बऱ्याचदा आपण अनप्लॅन ट्रिप केल्या असतील. काहीच नियोजन नसताना लहर आली की आपले छोटेसे बस्तान घेऊन निघालो. कधी कधी ठिकाण ही निश्चित नसते. वाट मिळेल तिथे, वळणे नेतील तसे जायचे. बऱ्याचदा ही अनप्लॅन आणि अनियोजित ट्रिप आपल्याला कायमची लक्षात राहते. धडा देऊन जाते. या ट्रिपची सुरवात ही अशीच झाली होती. वीस ते पंचवीस मिनिटांवर असलेले अपेक्षित " फायनल डेस्टिनेशन " दोन दिवसावर कसे गेले याची ही कथा.
तासाभरातच महडच्या वरदविनायक गणपती मंदिराला भेट देण्याचे योजले होते. आदल्या दिवशी महड च्या वाटेवर पाहिलेली ती सुंदर कमान. अनायसे सुट्टी होतीच त्यामुळे जायचे ठरलेच. माझा उत्साह चंद्रावर यान पाठवायच्या आधी वैज्ञानिकांचा असतो अगदी तसाच. आम्ही जेवणानंतर निघालोच. सुरवातीला एस टी आगारात बस असेल नसेल ही शंका होती. तीच पहिली धोक्याची घंटा झाली. बस आगारात न जाता आम्ही " महाड माणगाव " ओरडणाऱ्या प्रायव्हेट गाड्यांच्या गराड्यात गेलो. चांगले तासभर खाजगी टॅक्सी मधून डोंगर वळणावरून एफ एमची बहारदार गाणी ऐकत प्रवास सुरू होता. पंधरा वीस मिनिटांचा रस्ता तासाभरात संपलाच नाही म्हणून विचारपूस केली. त्यावर अजून दोन तास लागतील असे उत्तर पुढे बसलेल्या गाणे गुणगुणत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर दिले. थोड्या वेळासाठी गोंधळले. त्यावर आम्हाला गणपतीला जायचे त्याला सांगितले तर चौकात सोडतो म्हणून तो म्हणाला. चौक वगैरे तिथे काहीच नाही हे मला माहिती होते. मग नक्की कुठल्या ग्रहावर चाललो आहोत म्हणून गुगल मॅपवर नजर फिरवली. त्यावर मला कळले, पुढच्या पंधरा वीस मिनिटात पेण येणार होते. आम्ही होतो अलिबागच्या घाटातल्या रस्त्यावर. " अरे देवा...ही वाट दूर जाते पण भलत्याच ठिकाणी नेते!” इन्स्टंट रिऍक्टशन होती. समोरच एक सह प्रवासी बसला होता. आमचा गोंधळ न्याहाळत होता. मिश्कीलपणे हसून म्हणला " तिथे जवळच रायगड किल्ला आहे तिथे जरूर भेट द्या. " रायगड किल्ला… हे कुठे किल्ल्यावर घेऊन जात आहेत ? “ तेव्हाच त्या ड्रायव्हरने एका ढाबा कम हॉटेल जवळ टॅक्सी थांबवली. रायगड किल्ल्याचा संदर्भ देणारे सहप्रवासी तेव्हा अचानक शेजारी येऊन बसले आणि हे ड्रायव्हर अलिबागच्या महाडला निघाले आहेत याचा खुलासा करून दिला. त्यांच्या बोलण्यावरून यांना आमची चुकामुक आधीच कळली असावी हे जाणवले. मी परत गुगल मॅप वर पाहिले नक्की कुठल्या कोपऱ्यात हे महाड आहे ? तेव्हा कळले अजून दोन अडीच तासाचा प्रवास आहे. पुन्हा गाडी निघायला लागली आणि आता वेगळा ड्रायव्हर गाडीत बसला. मी त्याला झालेला गोंधळ सांगितला. त्यावर आम्हीच कसे चुकीचे सांगितले आणि बसलो हे आम्हाला तो समजवायला लागला. नागोठणे जवळ वाकण फाट्यावर सोडतो म्हणाला. जुना ड्रायव्हर तो पर्यंत नो दों ग्यारह झाला होता. नव्या ड्रायव्हरला समजवता समजवता संध्याकाळचे पाच वाजले होते. रायगड किल्ला सांगणारा सह प्रवासी पुन्हा शेजारी आला आणि वाकण फाट्यावरून पाली गाव जवळ आहे म्हणला. " बल्लाळेश्वर गणपती मंदिर छान आहे नक्की भेट द्या." वाकण फाट्यावर आल्यावर ढगाळ वातावरण झाले होते. चाळीस पन्नास रुपयांचा प्रवास इथवर येई पर्यंत एक माणसी दोनशे असा झाला होता. सूर्य अस्ताला गेला होता. द्रुतगती मार्गावर तेव्हा वाद घालणे ही सोयीचे नव्हते. तेव्हा पुन्हा त्या सह प्रवासी माणसाने त्या ड्रायव्हरला समजावले. काय करावे कळत नव्हते. समोर फक्त रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारी वाहने. त्यावेळी ही त्या सह प्रवासी व्यक्तीने पालीच्या गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता दाखवला. अगदीच जवळ आल्यामुळे आम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला.तिथे राहायची व्यवस्था कशी आहे वैगेरे थोडी फार माहिती ही त्यांनी दिली. थोड्या वेळासाठी हे अन प्रेडिक्टेबल व्यक्तिमत्व कळलेच नाही. पण ही व्यक्ती कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहणार हे मात्र नक्की कळले होते. तेव्हाच तिथल्या सिक्स सीटरने अंदाजे सातच्या सुमारास आम्ही पालीच्या रस्त्याला लागलो. त्या गाडीत काचेवर लिहिले होते. " जीवन एक यात्रा है ...चलाने वाला मत देखो ...तुम्हे चलते जाना है. " माझी नजर पुन्हा ड्रायव्हरवर गेली.
