मुंबई लखलखाटाची, झगमगाटाची, श्रीमंताची, गरीबाची, चाकरमान्यांची, राजकारण्यांची, व्यापाराची, जेवढी मालकाची तेवढी कामगारांची, ज्याने जसे जावे तशी वळणारी, ज्याने जसे पाहावे तशी कळणारी, कोड्यात घालणारी , हळूहळू उलघडत जाणारी, थोडी मजेशीर वाटणारी, कधी डोकं उठवणारी अशी तुमची आणि आमची जीवाची मुंबई .
अनेकांनी आपापल्या शब्दात मुंबईचे वर्णन केले. प्रत्येकाच्या चष्म्यातून प्रत्येक वेळी ती वेगळीच कळली. कदाचित हीच तिची खासियत. मुंबई हे नाव जरी लहान असलं तरी त्याहून बरच काही त्यात सामावलं आहे. तिच्या या विविध रंग छटांना एकमेकांशी जोडायच जिकिरीचं काम करते ती मुंबईची लोकल. दिवस रात्र धावणारी हि लोकल आपल्याला मुंबईची तोंड ओळख करून देते. नवख्या पाहुण्याने मुंबई समजून घेण्यासाठी एकदा तरी या लाइफ लाईन मधून प्रवास करणे जरुरीचे होते. याच सफारीतून मी अनुभवलेले काही कडू गोड अनुभव सांगण्याचा प्रयत्न करते.
खर तर या धावत्या मुंबईचे वर्णन करण्यासाठी पाने अपुरी पडतील. प्रत्येक वेळी त्यातून प्रवास करणे आणि तऱ्हेतऱ्हेचे लोक पाहणे म्हणजे नव्या विश्वाचे दार उघण्यासारखेच आहे. ज्याच्या किल्ल्या इथे घाम गाळणाऱ्या प्रत्येकाच्या हाती आहेत. टाळा मात्र एकच मुंबईचा वेग. हा वेग स्टेशनात प्रवेश करताच कळतो. पहाटेच्या प्रहरी डिजिटल कोंबडा (मोबाईल ) कानाशी आरवतो आणि आणखी एक वेगवान दिवसाची जोरदार सुरवात होते. जीवावर आल्या असताना आपल्या भविष्याची गरज म्हणून बळ येतेच. नव्या प्रवासाला सुरुवात होते. त्यासोबत या प्रवासात येणाऱ्या अनुभवाची ही जोड असते. सकाळ सकाळी जेव्हा डोळ्यांच्या पापण्या निटशा उघडल्या ही नसतात अशात आपले बाडबिस्तार आवरून, चेहरा सजवून त्याच नेहमीच्या लोकलच्या भोंग्याचा आवाज ऐकायला आसुसलेले कान आणि पाय स्टेशनात धाव घेतात. तिथे प्रवेश झाल्या झाल्या च घड्याळाच्या काट्यावर धावणारी मस्तके नजरेस पडतात अन लोकलचा जिवंत असण्याचा प्रत्यय येतो. प्रत्येकाच्या जगण्याचं साचेबद्ध नियोजन इथे प्रवासात ही पाहायला मिळत. सकाळी नेहमीप्रमाणे ७.३५ ची लोकल पकडण्यासाठी केलेले अविरत प्रयत्न, कष्ट आणि चुकली तर होणार दु:ख हे इंडिया पाकिस्तान च्या क्रिकेट मॅच मध्ये होणाऱ्या पराभवापेक्षा काही कमी नसतं. मला आठवतंय मैत्रिणींसोबत जाताना बऱ्याचदा गाडी पकडण्याच्या नादात झालेल्या धावपळीत आम्ही नेहमीच शेवटून पाहिल्या डब्यात चढायचो. कारण सुरवातीला कोणती गाडी कोणत्या फलाटवर आपली वाट पाहते हे कळेपर्यंतच तिने फलाट सोडलेलं असायचं. त्यातून ही नशीब जोरावर असेल तर ती समोरच दिसायची. गाडी मिळाली तरी हि लढाई संपत नाही. मुंबईकरांच्या मनात आणि लोकलमध्ये सीटवर आपली स्वतः ची लहानशी जागा निर्माण करणे म्हणजे तारेवरची कसरतच, त्यातही आपापसात जमून आणलेलं आरक्षण आणि त्यातून निर्माण होणारी वादळं कधी कधी मजेशीर वाटतं तर कधी प्रलयाची भीती ही दाखवत. आजू बाजूला लक्ष दिलं कि घरातल्या भांडणापासून ते या देशाच काय होणार इथवर चर्चा रंगते, गुडघेदुखीच