शोधत मैत्रेयीच्या खोलीत आली. तिकडे विजय पाठमोरा बसलेला होता. ती त्याला जाऊन बिलगली आणि रडायला लागली. वंदनाच्या हातात ते पेंटिंग होते. रडणाऱ्या वंदनाला शांत करत समोर बसवून त्याने एक हात पुढे करायला सांगितला. त्याचा एक हात मैत्रेयीच्या हातात होता. दुसऱ्या हाताने त्याने वंदनाच्या हातात एक चॉकलेट ठेवले आणि हॅपी बर्थडे इतकच म्हणले. ती तो हात घट्ट पकडुन विजयला म्हणली, “ सॉरी, मी चुकले ... विजय “ . विजयचा एक हात तेव्हा मैत्रेयीच्या हातात होता आणि एक हात वंदनाच्या हातात. पेंटिंग बाजूलाच ठेवलेले होते.
कथा इथेच संपली. एक गोष्ट या कथेतून मांडावीशी वाटते कि सुकून गेलेल्या फांदीला आलेले हिरवे पान म्हणजे “ माफी “ माफ करणाऱ्यापेक्षा, ती मागणारा ते हिरवे पान होतो. कारण माफी मागण्यात कारुण्य असते. विश्वास असतो. आशा असते. आपली चूक मान्य करणारे बलाढ्य मन असते. त्याला कुठलीच सीमा नसते. ना पदाची, ना वयाची. कुठल्या नातेसंबंधांचे दडपण नसते किंवा मान अपमानाची वादळे नसतात. ते निर्विकार असते.
एका मित्राने सांगितलेल्या वाक्यांने या कथेचा शेवट करते, तो म्हणतो “ चुरगळलेल्या फुलांच्या पाकळ्यांचा मागे उरलेला सुगंध म्हणजेच “ क्षमा “

वेल


प्रिया बारावीच्या वर्गावर तास घेऊन स्टाफ रूम मध्ये येऊन बसली. तिने बाहेर सुलभाला पाहिले. सुलभा आणि प्रिया वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये कार्यरत शिक्षिका होत्या. नुकताच पाऊस पडून गेला होता. बाहेर वातावरण थंड झाले होते. प्रिया बाहेर आली. तिने सुलभाला चहा घेण्यासाठी कँटीनमध्ये येण्याचा आग्रह केला.  सुलभाने निराषेच्या स्वरात म्हणले " नको ग, पुन्हा कधी जाऊ. " सुलभा थोडी उदास, बैचेन वाटत होती.
प्रियाने विचारलं " का गं... तू बरी आहेस ना... काही प्रॉब्लेम आहे का.. एवढा कसला विचार करतेस? "  प्रियाने सुलभाचा हात धरला आणि तिला पुन्हा भानावर आणले. तिच्या मनात अनेक प्रश्न होते.  सुलभाच्या  डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. सुलभा सांगत होती " प्रिया, माझे लग्न ठरले. कालच तारीख ठरवली. " लग्न ठरल्याची बातमी ऐकून प्रियाने तिचे अभिनंदन केले. तिला म्हणाली, " ही तर आंनदाची बातमी आहे... तू तर खुश व्हायला हवे... सुलभा... "
सुलभा म्हणाली, "हो गं... मी खुश ही आहे आणि थोडी चिंता ही वाटते. पुन्हा नवी सुरुवात करायची आहे, माझ्या आयुष्यात बदल ही होईल. त्या नव्या बदलाची ही हुरहूर मनाला लागली आहे. "

तिचे बोलणे मध्येच थांबले. त्या दोघी जिथे उभ्या होत्या. तिथे शेजारीच सुपारीचे उंच झाड होते. त्या झाडाला वेटोळे घालून वर गेलेली गडद जांभळ्या रंगाची गोकर्णाची वेल होती. दोघी त्या वेलीकडे पाहू लागल्या. प्रिया म्हणाली, " ही नाजूक वेल सुपारीच्या खांबासारख्या झाडाशी किती एकरूप झाली बघ, लग्न म्हणजे असंच समीकरण असतं, आपलं वेगळेपण सोबत घेऊन एकरूप होणं... बरोबर ना " प्रिया पुढे म्हणाली " कदाचित या वेलीला माहिती असावं. आपल्याला वर वाढत जायचे तर त्या झाडाचा आधार घ्यावा लागेल,  आपल्या मुळापासून अगदी लांब वाढलेली ही वेल आपला भाग नसलेले हे सुपारीचे झाड आपला आधार आहे हे किती पटकन स्विकारते. त्या वेलीचे वर वर जाणे तिच्यासाठी किती महत्वाचे होते. अपूर्ण असणं त्या वेलीने किती सहज स्विकारले. गंमत म्हणजे सुपारीच्या झाडासोबत वर जाण्याने त्या वेलीने ढगांना पाहिले. उडणाऱ्या पक्षांचा थवा पाहिला. वेलीचे झाडाशी असलेले नाते, ही सोबत बदल घेऊन आली होती... सुलभा "

सुपारीच्या झाडाशेजारी उभी सुलभा वर वेलीच्या टोकाकडे बघत होती. तिला पाहून प्रिया म्हणाली " तिच्यात तुझ्यात किती साम्य आहे बघ. तिने जस स्वतः ला स्वीकारले आणि पुढचे पाऊल टाकले तसं तू ही स्वतः ला स्वीकातले तर गोष्टी सहज पुढे जातील. बदलाना आनंदाने स्वीकारशील. " वर वाढत गेलेल्या त्या वेली समोर तेव्हा सुलभा आणि तिचे प्रश्न छोटे झाले होते. तोवर बेल वाजली, प्रिया आणि सुलभाची निघायची वेळ झाली. सुलभा आपल्या डिपार्टमेंटकडे निघाली. ती जाता जाता म्हणाली " उद्या एकत्र चहा घेऊ... " हे सांगताना सुलभाच्या चेहऱ्यावरचे भाव अमूलाग्र बदललेले होते. ती खूष दिसत होती. प्रिया म्हणाली " चालेल... उद्या इथेच भेटू " दोघी तिथून निघाल्या. 

Tuesday, 20 January 2026

टेकडी

आज पुन्हा एकदा थिएटर ऑफ रिलेवन्सच्या पावसाळी शिबिराला जायची तयारी सुरू होती. नवे अनुभव घेण्याचा अजेंडा समोर होता. पुन्हा एकदा टेकडीवर नवे शोधण्याचा प्रवास. तिथे पोहोचल्यावर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने निसर्गाच्या पैलुंचा अभ्यास केला जसे कि आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या रंगाची फुले शोधायची. वेगळ्या आकाराचे, रंगाचे दगड शोधायचे. सगळ्यात लहान पान शोधायचे. तिथे आजूबाजूला गवतफुले होती. पांढरी, तपकिरी अशा रंगाची काही फुले होती. अगदी लहान आणि अगदी मोठे दगड होते. वेगवेगळ्या आकाराची, रंगाची पानं होती. त्या शोध मोहिमेत सूक्ष्म दृष्टी, एकाग्रता आणि निसर्गाशी आपले असलेले नाते प्रकर्षाने जाणवले. अंधार पडू लागल्यावर आकाशातल्या ताऱ्यात काही शोधायचे, त्यात कोणाला सावित्रीची चीर दिसायची, कोणाला आणखी काही... अंधारातल्या ताऱ्यांच्या शोधात आपण आपली आवड शोधतो आणि ती सापडते. तसेच काहीसे माझे झाले.

काही वेळ आम्ही एक मोठ्या दगडावर बसून होतो. दूरच्या रस्त्यावरील गाड्यांच्या प्रकाशाला न्याहाळत होतो. वेगाने धावणाऱ्या वाहनाना पाहताना आपल्या जगण्याचा वेग लक्षात आला. तिथे टेकडीवर बसल्या असताना एक विचार मनात आला. अंधाराला आपण इतके भितो पण अंधार नसता तर त्या ताऱ्याचं विश्व कळलंच नसतं... वाटेवरच्या अंधारानेच तर प्रकाशाकडची वाट दाखवली होती.

दुसऱ्या दिवशी त्याच वाटेने जात असताना नवीन वळणे येत गेली. अनोळखी वाटेवर पळता येत नाही. वाट ओळखीची असली की वेग आपोआप येतो. त्यामुळे निमुळत्या वाटेतून अनोळखी वळणे, नदीचे पात्र पार करत परतीच्या वाटेला लागलो. येता येता एका भरगच्च पानांनी भरलेल्या चिंचेच्या झाडापाशी थांबलो. दूरवर डोंगरावर दाटलेले काळे ढग येणाऱ्या रिमझिम पावसाची चाहूल देत होते. हा निसर्गाशी झालेला संवाद आणि भरपूर आठवणी घेऊन मी माघारी आले.

  

युवा साहित्य संमेलन

ठाणे येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषद राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचा समन्व्यक म्हणून मला भाग होता आले. जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या छायेत वाढलेल्या या साहित्यिक वटवृक्षाचे... साहित्य वारीचे पुढचे युवा पाऊल... युवा साहित्य संमेलन.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे आधार स्तंभ सौ.नमिता किर, श्री. प्रदीप ढवळ, युवाशक्ती प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर, संमेलनाचे अध्यक्ष श्री. प्रणव सखदेव तसेच साहित्यिक मान्यवर मंडळी यांनी संमेलनाचे नेतृत्व केले.

मराठी साहित्य आणि भाषा यांचे संवर्धन आणि शिक्षण हे पुढच्या पिढीला सुपूर्द करताना त्या भाषेची गोडी, त्यातली रसिकता, त्यातल्या गमती जमती आणि भाषेची आवड जागृत करणे तितकेच जरुरीचे आहे आणि ही गरज ओळखून या संमेलनाचे सर्व नियोजन झाल्याचे जाणवले. नव्या साहित्याचे मुरलेल्या साहित्याशी आणि त्यासोबत नव्या कवीचे जेष्ठ कवी, साहित्यिकांशी नाळ जोडण्याचे कार्य या संमेलनाच्या माध्यमातून झाले. कवितेतून नृत्याविष्कार, म्हणींवर स्टॅण्ड अप कॉमेडी, बालभारतीच्या पुस्तकात वाचलेल्या कविता, बडबडगीते, प्रार्थना नाट्य रूपात सादर करणारे बाल कलाकार. गझल कट्टा, कवी कट्टा, अभिवाचन, कथा कथन अशी साहित्यिक मेजवानी इथे अनुभवली.

संमेलनाचे अध्यक्ष प्रणव सखदेव यांच्या मुलाखतीत पुस्तकांचे विश्व उलगडत गेले. एक पुस्तक निर्माण होण्यापासून ते पुस्तक ऑनलाईन विक्री पर्यन्त लेखक, प्रकाशक, वितरक असा प्रवास उलगडत गेला. पुस्तकाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळाली. पुस्तकांची दुनियादारी नव्याने अनुभवता आली. बहुभाषिक काव्यकट्टा आणि बोलीभाषा काव्य सादरीकरणातुन आपल्या मराठी साहित्याला जोडणाऱ्या फांद्या ज्या मराठी या वटवृक्षाच्या छायेत फुलत आणि बहरत गेल्या आहेत. त्यांचा आस्वाद घेता आला..

