Sunday, 18 July 2021

पुन:श्च हरी ओम

     

          एखाद्या नव्या गोष्टीची सुरवात उत्साहात करणे. त्यासाठी हवे ते कष्ट करणे. हा मानवी स्वभाव. सुरवात छान झाली कि मग ती चिरकाल तशीच राहावी ही एकच अपेक्षा मागे उरते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी तरी नवी सुरवात होत असते. उद्याचा दिवस हा ही काहींसाठी नवी सुरवात होतो. मग ती एक छोटीशी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चालते ते चक्र. ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास !
हे चक्र मध्ये थांबते, मंदावते, वेगळे होते. पुन्हा जोडले जाते. पुन्हा फिरू लागते आणि वेग येतो. एका क्षणाला भरधाव जाते. अगदी आपल्याला हवे तसे. “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी...लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी...”
या सावता माळींच्या ओळी प्रत्येकाच्या ओठांवर असतात. कोणाच्याही मनात जागा निर्माण करण्याचा एक महत्वाचा रोड मॅप म्हणजे “ जेवण. “
एकदा जिभेवर चव आली की कायम लक्षात राहते. कधी दखल घेतली जाते, कधी कोणाची नव्याने ओळख होऊन जाते. पंगतीत बसल्यावर कधीतरी असा चवदार पदार्थ समोर येतो की “ अन्नपूर्णा सुखी भव: “ शब्द मुखातून सहज येऊन जातात.
तीच ऊर्जा तिथे गुंतलेल्या हाताला, तिच्या कष्टाला मिळते. आणि तिचा ही जीव “ सुखीया “ होतो. हे तंत्र जोवर सुखा-सुखी सुरू असते तोवर घराच्या भिंती जरी ठिसूळ झाल्या तरी ओलसर जमीन सगळे घर बांधून ठेवते.
“ पुन:श्च हरी ओम “ ही तशीच आपल्यातली सामान्यांची असामान्य कथा. कधीतरी आपण ही जगलेली. अनुभवलेली कथा. चित्रपट आणि वास्तव यांना जोडणारी कथा. आपल्या गतीने पुढे जाणारे आपले एक विश्व मध्येच स्पीड ब्रेकरने थांबते. तेव्हा “ पुन:श्च हरी ओम “ म्हणत नवी सुरवात करावी लागते. पहिल्या प्रथम चित्रपट पाहिल्यावर, ऐकल्यावर देवाशी निगडित असावं का असे वाटले. पण जेव्हा कथा पूर्ण झाली तेव्हा काही निवडक प्रसंगातून “ आपला हात जगन्नाथ “ असे काहीसे शेवटी उरले.
खेळीमेळीची कौटुंबिक मध्यमवर्गीन स्थिती त्यात ही सुखाला कमतरता नाही. प्रत्येकाचे वेगळे विश्व तरी बांधलेले. वादविवाद तरी एकमेकांशी पूरक संवाद.
मनीष अंसुरकर यांची त्याच ताकदीची “ नवी सुरवात “ गाण्यात असे काही सांगते, जे ऐकता ऐकता खरंच पुन्हा नव्याने सुरवात करण्याची प्रेरणा मिळते
 “ इवलेसे जगणे, इवलीशी स्वप्ने...इवल्याशा आशेला नभ हे ठेंगणे...स्वप्नांच्या गावी हसत उडावे...घेऊन हातात हात...करू पुन्हा सुरवात नव्याने, करू पुन्हा सुरवात...”
छोटी मोठी स्वप्न आणि ती पूर्ण करताना मिळवलेली, कमावलेली संपत्ती, माणसे आणि बरंच काही. अचानक आलेले वैश्विक संकट त्यात झालेला निसर्गाचा प्रकोप आणि त्यावर सोशल मीडियाचे रामबाण औषध. आजच्या घडीला खर तर सगळेच या रामबाण औषधाच्या प्रभावाखाली आहेत. कोणी गरज म्हणून, कोणी मनोरंजन तर कोणी समाधान शोधत.
काही वेळाने दिपालीचे स्वयंपाक घर आपल्याच घरचे भासते. चूलीवरची चारी दिशांना पसरणारी वाफ आणि जेवणाचा दरवळ आपलासा वाटून जातो. अन्न शिजवणे ते चवदार करणे आणि जगासमोर ती अनन्य साधारण पण महत्वाची गोष्ट माध्यमातून पोहोचवणे, मांडणे, सादर करणे. सामान्यांची ही असामान्य धडपड. शेवटी “ कशासाठी...तर पोटासाठी “ ही या कथेची ओळख होऊन जाते.
सुरवात होते ती महिन्याच्या याद्या आणि गरजावरून. त्यावर आर्थिक टांगत्या तलवारी. नात्यांच्या अपेक्षा. सोन्याच्या किमतीत जमवलेली मदत. वादळात हरवलेली माणसांची घरे, पडक्या कौलाखाली उध्वस्त झालेली आपली चूल, पुन्हा त्याच माणसांसाठी चूल मांडण्याची धडपड.
त्याप्रमाणे सरतेशेवटी पडद्याआड थाटलेल्या चुलीमुळे घरी झालेला संघर्ष आणि त्यावर ही फुंकर देत घरच्यांचा पाठिंबा ही सामान्यांची असामान्य कथा मनाला भावते. अविरत प्रयत्नशील गृहिणी मग ती शहरातली असो किंवा खेड्यातील. जेव्हा उभी राहून वेगळी वाट निवडते. तेव्हा सारा आसमंत “ तथास्तु “ म्हणल्याशिवाय राहत नाही. अशी काहीशी तिची कथा...

