लिंबाच्या झाडापाशी एक फुलपाखरू कधी पासून घिरट्या घालत होते. जवळ गेलं की झटकन उडणार पण पुन्हा तिथेच येऊन बसणार. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर. किती तरी वेळ मी हा फुलपाखराचा खेळ पाहत होते. झाडाची हिरवी पोपटी पानं त्याला भलतीच आवडली होती. त्याचे तिथल्या तिथेच उडणे मला काही सुचवत होते. त्याच्या मुक्तपणे तिथेच उडण्याबद्दल... त्याच्या स्वातंत्र्याबद्दल...
फुलपाखरू पंख येण्यापूर्वी आपल्याच कोशात असते. आपल्याला कोणत्या रंगाचे, कसे नक्षीदार पंख येणार आहेत ? त्याला माहिती ही नसते. त्या कोशात त्याला जे मिळेल ते त्यात उतरत जाते. आपलंच काही तरी आपल्याला बांधून ठेवते याचं त्याला कदाचित दुःख ही नसावं. काही दिवसांनी ते जेव्हा बाहेर येतं. मोठाले पंख तेव्हा त्याच्याकडे असतात. सारं आकाश त्याच्यासाठी मोकळं असतं. तेव्हा ते मात्र ढगांशी शर्यत करत नाही. उंच जाणाऱ्या पतंगाची सोबत घेत नाही. पक्षांचे थवे उडताना दिसतात पण त्याला तिथपर्यंत जावे वाटत नाही. रंगीत फुलांचा झुपका किंवा हिरवं कोवळे पान ते शोधत असते. तिथेच ते घुटमळत राहते. उंच आकाशात उडण्याचे स्वातंत्र्य विसरून ते या रंगांशी जोडलेले नाते स्वीकारते. तिथेच रमते.
लहानपणी आपल्याला ही घराच्या भिंती कोशासारख्या असतात. नंतर थोडे मोठे झाल्यावर आपण बाहेरच्या विश्वात प्रवेश करतो. चार वेगळ्या वाटा असतात. आपल्याला आनंद देणारे रंग आपण शोधू लागतो. तिथेच रमतो. तेच आपले स्वातंत्र्य होते.
कोशातून बाहेर येताना आपण ही आपले मन ओळखावे. त्यातले रंग ओळखावे. ते फुलपाखरू जसे बाहेर आल्यावर रंगीत फुल शोधते तस आपलं मन कुठे जाते ? कुठे थांबते आणि कुठे रमते हे कळलं म्हणजे मनाचे स्वातंत्र्य आपसूक कळत जाते.
No comments:
Post a Comment