'माझ्या अंगणातील झाड आणि प्रेम' ऐकायला थोडे
वेगळे वाटेल पण त्यात ही गंम्मत आहे. आपण सिनेमामध्ये प्रेमकथा नक्की पाहिल्या असतील पण ही जगावेगळी अजब
गजब प्रेमकथा आणि ती ही त्या बहरलेल्या गुलमोहराशी. हो, मी पाहिली आणि ती शब्दात रेखाटण्याचा प्रयत्न केला. आम्ही शेरवली पाड्यावर एकदा ट्रेकिंग आणि कॅम्पला
गेलो होतो. तेव्हा मला ती भेटलेली. तिथेच पाड्यावर. गाणी म्हणत आम्ही सगळे
बसलेलो. ओघाओघामध्ये तिथल्या आजू बाजूच्या हिरव्या गार वनराईवर विषय पोहोचला, तेव्हा ती आमच्या समोरून उठून मागे गेली. तिथूनच मागच्या बाजूला
एक मोकळं रान होतं. माझी तिची गट्टी छान जमली होती. त्यामुळे तिच्या पाठोपाठ मी ही
गेले, तिच्याही नकळत. एक टक मातीकडे पाहत ती निराश होऊन विचारात गुरफटलेली, 'काय झालं
तुला? ' माझा प्रश्न ऐकल्यावर आणखीनच गोंधळली. काहीही न बोलता तशीच ती आत तिच्या खोलीत
गेली आणि पुस्तकात काही तरी शोधू लागली. मग मलाच खजील झाल्यासारखे वाटून तिथून मी काढता
पाय घेतला आणि आमच्या वस्तीच्या जवळ येऊन बसले. आमची सगळ्याची चार दिवसांची जेवणाची
सोय तिच्याच घरी केली होती. पुन्हा रात्री तिच्याशी बोलण्याचा योग आला. सहजच मी तिच्या
खोलीत गेले. तेव्हा न राहून पुस्तक आणि त्यात काय शोधते विचारले. तिने उडवा उडवीची
उत्तर देऊन वेळ मारून नेली पण आल्या आल्या पाहिलेला तिचा चेहरा आणि नंतरचे त्यावर बदललेले
रंग मला नक्की काहीतरी सुचवत होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती तिथेच भेटली पण तेव्हा
मातीला आंजारत गोंजारत त्यावर पाणी घालत असताना मी तिला पाहिलं. आता मात्र मी तिचे
या मातीत दडलेलं गुपित हुडकून काढण्यासाठी हट्टच धरला. आमची वयं जवळपास सारखीच होती.
त्यामुळे बोलण्यातली मोकळीक लगेच गवसली. तिच्या त्या दडून ठेवलेल्या गोष्टीची सुरवात
तिच्या शिक्षणावरून झाली.
गावाबाहेर तिची वस्ती असल्याने शाळा मिळणे मुश्किल
त्यात कॉलेजातले शिक्षण म्हणजे अशक्यच. म्हणून पुढच शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती गाव
सोडून आलेली. अनोळखी शहरात सगळ्यात जवळचा तेव्हा तोच होता. तिच्या खोलीच्या खिडकीच्या
आड लपलेला गुलमोहर!
दिवसाची सुरवात आणि शेवट त्याच्या डोकावणाऱ्या फांद्यांनी
व्हायची. सगळेच नवे नवे असताना ती त्याच्या ग्रीष्मात फुललेल्या पिवळ्या नारंगी रंगानी
सजलेल्या पाकळ्यांच्या, विस्तीर्ण पसरलेल्या फांद्यांच्या प्रेमात पडली. त्यावर येणाऱ्या
रोजच्या चिमण्या पाखरानी जणू त्याचा रूबाब आणखी वाढायचा. एकदा एकटेपणाच्या गर्तेत तिने त्याच्या पायाशी पडलेल्या
बहुरंगी पानांच्या सड्यात त्याला घट्ट मिठी मारली होती. आपल्या आईच्या पदरची माया,
वडिलांचा आधार, बंधुप्रेम आणि प्रियकराला वाटावी अशी ओढ आपसूक तिच्या आणि गुलमोहराच्या
त्या झाडामध्ये निर्माण झाली होती. नवे ऋणानुबंध जोडत होते. त्यानंतर ती नेहमीच तिच्या दिवसाचा जास्तीत जास्त वेळ तिथे
द्यायची. अगदी जेव्हा एकटे वाटेल, जेव्हा परके वाटेल, जेव्हा स्वतः ला शोधावेसे वाटेल,
जेव्हा पुन्हा प्रेमात पडावेसे वाटेल तेव्हा तेव्हा. कधी दिवसा, कधी रात्री त्याच्या
फुललेल्या फांद्याच्या कुशीत आणि केशरी पिवळ्या पाकळ्यांच्या सतरंजीवर आरामात तासभर
ती रमायची. त्याच्या सौंदर्याने तिच्या प्रतिभेला नवीन ओळख दिली आणि त्यातून तिने ही
आपली स्वतः ची लहानशी जागा या दोघांच्या विश्वात निर्माण केली. दिवसामागून दिवस गेले
