ते एक दगडांचे गाव होते. दुरवर भोवताली नजर जाईल तिथे वेगवेगळ्या आकाराचे, लहान, मोठे , भव्य, दिव्य दगड. ते दगडांचे गाव. दगडात वाहणारी नदी, दगडी डोंगर आणि दगडात हरवलेली दरी.
कर्नाटक राज्यातल्या हम्पी या दगडांच्या गावाचे हे एक आठवणीतले पान. तिथला दगडात खुलून आलेला निसर्ग आणि दगडात कोरलेली मंदिराची रचना. लहानपणी आपण ठोकळ्यांची घरे बनवली असतील ना, तसंच काही... काळजीपूर्वक रचलेले ठोकळे आणि त्यातून उभी राहिलेली उंच इमारत. इथे तसेच वळणा वळणावर दगडात उभे असलेले उंच पठार, डोंगर दिसत होते. ते उंच डोंगर पाहताना प्रश्न ही पडला, “ या दगडांना एकमेकांवर अचूकपणे रचणारा चमत्कारिक हात कसा असेल? इथल्या सळसळणाऱ्या वाऱ्याची भीती या दगडांना नसेल का ? किती विश्वासावर त्या दगडाखाली जीवन फुलते, फळते ! “
विखुरलेल्या लहान मोठ्या दगडांचा ढीग करावा आणि त्यातून एखादे शिल्प तयार व्हावे. तयार झालेल्या नव्या शिल्पाला न्याहाळत राहावे असा हर एक दगड तिथे मला त्याची कहाणी सांगत होता. तिथली संस्कृती, तिथला इतिहास, तिथलं दगडातलं राखाडी सौंदर्य आणि तिथली समृद्धी सारे दिसत होते. कधी काळी याच दगडाच्या खाली वसलेले विजय नगर अजून ही तिथल्या इतिहासाचे दाखले देत होते. तिथल्या तुटलेल्या भग्न झालेल्या शिल्पातून तेव्हाचा आक्रोश आज ही ऐकू येत होता. तिथल्या तडा गेलेल्या देवाच्या मूर्ती, त्यात कोरलेले देवाचे अस्तित्व आज ही सजीव भासत होते.
दगडांच्या त्या गावाने “ आयुष्यात दगडासारखे कठीण असणे ही किती सुंदर असू शकते “ ते दाखवले. विखुरलेल्या गोष्टींचा संचय करुन नवीन निर्मित होऊ शकते. असं ते सांगत होते. त्यासाठी जर काही आवश्यक आहे तर त्या दगडासारखे स्थर्य आणि संतुलन. परतीच्या प्रवासात विखुरलेल्या अशाच काही क्षणांना एकत्र करून या दगडी गावाचा मी निरोप घेतला.
1 comment:
सुंदर लेख
Post a Comment