Sunday, 9 March 2025

शेवटचा बाक

रमाला त्या दिवशी अचानक दुकानात बालपणीचा मित्र सुजय भेटला. वर्गात जशा गप्पा व्हायच्या तशाच त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. संगीत आणि गाणं सुजयला तेव्हापासूनच आवडायचं. शाळेत असल्या पासुनच त्याला गाण्यासाठी बोलवलं जायचं. रमा त्याला सोशल मीडिया वरच पाहत होती. पुढे जाताना. मोठं होताना. गेल्या तीन चार वर्षात पण त्याचे गाण्यासाठी सोशली ऍक्टिव्ह असणं फार कमी झालं होतं.
रमाने त्याला विचारलं,
“ गाण्यामुळे तुझं जग बदललं. पण आता कुठेच फारसा दिसत नाहीस रे ! “
सुजय म्हणाला “ वर्गातले बेंच वाजवून गाणं म्हणण्यात जी मजा होती ना... रमा, ती सोशल होता होता हरवून गेली. आपल्या वेळी छान होतं ग सगळं. कधी कधी वाटत तेच बेंच समोर भरलेले असावे, तशीच दाद पुन्हा यावी. “

सोशल होता होता अँटी सोशल होण्याचा हा प्रवास. समाज प्रिय होता होता आपण स्वतः मध्ये आनंद शोधण्यासाठी का बरे वळतो ? असा प्रश्न रमाला पडला. म्हणजे जिथे त्या व्यक्तीच्या आयुष्यात एकटेपणाची पानगळ सुरु असते. तिथे आपण त्याच्या भोवतालच्या फुलांच्या सौंदर्याचे कौतुक करतो. बऱ्याचदा समाज प्रिय होताना तोच समाज आपल्या पेक्षा वेगळा वाटू लागतो. सोशल होताना आपले अस्तित्व इतके मोठे होत जाते की आपण त्या समाजाचा घटक न राहता तो पूर्ण समाज होऊन जातो. आपला गट होतो. आपलं गाव आणि नंतर संपूर्ण शहर. हा प्रवास करताना सोशल होणारे किती तरी जण त्या चेहऱ्याचे प्रतिनिधी होतात. तो गट, गाव किंवा शहर आपल्याला ती नवी ओळख देते. अशा वेळी ठिपका असलेलं अस्तित्व ते असंख्य चेहरे मोठं करतात, पण मग तेव्हा शोधत शोधत आपण सोशल पासून अँटी सोशल च्या प्रवासाला का लागतो ? मोठ्यातलं हरवलेलं छोटंसं काही तरी शोधण्यासाठी. जिवापाड जपलेल. मोठं होताना ते नकळत हरवलेलं. ते शोधत शोधत कोणीतरी आपल्या समोर येतं आणि सैरभैर झालेल त्याच मन शांत होतं. अशा वेळी स्पष्टीकरण देणारे आपले शब्द आपोआप थांबतात. सगळंच बदललेलं असतं.
सुजय ही बदलला होता. पण त्या बदलानंतर हरवलेलं काही तरी त्याला सापडलं होतं. त्याने रमाला पुढच्या गाण्याच्या कार्यक्रमाला येण्यास सांगितले. पुढच्या रविवारी तो गाण्याचा कार्यक्रम त्यांच्या शाळेतच होता. रमा शेवटी बसलेली होती. सगळा कार्यक्रम झाल्यावर तो रमा जवळ आला. त्याने तिला सांगितले. “ शाळेतली सगळे बेंच आज भरलेले होते. पण माझं लक्ष तेव्हा ही आणि आज ही शेवटच्या बेंचवरच होतं. ती येणारी दाद ऐकण्यासाठी, ती आली तेव्हा समाधान झाले. सुजयला रमामध्ये त्याचे भविष्यातले साजिरे दिवस दिसले. त्यांनी एकमेकांना कायमची सोबत करण्याचे मनोमन ठरवले. एक हरवलेला सुर नव्याने गवसला. दूर जाणाऱ्या हातांना किंवा कानांना कधी कधी स्पष्टीकरणाची गरज नसते. त्यांचा फक्त लांब जाणारा हात कोणी तरी धरणारा हवा असतो. तो हात होता आलं तर जे हरवलेलं ते मिळून जातं.



निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...