Friday, 31 July 2020

घरटे

 पावसाची चाहूल लागली की पक्षी आपलं लहानसं घरटं बांधतात. सळसळत्या वाऱ्यापासून आपलं घरटं आणि आपली पिल्लं सुखरूप राहण्यासाठी झाडाच्या कुठल्यातरी उंच कोपऱ्यावर दोन फांद्यांच्या आधारावर ते एक एक काडी एकत्र करून आपलं छोटंसं विश्व उभं करतात. झुलणाऱ्या पानांची सावली आणि त्यावर लगडलेली जांभळं त्या घरट्याची आणखीनच शोभा वाढवतात. अस हे झाडात लपलेलं आणि पानांनी सजलेलं घरटं माझ्या अगदी डोळ्यासमोर बांधताना मी पाहत होते. माझ्या घरासमोर असलेल्या जांभळाच्या झाडावर बांधलेलं ते घरटं, संध्याकाळी त्यातून येणारा पिल्लाचा आवाज लक्ष वेधून घेत असे.
त्या घरट्याकडे बघून मला वाटायचे, इथे फक्त माणसाची परीक्षा घेतली जात नाही. जशी आपली परीक्षा होते. तशीच या कुठून कुठून गवताच्या काड्या उचलून आणणाऱ्या पक्षाची पण होत असते. बरेचदा अचानक जोरदार वारा आला की त्या फांदी सकट ते घरटं हलायचं. त्यावेळी तो पक्षी उडून जायचा पण परत आल्यावर ते घरटं तिथे नसलं तर याची भीती त्याला नसेल का ? असा प्रश्न पडायचा.
दर दोन तासांनी तर ते आपल्या पिल्लांना आपल्या चोचीने भरवायचे. अजून त्यांना पंख ही फुटले नव्हते. त्यांच्या चिमुकल्या चोचीत बळ ही नव्हते आणि पंखांना अजून ही आधाराची गरज होती अशा वेळी अचानक आलेला वारा त्याची परीक्षाच पाहत होता.
पडलं तर झेलणार कोण ही भीती जशी त्या पक्षांना असते तशीच ती आपल्यात ही असते. अपयश येणं, निराशा येणं हे त्या वाऱ्या सारखंच आहे. फक्त फांद्यांच्या जागी इथे आपलं घर आणि कुटुंब असत, नाही का ….
" एक मन मे है विश्वास " विश्वास नागरे पाटील यांचे नुकतेच वाचण्यात आलेले हे पुस्तक आणि त्यातली वाचण्यात आलेली कथा मला या आठवणीत जपून ठेवायची आहे म्हणून हे आठवणीतले पान…
एक राजा आपले दोन गरूड एका माणसाला सोपवतो आणि त्यांना उडायला शिकवायला सांगतो. राजा दोन्ही गरुड एक दोन आठवड्याने पाहायला येतो. राजाला एक गरुड उडताना दिसते तर दुसरे फांदीवर बसलेले असते. राजा त्या माणसाला सांगतो हे असे बरोबर नाही. तो गरुड आहे त्याचा स्वभाव उंच आकाशात उडण्याचा आहे तो असा फांदीवर बसून कसा चालेल ? राजा सगळीकडे राज्यात घोषणा करतो आणि त्या गरूडाला उडायला शिकवणारा कोणी असेल तर पुढे या म्हणतो. एक गरीब शेतकरी त्याला भेटतो आणि तो गरुडाची जबाबदारी घेतो. दोन दिवसातच राजाला त्याच्या बागेत तो गरुड उडताना दिसतो. हा चमत्कार कसा झाला हे विचारल्यावर तो शेतकरी सांगतो " तो ज्या फांदीवर बसायचा मी ती फांदी तो त्या फांदीवर बसल्या असताना कापून टाकली. सुरवातीला पंखांची फडफड केली. आता तो दुसऱ्या गरुडापेक्षा ही उंच उडायला लागला आहे. पडायची भीती असली तरी त्याच्या पलीकडे गेलं कि धाडस येते आणि मग आकाश आपले होऊन गेलं कि त्याला उंच उडता येतं हेच यावरून कळत. हे पाण्यात पडल्यावर पोहता येत याच्या सारखंच नाही का. याठिकाणी त्या शेतकऱ्याने तीच भूमिका घेतली.
आपल्या फांद्या आपलंच कुटुंब कधीच तोडू शकत नाही. त्यासाठी बाहेरच विश्व असतं. आपल्याला तेव्हा ते ओळखता आलं पाहिजे. जे हवं ते शोधून मिळवता आलं पाहिजे. पडता पडता सावरता आलं पाहिजे. अशीच आणखी एक गोष्ट त्याच पुस्तकात वाचलेली. असंच गरुडाचे उदाहरण आहे. उदाहरण भव्य असलं की आपोआप आपली स्वप्नाची उंची ही वाढते. गरुड आपल्या पिल्लांसाठी जेवण शोधत असते. तेव्हा त्याची पिल्लं माणसाचं मांस पाहिजे म्हणून हट्ट करतात. सुरवातीला ते गरुड मेलेल्या बोकडाचे मांस आणते तर दुसऱ्या वेळी गाईचे मांस आणते. पिल्लं लहान आहेत त्यामुळे त्यांना कळणार नाही हा त्याचा गैरसमज असतो.पण पिल्लं ते शिवत ही नाहीत. उपाशीच राहतात. शेवटी न राहवून तो मिळालेलं गाईचं मांस मंदिरासमोर आणि बोकडाच मांस मशिदीसमोर टाकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं मशिदीच्या आणि मंदिराच्या आवारात राहणारे लोक पाहतात आणि यामुळे समोरा समोर असलेल्या त्या मंदिराचे लोक आणि मशिदीतले लोक संशयास्पद वाटल्यामुळे एकमेकांचा जीव घेतात. या प्रकारात बरेच नाहक बळी जातात याचा फायदा गरुड घेते आणि आपल्या पिल्लासाठी जेवण घेऊन जाते. वरील दोन्ही उदाहरणे आपल्याला हेच सांगतात.
गरुड त्याच्या जागी बरोबरच होते. फक्त तेव्हा परिस्थितीनुसार त्या मंदिरातल्या लोकांना बदलता आले नाही आणि त्याचा फायदा गरूडाला झाला. आपण एखादी गोष्ट करताना आपल्या आजूबाजूला असे बरेच गरुड घिरट्या घालत असतात. त्यांना दूरदृष्टी असते. आपल्यात ती आली तर आपण त्यातून काहीतरी शिकू शकतो. स्वतः ला वाचवू शकतो. उंच भरारी घेणारा एक गरुड आपण ही व्हावं हा आत्मविश्वास आपल्याकडे असेल तर आपली पिल्लं कधीच उपाशी राहणार नाही. चिवचिवाट वाढला आणि वारा माझ्या विचारांना शिवून गेला. निःशब्द करून गेला.