गौरी सामंत यांच्या “ मी ते आम्ही “ या मुलाखतीत तृतीयपंथी समाजाचे प्रश्न समोर आले. दुर्लक्षित झालेले त्यांचे विश्व लेखकांनी आपल्या कथेतून मांडायला सुरवात केली आहे. सामाजिक भान, समाज प्रबोधन आणि मानवता विचार त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षाने पुढे आला. डिजिटल मीडिया, वेब सिरीज, जाहिरात, माहिती पट यातले भाषेचे योगदान, मराठी साहित्याचा वापर आणि त्यातून करियर संधी या विषयी माहिती मिळाली. साहित्य आणि युवा यांना जोडणारे साहित्य संमेलन, त्याचे बदलेले कलात्मक दर्शन या ठिकाणी झाले. त्यातून मिळालेली ऊर्जा पुढच्या वाटचालीसाठी महत्वपूर्ण असणार आहे.


लोकशास्त्र सावित्री

   “ लोकशास्त्र सावित्री “ नाटक... रंगकर्म... रंगमंच आणि ध्येयवेडे रंगकर्मी. डोंबिवली, पुणे, दादर या विविध ठिकाणी सावित्रीचा जागर झाला, माणुसकीची ज्योत उजळून निघाली. या प्रवासात पुढे जाणारी प्रेक्षकांमधली आजची सावित्री सापडत गेली. लोकशास्त्र सावित्रीच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाची आलेली प्रतिक्रिया आणि तितकाच जोश पूर्ण प्रतिसाद. त्यातून आलेले अनुभव यावर लिहीत आहे.
नुकताच “ जागतिक रंगभूमी दिन “ होऊन गेला. त्याचे निम्मित आणि लोकशास्त्र सावित्री नाटकाचा प्रयोग असा सुरेख योगायोग जुळून आला. सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक “ रंगचिंतक मंजुल भारद्वाज “ यांच्या कसदार लेखन आणि अनुभवी प्रशिक्षणाखाली “ लोकशास्त्र सावित्री “ चा प्रयोग डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात उत्साहात पार पडला.
    “ थिएटर ऑफ रेलवंस “ ची नुकतीच माझी तोंड ओळख झाली होती. बघता बघता प्रयोगानंतर त्यातलीच एक सावित्री मी ही कधी झाले कळलेच नाही.
नाटकाच्या तालमी पासून सुरू झालेला प्रवास गेल्या २७ मार्च २०२२ ला परिमाण कारक रंगमंचावर उतरत गेला. दिसत गेला. त्या रंगमंचावर उभे राहून नाटक जगण्याचा आणि तिथवर जाण्याचा अनुभव मी लिहायला घेतला.
   सर्वप्रथम कोणत्याही कलाकृतीला संगीताची, कणखर आवाजाची जोड असेल तर ती कलाकृती खणखणीत वाचते आणि गाजते ही. “ लोकशास्त्र सावित्री “ ला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. सावित्रीबाई फुले, बहिणाबाई आपल्याला रंगमंचावर दिसतात. आणि त्यामुळेच तेव्हा पासून सुरू असलेली आपली लोकसंगीताची परंपरा कायम राखत नाटक फुलत जाते. त्यात जागर, पोवाडा, झिम्मा फुगडी, गाऱ्हाणं, ओव्या अशी सगळी सांस्कृतिक मेजवानी मिळते. विषयाचे गांभीर्य धरून ठेवून तेव्हाच्या सावित्री – जोतिबा वर न थांबता आजची सावित्री कुठे आहे ? हा प्रश्न समोर येतो. प्रेक्षक तिथे गहिवरतो. उत्तर शोधण्यासाठी प्रवृत्त होतो.
    मी या प्रवासात होते ते एक लेखिका म्हणून... पण कधी त्यांच्यातली एक रंगकर्मी झाले हे कळले नाही. रंग मंचावर उभे राहून येणाऱ्या टाळ्या आणि प्रेक्षकांची दाद विंगेतून अनुभवण्याचा हा माझा पहिलाच अनुभव.
नाटकाविषयी सांगायचे असतेच पण ते अनुभवायचे असेल तर तो रंगमंचच बोलवतो. म्हणून पुन्हा तीच भेट आणि तिथेच उत्तरे. कारण शब्द हे जेव्हा कलाकृती सादर करताना चेहऱ्यावर झळकतात, आवाजातून उतरतात ते विश्व निराळेच असते. तिथे लेखक बोलतो पण तो प्रत्येकाच्या तोंडून, कृतीतून त्यामुळे ती जादूगिरी पाहण्यासाठी तिथे नक्कीच यावे.
नाटकात सावित्रीच्या विचारांना प्रकट करणारे हर एक कलाकार मुख्यतः अश्विनी नांदेडकर, त्यांनतर सायली पावसकर उर्फ काकू, कोमल खामकर उर्फ कठोर यांच्यात दडलेली ताकदीची सावित्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. प्रत्येकीत सावित्रीचे वेगळे रूप दिसून आले.
नाटक पूर्ण पाहिल्यावर नाटकाला येणारे विविध स्थरावरचे प्रेक्षक. वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक तसेच वैचारिक जडण घडणीतून येणारा प्रत्येक जण आपल्या आजूबाजूला किंवा स्वतः मध्ये हे नाटक अनुभवत होता. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे प्रतिबद्ध रंगकर्मीं यांनी आपल्या सर्वांगाने सृजनात्मक अभिनय, दृश्य बांधणी आणि रंगसौंदर्याने नटलेल्या सादरीकरणातून नेपथ्य किंवा सेट शिवाय, प्रकाश नियोजन व प्रकाश रंगांनी नाटकातली दृश्य, वेगवेगळे प्रसंग समोर आणले. प्रेक्षकांच्या दृष्टीने हे नाटक फक्त जोतिबांच्या सावित्री पर्यन्त न राहता ते आजची सावित्री कुठे आहे ? हा प्रश्न विचारते. नाटकातील गाण्यावर प्रेक्षक ठेका धरतात. त्यातील शब्द त्यांना स्वतः मध्ये डोकावण्याची संधी देतात. सुरुवातीपासूनच पडदा न ठेवता, मध्यंतर न घेता प्रभावीपणे सादर केलेले नाटक प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
      एका प्रतिसादात महिलेने “ मी सावित्री आहे “ कारण माझे जोडीदार माझ्यासाठी “ जोतिबा झाले “ असे अभिमानाने सांगते. नववार साडी आणि डोक्यावर पदर घेऊन आलेली बाई ही प्रेक्षकांतुन उठून नाटकाचे कौतुक करते. आपल्याकडे यशस्वी महिला झाल्या नाहीत का ? या प्रश्नांची उत्तरं, त्याची उदाहरणे प्रेक्षकांतुनच सांगितली जातात. पण तिथे ही या प्रतिक्रियेला छेद देत आपल्यातली ती एक का नाही ? या प्रश्नांवर प्रेक्षकांमध्ये चर्चा सत्र सुरू होते. नाटकाची मांडणी ही सुरू होते. विषयाचे गांभीर्य आणि स्त्री जीवनातील दाहक चित्र प्रेक्षक संवादात आणखी स्पष्ट होते. सामाजिक जागृतीला तिथेच सुरवात होते. रसिक प्रेक्षकांमधून कोणी येऊन सावित्रीच्या जीवनावर आधारलेले पुस्तक तर कोणी फोटो भेट देते. समोर बसलेली कधी गृहिणी असते. कधी शिक्षिका तर कधी व्यवसायिक कारकिर्दीतील महिला. तिच्यात प्रत्येकीत दडलेल्या सावित्रीच्या विचारांना ती शब्दातून व्यक्त करते.
        समाज जागृती हे ध्येय गाठण्यासाठी सुरू झालेली वैचारिक क्रांती प्रेक्षकांच्या मनावर कोरली जाते. त्यातून पुढे प्रेरणेने काही या क्रांती मध्ये जोडले जातात. तशीच एक शिक्षिका, प्रीती ताई अंबरनाथ वरून सावित्रीचा जागर पाहायला डोंबिवलीच्या प्रयोगाला आली आणि लोकशास्त्र सावित्रीशी जोडली गेली. नाटकाच्या शेवटी जागर सादर करताना प्रेक्षकांमध्ये गेल्यावर त्यांची उत्स्फूर्तपणे त्यात सामील होण्याची इच्छा पाहून ही वैचारिक क्रांती पुढे निरंतर सुरू राहणार आहे. याची खात्री पटली. नाटकाच्या शेवटी तो फक्त रंगकर्मींचा जागर न राहता प्रेक्षकांचा ही होऊन जातो.
माझ्या आठवणीत राहिलेला किस्सा असा की ठाण्याला झालेल्या साहित्य संमेलनात समन्व्यक म्हणून काम करताना मोठ्या सभागृहात एका जेष्ठ बाईंना घेऊन जाताना लिफ्ट मध्ये त्यांनी डोंबिवलीत झालेल्या प्रयोगाची आठवण करून दिली. त्यातील माझा चेहरा त्यांनी ओळखला. मी लोकशास्त्र सावित्री मध्ये येण्याचा, नाटकात प्रवेश करण्याचा पहिला प्रयत्न आणि डोंबिवलीचा प्रयोग ही माझ्यासाठी पहिलाच प्रयोग होता. त्यांच्याकडून ती गोष्ट निदर्शनास येणे. आणि प्रयोग होऊन बऱ्याच दिवसांनंतर ही त्यावर प्रतिक्रिया ऐकणे ही माझ्यासाठी अमूल्य आठवण आहे.
दर्जेदार भूमिका, प्रेक्षक, प्रसिद्धी आणि योग्य विचार ही कोणत्याही कलाकृतीला कायमस्वरूपी अढळ स्थानी नेऊन ठेवते. हेच या प्रेक्षक संवादातुन निदर्शनास आले.
“ ती आहे सृजनकार, तीच आहे पालनहार, नाही ती गुलाम कोणाची, आहे ती शक्ती जगाची, तीच सौंदर्य या जगाचे हो... जी जी जी ...” शेवटी त्याच नाटकातील या काही ओळींनी मी या सावित्रीला वंदन करते. आणि हा सवित्रीचा जागर दूरवर जिथे जिथे सावित्री वाट पाहत आहे. तिथपर्यन्त पोहोचावा या शुभेच्छा देते.

