Wednesday, 22 July 2020

कोयनेचा प्रवास

   

      

         

कोल्हापूर ते सातारा कोयना पेसेंजर ट्रेनने जायचं ठरलं होतं. माझ्यासाठी रेल्वेचा प्रवास नवीन नव्हता, तरी ही मनात थोडी उत्सुकता होती. गाठीशी लोकलचा अनुभव होता. त्यामुळे हा प्रवास आणि लोकलचा प्रवास यांची तुलना आपसूक होत होती.

 पाचचा अलार्म वाजला आणि डोळे उघडले. सहापर्यंत सामानाची बांधाबांध झाली. बघता बघता सात वाजले. गाडी होती पावणे आठची. लगोलग घराला राम राम ठोकला. घरचे इतर मंडळी तिकीट आणि सामान घेऊन मागाहून येणार होतेमी आणि माझी बहीण आम्ही थोडे सामान घेऊन पुढे निघून आलो. समोरच ट्रेन उभी होती.  ट्रेनमध्ये चढून खिडकीजवळ बसलो. तिथे खिडकीतून एक म्हातारी बाई डोकावू लागली. पैसे मागू लागली. त्या संपूर्ण डब्यात मी आणि माझी बहीण, आम्ही दोघीच होतोतिकीट नाही, सामान नाही, काय करावे सुचत नव्हतेअचानक गाडी सुटायचा भोंगा वाजला आणि हृदयाची धडधड वाढली. मनात गोंधळ सुरू होता. तेव्हा खिडकीतून बाहेर पाहिले, दोन लोकांना थांबवून तिकीट विचारताना टी सी दिसला. पुन्हा गाडीचा भोंगा वाजला. गाडी निघायला अवघी दोन मिनिटे असताना फोनची रिंग वाजली. सुदैवाने घरच्यांचा फोन आलाआमचा डबा कोणता ते सांगितले. पुढच्या क्षणाला घरचे लोक, तिकीट आणि सामान सगळेच भेटले. हा मधला दहा मिनिटांचा अवधी त्याक्षणी जीवघेणा वाटला. देवाच्या कृपेने बरोबर ठिकाणी गाठभेट झाली आणि तेवढ्यात कोयना निघाली.

संथ गतीने चालणाऱ्या रमत गमत जाणाऱ्या ट्रेन मधून जाताना जणू काश्मीरमधल्या दल सरोवरात विहार करणाऱ्या नौकेत बसल्याचा अनुभव येत होता. आकाशात काळ्या ढगांचे आच्छादन झाले होते. त्यामुळे उन्हाचा तडाखा फारसा जाणवत नव्हता.  मधून थंड वाऱ्याची झुळूक केसाच्या बटाना उडवून जायची. खिडकीच्या बाहेरचे सृष्टीचे सौंदर्य डोळे दिपून टाकत होते. हिरवेगार शेत, नव्याने नांगरलेली जमीन, त्यात ओलसर करणारा पाऊस आणि पावसाच्या पाण्यामुळे मातीतून येणारा दुर्मिळ सुगधं. अशा तजेलदार वातावरणात मागच्या तीन चार वर्षाचा शिणवटा, कंटाळा आणि ताण कुठच्या कुठे पळाला होता. तिथे वाटेत लागणारी छोटी छोटी स्टेशन तर अगदी परीकथेतल्या गावासारखी भासत होती. ती कुठून सुरू होत आणि कुठे संपत याचा मागमूसही लागत नव्हता. गाडी पुढे पुढे जात होती आणि प्रत्येक ठिकाणी निसर्ग आपली किमया दाखवत होता. मिरज स्टेशन आलं. स्टेशनात बरीच गर्दी होती. जेवढी उतरली, तेवढीच चढली. मग फेरीवाले, स्नॅक्स विक्रेत्यांची रेलचेल. त्याचा उत्साह बघून आपण ही बटाटा वडा आणला असता तर नक्कीच विकला गेला असता असे मनात आले. एवढी मागणी होती.