Thursday, 30 July 2020

पेन्शन प्लॅन


   
आपल्या जीवनचक्रात उतार वय हे एक नात्याच्या बहारदार वृक्षाला आलेले सुंदर फुल आहे. त्यात दडलेलं एक खोडकर मुलं आहे. कधी त्यात काळजीची चाहूल आहे तर कधी त्यात मायेची भूक भागवणारी चूल आहे.वयाच्या या टप्प्यावर आता थोडी शांतता ही आवडते. थोडी गडबड ही होते. थोडा आराम ही हवासा वाटतो तर कधी लहानासोबत खेळताना उत्साह ही येतो. या वेळी फक्त नात्याची गुंफण सोबत हवी. त्यात लकेर थोडी नवी, रुसवा फुगवा, गप्पा गोष्टी आणि अनुभवांची शिदोरी हवी. फुललेल्या या वृक्षाला आलेला बहर पाहणं हेच आजवरच्या जीवनाचं फलीत. तर याचा आस्वाद याची देही याची डोळा घेणं, दुसरे बालपण म्हणजे वृद्धत्व. शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारे सातपुते आजी आजोबा एकदा मला रस्त्यात भेटले. बरेच दा मी त्यांना वेगवेगळे बाहेर जाताना भेटले पण आज बऱ्याच दिवसांनी दोघे एकत्र समोरून येत होते. त्यांच्याशी बोलताना माझे आजी आजोबा आठवले. माझे बालपण समोर दिसू लागले. आम्ही सगळे नातवंड सुट्टीत गावी भेटायचो. खुप फिरायचो. अंगणात तासन तास खेळत बसायचो. अंगणात मस्त वारा सुटलेला असायचा आणि त्यात बैठक मांडून वाऱ्याच्या वेगातच आमचा खेळ रंगत असे. आजोबा आम्हाला त्याच्या शिक्षकी कारकिर्दीत त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी सांगत. बरेचदा त्याच्या शिक्षकी पेशात विद्यार्थ्यांचे त्यांना कसे अनुभव आले ? त्यांच्या या कार्यात किती कठीण परिश्रम होते हे आम्हाला सांगत. त्यात त्यांच्या दयाळू आणि कनवाळू स्वभावामुळे त्यांना कसे फायदे किंवा नुकसान झाले यावर आजी सुद्धा कितीदा चर्चा सत्र भरवत असे. विचारांची शृंखला सुरु झाली. तेव्हा आजोबांनी सांगितलेले एक वाक्य आठवले. आपले गेलेले दिवस आपल्याला परत मिळत नाही. कधी कधी आपली माणस ही आपल्याला परत मिळत नाही पण तेव्हाच्या आठवणी आणि त्यासोबत मिळालेले काही अनमोल क्षण आयुष्यभरासाठी पुरेसे असतात. कधी तरी आपली थांबलेली गाडी पुढे नेण्यासाठी तेव्हा ते इंधन म्हणून काम करतात. जग इकडचे तिकडे झाले तरी आपली मूठ अजूनही बांधलेली आहे, यात कुठेही सैल पडलेली दोर नाही की अविश्वासाचा मागमूस नाही म्हणून त्यांची गाडी एकत्र पुढे पुढे जात असते. आपल्या रस्त्यावर आपला मार्ग दाखवणारा कोणीतरी आपल्या सोबत असतो आणि आजवर चाललेल्या रस्त्यावर आलेले अडसर दूर करून आज पुन्हा रि-युनाइट होण्याची संधी देतो. हा प्रवास किती काळ पुढे शिल्लक आहे हे खर तर तेव्हा कोणालाच माहीत नसत. पण तेव्हा सोबत कोण कोण करणार हे आपले आधीचे आयुष्य ठरवते. कदाचित म्हणून उतार वयाला पेन्शन प्लॅन आपण म्हणूच शकतो. आपली आयुष्याची जमापुंजी म्हणजे हे दिवस...ख्याली खुशाली विचारून आजी आजोबा पुढे निघाले आणि मी हि माझ्या वाटेल लागले.  