हम है

थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या माध्यमातून लोकशास्त्र सावित्री नाटकाच्या टीम सोबत युसूफ मेहेरअली सेंटर, पनवेल येथे जाण्याचा योग आला. मी जेव्हा या सगळ्यांचा भाग झाले, तेव्हा “ लोकशास्त्र सावित्री “ हे नाटक इथे साकारले जात होते. सावित्री इथल्या प्रत्येकात होतीच, आता ती नाटकाच्या रूपात समोर येत होती. ती सावित्री मला पहायला मिळाली.
सायली सोबत मी फोनवर बोलले तेव्हाच मला चैतन्य अभ्यास आणि “ लोकशास्त्र सावित्री “ अनुभवण्याची इच्छा निर्माण झाली. ती आज पूर्णत्वाला येताना तिचा तो पुढाकाराचा हात मला खूप महत्त्वाचा वाटतो. अश्विनी नांदेडकर नाटकातली मुख्य भूमिका करणारी सावित्री. अश्विनी ताईने चैतन्य अभ्यासात सांगितलेल्या गोष्टी विचारांना चालना देत होत्या.
गवतावर डोकं ठेवून आभाळात आपला तारा शोधणे, चंद्र कोरी प्रमाणे हळूहळू वाढत जाणारे आपले चेहऱ्यावरचे स्मित हसू ; पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रा सारखे कलाकलाने वाढणारे, अगदी आपल्या वयासारखे. निसर्गाच्या सानिध्यात एक आकृती निर्माण करणे ते ही अगदी नैसर्गिक; कृत्रिम काहीच नाही. मग ते फुल असेल, फुलपाखरू असेल, रंगीत पक्षी, उगवणारा चंद्र, तिथे हे सगळं सुचणं अगदी स्वाभाविक होते. ते सौंदयपूर्ण ही भासत होते. ताईने सांगितलेला उगवण्याचा कन्सेप्ट. एक प्रेक्षक म्हणून या गोष्टीकडे पाहण्याचा कसा दृष्टिकोन असू शकतो? आणि एक लेखक किंवा एक कलाकार म्हणून आपल्याला काय पोहोचवायचे आहे? हा लेखक आणि प्रेक्षक यातला पूल किती भक्कम असावा लागतो ? हे इथे समजले. परीची निरागसता आणि तिच्या मनातलं कुतूहल, कोमलची कठोर मेहनत, प्रियांका, सुरेखा, प्रथमा, तुषार, तनिष्का, आईचं प्रेम आणि माया सगळं सगळं नवी ऊर्जा देणारे होते.
चंद्राच्या शीत प्रकाशात टेकडीवरून खाली येताना समोर अंधार होता पण मागे पुढे वाट दाखवणारे वाटाडे होते. तो चंद्राचा वाटेवर पडणारा शीत प्रकाश पुढे जाण्यासाठी इतकंच काय ते पुरेसं होतं. ही स्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा न केव्हा येतच असते. तेव्हा तो चंद्र प्रकाश पुरेसा असतो आणि सहप्रवासी जे आपल्याच वाटेने पुढे पुढे जात असतात. त्या दिवसासाठीची ही एक आठवण आपल्याला रोजच्या जगण्यात पण किती पटकन जवळची वाटते. हेच तर हवं असतं असं तेव्हा वाटून जातं. जे मला इथे अनुभवायला मिळालं.
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने विविध रंगी विचार घेऊन दिवसाची सुरुवात झाली. रंगाचं आणि सृष्टीचं अस एक कालातीत नातं आहे. रंगाना आपल्यात सामावून घेत या सृष्टीचे सृजन करण्याची ताकद निसर्गात आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश अशा पाच तत्वांनी सजलेल्या या सृष्टीचा आपण ही एक अंश आहोत. कमी अधिक प्रमाणात आपल्यात ही यातली एक ( सुपर पॉवर ) शक्ती पुरेपूर भरलेली आहे. कोणी अग्नी सारखे तेजस्वी, प्रखर, उष्ण. तर कोणी वाऱ्याप्रमाणे वेगवान. कोणी पाण्यासारखे प्रवाही. कोणी भूमीप्रमाणे मुळांना धरून ठेवणारे, कठोर. कोणी आकाशासम विशाल. आपल्यातली शक्ती ओळखण्याची समज म्हणजेच स्वतःची स्वतःशी झालेली ओळख. मानवी स्वभावात अशी मूल्ये येतात तरी कुठून... निसर्गातून. माझे उत्तर मला तेव्हा या संवादातून मिळाले. स्वतः कडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन मिळाला. प्रत्येकात या पंचतत्वापैकी एक एक तत्व रुजत गेले. त्या तत्वाच्या शोधाला इटरनल स्किल असे तेव्हा म्हणले.
            कलाकाराची प्रतिभा किती खोलवर रुजलेली असावी लागते आणि ते भाव चेहऱ्यावर येण्यासाठी आपल्यातील माणसाला कसे जागे करावे ? हे पुढच्याच नाट्यात अनुभवता आले. लोकशास्त्र सावित्री या नाटकातील एक प्रसंग. तीन जणी एका वर्तुळात उभ्या होत्या. तिथे सीतेची अग्निपरीक्षा दाखवली जात होती.
या आणि अशा मानवतावादी प्रश्नाना दृश्य रूपात मांडले गेले. पुढची दोन ते अडीच तासाची नाट्य कलाकृती पाहताना बदलाची सकारात्मक ऊर्जा मिळाली. आपल्या समोरून जाणारी दृश्य अजिबात कुठे मिस होऊ नये हीच एक इच्छा होती. “ हम है... “ या घोषणातून तालमीचा आणि दिवसाचा समारोप झाला.

ठसे

एका गावात एक प्राचीन शंकराचे मंदिर होते. त्या मंदिराची सर्व देखभाल आणि पूजाअर्चा पुजारी सदानंद कर्वे करत. पिढीजात वारसाने आलेली ही सेवा ते मनोभावे करत. वयाच्या आठव्या वर्षांपासून न चुकता त्यांच्या कडून ही सेवा अखंडित सुरू होती. एवढे पुण्य गाठीशी असताना सुद्धा कमी वयात अपघाताचे कारण झाले आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या नंतर त्यांच्या मुलाने – गिरीधरने त्यांचा वारसा पुढे सुरू ठेवला. गावातील सर्व गावकरी मंडळी त्यांच्या अकस्मात जाण्याने हवालदिल झाले. परंतु संपूर्ण गावाने त्यांच्या कुटुंबाला आधार दिला आणि त्यांचे घर पुन्हा एकदा उभे राहिले. सदानंद आपल्या कुटुंबाचे कष्ट स्वर्गातून पाहत होते. त्यांना फार वाईट वाटत होते. एकदा देवाने त्यांना विचारले, “ तुझ्या घरावर माझी कृपा दृष्टी असताना, संपूर्ण गाव तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी असताना का एवढा व्याकुळ होतोस ?
त्यावर सदानंद म्हणले, “ देवा मी आणि माझ्या कुटुंबाने मनोभावे तुझी सेवा केली. कधी गावाच्या यात्रेला खर्च कमी पडतो तर माझ्या पदरचे धन त्यासाठी देऊन तुझी पालखी यात्रा काढली. आम्हाला त्यातून समाधान मिळाले पण हे समाधानाचे आयुष्य माझ्या कडून तू घेतलंस ? तुझी तर मी सेवा केली, कधी लोभ केला नाही किंवा कोणाची फसवणूक केली नाही. मग हे पोरकेपण माझ्या मुलाला का यावे ?
त्यावर देवाला त्यांची दया आली आणि सदानंद सोबत देवाने फेर फटका मारत समुद्र किनारा गाठला. किनाऱ्यावरच्या वाळूवर चालताना त्यांची दोघांची पाऊले मागे उमटत होती. थोडे अंतर चालल्यावर देवाने सदानंदना मागे वळून पाहायला सांगितले. वाटेत कुठे दोघांचे पायाचे ठसे होते तर कुठे एकाचेच ठसे होते.
सदानंदनी देवाला विचारले, “ हे असे कसे झाले देवा ? “ त्यावर देवाने त्यांना त्यामागचे कारण सांगितले.
“ सदानंद, जिथे जिथे तुला दोघांच्या पायाचे ठसे दिसतात तिथे तिथे मी तुझ्या सोबत होतो आणि मी तुला येणाऱ्या सगळ्या संकटात बळ देत होतो. पण जिथे जिथे तुझ्यावर मोठी संकटे आली. तुझी शक्ती अपुरी पडली तिथे तुझी भक्ती आणि कर्म कामी आले. त्या त्या ठिकाणी मी तुला माझ्या खांद्यावर घेतले आणि तुझा रस्ता मी चाललो. म्हणून तिथे एकाचे ठसे आहेत. आजवर तुझ्या आयुष्यात जी संकटे आलीच नाही असे तुला वाटते ती तुझ्या पर्यन्त पोहोचली नाहीत. आपण जे आता पर्यन्त चालत आलो तो तुझा जीवन प्रवास होता. आपण जन्माला येतो तेव्हाच हा प्रवास ठरलेला असतो पण त्या प्रवासात कोण कुठे कसे भेटेल ? प्रत्येक वळणावर काय वाढलेले असेल ते आपले कर्म , भक्ती आणि निष्ठा ठरवत असते. काळजी करू नकोस. तुझ्या मुलाचे कल्याण होईल. तूझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला तिथे आता असंख्य सदानंद आहेत. जे तू तुझ्या सेवेतून कमावले आहेस. ते कधीच तुला विसरणार नाहीत. माझे आशीर्वाद कायम त्यांच्या सोबत असतील.
सदानंदच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी पाहिले गावकरी लोक त्यांची गाऱ्हाणी, अडचणी, सुख वार्ता देवाला सांगत आहेत आणि देवासोबत गिरीधरला ही नमस्कार करत आहेत. यात्रेसाठी लागणाऱ्या गोष्टी गावकरी जमवत आहेत. गिरीधर कडून पवित्र देवकार्य करून घेत आहेत. त्याला सर्वांचे खुप प्रेम, आशीर्वाद मिळत आहेत. हे सगळे पाहून त्याला एका गोष्टीची जाणीव झाली. आपला हा प्रवास जरी ठरलेला असला तरी आजवर या प्रवासात मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या दुःख, दारिद्र्य, निराशेला सामोरे जावे लागले नाही. आपण हे आयुष्य खरंच आनंदात जगलो. हीच तर आपली कमाई होती. सदानंदानी समाधानाने देवाला नमस्कार केला. आपल्या मुलाला आशीर्वाद दिला आणि गोष्ट इथेच संपली.
ही कथा माझ्या सासऱ्यांकडून ऐकताना माझे मन सांगत होते. अशा किती तरी गोष्टी निव्वळ श्रद्धेने आपल्याकडून सहज होऊन जातात. कोणताही गाजावाजा न करता असे असंख्य सदानंद जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात राबत आहेत. त्यांची दखल घेणारा कदाचित त्यांना आजवर भेटला ही नसेल पण भेटेल या आशेवर, श्रद्धेने आणि विश्वासाने राबणाऱ्या हाताला “ देव “ या सकारात्मक भावनेने अजूनही जोडलेले आहे म्हणून जग सुंदर आहे.

