प्रेम जे प्रत्येकासाठी वेगळे, सुंदर विश्व् असते. मग ज्याच्यासोबत राहून हसावस वाटत किंवा रडावस वाटत. ज्या व्यक्तीची किंवा कोणत्याही गोष्टीची सोबत आयुष्यभर राहावी म्हणून आपण त्याची जीवापाड काळजी घेतो, त्याला आपल्यापासून दूर नेण्याच्या कल्पनेने मनात धडकी भरते. पण फक्त मला ती आवडते किंवा तो आवडतो यावर हे गणित सुटत नसते. ती आवडते यात ही मनात बरेच संभ्रम असतात. आवडते मग ती आपलीच का ? आणि आपली नसली तर त्यामागे उसने दुःख ही ओघाओघात आले. मग आपले नाही ते मिळवण्याची धडपड आणि स्पर्धा.
पुढे या सगळ्या लहान सहान आवडी निवडी लग्नापर्यंत आल्या तरी हा पेच काही सुटत नाही. काहीही झालं तरी एखादी वस्तू किंवा व्यक्ती फक्त आवडते किंवा नाही आवडत मग ती जवळ असते, पुढे लहान मोठी वादळे येऊन जातात, दुरावा येतो आणि उरते ते प्रेम.
मला कधी कधी प्रश्न पडतो, खरच प्रेम ही भावना क्षणभंगुर आहे का? तसे असते तर पहाटेच्या अंधारात प्रकाशाची नवी किरणे अंगा खांद्यावर घेताना पक्षांनी निष्पर्ण झाडाच्या बुंध्याचा आणि फांद्यांचा आधार का घेतला असता? कोणतेही रूप नसलेले फांद्याच्या सापळ्या सारखे भासणारे हे झाड पहाटे पक्षी जवळ करतात, त्यांचा किलबिलाट आणि साजिरे दिसणारे सकाळचे दृश्य, त्या दिसण्यातली सुंदरता मागे सारून अनुभवातले साजरेपण अधिक आवडू लागते. जेव्हा एखाद्याचे वास्तव्य आपल्याला आजूबाजूला जाणवते किंवा नसतानाच त्याची उणीव किंवा रिकामपणा जाणवतो ती आठवण. माफी आणि दया, बदलाची सुरवात, परत माघारी येणं, प्रामाणिक असणं, समजून घेणं आणि समजून सांगणं यात लपलेलं प्रेम. जिवलग होण्यासाठी एवढं पुरेसे असू शकते.
कधीतरी चुकीच्या रस्त्यावरून दटावून पुन्हा मार्गस्थ करण्यात, काळजी आणि माया दोन्हीचा संगम, कधी कधी एकमेकांवर अवलंबून असणं, न केलेल्या, कधी न पटणाऱ्या गोष्टी कधी कधी स्वीकारणं. प्रदर्शन नाही किंवा स्पर्धा नाही, असतो तो संयम आणि प्रामाणिकपणा. जसे सोनं दागिन्यांत सजवलेलं असो किंवा नाण्यात, कोणत्याही आकारात, रुपात ते चमकणारच, तसे प्रेम जाणवते, कधी डोळ्यात तर कधी स्पर्शात. असे हे प्रेम आणि अशी एका प्रेमाची गोष्ट.
2 comments:
Lovely and very true
Thank you pranita tai
Post a Comment