Wednesday, 29 July 2020

शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा

      शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेला काल गेले होते. नव्याने जरी आले असले तरी त्यातलीच एक होऊन गेले. रात्री तिथला अनुभव लिहायला घेतला. काही आठवणीत राहिलेल्या गोष्टी आपोआप कागदावर उतरत गेल्या. सुरुवातीला शैक्षणिक मुद्द्यावर चर्चा सत्र झाले. मध्यान्ह झाल्यावर शिक्षक आणि विदयार्थ्यांमधल्या मानसिकतेवर भाष्य करणारे दोन चित्रफीत आणि फोटो दाखवले. त्यातला एकात काचेच्या फिश पौंड मधून समुद्राच्या लाटांवर उसळी घेणारा गोल्डन फिश होता, तर चित्रफितीत नवजात पक्षाचे उडण्यासाठीचे प्रयत्न दाखवले होते, ज्यात तो बराच प्रयत्न करून हि उडू शकत नव्हता. शेवटी दूरवरून एक पक्षाचा थवा त्याच्या जवळ स्थिरावला आणि ना उमेद झालेला पक्षी थव्याच्या बळावर पहिल्यांदा उडायला शिकला. ही दोन उदाहरणे लहान मुलांसाठी समर्पक आणि सकारात्मक ऊर्जा देणारी आहेत. पण फक्त लहानासाठी का? ही त्या मानसिकतेची परीक्षा होती किंवा शिक्षकांची. आयुष्यात लहानपणी लहान सहान अनुभवातून मिळणारे धडे किती खोलवर बदल घडवू शकतात हे समाजाचा भाग होताना कळते. कोणतेही काम नव्याने सुरू करायचे किंवा आहे ते पूर्णत्वास न्यायचे म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्य ही गरजेचं आहे आणि ते व्यवस्थित ठेवण्याचे काम आपल्या आजूबाजूला असलेली परिस्थिती करते. फिशपौंड मध्ये असलेला मासा दिसायला सुंदर होता पण त्याच विश्व पण तेवढंच संकुचित होतं. त्यामुळे अथांग समुद्र पाहून त्याची ओढ वाटणे किंवा मोकळे आकाश पाहून पक्षाला उंच उडण्याची इच्छा होणे हे ही स्वाभाविक वृत्ती आहे. जी तुमच्या आमच्या सारख्या माणसांमध्ये ही दिसून येते. जेव्हा ह्या गोष्टी सत्यात उतरण्याची वेळ येते तेव्हा दुरून डोंगर साजरे असे ही वाटते. या पसाऱ्यात आपले अस्तित्व हरवले तर अशी भीती मनात खोलवर कुठेतरी उपजत असते. मग तो समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटांवर स्वार होणारा मासा असो किंवा आकाश कवेत घेणारा पक्षी किंवा माणूस. एखादे काम हातात घेतले तर ते काम मी का करावे? किंवा खूप मेहनत घेतली तर का घेतली ? असा विचार एकदा तरी मनात येणं साहजिकच आहे. त्या “ का “ चे उत्तर एकदा मिळाले की गोष्टी सहज आणि सोप्या होतात. मग तो का फक्त आपल्या पुरता मर्यादित असेल तर मात्र ते काम आपण तो पर्यंत करतो जो पर्यंत आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाही. आणि एकदा त्या व्हायला लागल्या की हळूहळू ती गोष्ट क्षुल्लक वाटू शकते. त्याचे आपल्या कडुन महत्व कमी झाले की प्रयत्न संपतात. तिथेच त्याला पूर्ण विराम मिळतो. हे चक्र फक्त आणि फक्त 'का' या प्रश्नावर अवलंबून असते.
जर योग्य वेळी त्या 'का' ला शांत करून त्याचे कारण स्वतः ला पटवून दिले की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीच. माश्याला का पोहवेसे वाटले लाटांवर आणि पक्ष्याने झेप का घेतली आकाशात? खरंतर पोहणे आणि उडणे त्यांचे स्थायी स्वभाव होते तरीही वेळ का घेतला तर त्या विस्तीर्ण विश्वाची त्यांना कल्पना नव्हती जी तिथल्या पोहणाऱ्या इतर माश्यांनी आणि उडणाऱ्या पक्ष्याच्या थव्याने दिली. पुढे तोच समूह ज्यात त्यांना हरवण्याची भीती होती तोच त्यांची ओळख बनला. एकट्या पोहणाऱ्या गोल्डन फिशची किंवा रंगबेरंगी पक्ष्यांची सुंदरता समूहाने क्षुल्लक केली तरी आकाशात उंच भरारी घेणारा पक्षांचा थवा जास्त आकर्षित वाटू लागला. हीच दृष्टी आपल्या मनात रुजवणे त्याला खतपाणी घालणे आणि त्यातून फुलणाऱ्या पालवीतून डेरेदार वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया फक्त आणि फक्त ' का ' या प्रश्नावर थांबते. आपण ते उत्तर शोधण्याच्या प्रवासात अनुभवानी परिपूर्ण होत जातो. ही वाट आपल्यातल्या विद्यार्थ्याची. त्याला जागृत ठेवण्याची… हो ना.

Tuesday, 28 July 2020

चारचौघी


   एका हातात चहा चा कप आणि दुसऱ्या हातात नवं कोरं भेट मिळालेलं कवितेचं पुस्तक घेऊन मी खिडकीशी बसले होते. आजूबाजूला नजर गेली आणि खालच्या कट्ट्यावर चार चौघी दिसल्या. आज बऱ्याच दिवसांनी आल्या होत्या. आधी दोघीच होत्या मग अजून एक, दोन आल्या. आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा नव्या उत्साहात, नव्या विषयांवर आपले सोशल डिस्टन्सचे नियम पाळत आपली रोजची दुखणी, अडचणी, फसलेले बेत, हसलेले दात, रुसलेले अहो, पोराबाळाची भांडण, त्यातून सूट तर जगाची चिंता, एक ना अनेक किती विषय सोबत घेऊन आलेल्या. सध्याचा ज्वलंत विषय “कोविड “ तो ही होताच.
मनुष्याला दिलेली ही दैवी देणगी म्हणजे एकमेकांमधला संवाद, विचारांची देवाण घेवाण, गप्पा, चर्चा. सोशल डिस्टन्स च्या सावटाखाली जर कोणाचे वांदे झाले असतील तर या कट्ट्यावरल्या ताई – माई, आक्काचे. आबा, आजोबा, मामांचे. ज्याची रोज संध्याकाळ त्यांच्या मित्र मैत्रिणीसोबत जायची. काय करावे आता आणि कसा जमवावा बरे आपला गोतावळा. यक्ष प्रश्न. घरी बसलेल्या सगळ्यांनाच सतावत होता. त्यांना पाहून पूर्वीचे दिवस पुन्हा आले याचा आनंद हि झाला. सगळ्या शहराची एका आठवड्याची हिस्ट्री सवयीप्रमाणे आपोआप चर्चेत येत होती. समोरचीच्या कानावर आदळून पुन्हा नवे काही तरी निर्माण करत होती. एक एक करत लॉक डाऊनचा सगळा दिनक्रम सांगून झाला. साडी चॅलेंज पासून ते दूधवाला गावी पळाला पर्यंत. सगळे सगळे मनीच्या गुलदस्त्यातल्या गुजगोष्टी सांगून झाल्या. नेहमी डोक्यावर पदर घेणारी वयस्कर आजी पदराचा मास्क करून बोलत होती. कधी ओढणीचा वापर न करणारी आंटी आज त्याच ओढणीचा मास्क करून लावून आलेली. कधी नव्हे ती शर्मांची घुंगट मधली बहुरानी आज पंजाबी ड्रेस मध्ये पाहिली आणि तिच्या सुंदरतेवर मी ही भाळले. बाकी दोघींनी तेवढा मास्क लावला होता. कदम काकू खूप धडाडीच्या. मास्क वैगेरे काही नाही. रुमाल तेवढा हातात ठेवलेला तो ही औपचारिकता म्हणून असेल. नाहीतर “ खतरो के खिलाडी ” असे हे व्यक्तीमत्व. एवढं करून एक मीटरच अंतर ठेवून सुरू झालेले हे चर्चासत्र लांबून म्हणता म्हणता एक तासभर झालं. सोशल डिस्टसिंगला धाब्यावर ठेवून हे अंतर कधी कमी होत गेलं, कसे ते त्यांना ही कळलं नाही आणि लिहिता लिहिता माझं पान भरलेलं मलाही कळलं नाही. सांगायचं एवढंच अवघाची संसार एकवटला भूवरी…गप्पाच्या मैफिली रंगल्या आज पुन्हा कट्ट्यावरी....!