फुटबॉल

चिनूची आज फुलबॉलची मॅच होती. गेले आठवडाभर जोरदार तयारी सुरू होती. दिवस रात्र एक करून भरपूर मेहनत घेतल्यावर आज तो दिवस उजाडला होता. आज पहाटेच चिनूला जाग आली. त्याने आपले स्पोर्ट शूज पुसून स्वच्छ करून ठेवले. आपली नवीन जर्सी काढून ठेवली आणि तो मॅच खेळायला जाण्याची तयारी करू लागला.
चिनूला फुलबॉलचे हे वेड शाळेपासूनच होते. शाळेच्या मैदानात खेळण्यासाठी तो त्याचा सर्वात आवडता खेळ. पुढे तो खेळ त्याला एवढा आवडू लागला की त्याने आपले कॉलेज ही तसेच निवडले जे या खेळासाठी प्राधान्य देईल. एकदा सगळे तास झाले की कॉलेजचे मैदान गाठायचे ते थेट संध्याकाळी अंधार होई पर्यंत सोडायचे नाही. त्याची खेळावरची ही निष्ठा आणि आवड बघून त्याला राज्य पातळीवर खेळण्यासाठी संधी आली. त्याचीच निवड प्रक्रिया म्हणजे आजचा सामना. आजचा सामना जिंकल्यावर मोठे बक्षीस तर होतेच पण त्या सोबत देशासाठी ही पुढे खेळण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे आजची मॅच म्हणजे त्याच्यासाठी शिव धनुष्यच होती. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीची तयारी चिनूने सुरू केली त्या वर्ष भराच्या मेहनतीचे फळ म्हणजे आजचा सामना.
चिनू आत्मविश्वासाने घरून निघाला. मैदानात सगळे खेळाडू आले. सामना सुरू झाला. दोन्ही टीमकडून एक एक गोल करत चांगली सुरुवात झाली. सर्व खेळाडूंनी चांगली खेळी केली पण चिनुला तशी संधी लवकर आली नाही. शेवटची पाच मिनिटे राहिलेली असताना चिनूकडे बॉल आला. शेवटच्या पाच मिनिटात सामना अटी तटीचा झाला. दोन्ही बाजूंनी सारखेच गोल झाले होते. सर्वांच्या नजरा चिनू वरून हटत नव्हत्या. सगळे कॉलेज मधले विद्यार्थी त्याला मोठ्या आवाजात प्रोत्साहन देत होते. कॅप्टनने त्याला गोल करण्याचा इशारा दिला. त्याने बॉल सकट नेटकडे धाव घेतली. शेवटच्या काही मिनिटात नेटच्या अगदी जवळ असताना प्रतिस्पर्ध्यानी बॉल कावेबाज पद्धतीने आपल्याकडे मिळवला. बॉल हातचा गेल्यामुळे चिनू निराश झाला. मॅच अजून संपली नव्हती एक गोल होणे बाकी होते. इतर खेळाडूंनी आपले प्रयत्न सुरू ठेवले पण चिनू मैदान सोडून बाहेर आला. त्यांच्या टीमचा एक गोल झाला. एका पॉईंटने चिनुच्या टीमला हार पत्कारावी लागली. मॅच सुरू असताना च चिनू मैदान सोडून आल्याने कॅप्टन त्याला खूप ओरडले. त्याच्या मित्रांनी त्याला समजावले. पुढचा सामना लगेच सुरू झाला पण चिनू तो सामना पाहण्यासाठी काही थांबला नाही. खर तर ती मॅच पाहण्यासाठी आणि त्यातून नव्या पद्धती शिकण्यासाठी कॅप्टननी तिथेच थांबायला सांगितले होते. चिनुच्या मनातले अपयशाचे दुःख काही कमी झाले नाही आणि तो अगदी दीड दोन तासातच घरी परतला. त्याला लवकर आलेलं बघून आईने त्याला मॅच विषयी विचारले. तेव्हा हिरमुसल्या चेहऱ्याने चिनूने आईला सांगितले,
“ आजच्या मॅच मध्ये साधा एक ही गोल मी करू शकलो नाही. सगळे माझ्याकडून अपेक्षा करत होते पण .... आमची टीम सेमी फायनल पर्यन्त ही पोहोचली नाही आई... “
“ बस, मी ठरवले आता, आजपासून मी अजिबात फुटबॉल खेळणार नाही. मी या खेळासाठी बनलेलोच नाही. “
“ मी अभ्यास करीन आणि आता फुलबॉलला हात ही लावणार नाही. “
चिनू तसा खुर्चीत बसून टेबलावर डोकं ठेवून रडू लागला. त्याच्या मुसमुसण्यामुळे क्षणभर आई बैचेन झाली. तिला त्याची चिंता वाटू लागली. पण त्याचा हा ना उमेदीचा सूर वेळीच ओळखून आईने त्याला समजवण्याचा छोटासा प्रयत्न केला.
चिनूला गोडीगुलाबीने तिने किचनमध्ये बोलावले. सुरुवातीला नाही नाही म्हणणारा चिनू शेवटी किचन मध्ये आला.
“ तुझ्यासाठी गरमा गरम कॉफी करते, चिनू... अगदी तुला आवडते तशी वेलची घालून... दोघे मस्त कॉफी पिऊ. “ आईने चिनूला म्हणले.
चिनू हो , नाही काहीच न म्हणता फक्त पुतळ्या सारखा आईच्या शेजारी उभा होता. मग आईने त्याला एक बटाटा आणि अंडे आणायला सांगितले. गॅसवर पाणी घालून तीन पातेली ठेवली.
पाणी उकळायला लागल्यावर तिने एका पातेल्यात थोडी कॉफी आणि वेलची पावडर घातली. दुसऱ्यात बटाटा आणि तिसऱ्यात अंडे घातले. थोड्या वेळाने तिने चिनूला तो बटाटा आणि अंडे पाण्यातून काढायला सांगितले. त्याने आईचे ऐकून तसे केले.
नंतर तो आईला म्हणाला,
“ मला कळत नाही आई, तू नक्की काय बनवतेस ? हे काय करतेस ? “
त्यावर आई म्हणाली “ हे बघ, तीन ही पातेल्यात उकळलेले पाणी आहे, पण हा बटाटा आधी कडक होता, त्या गरम पाण्यामुळे आता नरम झाला तसे हे अंडे आता त्याच गरम पाण्यात कडक झाले आणि त्या तिसऱ्या पातेल्यातल्या पाण्याचे तर रंग रूप च बदलले. कॉफी आणि वेलची चा सुगंध सुद्धा यायला लागला. पाण्यात कॉफी आणि वेलची अगदी मिसळून गेली. “
“ म्हणजे ? “
“ म्हणजे चिन्मय, हे गरम उकळते पाणी म्हणजेच तुझ्या समोरची आव्हाने. तेव्हा वेळेनुसार आपल्या स्वभावात कधी कधी बदल करायला हवेत. कधी कठोर किंवा मृदू होता यायला हवं. अपयशाने निराश न होता वेगवेगळे पर्याय शोधायला हवेत, वेगळ्या तर्हेने पुन्हा प्रयत्न करायला हवेत आणि जर तुला हे यश टिकवायचे असेल, खूप मोठं स्वप्न पूर्ण करायचे असेल तर या कॉफी प्रमाणे एकमेकांत मिसळता यायला हवे. फुटबॉलचे हे अपयश तुझे एकट्याचेच नाही. तुझ्यासोबत संपूर्ण टीम ला हे अपयश आले आहे. सर्वांनीच फुलबॉल सोडले तर ! तेव्हा फक्त आपलाच विचार करून कसे चालेल? पुढच्या वेळी संपूर्ण टीम जिंकण्यासाठी खेळशील तेव्हा तू खऱ्या अर्थाने जिंकलास म्हणून समज ... “

मनाची शक्ती


मोठे होताना कौटुंबिक वर्तुळ ओलांडल्यावर अनेक प्रसंगी आपणच आपले सोबती होतो. आपल्याच मनाची समजूत घालणारे समुपदेशक होतो.
लहानपणची हट्टाची ढाल आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना पुरतेच असे नाही. तेव्हा अनुभवाची ढाल आपल्याकडे असते. खूप कसोशीने प्रयत्न करून ही हवे ते मिळत नसेल तर मनाची शक्ती कमी होणे स्वाभाविक असते. या अंधाराला दूर करणारे काही तरी वाचण्यात, ऐकण्यात आले कि ही मरगळ तात्काळ दूर होते. माझ्यासाठी ही मरगळ दूर करणारी अशी एक गोष्ट असायची... एखादी कविता, एक कथा किंवा आठवणीतल्या काही गोष्टी.
लहानपणी तुम्ही राजा आणि कोळ्याची गोष्ट ऐकली असेल आज मनाच्या शक्तीवर लिहिताना ती गोष्ट मला आठवते, ज्यात एक राजा आहे आणि तो युद्धात शत्रूशी लढताना पराभूत झाला आहे. पराभूत झालेला तो राजा स्वतःच्या जीवाला वाचवण्यासाठी एका गुहेचा आधार घेतो. तिकडे एक लहानसा कोळी जाळे विणताना गुहेच्या कोपऱ्यात त्याला दिसतो. जाळे विणत तो वर जातो आणि खाली पडतो. असे सहा सात वेळा होते. त्याचे जाळे जोवर मजबूत होत नाही तो पुन्हा पुन्हा पडत राहतो. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश येते. तो वरच्या दगडावर पोहोचतो. राजा त्या कोळ्याचे प्रयत्न बघून खजील होतो आणि स्वतःला पुन्हा युध्दा साठी तयार करतो. शत्रूवर विजय मिळवतो. त्याचे राज्य पुन्हा त्याला मिळते. आपले सर्व मातब्बर योध्ये आणि शस्त्रे गमावल्यावर पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त एक अनुभव त्याच्या कामास येतो. राजाला तो कोळी तेव्हा दिसलाच नसता तर... चित्र काही तरी वेगळे असते.
आपले आयुष्य हे नदीच्या पात्राप्रमाणे वाहत असते. ज्या प्रमाणे नदी तिच्या मार्गात प्रत्येक ठिकाणी थांबत थांबत पुढे जाते, शेवटी समुद्राला जाऊन मिळते तसेच आपली आजची वेळ, परिस्थिती, जागा ही सुद्धा नदी प्रमाणे स्थिर नसून प्रवाही आहे. आपण आज ज्या काठावर आहोत तिथे उद्या नसू. जिथून जसे नदीला पहावे तसे विराट किंवा संथ तिचे दर्शन आपल्याला होत असते. आज आपण तिथे असलो तरी नदीतल्या प्रत्येक थेंबावर आपण हक्क गाजवू शकत नाही. तेव्हा आपल्या ओंजळीत जेवढे नदीचे वास्तव्य असेल तेवढीच ती ओंजळीत येते. तिच्या सारखे वाहताना मनातल्या व्यतिगत चिंता, महत्त्वाकांक्षा त्याच काठावर सोडून पुढे जायला ती शिकवते. कारण तेव्हा ही आपल्या वाटयाला आलेले ते क्षण ही कोणाची तरी स्वप्ने असतात. कुणाची तरी स्वप्ने आपण तेव्हा जगत असतो. अशा वेळी खोल जाणाऱ्या सूर्याला बघत आपण स्वतः ला भाग्यवान म्हणले तर जगण्याची गम्मत आणि आयुष्याची किंमत दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मनातील विचार सहज वाचनात यावे, एखाद्या कवीने ते आधीच ओळखावे अशा या कवितेच्या ओळी माझ्या समोर आल्या...
“ निसटून चालले काही हातास लागण्या आधी
तरी मना नको निष्कारण लागू चिंतेच्या नादी
आयुष्य वाहते म्हणूनी बैचेन उगा का व्हावे
ओंजळीत येईल तितके आपले धरून चालावे “
“ गुरू ठाकूर “ यांनी लिहिलेल्या ओळी या गोष्टीला पूर्ण करतात. शेवटी आपल्या मनाला समजवणारे एक जवळचे मित्र “ आपणच “ हे कायम लक्षात ठेवावे, “ कोणी तरी पाहिलेले सुंदर स्वप्न, आपल्याला ते जगण्याची मिळालेली संधी म्हणजे हे आयुष्य “ हे कायम लक्षात असावे.