Sunday, 4 July 2021

गाढवाचे कान

         
   काल एक इंग्रजी कथा वाचण्यात आली. गोष्ट वाचून मला पूर्वीच्या अकबर – बिरबल, राजा राणीच्या गोष्टीची आठवण झाली. मग या इंग्रजी कथेला मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केला.
सूर्यसेन नावाचा राजा सूर्यनगरीत राज्य करत होता. राज्यात पावसाचे दिवस होते. एकदा राजाला मासे पकडायला जायचे मनात आले. मासेमारीला जाण्याआधी हवामानाचा अंदाज त्यांनी त्याच्या हवामान शास्त्रज्ञाला विचारला.
दरबारातील त्या शास्त्रज्ञाने पुढच्या काही तासात पाऊस पडणार नाही याची खात्री राजाला दिली. राजा आणि राणी मासे पकडायला बाहेर पडले. जाताना रस्त्यात त्यांना गाढवावरून जाणारा एक माणूस भेटला. ज्याच्या हातात मासेमारीचा काटा होता. त्याला थांबवून राजाने त्या माणसाला पकडलेल्या माशाबद्दल विचारले. गाढवावर बसलेला तो माणूस राजाला म्हणला “ राजे, आता मासे पकडायला तुम्ही जाऊ नका. तुम्ही तुमच्या दरबारी परत जायला हवे, आता वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. “
 त्यावर राजा म्हणला “ मी माझ्या दरबारात हवामानाचा अंदाज घेण्यासाठी खास शास्त्रज्ञ नेमला आहे. त्याला चांगला अनुभव आहे. त्याचा त्यात अभ्यास आहे. त्याने मला आजच्या हवामानाचा अचूक अंदाज दिला आहे. माझा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. “ बोलणे पूर्ण करून राजा पुढे त्याच्या रस्त्याने जाऊ लागला. थोड्याच वेळात जोरदार पाऊस कोसळू लागला आणि राजा, राणी पूर्णपणे भिजले.
परत आल्यावर संतप्त राजाने हवामानाचा चुकीचा अंदाज सांगणाऱ्या त्या शास्त्रज्ञाला शिक्षा फर्मावली. त्याला त्या पदावरून काढून टाकले. राजाने त्याच्या शिपायांना रस्त्यात भेटलेल्या त्या माणसाला दरबारात शोधून आणायला सांगितले. त्याला राज दरबारी “ प्रशिक्षित हवामान शास्त्रज्ञ “ हे पद दिले.
राज दरबारी हे सगळे कौतुक पाहून त्या माणसाने राजाला सांगितले. “ मला हवामानाची विशेष काही माहिती नाही, राजे....
मी अंदाज लावतो तो माझ्या गाढवावरून. माझ्या गाढवाचे कान खाली झुकलेले असतात तेव्हा पावसाची शक्यता असते आणि तोच अंदाज मी तुम्हाला त्या दिवशी सांगितला.” हे ऐकल्यावर राजाने त्याच क्षणी त्याला त्या पदावरून काढून त्याच्या गाढवाला त्या पदावर ठेवण्याचा निर्णय घेतला. राजाच्या निर्णयाने दरबारातील सर्व लोक आश्चर्य चकित झाले.
गोष्ट इथेच संपली, पण खरी गोष्ट इथे सुरू होते. जी सांगते बरेच काही. त्या पदावरचा आधीचा “ अनुभवी माणूस “ किंवा नंतरचा “ गाढव. आधीचा चुकलेला अंदाज आणि नंतर त्या गाढवावरच्या माणसाचा अचूक अंदाज त्यानंतर राजाची हटके सुनावणी. माणसावर ठेवा किंवा गाढवावर... विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे आपल्या हातात असते. जितके सोपे तितकेच कठीण असते. बाकी अवेळी पाऊस तेव्हा ही चर्चेचा विषय होता आज ही आहे.

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...