जीवन विमा

     
     दुपारचे तीन वाजलेले, दार वाजले आणि एक फॉर्मल कपड्यातला इसम समोर आला. हेल्थ इंशोरन्स या विषयावर माहिती सांगण्याची त्याची इच्छा होती. तेवढीच माझी तिथून नौ दो ग्यारंह होण्याची इच्छा होती. त्याचे दोन शब्द ऐकून घोटभर पाणी दिले आणि राम राम केला. जीवन विमा आणि या गुंतवणूकीच्या जाहिराती आपल्यासाठी काही नवीन नाहीत. म्हंटले आता त्यावरच लिहावे. आपले आणि आपल्या प्रियंजनांचे जीवन आनंदात जाण्यासाठी भविष्यकाळाची केलेली तजवीज म्हणजे " जीवन विमा "
खरं तर हे आर्थिक स्वास्थ्य आपण कमावलेलं आणि साठवलेलं त्याच्या मॅनजमेंट साठी शंभर वाटा. काही भरवशाच्या, काही बेभरवशाच्या. आपल्या जवळ असलेली हक्काची एक गोष्ट म्हणजे आरोग्य, त्याची ही शाश्वती नाही आणि त्याचा परिणाम म्हणून एकाच घरात वाढत चाललेल्या या इंशोरन्स पॉलिस्या. रुटीन चेकअप, रक्तदाब, रक्तातली साखर, थायरॉईड, शिक्षण, घर, गाडी, सोने नाणे, अमुक तमुक एक ना अनेक हनुमानाच्या शेपटी प्रमाणे वाढणारं हे रामायण - महाभारत कोणाला चुकले नाही. त्याची तजवीज म्हणून हा " जीवन विमा " जीव मुठीत घेऊन जगणारे, रोजच्या मेहनतीवर दिवस काढणारे म्हणा किंवा गडगंज संपत्ती असूनही रोजची कुठलीतरी एक गोळी घेणारे जगतातच. समोर असलेलं मृत्यूच भय, उपासमार स्वीकारून रोजचा एक चटका किंवा चिमटा असतोच पोटाला. तेव्हा ती हि माणसे जीवनाची हमी मागत असतात. जीवनाचा अशोरन्स पासून सुरु होऊन ही कहाणी इंशोरन्स वर येऊन थांबते. खरं तर त्यांचे आशा वादी जगणेच इतरांना ती हमी देत असते. लहानपणीच डॉक्टरची, दवाखान्याची आणि आजारी माणसाची भीती मनाच्या कोपऱ्यात कधीतरी पेरली जाते. एखादे अघोरी स्वप्न पाहून दचकून उठले असू तेव्हाची असुरक्षितता मोठेपणी कमी होऊ शकते तरीही प्रत्येकाच्या मनात ती दडवून ठेवलेली असतेच. वाढलेल्या गरजा, स्पर्धा, इच्छा, स्वप्न आणि जबाबदारी सगळंच तर बदलत. माणस, परिस्थिती आणि समाजाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन आपल्याला हेल्थ अशोरन्स वरून हेल्थ इंशोरन्स पर्यंत आणतो.
जगताना या हात पायांनी मेहनत करायची आहे, या लहानशा मेंदूमध्ये आयुष्यातील सगळ्या आठवणी साठवायचे आहेत आणि न दिसणाऱ्या मनात हे प्रश्न, भीती आणि भावना सोबत न्यायच्या आहेत तर माणसात इन्व्हेस्टमेंट केली तर… योग्य माणसामध्ये खात्रीशीर केलेली गुंतवणूक आणि माणसासोबत विचारांची केलेली जपणूक म्हणजे आयुष्यभराचा विमा नाही का. तर मग काढावा आपला ही एखादा जीवन विमा एखाद्या माणसाशी जोडलेला मग विश्वाची निर्मित आणि विश्वाचा अंत यावर जोरदार चर्चा सत्रे रंगवावी.

Sunday, 26 July 2020

पाट्या

अक्षर ओळख आणि शिक्षण सुरू झाले ती काळ्या पाटीवर. नंतर तीच पाटी आयुष्याचा भाग झाली. तेव्हा श्री गणेशा लिहून सुरवात केलेली पाटी नंतर बरेच काही लिहिण्यासाठी वापरली गेली. ती काळी होती नंतर हळूहळू पांढरी, हिरवी विविध रंगी झाली. नंतर त्याच पाटीवर आपल्या गरजेचा मजकूर लिहून कधी दारावर, भिंतीवर, वेळ पडलीच तर खिडकीवर लावू लागले. जाहिरातींनी, सिनेतारकांनी भरलेल्या भिंती तर खूपदा पहिल्याच असतील. पोस्टर, फलक आणि पाट्या यावर काय काय मजकूर असतो. यावर हा आढावा.
 दुकानाबाहेर हमखास दिसणारी ही गोष्ट बऱ्याचदा आपले लक्ष वेधून घेते आणि कायमची लक्षात राहते. त्यात ही विनोदी काही असेल तर हे कायमचे कोरले जाते. सुरवात दुकानाच्या झगझगीत फलकाने होते. बल्बच्या प्रकाशात आपल्या दुकानाला आकर्षक करतात ते नावांचे फलक. जसे एम बी ए चायवाला, बालाजी स्नेक कॉर्नर, खाना खाके जाना डायनींग इत्यादी. दुकानांनंतर आपली नजर जाते ती आपल्या आजूबाजूला असलेल्या गाड्यांवर. काही जणांसाठी गाडी ही वाहन नसून बऱ्याच जणांचे आशीर्वाद असतात. सुरवात देवापासून होते " गणपती, महालक्ष्मी, काळूबाई, वाघजाई प्रसन्न नंतर आपल्या आवडीचे असे तेहतीस कोटी देव. काही पुढच्या काचेवर काही मागच्या काचेवर. त्यात आपले कुटुंब ही आलेच आईचा आशीर्वाद, पप्पांचा आशीर्वाद, आजी, आण्णा, काका, दादा, भाई, ताई जागा राहिली तर आपली मुले आणि नातवंडे ही. असे सगळे देव आणि कुटुंब सोबत घेऊन रोज मैलाचा प्रवास करणारे ते वाहन नसून नवसाचे पोरं वाटायला लागते. आशीर्वाद घेतले पण काही लोक अधिक मजकूर देऊन देशसेवा ही करतात. " पुढच्यास ठेच मागचा शहाणा "
 " सुरक्षित अंतर ठेवा " " अति घाई संकटात नेई " हे सगळे लिहून कोणत्यातरी नेत्याची जाहिरात करणारे पोस्टर ही लावलेले असते म्हणजे नक्की हे मजकूर कोणासाठी हे आपणच ठरवायचे. बऱ्याच ठिकाणी कॉलनीत, मोठमोठ्या कंपन्यांच्या बाहेर सूचनांचे फलक लिहिलेले असतात. " येथे वाहन उभे करू नये " बरोबर त्याच्या समोर कोणीतरी नेनो, मारुती उभी केलेली असते. म्हणजे उभे करणाऱ्याला वाचनाची आवड कदाचित नसणार. तसेच काही बिल्डींगच्या बाहेर, बंगल्याच्या बाहेर लिहिलेले असते " फेरीवाले आणि बाहेरचे श्वान यांना प्रवेश निषिद्ध " फेरीवाले ते वाचूनही बिल्डिंग मध्ये येतात. त्या पाटीखाली कुत्रा मात्र शांत बसलेला असतो म्हणजे शहाणे कोण ? त्याला बिचऱ्याला तर वाचता ही येत नाही पाटी. कधी कधी " कुत्र्यापासून सावधान " लिहिलेले असते. म्हणजे आपण ज्या व्यक्तीला भेटायला आलो त्याला शोधण्यापेक्षा कुत्रा कुठून येईल का हे पहिले शोधा. काही आठवणीत राहिलेल्या पाट्या म्हणजे गाडीवर लिहिलेलं आहे " बघतोस काय रागानं...overtek केलाय वाघांन ...वाघ पण चित्रातला. एका रिक्षावर लिहिलेलं " भावा तू पुढे जा... तुला असेल घाई, माझ्या घरी वाट बघते माझी आई. " वेगावर नियंत्रण ठेवा " हेच सांगितले पण वाचणारा थोडा बुचकळ्यात पडेल. अगदी विरोधी आहे पण हे दोन वाहने समोर आलीच तर विनोद झाल्याशिवाय राहणार नाही. सिग्नलला थांबल्या असताना एक रिक्षा आणि ट्रक समोर उभे होते. रिक्षावर " ईशीता " एवढेच. बाकी पुढची स्टोरी ट्रकवर " ललकार ", " तुझ्या येणाने जीवनाचं सोनं झालं " अशी प्रेमाची कबुली आजवर कोणत्या चित्रपटात पण पाहिली नसेल. याला योगायोग म्हणावा की आणखी काही माहीत नाही. पण आपली नजर शोधक असली की अशा गमती जमती नजरेतून सुटत नाही. तर या गमती जमतीचा आस्वाद घेत घेत जग जिंकणे हीच आपली मिळकत असली पाहिजे नाही का …