अरुंद पूल

एकट्याचा प्रवास जेव्हा सोबतीने होतो तेव्हा नक्की कुठे बदल होतो ? या प्रवासात आपण कुठे येऊन पोहोचतो ? आणि आपली परीक्षा कुठे होते ? हे सांगणारी एक सुंदर कथा माझ्या ऐकण्यात आली.


ही कथा आहे दोन मेंढ्यांची, हिमालयाच्या डोंगर रांगात मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा कळप चरायला घेऊन जात असत. वेगवेगळ्या कळपातली जनावरे कधी दुसऱ्याच कळपात नकळत येत, कधी आपला कळप सोडून मैल दर मैल दूर निघून जात पण मेंढपाळ आपल्या मेंढीला बरोबर हुडकून काढत.

एकदा अशाच वेगवेगळ्या कळपातल्या दोन मेंढ्या भलत्याच ठिकाणी एकत्र येऊन पोहोचल्या. त्यांचे कळप आणि मेंढपाळ बरेच दूर राहिले. गवताळ भागात चरत चरत त्या एका अरुंद पुलावर येऊन पोहोचल्या. तो पूल एवढा निमूळता होता की एका वेळी एकच मेंढी त्या पुलावरून जाऊ शकत होती. दोन्ही मेंढ्या वाट मिळेल तसे पुढे पुढे येत राहिल्या. पुलाच्या मध्यभागी पोहोचल्यावर एकमेकांच्या समोर आल्या. त्यांना काहीसा ओळखीचा आवाज कानावर आला. दोन्ही मेंढ्या खुश झाल्या. आपल्या मेंढ्यांचा कळप जवळपास आहे हे त्यांना त्या आवाजावरून कळले. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांना अडचण अशी आली की दोन्ही मेंढ्यांचे कळप विरुद्ध दिशेला होते. एकाच वेळी त्यांना त्या अरुंद पुलावरून विरुद्ध दिशेला जाणे अशक्य होते. पुलाच्या खाली खोल दरी होती. त्यामुळे मृत्यूचे ही संकट होतेच. आपल्याला या पुलावर मधेच थांबता येणार नाही आणि आपल्याला पुढे जायचे आहे. आपल्या कळपात जायचे, काय करावे ? या विचारात असताना त्यातल्या एका मेंढीने दुसऱ्या मेंढीला आपल्या पाठीवरून पलीकडे जाण्यास सांगितले. त्या साठी त्या मेंढीला खाली मान घालून बसावे लागणार होते. इथून बाहेर पडण्यासाठी तो एकच मार्ग त्यांना दिसत होता. ती मेंढी लगेच खाली बसली, दुसऱ्या मेंढीने त्या मेंढीच्या वरून उडी मारली आणि ती पलीकडे पोहोचली. पलीकडे गेल्यावर बसलेल्या मेंढीचे आभार मानले. पलीकडची मेंढी तिच्या वाटेने कळपात गेल्यावर बसलेल्या मेंढीला शोधत तिचा मेंढपाळ आला आणि ती मेंढी ही आपल्या कळपात सुखरूप पोहोचली.

दोन मेंढ्या च्या जागी आपण आपल्याला ठेवून विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की अशा अरुंद पुलावरून आपण ही कितीतरी वेळा जातो, जिथे कोणा एकाला पुढे जाण्याची गरज असते, एकाला थोडे थांबण्याची गरज असते. कधी कधी तो न दिसणारा पूल आपल्या आवडत्या नावडत्या गोष्टीना जोडणारा असतो. असा नाजूक पूल पार करताना दरी डोंगरांची नसते तर आपल्या सोबत असणाऱ्या माणसाच्या भावनांची असते. त्या वेळी पुढच्या प्रवासासाठी कधी झुकावे लागते, थोडे थांबावे ही लागते आणि त्यामुळे कधी कधी दुसऱ्याचा मार्ग मोकळा होतो तसेच आपल्याला ही पुढे जाण्यासाठी आणि हा प्रवास सुरु ठेवण्यासाठी मदत होते. कधी कधी आपल्या जोडीदारासोबतच्या प्रवासात दोन आवडीच्या गोष्टी विरुद्ध टोकाच्या असू शकतात तेव्हा हा प्रवास निरंतर सुरू ठेवण्यासाठी एकमेकांना वाट देत आपण ते विरुद्ध टोक जवळ आणण्याचा प्रयत्न करू शकतो.

कमल मावशी


काही दिवसांपूर्वी शलाका तिच्या शाळेत गेली होती. बऱ्याच दिवसांनी शाळेतल्या वर्गांना, तिथल्या विद्यार्थ्यांना पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

काही शिक्षकांनी आल्या आल्याच तिला दुरूनच ओळखले आणि तिची खुशाली विचारली. तिचा चेहरा थोडा फार बदललेला होता, पण तिची बोलण्यातली तेव्हाची आत्मीयता अजूनही तशीच होती. तासाला जाताना त्यांनी शलाकाचा निरोप घेतला. शलाका आजूबाजूचे वर्ग, प्रयोगशाळा बघत स्टाफ रूमच्या दिशेने निघाली.
वाटेत तिला कमल मावशी दिसल्या. दुरून हाक मारल्यावर त्यांनी लगेच ओळखले. तिला जवळ बोलावले. त्या पूर्वी जशा असायच्या अगदी तशाच आता ही होत्या. वय वाढलेले पण मनाने उत्साही आणि तरुण. त्या शाळेत बऱ्याच वर्षांपासून स्वच्छतेचे काम करत. त्या वर्गात जेव्हा जात असत तेव्हा वर्ग स्वच्छ करता करता मुलांशी सुद्धा बोलत असतं. त्यामुळे मुलांची आणि त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. शाळेतला प्रत्येक कोपरा त्या घराप्रमाणे स्वच्छ करत. त्याच्या नेटक्या कामामुळे त्यांना कधीच दुय्यम वागणूक मिळाली नाही. कमल मावशी कायम लक्षात राहतील असे त्यांचे व्यक्तीमत्व होते.
त्यांच्याशी गप्पा मारता मारता शेजारच्या वर्गात भांडणाचा आवाज येऊ लागला. कमल मावशीनी शलाकाला आत जाऊन पाहायला सांगितले. डब्यातल्या खाऊवरून दोघा मुलांमध्ये भांडणे सुरू होती. सुजय आणि विनय दोघे मित्र होते पण एकमेकांशी मारामारी करण्यापर्यन्त प्रकरण पुढे गेले होते. शलाका आत गेल्यावर वर्ग शांत झाला आणि जोरात डबा पडण्याचा आवाज झाला. सुजयचा संपूर्ण डबा खाली सांडला. बेंच आणि जमिनीवर सगळे सांडलेले बघून सुजय रडवेला झाला. दोघे मान खाली घालुन उभे होते. जे झाले ते बरोबर नव्हते याची जाणीव दोघांना झाली. शलाकाने वर्गाबाहेर येऊन मावशीना हाक मारली. सांडलेले स्वच्छ करण्यासाठी त्यांना त्या वर्गात बोलावले. शलाका पुन्हा वर्गात येण्या आधीच विनय आणि सुजयने सांडलेले सगळे उचलून आपल्या रुमालाने बेंच स्वच्छ केला.
ती जागा आधी सारखी स्वच्छ झालेली पाहून शलाका ने सुजय आणि विनयचे कौतुक केले. शलकाने त्यांना विचारले, “ मावशी स्वच्छ करण्यासाठी येतच होत्या तर तुम्हाला स्वच्छ करावे असे का वाटले ?? “ त्यावर त्यातल्या विनयने उत्तर दिले, जे फार वेगळं होतं...
तो म्हणाला “ आम्ही बेंच साफ करत नव्हतो , आमची चूक झाली म्हणून मन साफ करत होतो, म्हणजे मावशीच म्हणलेल्या एकदा ते मला आठवलं “
“ काय म्हणलेल्या “ शलाकाने विचारलं
“ मी त्यांना विचारलं होतं , रोज ही स्वच्छता करताना, आम्ही केलेला कचरा गोळा करताना तुम्हाला वाईट वाटत नाही का ? तुम्ही थकत नाही का ?
त्यावर त्या म्हणलेल्या की, “ जेव्हा मी हे काम करते तेव्हा असं समजते की या कचऱ्यासोबत मी माझ्या मनातले वाईट विचार आणि चुकीच्या गोष्टी ही उचलून बाहेर टाकते. तुमचा वर्ग स्वच्छ करता करता मनातला कडवट पणा, द्वेष, निराशा, लोभ आणि ईर्षा सगळे मनातून काढून टाकते. आपल्याकडून झालेल्या चुकांचे प्रायश्चित म्हणजे माझं काम. कालच्या चुका दुरुस्त करण्याची नवी संधी म्हणजे माझं काम. कामातुन कचरा काढता काढता मी माझ्या मनातले जळमटे पण काढत असते विनय. “
“ आज आमच्याकडून पण चूक झाली म्हणून आम्ही हे केले, आम्ही जमिनीला साफ करता करता मनाला पण साफ केले मॅडम, “
हे उत्तर ऐकून शलाकाच्या डोळ्यात पाणी आले. तोपर्यंत मावशी तिकडे आल्या होत्या. त्यांनी ही सगळे ऐकले होते. त्यांच्या ही डोळ्यात पाणी आले. पण ते समाधानाचे अश्रू होते. त्या तशाच वर्गा बाहेर आल्या. त्यांच्या मागोमाग शलाका पण बाहेर आली. ती त्यांना म्हणली,” मावशी तुम्ही फक्त शाळा स्वच्छ करत नाही आहात, इथल्या मुलांची मने पण स्वच्छ करत आहात. “ तेवढ्यात मधल्या सुट्टीची बेल झाली आणि सगळी मुलं बाहेर आली. दोघी स्टाफरूमच्या दिशेने निघाल्या.