तिचे शिक्षण पूर्ण झाले तशी तिच्या परतीचा योग जवळ आला. परीक्षा संपल्या. आपली खोली
आणि त्या खोली बाहेर फुललेला तो गुलमोहर तिला विसरणे शक्य नव्हते. सोबत साठवलेल्या
त्या आठवणी तिला काही केल्या पाय काढू देईनात तरीही मनाची एखाद्या लहान मुलाप्रमाणे
समजूत घालून तिने परतीची तयारी केलीच. पुन्हा तिथे जायचे नाही ठरवून ही जाता जाता आपसूक
तिची पाऊले त्या गुलमोहराच्या झाडाजवळ गेली. एव्हाना ग्रीष्म सरला होता, त्यामुळे गुलमोहराच्या
झाडाचीही पानगळ झाली होती. निष्पर्ण झालेला गुलमोहर पाहून ती ही त्याला मिठी मारून
एखाद्याने कानात गुपित सांगावं तस काहीसं बोलून गेली." तुलाही विरह सहन नाही झाला
ना, म्हणूनच कदाचित कधी काळी रंगात नटलेला तू आज तुझे ही रंग उतरले, तुझेही अश्रू आज
त्या फांद्यावरून गळून गेले बघ. आता तुझ्या या फांद्यावर खेळायला, बागडायला, तुझ्या
पायाशी बसायला, तुझ्या सावलीत रमायला मी नाही, तू माझ्या घराच्या अंगणात
असाच बहरून का नाही येत? फुललेला तुझा तो पिसारा मला माझ्या घरीही का नाही देत? पुढच्या
ग्रीष्मात माझा प्रियकर बनून तू माझ्या घरामागच्या पडवीत नक्की ये. तुझी सावली माझ्या
घराला आणि मला नक्की जवळ करेल. फक्त एकदा फुलून ये,
आणि प्रेमाने माझा आता निरोप घे. नाही तर माझं ही मन आता तुझ्या पानासारखं गळून जाईल
आणि तुला ते पहावणार ही नाही. इतकं बोलताच एक वाऱ्याची झुळूक येऊन तिच्यावर होत्या
नव्हत्या चार दोन पाकळ्यांचा प्रेमाचा वर्षाव करून गेली आणि ती ही वेडी त्या पडलेल्या
पानांना, पाकळ्यांना एकत्र करून आपल्या राहिलेल्या सामानासारख पुस्तकाच्या एका कोपऱ्यात
साठवून ठेवत होती. तिचा गुलमोहर ती साठवून ठेवत होती अगदी हक्काने...
आज ही तिने त्या पाकळ्या जपल्या आहेत. अगदी तशाच.
अजून ही त्या ताज्या आहेत, अगदी तेव्हा होत्या तशाच. आज ही त्या आठवणी आहेत तशाच फक्त
गुलमोहर काही फुलला नाही पुन्हा तसा... बहरला नाही...नटला नाही तसाच. अंगण अजून ही
वाट पाहते त्या फुललेल्या गुलमोहराची आणि ग्रीष्मातल्या प्रियकराची.
तिला आणि त्या ग्रीष्मात फुलणाऱ्या गुलमोहरात तीच
माया, प्रेम आणि ओढ जाणवली जी आपण प्रेमाचं प्रतीक वगैरे समजतो. आता या अगतिक होणाऱ्या
तिच्या मनाला ती च रिकामी जागा भरण्यासाठी
पुन्हा गुलमोहर फुलवायचा आहे. वाढवायचा आहे. जगवायचा आहे. मी तिचे बोलणे ऐकून, त्या पुस्तकात लपवलेली ती
फिक्या रंगाची पान न्याहाळली. तिच्या प्रेमाचे संकेत घेऊन आलेली पावसाची सर मला तिथे
जास्त वेळ राहु देईनात. शेवटी आम्ही वाढणाऱ्या पावसाला शरण जाऊन ती रात्र तिच्याच घरी
काढण्याचा निर्णय घेतला.
आज तिचे चेहऱ्यावरचे तेज काहीतरी वेगळेच सांगत होते.
कालच्या तिच्या चेहऱ्यावरचे रहस्यमय स्मितहास्य मी बराच वेळ न्याहाळले होते. नेहमीपेक्षा
वेगळी वाटली ती काल. आज ही ती तशीच प्रसन्न चेहऱ्याने आली माझ्या समोर. काही सांगायच्या
आत ती माझे मनगट पकडून मला अंगणात घेऊन गेली. ती तिथेच उभी राहिली. मीच उत्सुकतेने
पुढे पावले टाकली. तिथे एक सोहळा रंगला होता...पुनर्जीवनाचा...नव्या उमेदीचा...पालवी
फुटण्याचा...मातीआडून एक हिरवे पिवळे कोंब जन्माला येत होते. त्याचाच तो आनंद सोहळा...मी
अलगद त्यावरून हात फिरवला. तो पर्यंत ती ही आली
आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली " माझा प्रेमाचा गुलमोहर आज माझ्या अंगणात
फुलला बघ."
No comments:
Post a Comment