 


 






Saturday, 25 July 2020

स्वप्नातलं घर



नव्या घराचा शोध...कुणासाठी नव्या जागेचा शोध आणि कुणासाठी आपल्या आंनदाचा, भरभराटीचा, स्वप्नांचा शोध... घराचा शोध हा प्रत्येकासाठी त्याचा त्याच्या आवडी निवडीचा शोध असतो. कधी दिशा पाहून तर कधी रस्ता म्हणजे कनेक्टिव्हिटी पाहून आपण जुळवून आणलेलं गणित.  


अनेक  घरं पाहिल्यावर योगायोगाने एखादे नजरेत भरते. काळजात उतरते आणि सत्यात साकारते. कधी हो – नाही म्हणता म्हणता आशा निराषेच्या रणभूमीवर आपला कधी विजय होतो. घराचा शोध संपतो. 


घराच्या शोधाचा प्रवास सुरु होतो. आपली आजवरची गाऱ्हाणी, आजवरची जमापुंजी मनात किंचित धाकधूक असते.   अशा वेळी एखाद्या गगनचुंबी इमारतीच्या आलिशान लॉबी मध्ये गेल्यावर आपलं मन आपोआप जमा खर्चाचा हिशेब आणि कौटुंबिक गणित मांडायला सुरवात करते. व्याज, मुद्दल, कर्ज, सरकारी दाखले आणि स्वप्न याची गोळा बेरीज होते. एका थंडगार खोलीत घराची प्रतिकृती पाहायला मिळते. कधी त्याची चित्रफीत समोर दिसते. त्यातच आपले स्वप्नांतले घर दिसते. आपण त्यात क्षणभर रमुन जातो. एक आलिशान काल्पनिक दुनियेची सफर करून आपलं मन स्थिमित होते. एक घर आपल्याला बनताना पाहायला मिळते. तिथली खोल्यांची रचना, चारी दिशांना तयार होणाऱ्या भिंती, घराचे प्रवेश द्वार आणि खिडकीतून दिसणारा सीनिक व्हीवू आपण टिपून घेतो. त्या एका घरासोबत येणाऱ्या विविध सोयी सुविधा आपले डोळे दिपवून टाकतात. शेवटच्या मजल्यावरून  दिसणारे भव्य टॉवर, आकर्षक लाइटिंग करून सजवलेले कारंजे, मोठं गार्डन, भव्य प्रवेश द्वार सारे दाखवले जाते. तिथल्या तिथे आपण एक काल्पनिक रपेत मारून येतो. स्वप्नांच्या जगात क्षणभर रमून झाल्यावर आपल्याला प्रतिक्रिया विचारली जाते. तेव्हा आपण जागतिक प्रश्न असल्यासारखे “ विचार करून सांगतो “ एवढं बोलून तिथून काढता पाय घेतो. आपण ते स्वप्नांतलं घर मनात घोळवत घोळवत माघारी येतो. कुटुंबासोबत रात्री जेवायला बसताना आपण पाहिलेल्या घराची सारी गोष्ट सांगून जेवायला सुरुवात करतो. आईने हौसेने ताटात वाढलेल्या वरण भाताने आपण तृप्त होतो. आपल्या ताटात वाढताना तिच्या डोळ्यात तेव्हा एक मायेने भरलेलं घर दिसतं आणि आपण सारे विसरून मनोमन खुश होतो.