गोदावरी

नदीचा निरंतर वाहणारा प्रवाह मला नेहमीच लिहिण्याचा नवीन विषय देतो. इथे हा वाहणारा प्रवाह म्हणजे जोडणारा धागा आहे. माणसाला माणसाशी आणि परंपरेशी जोडणारा धागा. खळ खळ वाहणारी असो किंवा संथ वाहणारी, ती नदी काही जोडत असते. काही स्वतःसोबत नकळत पुढे पुढे नेत असते. त्या नदीच्या घाटावर बसलेली मुलगी जेव्हा विचारते...” परंपरा म्हणजे नक्की काय? “ तेव्हा त्याचे उत्तर असे सुंदर मिळते, “ नदीच्या उगमाच्या ठिकाणी सोडलेले फुल जसे हळू हळू नदीच्या प्रवाहासोबत पुढे वाहत येते, घाटावरच्या प्रत्येक दगडाला स्पर्श करत, खाणाखुणा मागे ठेवत पुढे जाते. ते फुल म्हणजे परंपरा. “ येणाऱ्या प्रवाहासोबत त्याचे पुढे पुढे वाहत जाणे. आपले स्थायी रूप न बदलता अखंड पुढे जाणे म्हणजे परंपरा. नदीचा काठ. नदीचे पाणी. कुणासाठी तीर्थ, कुणासाठी जीवन. कोणी त्यात आकंठ बुडलेला. कोणी फक्त दुरून पाहणारा. कोणी त्यात रमणारा. कोणी मागे उरणारा. कधी काळी वाहून गेलेल्या आपल्या आठवणींना तिथे येऊन शोधणारा अशी ही प्रत्येकाची नदीशी नाळ जोडलेली असते.
हरवलेलं सापडण्यासाठी असलेला एक दुवा म्हणजे हा नदीचा प्रवाह. त्यातून वाहत येणारं फुल. एक परंपरा. असं नदीकाठचं विश्व आपल्या समोर आणणारा चित्रपट “ गोदावरी “
नदी फक्त वाहत नसते. ती जगत असते तिचे विश्व. तिच्या भोवतालचे जीवन. ती सारे आजूबाजूचे विश्व चालवते. नदी म्हणजे संस्कृती. नदी म्हणजे इतिहास आणि नदीच तो पिढ्यानपिढ्या जपत असते. म्हणूनच नदीत सोडलेल्या दिव्याने गोष्टीचा शेवट हा होत नसतो. ती गोष्ट दिव्यासोबत पुढे जाते. तो दिवा अखंड अस्तित्व घेऊन निरंतर जळण्यासाठी कोणा एकाच्या हातात येतो.
तो दिवा असतो कोणाची तरी आठवण. कोणाची तरी ओळख. कोणाचं तरी वास्तव्य. जे संपत नाही. ज्याला अंत नसतो. त्या फुलाप्रमाणे, दिव्याप्रमाणे किंवा नदीच्या प्रवाहाप्रमाणे त्याचा पुढे जाण्याचा प्रवास हा सुरू असतो.
चित्रपटात नदीकाठचे विश्व दाखवणारे एक उघडलेले दार दिसते. नदीला जिवंत करणारे हे दार कोणाची तरी वाट पाहत असते. ती व्यक्ती त्या घराला मिळते आणि तिच्यासाठी नदीच अखंड वाहणारी एक परंपरा होते.

जे. के. राऊलींग

१९९४ सालची ही गोष्ट आहे. एका तरुणीने आपल्या पतीच्या विरोधात घटस्फोट आणि न्याय मागण्यासाठी न्यायालयात खटला दाखल केला. कोणतेही आर्थिक पाठबळ आणि हाताला काम नसताना आपल्या नवजात लहान मुलीच्या भविष्यासाठी तिने नवऱ्याकडे आर्थिक मदत मागितली.
त्या तरुणीची आई काहीच वर्षांपूर्वी गेली होती. वडिलांशी तिचे तितके चांगले संबंध नव्हते. वर्षभर ती तिच्या वडिलांशी नीट बोलली ही नव्हती. अशा परिस्थिती ती एकटी कोणतेही काम हाताला नसताना, आपला विस्कटलेल्या संसाराला तोंड देत एकटीच लढत होती. नैराश्याने आणि आत्महत्येच्या विचाराने तिला ग्रासले होते. वर्षभरात ती स्वतः ला आजवरची सगळ्यात हरलेली व्यक्ती म्हणून समजू लागली.
घटस्फोटांनंतर पाच वर्षांनी आपली भीती आणि नैराश्याला मागे टाकत असामान्य परिस्थितीतुन कोट्याधीश होण्याचा तिचा प्रवास आपल्याला थक्क करून जातो.
      त्या तरुणीचे नाव होते “ जॉन “ नंतर लोक तिला “ जे. के. राऊलींग “ या नावाने ओळखू लागले. जे.के. राऊलींग ची यशस्वी वाटचाल सुरू झाली. जे. के. राऊलींग ही “ हेरी पॉटर “ या पुस्तकाची लेखिका. ज्या पुस्तकाचे चारशे कोटीहुन अधिक प्रति विकल्या गेल्या. जी आज पर्यन्त वाचकांची आवड म्हणून गाजते आहे. पुढे त्यावरच्या चित्रपट मालिका ही प्रसिद्ध झाल्या.
     फॉर्बेज यांच्या अनुसार राऊलींग या पहिल्या लेखिका आहेत ज्यांनी लिखाणातून एक अब्जाहुन अधिक कमाई केली.
    राऊलींग यांची ही यशोगाथा तुम्हाला आणखी प्रभावित करेल जेव्हा तुम्ही त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल जाणून घ्याल. पहिल्या पुस्तकासाठी हस्तलिखित लिहितानाही ती एक सामान्य जीवन जगत होती. या गरिबीतून उंच उडी घेऊन लेखन क्षेत्रात एवढे वरचे स्थान तिने कसे गाठले?
त्याला बरीच कारणे असणार. तिच्या या यशामागे एक महत्वाचा मुद्दा असा ही असू शकतो. जेव्हा तिच्या आयुष्याचा वाईट काळ सुरू होता, तेव्हा तिने त्याची जबाबदारी घेऊन त्यासाठी काही तरी करण्याचे ठरवले.
ही तुझी चूक नाही, ही तुझी जबाबदारी आहे, हे लेखिकेने मान्य केले होते.
जे. के. राऊलींग यांनी फसलेल्या नात्याची कधीच अपेक्षा केली नसणार यात शंकाच नाही. घटस्फोटाने हे नाते संपावे असे ही त्यांना कधी वाटले नसणार आणि मला खात्री आहे आपली मुलगी गरिबीत मोठी व्हावी असा स्वप्नातही त्यांनी विचार केला नसणार. हे त्यांच्याच बाबतीत सगळे घडावे, त्यात त्यांची चूक आहे असे ही नाही. पण त्या नात्याची जबाबदारी घेऊन त्या परिस्थितीवर काहीतरी करण्याचे त्यांनी ठरवले.
जेव्हा त्यांचे वैवाहिक संबंध बिघडले. तेव्हा आपल्या लहान मुलीला घेऊन त्या दुसऱ्या देशात गेल्या. जेव्हा कोणतेही काम हाताला नव्हते. तेव्हा त्यांनी स्वतः चे पाहिले पुस्तक लिहिले. त्यानंतर ही १२ प्रकाशकांनी त्यांचे “ हॅरी पॉटर “ पुस्तक प्रकाशित करण्यासाठी नकार दिला. तरीही १३ व्या प्रकाशकाकडे गेल्या. जेव्हा आयुष्याला उतरती कळा आली तेव्हा त्यांनी स्वतः ला सुधारण्यासाठी तशी संमती दिली आणि यश मिळवले.
त्या असे म्हणतात,
“कठीण परिस्थिती माझ्या आयुष्याचा भक्कम पाया आहे, त्यावर मी माझ्या आयुष्याची पुन्हा बांधणी केली.”
इंग्रजीत वाचण्यात आलेल्या या लेखाने मला आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. असे एक धाडसी व्यक्तिमत्व मातृभाषेत लिहिताना त्याचे तेवढेच अप्रूप वाटत होते. कौतुक वाटत होते.

कबर्न पार्क


रविवारची सकाळ, बेंगलोर मधल्या एका जुन्या ऐतिहासिक बागेला भेट देण्याचे योजले होते. त्याचे नाव “ कबर्न पार्क “ पूर्वी तिथे राज्य करणाऱ्या सम्राट राजावरून त्या ठिकाणाला “ श्री चाम राजेंद्र पार्क “ असे हि दिले गेले. पुढे इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या बागेचे व्यवस्थापन हातात घेतले. लोक त्याला मग कबर्न पार्क म्हणून ओळखू लागले. अठराशेच्या काळातला ऐतिहासिक वारसा जपत दुरवर पसरलेली हि बाग पाहण्यासाठी आम्हाला पूर्ण दोन ते तीन तास लागले. तिकडे जाण्यासाठी मेट्रोचा पर्याय होता. मुंबईच्या लोकलचा अनुभव गाठीशी असताना इथे मेट्रोने प्रवास करण्यात थोडे वेगळेपण जाणवले. खर तर इकडे आल्यावर तो माझा पहिला वाहिला मेट्रोचा प्रवास. त्यात ही मेट्रो मधली जुजबी गर्दी, निवांत प्रवास आणि शिस्तीत रांग लावून मेट्रो मध्ये चढण्या उतरण्याचे वेगळेपण मी इकडेच पाहिले.

अर्ध्या तासात कबर्न पार्क स्थानक आले. थोड्याच अंतरावर त्या बागेचे प्रवेश द्वार आले. सामान्यपणे शहरात जसे पार्क असतात. जिथे लोक चालायला, धावायला येतात. काही विदेशी पर्यटक विशेष भेट द्यायला येत असतात. काही स्वतःच्या शोधात एकांत मिळवण्यासाठी येत असतात. तसेच इकडे आजूबाजूला लोक दिसत होते. फार गर्दी नव्हती. निवांत आपल्या वाटेने जाता येईल. तेवढी मोकळीक होती. हे पार्क दोन ते तीन भागात विभागले गेले आहे. एका बाजूला लहान मुलांचे खेळ आणि खाण्याचे स्टोल होते. एका बाजूला पूर्णपणे वृक्षवल्लीने भरलेला परिसर होता. कृत्रिम तळे आणि त्यात फुललेली कमळे. त्यात बोटींगचा आस्वाद घेता आला. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज कानात रुंजी घालत होते. कुठे बदक उन्हात पहुडलेली दिसली. एका ठिकाणी धबधबा, टेकडी, कारंजा असा संगम साधला होता. पेटपूजा करायला आत स्टोल होते पण स्वच्छतेची काळजी जागोजागी घेतली गेली होती. त्या बागेच्या भोवती जरी उंच इमारतींनी वेढा घातलेला दिसला तरी बागेतले सौंदर्य झाडानी जपले होते.

तिथले माझे आकर्षण होते, तिथली ऐतिहासिक झाडे. दीडशे ते दोनशे वर्षांपासून विस्तीर्ण पसरलेली झाडे त्या शहराचा श्वास जपत होती. हजाराच्या संख्येने वाढलेली लहान मोठी झाडे तिथे एकाच ठिकणी असावीत. दूरवर नजर जाईल तिकडे पसरलेली. असे हे हिरवे छप्पर डोक्यावर असताना वेळ कसा गेला कळले नाही. प्रत्येक झाडाच्या फांद्या अशा काही एकमेकांत गुंतल्या होत्या की त्यांना न्याहाळताना ब्रम्हाण्ड एकमेकांशी जोडल्याचा भास होत होता. दूरवर दिसणारे हे हिरवे खांब आमची वाट आणखी सुंदर करत होते. पुन्हा एकदा भेट देण्यासाठी आम्ही त्या जागेचा निरोप घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो.