प्रवास इतका आल्हाददायक होता की संपूच नये असे वाटत होते. त्यात पावसाची सुमधुर गाणी ऐकत, मजा करत आम्ही निघालो होतो. बरेच प्रवासी खाली पायाशी बसले होते. तरीही ते प्रवासाचा आनंद घेत होते. बघता बघता सातारा स्टेशन जवळ आलं. स्टेशन जस जवळ आलं. पुढे बॅगा काढायची लगबग सुरु झाली.  या आधी प्रत्येक वेळी बस ने प्रवास झाल्यामुळे पहिल्यांदाच सातारा स्टेशन पाहण्याची उत्सुकता होती. गाडी थांबली. आम्ही तिथे उतरलो. उतरल्या उतरल्या फोन वाजला आणि मैत्रिणीने आमचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागणार आहे ही बातमी मला फोन वरून कळवली. या बातमीने स्टेशन पाहण्याची उत्सुकता पुरती संपली होती. निकालाची उत्कंठा त्याहून मोठी झाली होती.

त्याच विचारात मी स्टेशनच्या बाहेर आले. बाहेरूनच शहरात जाण्यासाठी सिटी बस आहे हे आम्हाला कळलं. दहा पंधरा मिनिटं तिथे ही गेली आणि तेवढ्यात तिथे ती बस आली. माणसं पळत पुढे जात होती. विचारल्यावर कळलं तासाभराने पुढची बस आहे आणि ही आली ती ही उशिराने. संयम म्हणजे काय? ते तेव्हा पळत बस पकडताना कळलं. आम्ही बसमध्ये चढलो. बसायला जुजबी जागा मिळवली.

बसमध्ये एक चाळिशीतली प्रौढ महिला चढली. शेवटच्या सीटवर बसली. मी अलीकडच्या सीट वर बसलेले तेव्हा चुकून माझ्या सामानाचा धक्का त्यांना लागला. पायातली बॅग उचलून मी माफी मागितली.  त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांनी माझ्याकडे बघून स्मितहास्य केलं.  एवढ्या गर्दीत सुद्धा त्या बाईंच्या चेहऱ्यावर संयम  होतामला काहीतरी त्यांच्यात वेगळेपण जाणवलं होतं. त्यांच्या शेजारी खेड्यातून आलेलं, शेतीची काम करणार मजूर जोडपं येऊन बसलं. जसा त्या बाईंनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांचे बोलणे ऐकण्यात हे जोडपं रमुन गेलं. बघता बघता ही दोन अनोळखी माणसं आताच भेटली हे मी विसरून गेले. शेतीविषयीची माहिती आणि त्यांनी नवे तंत्रज्ञान वापरून तयार केलेले सेंद्रिय खत, बी बियाणे याची माहिती त्या बाईंनी त्यांना दिली.  थोड्याच वेळात ते घेण्यासाठी ग्राहक त्या बाईंना त्या प्रवासात मिळाले. गाडी सातारा बस स्टँड वर थांबली. जाता जाता  त्या जोडप्याने त्यांना गावच्या जत्रेचं निमंत्रण ही दिले.

माणसामध्ये दडलेल्या कौशल्याच्या जोरावर आणि संवादातुन तो अनोळखी व्यक्तीला आपलेसे करू शकतो आणि त्याची सुरुवात करण्यासाठी संयम आणि स्मितहास्य पुरेसे असते हे ही मला तिथेच कळलं. माणसाला माणसाशी जोडणारा हा दुवा सोबत घेऊन तिथून शेयर रिक्षाने आम्ही आजी आजोबांच्या घरी पोहोचलो.

No comments:

पर्यावरण संवर्धन

आपल्या भोवतालचे वातावरण, आजूबाजूचा परिसर आणि पर्यावरण यांचा आपल्या विचारांवर, प्रगतीवर आणि जगण्यावर दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात ...