खिडकी…. घरातली एक अशी जागा, जिथे मन शांत होते. विचारांना जिथे स्थिरता मिळते. माझ्यासाठी घरातली एक अशी जिव्हाळ्याची जागा म्हणजे खिडकी. मला या खिडकीची आणि खिडकीला ही माझी सवय झाली आहे. कधी तरी गप्पा मारायला चिमण्या तिथे येतात तर कधी झाडाचे हिरवे पान येते. कधी वाऱ्याच्या वेगाने खारू ताई येते. काही तरी टिपत ही मंडळी माझ्या घरी डोकावून जातात. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर रात्री फुललेलं ब्रम्ह कमळ विलक्षण आकर्षक वाटते. फुलाचे सूक्ष्म निरीक्षण, त्याची फुलण्याची प्रत्येक पायरी जवळून पाहणे असो किंवा एखाद्या फुलावर विहार करणारे फुलपाखरू न्याहाळणे हे क्षण आयुष्यात रंग भरण्यासाठी असतात. आंनदी किंवा उदासवाणे असे दोन्ही दिवस आणि विचार चक्र मी या खिडकीसोबत शेअर केले आहेत. सुकलेले पिवळे करडे पान आपोआप गळून पडते. त्या जागी नवे कोंब येते. तिथे मला अपयशानंतर पुन्हा फुलण्याची प्रेरणा मिळते. पाऊस आणि त्यात झाडाची चिंब भिजलेली पानं यांच्या नात्यात मला प्रेम कळते. फुलपाखरू आणि फुल यांच्यातलं रंगाचं नात, त्या नात्यात मला मैत्री कळते. कधी जगण्याची प्रेरणा, कधी निसर्गावरचे प्रेम तर कधी अतूट मैत्री यांचे दाखले मला इथेच मिळतात. खिडकी स्थिर राहून बदलणारे दिवस पाहते. खिडकी मला आकाश आणि जमीन यातले अंतर दाखवते. ध्येय गाठण्यासाठी लागणारे सातत्य आणि प्रयत्न तिथे कळतात. अशी ही कधी आनंद देणारी, कधी अंतर्मुख करणारी खिडकी कधी शिकण्याची कधी व्यक्त होण्याची मला संधी देते.
No comments:
Post a Comment