Friday, 24 July 2020

ती स्मरणीय भेट

        वेळ संध्याकाळची, कोणतंही आधीच आखीव रेखीव नियोजन नसताना योगा- योगाने म्हणा, नाहीतर नियतीने मला तो एक दिवस तिथल्या मुलांसोबत, आजी आजोबांसोबत घालवायला मिळाला. ही संधी मिळाली ते साहित्य संपदा संस्थेचे प्रमुख श्री वैभव धनावडे यांच्या पुढाकाराने. औचित्य होते वाढदिवसाचे. खरं तर वाढदिवस किंवा वर्षपूर्तीची जंगी पार्टी जिगरी दोस्तासोबत आपण करतोच, पण आपल्यात असे अनेक दुर्लक्षित झालेले किंवा अजाणतेपणी केले गेलेले अनेक मित्र मैत्रिणी असतात. त्यांच्या सोबत आपल्या आयुष्यात आलेले हे महत्वाचे दिवस साजरे करणं हे ही आनंद देऊन जातं याची जाणीव तेव्हा घरी परतत असताना झाली. मनोमन त्या पालक वजा मुलांच्या आणि आजी आजोबांच्या डोळ्यात पाहिलेले भावनिक उमाळे आणि आपल्यापेक्षा वयाने लहानाची मोठी स्वप्ननगरी पाहून आनंद म्हणजे नक्की काय ? आणि कुठे कुठे शोधायचं हे ही कळलं.
ती जागा होती पनवेल जवळचे अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम. तिथे दोन विश्व एकत्र नांदत होती. एका ठिकाणी लहान मुले ज्यांना नव्याने जग पाहायचे होते. स्वतः ला आजमावायचे होते. कोऱ्या मनाच्या पाटीवर, ज्यांना स्वतः ला आयुष्याचे गणित सोडवायचे होते. अडनिड्या वयातली तर काही बोबडे बोल बोलणारी अशी सगळी मुलं होती, ती बरोबर की चूक हे ठरवणारे दिशादर्शक किंवा वाटाडे ही कदाचित त्यांना शोधावे लागणार होते. अशी कोवळी अंकुरलेली मने आणि त्याची ती लहानशी वस्ती तर एकीकडे आपलं सगळं विश्व पाहून, रमून, जगून आणि मागे टाकून पुढे आलेली वयोवृद्ध आजी आजोबांची वस्ती.
त्यात ही फुलाप्रमाणे फुलणारी त्यांची मैत्री इंधन म्हणून जगण्यासाठी होती. आपण कधी दूर दूर आनंद शोधत भटकत असतो, पण ही मंडळी आपल्याला आनंदात जगायची कला शिकवतात. आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा तो ही आपली ओळख व्हावा असे जगण्यात जो आनंद आहे तो किती सहज आपल्याला मिळू शकतो हे मला तिथे जाणवले. आम्ही निघताना ही ती मुलं आमचे आभार मानत होती. " परत या " हे आग्रहाचे बोलवणे ही कानावर पडले. कदाचित त्यावेळी जगण्याची कला शिकवल्या बद्दल त्यांचेच आभार मानावे वाटले. आपण भावनिक आणि सामाजिक बाजूने किती श्रीमंत होऊ शकतो हे त्यांनीच शिकवले.
 " इतनी शक्ती हमे दे न दाता...मन का विश्वास कमजोर होना हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना..." ही शाळेत म्हणली जाणारी प्रार्थना तिथे म्हणली आणि आम्ही निघालो. जाताना ज्याचा शोध सुरु होता तो आनंद त्यांच्या आणि आमच्याही चेहऱ्यावर होता.

Thursday, 23 July 2020

एकला प्रवास


    
      ग्रॅज्युएशनचा शेवटचा पेपर दिला. परीक्षा संपून बरेच दिवस झाले होते. दूरचा प्रवास करायचे मनात ठरवले आणि मावशीकडे जाण्याचा बेत आखला. पुढच्याच आठवड्यात पनवेल एस टी स्टॅण्ड गाठले. पहिला वहिला एकटीने एस टी चा प्रवास. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर एस. टी पुढे येऊन उभी राहिली. खिडकीची जागा पकडली आणि पुढच्या पाच सहा तासासाठी तिथेच सेटल झाले. आई मनावर दगड ठेवून मला सोडण्यासाठी आली होती. आपले मुलं दूर जाताना आईच्या मनावर अदृश्य दगड असतोच. ते तिच्या नजरेतून मी ओळखलं होतं. काहीही झाले तरी आता माघार नाही ठरलं होतं. खिडकीतुनच मी सुखरूप लवकरात लवकर परत येण्याचा आशावाद दिला आणि अचानक एस टी जागची हलली. काही क्षणासाठी मन दाटून आलं. काही क्षणात एस टी निघालीच. हळूहळू दूर जात होते. मनात हुरहूर वाढत होती पण सोबत उत्साह ही होताच. नवीन अनुभव घेऊन मी परत येणार होते.
कोल्हापूर ... लाल मातीतल्या गड्यांचं, कुस्तीतल्या पैलवानांच, मराठमोळ्या शाहूंचं कोल्हापूर, कोल्हापूर ठसक्यातली मिरची, तांबडा पांढरा रस्सा, मिसळीच कोल्हापूर ...माझ्या मावशीच कोल्हापूर !
प्रवास चालूच होता. म्हणता म्हणता दोन तीन तास उलटले. पनवेल आणि माझं घर कुठच्या कुठे राहील होतं. नागमोडी वळणावरून, बोगद्यातून गाडी धावत होती. सुमधुर गाणी, आजू बाजूला हिरवाई अंथरलेली, उसाची शेत आणि थंडगार वारा सगळ्यांनी ताल धरला होता आणि वातावरणातील सौंदर्य वाढवणारे ते सगळेच मनाला शांती आणि समाधान देत होते. रस्ता मागे जात होता. गाडी पुढे जात होती. जणू काही मागच्या सगळ्या कडू गोड आठवणी मागे टाकून येणाऱ्या नव्या आठवणी मला साद घालत होत्या. प्रवासाची खरी गम्मत तेव्हा येते जेव्हा नवे अनुभव येतात. मी पुढच्याच सीट वर होते. प्रवासाचा काही अंदाज नव्हता त्यामुळे माझ्या शेजारच्या सीट वर बसलेल्या व्यक्तीला आपण कुठं पर्यंत आलोय आणखी किती वेळ लागेल विचारलं. तेव्हा त्याने फोन मध्ये पाहून अचूक माहिती दिली. त्याच्याकडे असणाऱ्या स्मार्ट फोन मधले गुगल मॅप मी तेव्हाच पाहिले.
मागच्या सीटवर बसलेले वृद्ध आजोबा सुद्धा ते कौतुकाने पाहत होते. त्यांनी ही मग विचारपूस केली. तोंड ओळख झाली आणि नंतर ते ही कोल्हापूरलाच निघाले कळलं. मुंबईहून सुट्टीसाठी ते आपल्या नातवंडांना भेटायला निघाले होते. त्यांच्या बोलण्यातला उत्साह भरभरून जगण्याची इच्छा आणखी प्रबळ करत होता, सोबत आनंद होताच. त्यांच्या बोलण्यातून तो जाणवत होता. मुलावरचा, सुनेवरचा अभिमान, नातवंडावरच प्रेम आणि जगण्याचं समाधान ही दिसत होतं. बघता बघता गाडी कोल्हापुरात शिरली आणि वेळ कसा गेला कळलं नाही. माझी त्या आजोबांशी थोड्याच वेळात चांगली गट्टी जमली होती. कोल्हापूरचा सगळा इतिहास, भूगोल सार काही त्यांनी मला दोन तासात सांगितले होते. जाताना त्यांनी मला त्यांचा कोल्हापूरचा घरचा पत्ता ही दिला, घरी माझ्या नातवंडाना भेटायला यायला सांगितले असे आपुलकीचे बोलवणे आले आणि विश्वास म्हणजे काय ? हे कळलं.
फायनली गाडी थांबली. कोल्हापूर एस टी स्टॅण्ड आलं. गाडीतून उतरल्यावर त्यांनी माझा निरोप घेतला. मी काकांची वाट बघत पाच दहा मिनिटे तिथे उभी होते. बघता बघता काका आले आणि मी माझ्या सामानासकट तीन कलिंगड घेऊन मावशीकडे पुढच्या दहा मिनिटात पोहोचले.

Wednesday, 22 July 2020

कोयनेचा प्रवास

   

      

         

कोल्हापूर ते सातारा कोयना पेसेंजर ट्रेनने जायचं ठरलं होतं. माझ्यासाठी रेल्वेचा प्रवास नवीन नव्हता, तरी ही मनात थोडी उत्सुकता होती. गाठीशी लोकलचा अनुभव होता. त्यामुळे हा प्रवास आणि लोकलचा प्रवास यांची तुलना आपसूक होत होती.

 पाचचा अलार्म वाजला आणि डोळे उघडले. सहापर्यंत सामानाची बांधाबांध झाली. बघता बघता सात वाजले. गाडी होती पावणे आठची. लगोलग घराला राम राम ठोकला. घरचे इतर मंडळी तिकीट आणि सामान घेऊन मागाहून येणार होतेमी आणि माझी बहीण आम्ही थोडे सामान घेऊन पुढे निघून आलो. समोरच ट्रेन उभी होती.  ट्रेनमध्ये चढून खिडकीजवळ बसलो. तिथे खिडकीतून एक म्हातारी बाई डोकावू लागली. पैसे मागू लागली. त्या संपूर्ण डब्यात मी आणि माझी बहीण, आम्ही दोघीच होतोतिकीट नाही, सामान नाही, काय करावे सुचत नव्हतेअचानक गाडी सुटायचा भोंगा वाजला आणि हृदयाची धडधड वाढली. मनात गोंधळ सुरू होता. तेव्हा खिडकीतून बाहेर पाहिले, दोन लोकांना थांबवून तिकीट विचारताना टी सी दिसला. पुन्हा गाडीचा भोंगा वाजला. गाडी निघायला अवघी दोन मिनिटे असताना फोनची रिंग वाजली. सुदैवाने घरच्यांचा फोन आलाआमचा डबा कोणता ते सांगितले. पुढच्या क्षणाला घरचे लोक, तिकीट आणि सामान सगळेच भेटले. हा मधला दहा मिनिटांचा अवधी त्याक्षणी जीवघेणा वाटला. देवाच्या कृपेने बरोबर ठिकाणी गाठभेट झाली आणि तेवढ्यात कोयना निघाली.

संथ गतीने चालणाऱ्या रमत गमत जाणाऱ्या ट्रेन मधून जाताना जणू काश्मीरमधल्या दल सरोवरात विहार करणाऱ्या नौकेत बसल्याचा अनुभव येत होता. आकाशात काळ्या ढगांचे आच्छादन झाले होते. त्यामुळे उन्हाचा तडाखा फारसा जाणवत नव्हता.  मधून थंड वाऱ्याची झुळूक केसाच्या बटाना उडवून जायची. खिडकीच्या बाहेरचे सृष्टीचे सौंदर्य डोळे दिपून टाकत होते. हिरवेगार शेत, नव्याने नांगरलेली जमीन, त्यात ओलसर करणारा पाऊस आणि पावसाच्या पाण्यामुळे मातीतून येणारा दुर्मिळ सुगधं. अशा तजेलदार वातावरणात मागच्या तीन चार वर्षाचा शिणवटा, कंटाळा आणि ताण कुठच्या कुठे पळाला होता. तिथे वाटेत लागणारी छोटी छोटी स्टेशन तर अगदी परीकथेतल्या गावासारखी भासत होती. ती कुठून सुरू होत आणि कुठे संपत याचा मागमूसही लागत नव्हता. गाडी पुढे पुढे जात होती आणि प्रत्येक ठिकाणी निसर्ग आपली किमया दाखवत होता. मिरज स्टेशन आलं. स्टेशनात बरीच गर्दी होती. जेवढी उतरली, तेवढीच चढली. मग फेरीवाले, स्नॅक्स विक्रेत्यांची रेलचेल. त्याचा उत्साह बघून आपण ही बटाटा वडा आणला असता तर नक्कीच विकला गेला असता असे मनात आले. एवढी मागणी होती.

प्रवास इतका आल्हाददायक होता की संपूच नये असे वाटत होते. त्यात पावसाची सुमधुर गाणी ऐकत, मजा करत आम्ही निघालो होतो. बरेच प्रवासी खाली पायाशी बसले होते. तरीही ते प्रवासाचा आनंद घेत होते. बघता बघता सातारा स्टेशन जवळ आलं. स्टेशन जस जवळ आलं. पुढे बॅगा काढायची लगबग सुरु झाली.  या आधी प्रत्येक वेळी बस ने प्रवास झाल्यामुळे पहिल्यांदाच सातारा स्टेशन पाहण्याची उत्सुकता होती. गाडी थांबली. आम्ही तिथे उतरलो. उतरल्या उतरल्या फोन वाजला आणि मैत्रिणीने आमचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागणार आहे ही बातमी मला फोन वरून कळवली. या बातमीने स्टेशन पाहण्याची उत्सुकता पुरती संपली होती. निकालाची उत्कंठा त्याहून मोठी झाली होती.

त्याच विचारात मी स्टेशनच्या बाहेर आले. बाहेरूनच शहरात जाण्यासाठी सिटी बस आहे हे आम्हाला कळलं. दहा पंधरा मिनिटं तिथे ही गेली आणि तेवढ्यात तिथे ती बस आली. माणसं पळत पुढे जात होती. विचारल्यावर कळलं तासाभराने पुढची बस आहे आणि ही आली ती ही उशिराने. संयम म्हणजे काय? ते तेव्हा पळत बस पकडताना कळलं. आम्ही बसमध्ये चढलो. बसायला जुजबी जागा मिळवली.

बसमध्ये एक चाळिशीतली प्रौढ महिला चढली. शेवटच्या सीटवर बसली. मी अलीकडच्या सीट वर बसलेले तेव्हा चुकून माझ्या सामानाचा धक्का त्यांना लागला. पायातली बॅग उचलून मी माफी मागितली.  त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांनी माझ्याकडे बघून स्मितहास्य केलं.  एवढ्या गर्दीत सुद्धा त्या बाईंच्या चेहऱ्यावर संयम  होतामला काहीतरी त्यांच्यात वेगळेपण जाणवलं होतं. त्यांच्या शेजारी खेड्यातून आलेलं, शेतीची काम करणार मजूर जोडपं येऊन बसलं. जसा त्या बाईंनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांचे बोलणे ऐकण्यात हे जोडपं रमुन गेलं. बघता बघता ही दोन अनोळखी माणसं आताच भेटली हे मी विसरून गेले. शेतीविषयीची माहिती आणि त्यांनी नवे तंत्रज्ञान वापरून तयार केलेले सेंद्रिय खत, बी बियाणे याची माहिती त्या बाईंनी त्यांना दिली.  थोड्याच वेळात ते घेण्यासाठी ग्राहक त्या बाईंना त्या प्रवासात मिळाले. गाडी सातारा बस स्टँड वर थांबली. जाता जाता  त्या जोडप्याने त्यांना गावच्या जत्रेचं निमंत्रण ही दिले.

माणसामध्ये दडलेल्या कौशल्याच्या जोरावर आणि संवादातुन तो अनोळखी व्यक्तीला आपलेसे करू शकतो आणि त्याची सुरुवात करण्यासाठी संयम आणि स्मितहास्य पुरेसे असते हे ही मला तिथेच कळलं. माणसाला माणसाशी जोडणारा हा दुवा सोबत घेऊन तिथून शेयर रिक्षाने आम्ही आजी आजोबांच्या घरी पोहोचलो.

Tuesday, 21 July 2020

खिडकी


                    खिडकी…. घरातली एक अशी जागा, जिथे मन शांत होते.   विचारांना जिथे स्थिरता मिळते. माझ्यासाठी घरातली एक अशी जिव्हाळ्याची जागा  म्हणजे खिडकी. मला या खिडकीची आणि खिडकीला ही माझी सवय झाली आहे.  कधी तरी गप्पा मारायला चिमण्या तिथे येतात तर कधी झाडाचे हिरवे पान येते.  कधी वाऱ्याच्या वेगाने खारू ताई येते. काही तरी टिपत ही मंडळी माझ्या घरी डोकावून जातात. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर रात्री फुललेलं ब्रम्ह कमळ  विलक्षण आकर्षक वाटते. फुलाचे सूक्ष्म निरीक्षण, त्याची फुलण्याची प्रत्येक पायरी जवळून पाहणे असो किंवा एखाद्या फुलावर विहार करणारे फुलपाखरू न्याहाळणे हे क्षण आयुष्यात रंग भरण्यासाठी असतात.  आंनदी किंवा उदासवाणे असे दोन्ही दिवस आणि विचार चक्र मी या खिडकीसोबत शेअर केले आहेत. सुकलेले पिवळे करडे पान आपोआप गळून पडते. त्या जागी नवे कोंब येते. तिथे मला अपयशानंतर पुन्हा फुलण्याची  प्रेरणा  मिळते. पाऊस आणि त्यात झाडाची चिंब भिजलेली पानं यांच्या नात्यात मला प्रेम कळते. फुलपाखरू आणि फुल यांच्यातलं रंगाचं नात, त्या नात्यात मला मैत्री कळते. कधी जगण्याची प्रेरणा, कधी निसर्गावरचे प्रेम तर कधी अतूट मैत्री यांचे दाखले मला इथेच मिळतात. खिडकी स्थिर राहून बदलणारे दिवस पाहते. खिडकी मला आकाश आणि जमीन यातले अंतर दाखवते. ध्येय गाठण्यासाठी लागणारे सातत्य आणि प्रयत्न तिथे कळतात. अशी ही कधी आनंद देणारी, कधी अंतर्मुख करणारी खिडकी कधी शिकण्याची कधी व्यक्त होण्याची मला संधी देते.

खिडकी…. घरातली एक अशी जागा, जिथे मन शांत होते. विचारांना जिथे स्थिरता मिळते. माझ्यासाठी घरातली एक अशी जिव्हाळ्याची जागा म्हणजे खिडकी. मला या खिडकीची आणि खिडकीला ही माझी सवय झाली आहे. कधी तरी गप्पा मारायला चिमण्या तिथे येतात तर कधी झाडाचे हिरवे पान येते. कधी वाऱ्याच्या वेगाने खारू ताई येते. काही तरी टिपत ही मंडळी माझ्या घरी डोकावून जातात. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर रात्री फुललेलं ब्रम्ह कमळ विलक्षण आकर्षक वाटते. फुलाचे सूक्ष्म निरीक्षण, त्याची फुलण्याची प्रत्येक पायरी जवळून पाहणे असो किंवा एखाद्या फुलावर विहार करणारे फुलपाखरू न्याहाळणे हे क्षण आयुष्यात रंग भरण्यासाठी असतात. आंनदी किंवा उदासवाणे असे दोन्ही दिवस आणि विचार चक्र मी या खिडकीसोबत शेअर केले आहेत. सुकलेले पिवळे करडे पान आपोआप गळून पडते. त्या जागी नवे कोंब येते. तिथे मला अपयशानंतर पुन्हा फुलण्याची प्रेरणा मिळते. पाऊस आणि त्यात झाडाची चिंब भिजलेली पानं यांच्या नात्यात मला प्रेम कळते. फुलपाखरू आणि फुल यांच्यातलं रंगाचं नात, त्या नात्यात मला मैत्री कळते. कधी जगण्याची प्रेरणा, कधी निसर्गावरचे प्रेम तर कधी अतूट मैत्री यांचे दाखले मला इथेच मिळतात. खिडकी स्थिर राहून बदलणारे दिवस पाहते. खिडकी मला आकाश आणि जमीन यातले अंतर दाखवते. ध्येय गाठण्यासाठी लागणारे सातत्य आणि प्रयत्न तिथे कळतात. अशी ही कधी आनंद देणारी, कधी अंतर्मुख करणारी खिडकी कधी शिकण्याची कधी व्यक्त होण्याची मला संधी देते.


निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...