Sunday, 1 August 2021

शून्याचा प्रवास

       लहानपणी गणितातली आकडेमोड शिकली. सुरुवात शून्याने झाली. शून्याला किंमत नसते हे तेव्हा शिकलो. पण तिथून सुरुवात असते हे सुध्दा समजलं. थोडं मोठं झाल्यावर कळलं, शून्याला किंमत येते त्याच्या उजव्या डाव्या बाजूला वाढलेल्या अंकावरून. वाढलेल्या शून्यावरून. लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आज आठवली.
देवाने एकदा भिकाऱ्याला त्याच्या दयनीय परिस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी हवे तेवढे धन देण्याचे वरदान दिले. फक्त अट अशी होती की त्याच्या खांद्याला लागलेल्या झोळीत राहतील तितकेच धन त्याला मिळणार होते. ते झोळीतून पडले कि त्याची माती होणार. जोपर्यंत तो गरीब देवाला थांबवत नाही तो पर्यंत ते धन त्याच्या झोळीत पडत राहील.
पटापट आपली ठिगळं पडलेली झोळी त्याने देवासमोर उघडी केली. झोळी भरू लागली आणि त्याच क्षणी गरीबाच्या डोळ्यासमोर मोठं मोठी स्वप्न रंगू लागली. हातात झोळी घेऊन त्याचे स्वप्न रंजन सुरू होते. झोळी भरत होती. आणखी जड होत होती. अचानक ती ठिगळं लावलेली झोळी खालून फाटली. सगळ्या सोन्याच्या मोहरा खाली पडल्या. जशी झोळी फाटली, सगळ्या सोन्याच्या मोहरांची माती झाली. देवाने त्या भिकाऱ्याकडे पाहून स्मित हास्य केले. जेव्हा तो भानावर आला तेव्हा त्याला समजले, आपली झोळी फाटली आणि त्यातल्या सगळ्या मोहरा खाली पडून त्याची आता माती झाली आहे. भिकाऱ्याने देवाला विचारले “ सगळी माती झाली आणि तू खुश कसा आहेस, या वरदानाचा काहीच उपयोग झाला नाही. “
देवाने उत्तर दिले “ तुझी मोहाची झोळी होती ती गरजेपेक्षा जास्त भरली आणि फाटली. त्याला आधी समाधानाचे ठिगळं होते आणि रोज पुरेल इतके त्यात धन तुला मिळत होते. आज तुझ्या त्या झोळीला लावलेली ती ठिगळे उसवली गेली त्यांना तो अधिकचा भार सहन झाला नाही आणि फाटली. “ भिकारी खाली झालेल्या मातीच्या ढीगऱ्याकडे पाहत राहिला.
कथा इथेच संपते. आजीकडून ऐकलेली ही गोष्ट आज ही शिकवते. गणितातली आकडेमोड कधी कधी भीती घालते. हळूहळू एखादे गणित ऑप्शनला टाकले जाते. लहानपणी तशी सोय असते. थोडे आणखी वय वाढले की हा ऑप्शन चा विषय आपोआप कंपल्सरी होऊन जातो.
सुरवात शून्यापासून झाली होती. त्याचे गणित सोडवता सोडवता त्याची किंमत हळूहळू वाढत गेली. आपल्या कडचा छोटा शून्य कधी मोठा झाला कळलेच नाही. त्याच्या आजूबाजूच्या आकड्यांना आज महत्व आले. वेळ बदलते म्हणजे नक्की काय होते तर हा जो सगळ्यांकडे असणारा छोटा शून्य मोठा होत असतो. तो तेव्हा पण होता, आज पण सोबत आहे. उद्याही असेल; त्याची किंमत त्याची जागा ठरवते. त्याची गरज ठरवते. कधी तो खूप मोठा झाला तरी तो शेवटी शून्यच राहतो. असा हा शून्याचा प्रवास...

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...