वर्गात गेल्यावर आज सर्व विद्यार्थी अभ्यास करताना दिसले. शांततेत आपापल्या गृहपाठाच्या वह्या समोर आणून ठेवल्या.
सगळ्यांच्या वह्या चेक करत असताना सुमुखच्या वहीमध्ये मला नचिकेतचे नाव दिसले. दोघांना
समोर बोलवून विचारले असता कळलं की नचिकेतने गृहपाठाची वही आणली नव्हती म्हणून शिक्षेपासून
वाचण्यासाठी सुमुखच्या वहीचे पान दुमडून त्यावर नचिकेत ने स्वतः चे नाव लिहिले. सुमुखला याची कल्पना ही नव्हती. नचिकेतला समोरच उभे राहण्यास सांगितले. याच आशयाची एक कथा माझ्या ऐकण्यात आली होती. ती
मी त्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना सांगितली. ज्याचे तात्पर्य नचिकेतला सांगायचे
होते.
एकदा एका माणसाला गाढ झोपेत असताना अचानक दार वाजवल्याचा
आवाज आला, तो घाबरून उठला आणि त्याने दार उघडले. पाहता क्षणी त्याला समोर यमराज दिसले
आणि त्यांच्या हातात भली मोठी यादी. यमराजाला पाहून माणसाला
घाम फुटला आणि त्याने त्याला विचारले " तू इतक्या लवकर का बरं आला आहेस
?" तेव्हा यमराज म्हणले " माझ्या यादीत तुझं पहिलं नाव आहे आणि तुला वर यमलोकांत
न्यायला मी आलो आहे." घाबरलेला माणूस त्याला म्हणला " तुम्ही माझी शेवटची
इच्छा पूर्ण करा. आज तुम्ही पाहुणे म्हणून आलेले आहात तर मी तयार केलेली कॉफी तुम्ही
आधी प्यावी एवढंच.." त्यावर यमराज होकारार्थी
मान हलवून घरात आले. घाबरलेला माणसाने दोन झोपेच्या गोळ्या घालून कॉफी तयार करून दिली
आणि ती प्यायल्यावर यमराज झोपी गेले. तेवढ्यात त्या माणसाने आपले यादीतील पहिले नाव
खोडुन शेवटी टाकले. यमराज थोड्या वेळेत उठून त्या माणसाला म्हणाले " तू बनवलेली
कॉफी आणि माझा केलेला पाहुणचार पाहून मी खूप खुश झालो आता मी यादी शेवटून सुरू करणार.
तो माणूस हे ऐकून रडायला लागला आणि आपली चूक त्याने कबूल केली.
जेव्हा एखादी गोष्ट किंवा घटना आपल्या बरोबर घडते
आणि त्याला कोणीही बदलू शकत नाही. ती विधिलिखित असते. किंवा आपल्याच कृतीचे ते
आपल्याला मिळालेले फळ असते. त्याचे बरे वाईट परिणाम आणि परिस्थितीला सामोरे
जाण्यासाठी आपली तयारी हवी. त्यातून पळवाट काढली कि आपणच फसतो. हेच ही गोष्ट आपल्याला
सांगते.
जस की पहा, पोपट आणि कावळा जेव्हा
आपले रूप देवाकडे मागायला गेले तेव्हा देवाने पोपटाला हिरवा रंग दिला तर कावळ्याला
काळा. कावळा निराश होऊन देवाला म्हणला
" असं का...?" तो देवासमोर रडायला लागला, देवाला त्याच्यावर दया आली आणि
तो त्याला समजावू लागला " पोपट कितीही सुंदर असला तरी तो पिंजऱ्यात कैद आहे आणि तू रंगाने काळा असलास तरी तू आकाशात उडण्यासाठी
मुक्त...आता तूच ठरव जगायचं कसं?
पोपट आणि कावळ्याच्या उदाहरणावरून एक गोष्ट नक्की
आहे. आपल्या डोक्यात येणाऱ्या का साठी कधी कधी q उत्तरे नसतात. तेव्हा झाल्या घटनेचे कारण शोधत बसू नये. बऱ्याचदा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नसतील
पण त्या तुमच्या चांगल्यासाठी असतील तेव्हा त्यातून शिकण्याचा प्रयत्न करूयात. नचिकेतने
आपली चूक कबूल करून सुमुखची माफी मागितली. पुन्हा आपली चूक झाकण्यासाठी दुसऱ्याला अडचणीत
टाकणार नाही असा शब्द दिला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला.
4 comments:
खूप मस्त दीदी...
नियतचा खेळ चालूच राहिल पण त्यातून काही शिकत राहिलो तर नक्कीच पुढे जायचा मार्ग आपोआप समोर येईल...
खूप छान. अगदी बरोबर
धन्यवाद
खरे आहे. आपल्याच भल्यासाठी समोर आलेले सत्य म्हणजे नियती.
धन्यवाद ओमकार.
Post a Comment