संपलेले पेन



आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक नव्याचे कौतुक, त्याचे नवे पण आपण साजरे करतो. मग ती एखादी वस्तू असो, जागा असो किंवा एखादी व्यक्ती. नव्याचे कुतूहल असताना त्याच मनात पूर्वीचे काही तरी मागे ठेवून आपण पुढे आलेलो असतो. काही गोड तर काही कटू आठवणी सोबत असतात. त्या गोष्टीचा दीर्घ सहवास, सोबत असते.

जसे कि जेव्हा अक्षर ओळख नव्हती तेव्हा पाटी आणि पेन्सिलचे कुतूहल होते. जसे पुस्तक, पेन हातात आले तेव्हा त्याचे आकर्षण वाटू लागले. नव्या कोऱ्या वहीच्या पानावर त्या पेनाने लिहिलेली अक्षरे पाहताना त्या हस्ताक्षराची भुरळ पडली.

टेबलावरच्या अशाच एका पेनाचे ही गोष्ट.

मी नवीन कथा लिहायला घेणार होते. वही पेन खालच्या रकान्यातून काढले. समोर टेबलावर ठेवले. लिहायला सुरुवात करणार तोच शीर्षक लिहिल्यावर पेनाची शाई संपली. सहजपणे ते जुनं संपलेलं पेन बाजूला ठेवलं आणि काहीच दिवसापूर्वी भेट म्हणून मिळालेलं नवं पेन हातात घेतलं. ठरवल्याप्रमाणे कथा लिहून पूर्ण झाली. पेन पुन्हा त्या जागी ठेवताना मला ते संपलेलं पेन दिसलं.

ते पेन मला काही तरी सांगत होतं. काही काळ माझा त्या संपलेल्या पेनाशी मूक संवाद झाला.

“ नवं कोर पेन आपल्याला भेट म्हणून मिळाल्यावर त्याचं आपल्याला किती कौतुक असतं! आपण त्याला किती जपतो! असे नवे पेन हातात पडल्या पडल्या त्याने स्वतःचे नाव लिहिण्याची उत्सुकता, नवीन कथा, कविता लिहिण्याची उत्सुकता, त्याने केलेला गृहपाठ, भरलेली डायरी सगळंच आवडू लागतं. ते कधी संपूच नये अशी हि सुप्त इच्छा मनात असते आणि अचानक कोरी पाने त्या पेनाने भरता भरता कधीतरी ते पेन संपलं की त्याच विश्व् संपत. असे कसे होऊ शकते? “

ते संपलेलं पेन तेव्हा मला सांगत होतं “ मी काही संपलो नाहीच मुळी... माझ्यासोबत आता भरभरून साठा आहे... तुझ्या अनुभवाचा, तुझ्या सोबतीचा, माझ्याकडे तुझ्या आठवणीतल्या गोष्टी आहेत. तुझ्या मनातली मी वाचलेली काही पाने आहेत. ती आता बदलणार नाहीत. आपली सोबत आज हि सुंदर पानावर सजलेली आहे. आज मी हातात नसलो तरी मी मागे ठेवलेली असंख्य आठवणीतली पानं आहेत. अशा वेळी नवे पेन हातात घेताना त्या मागच्या पानांची आठवण ठेवून तू नवी सुरुवात कर . “

ते पेन मला नवीन सुरुवात करायला सांगत होतं. अगदी आपल्या जवळच्या माणसासारखं...

त्या पेनासारखेच तर हे जग आहे. एखादी व्यक्ती आपल्याला विसरली असे कधी वाटू शकते. तेव्हा आपले तेव्हाचे सोबत असणे आणि आताचे नसणे त्या पेनासारखे समजावे. कोणीतरी तसे पेन होऊन आपल्याला समृद्ध केलेले असते. तर कधी आपल्याकडून एखाद्याच्या आयुष्यात आठवणीतले सुंदर पान लिहिले गेलेले असते. त्याचे समाधान सोबत ठेवून पुढच्या प्रवासाला आपण निघावे. गोष्ट लिहिताना मध्येच पेन जरी संपलं. दुसरं घ्यावं लागलं तरी मागची काही पाने त्या पेनाने लिहिल्याचे समाधान कायम सोबत ठेवून पुढे लिहीत राहावे.


पुस्तक मनोगत : युद्धानंतर



युद्धभूमी, रणांगण , विजय , पराजय , लढाया, शस्त्रे, मनुष्य हानी, आपण लहानपणापासून गोष्टीत ऐकतोय. सिनेमामध्ये पाहतोय. आज ही अशी युद्ध कधी सौम्य तर कधी रुद्र रूपात सुरू आहेत.

जेव्हा ही युद्ध आजूबाजूला सुरू असतात. जेव्हा युद्ध डोळ्यांनी पाहिले जाते. कानांनी ऐकले जाते. तेव्हा प्रश्न पडतो...युद्ध का सुरू होतात? युद्ध कशी संपतात ? युद्धा नंतर काय होते? या प्रश्नांची उत्तरं आणि युद्धानंतर चे दारुण चित्र, तिथली हकीकत मला “ युद्धानंतर “ या कवी. आदित्य दवणे लिखित काव्य संग्रहात वाचायला मिळाले.

जिथे युद्धाचे वावटळ येते, तिथला परिसर कलाकाराला बोलका वाटू लागतो. भयाण शांततेत सुद्धा बोलणारी मने तो ऐकू शकतो. एखाद्या शारीरिक आजाराची जशी लक्षणे असतात तसे मला वाटते आपल्या मनातल्या अस्थिरतेचे, विकाराचे लक्षण म्हणजे ही युद्ध, बंड, मनुष्य हानी.

युद्धात बधिर झालेले कान कोणाची तरी तन्मयतेने मारलेली हाक ऐकण्यासाठी आसुसलेले असतात. युद्धात पाणावलेले डोळे मायेचा ओलावा शोधत असतात. सैरभर झालेले मन युद्ध जिंकण्याआधीच हरलेले असते.

कोरीव शिल्पे जशी इतिहास जपतात. तसेच युद्धातल्या आठवणी म्हणजे शरीरावरचे व्रण कायम माणसाच्या सोबत असतात. ती जागा, तो परिसर आणि ती माणसे सावली सारखे मनावर गारुड घालतात.

मनातल्या सुप्त भावना, नव निर्मितीचा ध्यास जिवंत असणाऱ्या प्रदेशात कलाकार जन्माला येतो आणि कलाकार नसणाऱ्या ठिकाणी युद्ध जन्माला येते. युद्धभूमीवर ते थांबवण्याची ताकद कलाकारात असू शकते. तो तिथले चित्र बदलण्यासाठी कलेचे शस्त्र हाती धरतो. तो त्याच्या कलेतून तिथले विश्व, तिथल्या जागा, तिथली माणसे सांगत असतो. मृत जमिनीत कला अमृत पेरू शकते. तिथले युद्ध तो शिल्पात साकार करतो. युद्धात बेरंगी झालेल्या चित्राला तो नव्याने रंगवू शकतो. बधिर झालेल्या कानांना सुरांचे दान देऊ शकतो. या युद्ध भूमीला नव जीवन देऊन रंगमंच करणारा जादूगार त्या मातीतला कलाकार असू शकतो. या पुस्तकातील एका कवितेत कवी आदित्य दवणे लिहितात,

“कलेच्या साध्या असण्याने ही

 लढले जाणारे युद्ध युद्ध उरले नसते

 हे जग खरेच किती सुंदर झाले असते!”

असे हे युद्धानंतरचे जग पुन्हा नव्याने उभारण्याचे आशादायी चित्र मनाच्या कोपऱ्यात जपत हे पुस्तक वाचून पूर्ण झाले.


बाहुली


बर्लिन मधल्या एका तरुणाची ही गोष्ट. हरवलेल्या प्रेमावरची गोष्ट. मूळ इंग्रजी भाषेत असलेली गोष्ट मराठीत लिहायला घेतली.
जोसेफ नावाचा तरुण त्या शहरात एकटा राहत होता. त्याला कोणी जोडीदार नव्हता. मुलं ही नव्हती. कुटुंब नव्हते. जवळच्या पार्क मध्ये तो रोज वेळ घालवायला जात असे. एकदा त्या पार्क मध्ये त्याला किमा नावाची एक सात आठ वर्षाची मुलगी भेटली. ती रडत रडत समोरून येत होती. तिची हरवलेली बाहुली ती शोधत होती. किमाला रडताना पाहून त्याने तिला धीर दिला. तिचे नाव विचारले. मग तो ही तिच्या सोबत ती बाहुली शोधू लागला. हरवलेली बाहुली काही मिळाली नाही. थोड्या वेळात तिचा भाऊ तिला शोधत आला. किमा निराश मनाने आपल्या भावासोबत घरी निघाली. जोसेफ ला तिचा रडवेला चेहरा पाहवत नव्हता. त्याने किमाला दुसऱ्या दिवशी पुन्हा यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी ही बाहुली काही भेटली नाही. किमा रडू लागली. जोसेफने किमाच्या हातात एक पत्र दिले. बाहुलीने लिहिलेलं पत्र असं सांगून ते तिच्या हातावर ठेवले. त्या पत्रात लिहिलेले “ किमा...तू रडू नकोस, मी हे सुंदर जग पहायला निघाले आहे. प्रवासात काय काय अनुभवले ते तुला पत्रातून कळवत राहीन. – तुझी बाहुली “ ते वाचून किमाने डोळे पुसले. ते पत्र घेऊन आनंदाने किमा घरी गेली.
बाहुलीने लिहिलेलं पत्र वाचायला पुढे किमा रोज त्या ठिकाणी येऊ लागली. जोसेफ कडून ते पत्र घ्यायचं, ते वाचायचं रोजचा दिनक्रम झाला. त्या पत्राची आतुरतेने ती वाट पाहू लागली. हा पत्राचा प्रवास पुढे जोसेफच्या म्हातारपणा पर्यन्त सुरूच होता.
किमा आता मोठी झाली. जोसेफने तिला ती हरवलेली बाहुली मिळवून दिली. ती बाहुली तिचा प्रवास पूर्ण करून आली होती. बाहुलीला पाहून किमा म्हणाली “ ही बाहुली माझ्या बाहुलीसारखी दिसत नाही “ त्यावर जोसेफने आणखी एक पत्र त्या बाहुलीसोबत दिले. त्यात लिहिलेलं “ माझ्या या प्रवासाने मला संपूर्ण बदलले. मी तुझी आवडती बाहुली “ किमाने त्या बाहुलीला घट्ट मिठी मारली. त्या बाहुलीला घेऊन किमा आपल्या घरी गेली.
काही वर्षात जोसेफचे निधन झाले. किमा आता अठरा एकोणीस वर्षाची सुंदर तरुणी झाली होती. किमाने ती बाहुली अजून ही जपून ठेवली होती. एक दिवस तिला जोसेफची आठवण आली. तिने ती बाहुली हातात घेतली. त्या बाहुलीच्या आत किमाला चिठ्ठी मिळाली त्यात लिहिलेले “ आपण ज्या ज्या गोष्टींवर प्रेम करतो. त्या कधी तरी हरवतात, दुरावतात पण शेवटी हरवलेले प्रेम कुठल्यातरी रुपात पुन्हा आपल्याला सापडते. – तुझा बागेतला मित्र जोसेफ “ किमासाठी जोसेफची आठवण म्हणजे ती बाहुली आणि त्यांनी लिहिलेली सगळी पत्र. किमा भावुक झाली.
ही कथा जशी संपते तसे त्या हरवलेल्या प्रेमावर आपण ही विचार करू लागतो. या जगात शाश्वत असे काही नाही हे जरी खरे असेल तरी जुन्या बाहुलीचे रूपांतर नव्या बाहुलीच्या रुपात होणे. त्या बाहुलीचे नवेपण त्या क्षणी स्वीकारणे हे तिच्यावरच प्रेमच...आपण शेवटाकडे येताना कुणाच्या तरी आयुष्यात नव्याची सुरुवात करणे हे ही प्रेम...एखाद्याचे हरवल्याचे दुःख पाहून त्याच्या आयुष्यात आनंद शोधून देणे हे सुद्धा प्रेम...कधी वेगवेगळ्या मार्गाने शोधत येणारे हे प्रेम आपल्या आयुष्यात आपली गाठ भेट नक्की घेते. एखाद्या ठिकाणी, एखाद्या प्रवासात...

सफरचंद


शाळेत आपण अजाणतेपणी बऱ्याच गोष्टी अनुकरणातून, प्रयोगातून शिकतो. निरीक्षणातून शिकतो. या कथेत ही तसेच काहीसे होते. मूळ इंग्रजीत वाचण्यात आलेली ही कथा मला माझ्या संग्रही ठेवण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. म्हणून लिहायला लागले.

पाचवीचा वर्ग मुलांनी भरला होता. मुलांचा कलकलाट, भांडणे, आरडाओरडा, गोंधळ सुरू होता. व्यक्तिमत्व विकासाचा पुढचा तास होता. तासाला कोणी शिक्षक वर्गावर नव्हते. काही वेळाने त्या वर्गात नव्याने रुजू झालेल्या मीना बाई आल्या. त्या आल्या तशा दोन क्षण वर्गाबाहेरच थांबल्या. गोंधळ काही शांत होत नव्हता. त्यांना मुलांना नवीन काही शिकवायचे होते. पण अजून मुलांची तितकीशी ओळख झाली नव्हती. पहिल्यांदाच त्या वर्गात त्यांचा तास होता. मुलांना ही त्यांची ओळख नव्हती. त्यांनी हातात दोन सफरचंद आणले होते. त्या टेबलजवळ आल्या. त्यातला एक सफरचंद त्यांनी जोरजोरात टेबलवर आपटायला सुरुवात केली. असे एक दोनदा केले. समोर बसलेल्या मुलांनी ते पाहिले. त्यांना ते विचित्र वर्तन वाटले. बघता बघता सगळे शांत झाले. मुलांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. सगळे शांत झाल्यावर त्यांनी ते दोन्ही सफरचंद टेबलावर ठेवले. मुलांना त्यातला फरक ओळखायला सांगितला. कुठला चांगला आणि कुठला खराब ते ओळखायचे होते. नवीनच वर्गात आलेल्या बाई असं का विचारत आहेत? याचा मुलांना अंदाज येईना. वर्ग आता पूर्ण शांत झाला होता. सगळ्यांच्या नजरा त्या टेबलावर ठेवलेल्या दोन्ही सफरचंदावर होत्या. साहजिकच मुलांना विचारल्यावर सुरुवातीला अगदी सारखे दिसणारे सफरचंद आता वेगळे दिसत होते. त्यातला एक आपटलेला सफरचंद बाईंनी हातात घेतला. सर्वांनी तो खराब झालेला असे अनुमान काढले. याउलट दुसरा गुलाबी दिसणारा, आतून पांढरा शुभ्र गोड असा अंदाज बांधला. वर्गातील सर्वच मुलांनी तसेच उत्तर दिले. त्या नंतर मीना बाईंनी ते दोन्ही सफरचंद कापले. मुलांना दाखवले. पहिला सफरचंद हळूहळू बाजूने काळा पडलेला, खराब होऊ लागला होता. आकार उकार बदलला होता. एका मुलीने उठून त्यांना विचारले “ आपण त्याला जे बोललो ते त्याने ऐकले का ? म्हणून तो आतून खराब झाला का...? “

बाईंनी मग तिला त्याचे उत्तर दिले. सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते “ आपण त्याला आपटले, त्याला चुकीच्या पद्धतीने हाताळले, त्याला सांभाळले नाही, त्याच्या दिसण्यावरून, चवीवरून सगळ्यांनी नाकारले. एक नाही तर तीस जणांनी त्याला नाकारले म्हणून ते आपोआपच आतून खराब होत गेले. या उलट जे दुसरे सफरचंद त्याबद्दल आपण किती छान म्हणले. त्याच्या चवीला, दिसण्याला, असण्याला आपण स्वीकारले. त्याला व्यवस्थित हाताळले म्हणून ते जसे बाहेरून गुलाबी सुंदर दिसते तसेच ते आतून ही गोड राहिले.

मी येताना दोन्ही चांगलीच फळे आणलेली होती, पण कुणाच्या तरी स्वीकारण्याने, हाताळण्याने एक फळ गोड आणि ताजे राहिले तर दुसरे व्यवस्थित सांभाळले नाही, नाकारले म्हणून आतून खराब झाले. मैत्री करताना आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, चुकीच्या वर्तनाने ती व्यक्ती दुखावली जाते आणि असे मैत्री चे नाते फार काळ टिकत नाही... त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा... Be kind to universe …Be kind to yourself.

या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वर्गात थोड्याच वेळात वर्गशिक्षिका आल्या. त्यांनी सर्व मुलांना त्यांच्या नवीन बाईंची ओळख करून दिली. सर्व मुलांनी आपली नाव मीना बाईंना सांगितली. सफरचंदाचा हा खेळ आणि त्यामागची गोष्ट सर्वानाच आवडली.

गोष्ट संपली. त्यातून किती सहज मानवी भावना मांडल्या गेल्या आहेत. असंवेदनशील मने ही कधी तरी संवेदनशील मनाला ठेच लागते तेव्हा निर्माण होतात.

आपल्यातली इतरांच्या प्रति असलेली संवेदनशीलता, करूणा किती मोठा बदल करते पहा ! एखाद्या गोष्टीला नाशिवंत करू शकते किंवा कुणाला नवजीवन देऊ शकते.

आपले मन आणि जीभ यात अदृश्य असं जोडलेलं नातं आहे. त्यात प्रचंड ताकद आहे. कधी ते मोरपिस होऊन दगडासारख्या मनाला ही प्रेमाने मृदू स्पर्श करू शकते तर कधी संवेदनशील मनाला दगडासारखे कठीण करू शकते. तेव्हा इतरांना आणि स्वतःला मायेची उब देत राहा.


रानभुली



“ रानभुली “ गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचे नुकतेच वाचनात आलेले हे रानातले पुस्तक. पुस्तकाबद्दल लिहिताना माझ्या डोळ्यासमोर रायगडाची तटस्थ तटबंदी येते. तिथले मातीत रोवलेले बुरुज, बाजारपेठेतली पडलेली भिंत, तिथला सूर्यास्त, गडाला शोभणाऱ्या अजस्त्र कडा आणि भोवताली पसरलेली पोकळ दरी.

हे पुस्तक लिहिणारा गडाचा वारकरी. जो गडाच्या शौर्य कथा टिपण्यासाठी ही वारी करतोय. या वारीत त्याला सोबत होते ती एका रान कन्येची. मनीची. मनीसाठी हा वारकरी म्हणजे आप्पा. या गडाचा गड पुरुष. त्यांच्या छत्र छायेत तिला या गडाला पालथे घालण्याचे अभय मिळते. मनीची सोबत हळूहळू आप्पांना ही

हवी हवीशी वाटू लागते. अशी ही धनगरांची विलक्षण धाडसी पोर. तिची कथा या पुस्तकात वाचायला मिळते.

सोनवळीची पिवळी धम्म फुले, तेरड्याचे ताटवे, दूरवर पसरलेलं हिरवं कच्चं गवत, सोनवळीच्या फुलांची कलाबुत त्यावर तेरड्याची आरास. पांढऱ्या शुभ्र ढगांनी गच्च भरलेले आकाश आणि खाली फुलांच्या रंगांची उधळण. असे सुरेख वर्णन यात वाचायला मिळते.

गडावर मनीचे अपार प्रेम, भक्ती आणि श्रद्धा. गडासारखा प्रिय हिला दुसरा कोणी नाही. दरदरत्या पावसात, दाटलेल्या थंडीत, भिजत , कुडकुडत गड हिंडत राहणारी, सूर्यास्ताच्या वेळी बाजारपेठेच्या पडक्या भिंतीवर बसून सूर्यास्त न्याहाळणारी मनी म्हणते “ नारायेन बघ कसा ग्वाड दिसतो ! “

मनी उनाड, अल्लड, रानातल्या काट्या कुट्याना, कडा कोपऱ्याना सहज स्पर्श करून येणारी गड कन्या मला वाटते. साधी सोपी असली तरी धाडसी, करारी ही भासते. “ खानदानी किल्लेदाराची लेक “ असे ही आप्पानी मनीला म्हणले आहे. इतकं आत्मीयतेने निभावलेले हे नाते लग्न बंधनात अडकल्यानंतर अचानक दुरावते.

पाचाड हुन मुंबईस आल्यावर झोपडीत सुरू झालेला तिचा संसार तिला निरस, रंगहीन वाटू लागतो. त्यात जन्माच्या वेळीच अकस्मात गेलेले पहिले मुलं. तिचे पाचाडास परतणे. आपल्या न जगलेल्या बाळाच्या समाधी ठिकाणी जाऊन अंतर्मनातून कोलमडून जाणे. मनीचे नवऱ्याशी, घरच्यांशी धरलेले अखंड मौनव्रत आणि गडावरच्या आठवणी सारेच आप्पांसाठी दुसरे टोक.

शेवटी मुंबईतला तुटपुंजा संसार नवऱ्या सोबत पुन्हा गडाच्या पायाशी आणून ठेवणारी मनी आप्पांना या कथेच्या शेवटी भेटते. गमावलेले सारे परत मिळवण्यासाठी धडपडणारी मनी त्यांना पुन्हा भेटते. गडावर असलेल्या निस्सीम प्रेमाचे आणि फार पूर्वीच जमलेल्या दृढ नात्याचे हे बळ असते.

गडाकडे परतताना आप्पांना ती गजरे घ्यायला सांगते. कुणासाठी ? तिची गडावर वाट पाहणारी शिर्काई, मानाई, सातमाय, आसरा त्या शतकापासून तिथे गडावर ठाण मांडून बसलेल्या देव्या असतात. त्यांची गाठभेट घेते. किल्लेदाराची लेक, गडाची लेक खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा गडावर परतते. इथेच कथेचा शेवट होतो.


निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...