Saturday, 25 March 2023

मोहरलेली फांदी



आंब्याचे हिरवेगार बहरलेलं ते झाड. त्याचे पसरलेले खोड आणि त्याची उंच जाणारी एक फांदी. आज जेव्हा त्याच्या खोडाला स्पर्श केला. खडबडीत लागलेल्या त्या खोडावर बरेचसे व्रण होते. त्यात उरले सुरले कोवळेपण त्याच्या उंचच उंच जाणाऱ्या पानांना त्याने बहाल केले होते. आता त्याच्या खोडावर होत्या त्या खूप साऱ्या खुणा. त्याने पाहिलेल्या ऊन सावलीच्या. त्याने पाहिलेले पावसाळे, हिवाळे आणि उन्हाळे. त्याने अनुभवलेल्या किड्या मुंग्यांचा स्पर्श, इवल्या चोचीचा स्पर्श, छोट्या छोट्या वसाहती, घरटी. त्याच्या सानिध्यात वाढलेले एक कुटुंब. फांदयाना जोडणारा एक वळणा वळणाचा रस्ता. एक खोलवर गेलेली चीर आणि दुभंगलेल्या दोन शाखा. कमी झालेले आयुष्य आणि बरंच काही. हातांचा स्पर्श त्याच्या कठीण झालेल्या खोडाला मृदू करेल का ? मनात विचार आला.
आकाशात प्रखर झालेली किरणे उंच जाणाऱ्या त्या मोहोरलेल्या फांदीवर पडत होती. पानापानातून मोहोर डोकावून बाहेर पाहत होता. खालचे कठोर झालेले खोड त्याच्या दृष्टीला पण पडत नसावे. तो मात्र बहरत होता. आता उन्हात चमकत ही होता. किती वेळ घेतला असेल त्या खोडाने कोवळे पणा सोडून कठीण होण्यासाठी ? किती वेळ घेतला असेल निष्पर्ण झालेल्या फांद्यांनी डोक्यावर पोपटी तुरा येण्यासाठी ? किती वाट पहावी लागली असेल त्या तटस्थ उभ्या असलेल्या खोडाला अंतरावर फुलण्यासाठी, फळण्यासाठी, मोहरण्यासाठी ? वाट पाहणे त्याला कधी सजवते, कधी रुजवते.
हळू हळू सूर्य मावळू लागला. आकाशाचा रंग फिकट झाला पण मोहरलेली ती फांदी मात्र गडद झाली. माझी दृष्टी बदलत्या रंगाकडे गेली. रंग आकाशाचे बदलत होते. रंग पानांचे बदलत होते. झाडाचे बदलत होते. एक पालवी झुलत होती. मोहरणाऱ्या झाडाचे फुलणे उंबरठ्यावर होते. आकाशात चंद्र कोर आणि चमचमता तारा दृष्ट काढत होता. रखरखीत वाटणारा स्पर्श तेव्हा क्षणभर मृदू झाला. चंद्राच्या प्रकाशात झुलणारी ती मोहरलेली फांदी तेव्हा आकाशात नववधू प्रमाणे भासत होती.

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...