तिथे ही एफ एमची सदाबहार गाणी लागली होती. योगायोग म्हणा किंवा नियती. तेव्हाच्या गाण्याचे बोल ही साजेसे होते. " गोलमाल है भाई सब गोलमाल है...सिधे रस्ते की ये टेढी ही चाल है...." अजून काय काय पहायचे आहे याचाच विचार डोक्यात सुरू होता. हो नाही म्हणता म्हणता गर्द डोंगरात लपलेल्या " पाली " या गावी साडे सातच्या सुमारास आम्ही पोहोचलो. गणपतीचे दर्शन झाले आणि परतीच्या प्रवासाचे काय करायचे प्रश्न पडला. रात्री पुन्हा नागोठणेच्या जंगली रस्त्यावरून गाडी आहे. ती ही नियमित नसते. पुन्हा दुसऱ्या दिवशीच गाडी आहे हे ही तिथेच कळले. काळ्या मिट्ट काळोखात तिथे जाणे अशक्य वाटले. शेवटी तिथलीच एक खोली रात्रीसाठी घेतली. मोबाईल मधल्या आधार कार्डच्या फोटोच्या आधारावर आम्हाला ती खोली मिळाली होती. मोबाईल ची रेंज आणि व्यवस्थित बॅटरी होती याच ही तेव्हा कौतुक वाटलं. एवढी मोठी रपेट मारून बिस्किटाच्या पुडा घेऊन त्याच्याच भरवशावर रात्र काढली. डोळे मिटले तरी " महाड माणगावचे " ओरडण्याचे सूर कानी वाजत होते. सकाळचे उत्साही उड्डाण भलत्याच ग्रहावर आणि भलत्याच मार्गाने झाले याची क्षणा क्षणाला प्रचिती येत होती. सकाळच्या दुलईदार धुक्यात पुन्हा पालीच्या बल्लाळेश्वराच्या गणपती मंदिरात गेले. एकटीच होते. सुरवातीच्या धुंडी विनायकाच्या मंदिराजवळ मला एक वृद्ध गृहस्थ भेटले. मी गाभाऱ्यात जाणार इतक्यात त्यांनी मला थांबवले आणि हातात दहाची नोट ठेवली. त्या क्षणी काहीच कळले नाही. मला फक्त ती नोट आत दान पेटीत टाकायला सांगितली. माझ्या सोबत तेव्हा कोणीच नव्हते. मी ही एका मिनिटात नमस्कार करून ती नोट नीट पाहिली ही नाही आणि दान पेटीत टाकून आले. ती व्यक्ती क्षणभरात तिथून निघून गेली. समोरचा रस्ता अगदी मोकळा. मागून माझा भाऊ आला आणि कोणीच बाहेर नसल्याचे म्हणाला. चमत्कारिक भासले. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात गेले तेव्हा बाप्पाचे मोहक रूप पाहून आता पर्यंतची झालेली दमछाक कुठल्या कुठे पळाली. जणू काही त्यानेच बोलावले असावे. लांबची प्रदक्षिणा घालून ये म्हणला असावा कदाचित. गाभाऱ्यासमोरच असलेल्या तलावाजवळ एक इसम त्या मंदिराच्या कळसाचा फोटो काढण्यासाठी सारखा सुचवत होता. बराच वेळ त्या तलावपाशी मी बसले होते. त्या व्यक्तीचे त्या कळसाकडे पाहणे ही तेव्हा मला आश्चर्यकारक वाटले. सगळे मंदिर आणि त्या मंदिराची आखीव रेखीव बांधणी मन भरून पाहिली आणि आवडली ही. पुन्हा येण्याची नक्कीच इच्छा झाली. फक्त पुढच्या वेळी येताना पुन्हा ही प्रदक्षिणा रायगड किल्याला किंवा रायगड जिल्ह्याला नसावी ही बाप्पा चरणी प्रार्थना केली. कळसाच्या मागच्या बाजूला माकडांची मोठी टोळी होती. बाहेर वडापावच्या गाडीवर गरम वडे आणि चहा घेऊन कळसाला नमस्कार करत तिथून काढता पाय घेतला. तेव्हा ही समोर प्रवेशद्वारावर एक माकड टकमक पाहत होते. त्या वेळी पोटासाठी काय पण म्हणून पहिल्यांदाच तो वडापाव त्या माकडापासून लपवून संपवला असेल. भूक म्हणजे काय याची प्रचिती तेव्हा माकडाने करून दिली.
