Friday, 1 July 2022

सोंडाई

आठवणीतले पान भरले ते हिरव्या पोपटी रंगानी. झाडाआड लपलेल्या. लपाछपीचा खेळ खेळणाऱ्या तांबड्या खडकाळ वाटांनी. निळ्या पांढऱ्या ढगांनी आणि वाहून येणाऱ्या ओलसर वाऱ्याने. वहीच्या पानांना ही पालटत जात तोच वारा शब्दात उतरतोय. ती तांबडी माती छाप मागे सोडते. ते शुभ्र पाणी कड्याकड्यातून प्रवास करत पायाशी येते.

सोंडाई किल्ल्यावर जाण्याचा बेत होता. कर्जतच्या वाटेवर लागलेला बोरगाव फाटा तिथून जाणारा वळणदार रस्ता. तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. वाटेत गाठीस पडला खिडकीतला पाऊस. त्याची तशीच अधून मधून उडती भेट होत होती. सोबत आणलेल्या ढगांनी प्रवासात सावली दिली. त्यांच्या छत्र छायेखाली ही सोंडाई ची सफर सुफळ आणि सफल झाली.
किल्ल्याच्या पुढ्यात उभे राहून एका बाजूला गावाची वाट आणि बाकी तीन ही बाजूनी उभी डोंगरांची तटबंदी. जमिनीची खोली. किल्ल्याचे टोक. मधोमध सुरू झालेला प्रवास.
हा अनुभव लिहिताना मला स्पर्श आठवतो. सोंडाईच्या पायथ्याशी असताना त्या टोकावर फडकणाऱ्या भगव्याला दुरून केलेला स्पर्श. पायवाटेने जाताना पायांचा दगडांना झालेला स्पर्श. लहान, गुळगुळीत, विस्तीर्ण मोठे, वेगवेगळ्या आकाराचे असे दगड. काही ठिकाणी फक्त त्यांचाच आधार होता. लहानशा पाय वाटेने जाताना माती घसरत होती पण निसरड्या मातीवर दगड मात्र खोलवर रुतून होते.

उंचीवर गेल्यावर दुमदुमत येणाऱ्या वाऱ्याच्या प्रवाहाने अंगावर आलेला शहारा मानवी स्पर्शापेक्षा वेगळा नव्हता. अद्भुत. सोबतीचा प्रवासी तो ही तेव्हा झाला होता. वाऱ्यावरती गंध पसरला वगैरे अशी गाणी आपसुक ओठावर येत होती. कालचा आणि उद्याचा विसर पडला. तेव्हा त्याच पानावर राहून अनुभव घेण्याचा हट्ट अगदी साहजिक मनाने केला. दृष्टीस पडणारी डोंगर दरी. आजूबाजूला फुलपाखरे हसरी. निमुळत्या वाटेने केलेला हा प्रवास. आणि तेव्हा अनुभवलेला एकमेकांचा सहवास. श्रुती, मोहिनी, निशा, वैभव, श्रेयस आणि मैत्रिणी. खिचडी आणि वडापावची खवय्येगिरी. जांभूळ, करवंद, काकडी विकून माझ्या संपर्कात आलेली बिझनेस वुमन “ आजी “ त्या आजीशी मारलेल्या गप्पा. घोळक्याने खाली येणाऱ्या लोकांची फौज. ती फौज जेव्हा आजीच्या ठेल्या वरचा रानमेवा घेण्यासाठी धडकली तेव्हा आजीची उडणारी उत्साही धांदल. फोटो काढण्याच्या निमित्ताने अचानक भेटलेली हिंदी भाषिक मैत्रीण, तात्पुरती तिची माझी झालेली मैत्री. मागे फोटोग्राफी पाहायला आलेली गाई गुरे. सगळे अनुभव गाठीशी घेऊन सुरू झाला परतीचा प्रवास. परतताना हा आठवणींचा स्पर्श मला नव्या वाटा दाखवत होता. त्या नव्या वाटेवर चालताना कोणीतरी तिथेही भेटत होते. त्यातच माझे आणखी एक आठवणींचे पान भरत होते.


4 comments:

Unknown said...

❤️✅💯 touched

प्रथमेश लिंगायत said...

छान प्रवास आणि तितकच छान त्याच प्रवास वर्णन

Gauri Dhanwate said...

किती सुंदर😍💖

आकाश नलावडे said...

मस्तच

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...