बस स्टॉपवर आल्यावर पुन्हा घर वापसी करावी ठरले होते. तेव्हाच कळले खोपोलीला जावे लागेल. डायरेक्ट गाडी नाही. दहा पंधरा मिनिट थांबल्यावर प्रायव्हेट गाडीचा मार्ग निवडला असता पण प्रवासाच्या सुरवातीचा प्रायव्हेट गाडीचा अविस्मरणीय अनुभव गाठीशी होता. त्यामुळे तो पर्याय मनातून कायमचा दूर गेला होता. तेवढ्यात फॉर्मल कपड्यात एक इसम जवळ आला आणि खोपोलीची गाडी असल्याचे सांगू लागला. ती गाडी येईपर्यंत तो इसम तिथेच स्टॉपवर फोनवर बोलत थांबला होता. गाडी ही आली आणि तो इसम चढला ही नाही. भलत्याच ठिकाणी निघून गेला. जणू काही आम्हाला च गाडी येण्याचे सांगण्यासाठी हे योजले असावे. तिथे रस्त्यात एक गाव लागले होते. गावाच्या स्टॉपवर एक छोटेसे मंदिर पाहिले. त्यावर एक पाटी होती " श्री जननी, कलेश्वरी, वाघजाई, महाकाली, हनुमान देवस्थान , शेमडी. नाव वाचताच क्षणी भन्नाट वाटले. एकाच पाटीवर तेहतीस कोटी देव असणारे हे ते आगळे वेगळे गाव असणार. अशाच पाट्या वाचत खड्यांमधून रस्ता काढत खोपोलीला पोहोचलो. स्टँड वर जाण्याऐवजी पुन्हा हायवेला उतरलो. तिथे ही शेयरच्या रिक्षाची लांबच्या लांब रांग लागली होती. सगळ्या रिक्षा जात होत्या ते ठिकाण होते " महडचे वरद विनायक मंदिर " फिरून फिरून याच ठिकाणी यायचे होते. वेळ ही अशी होती की काहीच ठरवून होत नव्हते. आणि यावेळी ठरवायच्या आधीच त्या रिक्षातल्या काकांनी बसवले आणि आम्ही त्याच कमानीच्या प्रवेश द्वारापाशी पोहोचलो. जो पाहून तिथे येण्यासाठी मी उत्सुक होते. तेच ते नक्षीदार प्रवेशद्वार. येता येता या मंदिराचा सगळा इतिहास त्या काकांनी सांगितला. " जवळच गगनगिरी महाराजांचे मठ होते तिथे नक्की भेट द्या " ते म्हणाले. माझ्या डोळ्यासमोर आदल्या दिवशीचा त्या टॅक्सी मधला सह प्रवासी आला. पुन्हा दर्शन घेऊन येईपर्यंत थांबण्याची तयारी त्या रिक्षा चालकांनी दाखवली. पण दर्शनाला आलोच तर थोडे थांबावे म्हणून आग्रह केला नाही. वरद विनायकाच्या दर्शनाने ही आगळी वेगळी महाड ते महड ट्रिप पूर्ण झाली. तिथून पुढे मुख्य रस्त्याला पुन्हा काळी पिवळी टॅक्सी सहज मिळाली आणि जीव भांड्यात पडला आणि व्यवस्थित घर गाठले.
खर तर देव पूजा ही मनाच्या शांतीसाठी करावी इतपत मी देव भोळी आहे पण या प्रवासात भेटलेल्या एक एक व्यक्तीला पाहता आणि त्या परिस्थितीवरून खरंच विधी लिखित म्हणून काही तरी असावे यावर विश्वास बसायला लागला. अशा वेळी आपले कर्म आपल्याला त्यातून मार्ग दाखवते हे मात्र नक्की.
महाड ते महड हा प्रवास पूर्ण करून आल्या आल्या जर काही केलं असेल तर या अनुभवावरून पुढच्या कोणत्याही अन प्लॅन ट्रिपच्या वेळी लागणाऱ्या अति आवश्यक गोष्टीची डायरीत यादी करून ठेवावी मग बाहेर पडावे ही गोष्ट मनावर कोरून ठेवली.

2 comments:
खूप सुंदर...मला अगदी पाली आणि माणगांवची आठवण आली...👌👌👌
धन्यवाद 👍😊
Post a Comment