जालीम औषध म्हणू नका तर पुढच्या वेळी कुठे फिरायला जायचे इथपर्यंत देशोदेशीच्या चर्चानी इथल्या डब्ब्याचे कान पिकत कसे नाही ? असा च एखाद्याला प्रश्न पडावा असे तरंग नेहमी वाहत असतात. कदाचित म्हणूनच देश बदलण्यासाठीचे खारीचे प्रयत्न इथूनच सुरू होत असावेत असे वाटते. काहीजण या विश्वापासून अलिप्त कानाला इयर फोन लावून बहारदार गाण्यात आणि आपल्यातच मशहुल असतात. काहीच्या हातात ताजे कोरे करकरीत वर्तमानपत्र घडी केलेले असते, खर सांगायचं तर त्या चार बाय चारच्या चौकटीत भलामोठा विश्वाचा पसारा काढून चाळून काढायचा हे ही अजब कसब आहे जे इथे लोकलच्या गर्दीत अनुभवाने शिकता येतं. मधूनच शेजारी बसलेली व्यक्ती त्यात डोकं घालून आजच्या ठळक बातम्या नजर तिरकी करून अविरत कष्टाने वाचण्याचा प्रयत्न करत असते. काहीजण स्वतः च्या विश्वात गढून गेलेले असतात तर काही माझ्या सारखे आजूबाजूला न्याहाळत या लहानशा विश्वाची गंमत घेत असतात. माणसांच्या गर्दीत, रेटारेटीत, गोंधळात, असाच येणारा प्रत्येक दिवस मुंबईकर आव्हानांनी जगत असतो. त्यात त्याच्या पिढ्यानपिढ्या जातात. आणखी एक खासियत म्हणजे या लोकल मध्ये नावारूपाला आलेला छोटा मोठा बिसनेस करणारे व्यक्तिविशेष. यांना व्यक्ती विशेषच म्हणावे लागेल, पायही ठेवायला जागा नसताना त्यात तुटपुंज्या गुंतवणुकीत उभारलेला व्यवसाय करायचा त्यात हि दोन-चार रुपयांचा फायदा करायचा म्हणजे तारेवरची कसरतच. निवडलेल्या भाजीपासून तयार पक्वनापर्यंत, पायमोज्यापासून ते पावडर टिकली पर्यंत साऱ्याच वस्तूंचा इथे व्यापार होतो. या बारा डब्याच्या बाजारात सारच छोटं मोठं सामान विकल जात. इथे मिनरल वॉटर पिणारे आणि ब्रँडेड वस्तू वापरणारे सुरकूतलेल्या हातानी बनवलेले वडी आणि लाडू त्याच आपुलकीने विकत घेतात. पक्वान्ने विकायला आलेल्या आजी कडून चार सुरळीच्या वड्या आणि आलू पराठे हक्काने घेणाऱ्या गृहिणीच्या संसाराची गाडी ही याच भरवशावर इथे वेगात धावते. शेवटी पोटासाठी काय पण हेच खरं ....विश्वासाच्या जोरावर माणसं आयुष्य काढतात. त्याचा प्रत्यय इथे पदोपदी येतो. हि सर्व विश्वासाने जोडली जाणारी यंत्रमानव आहेत आणि हाच विश्वास या शहराला जिवंत ठेवत आहे. या बारा डब्याच्या लोकल मध्ये प्रत्येक डब्यात वेगळ विश्व पाहायला मिळतं. कुठे सात आठ देव भोळ्या भजनी मंडळाचे एका सुरात ऐकू येणारे ”हे भोळ्या शंकरा " तर कुठे चौथ्या सीटसाठी चाललेली वादावादी. कोणाच्या फोनवरच्या तार सप्तकातल्या गप्पा तर काहींच्या वैचारिक गुजगोष्टी. कधी बाळ-गोपालाचे रडण्याचे सूर ...हेच सारं या विश्वाला सजीव आणि उर्जित ठेवते आणि नवीन उत्साह देते. म्हणूनच कदाचित त्याच त्या वाटेवर लोक नव्या उत्साहाने रोज प्रवास करतात. अशा या मुंबई लोकलला मुंबईच छोट मॉडेल म्हणले तर वावग ठरणार नाही. त्या स्वप्ननगरीत जाण्याचा मार्गच जर इतका विविध रंगी असेल तर तिथे जाण्याची, राहण्याची, अनुभवण्याची इच्छा कोणाला नाही होणार !
कालचाच एक प्रसंग, काम आवरून घर गाठण्यासाठी धावत पळत कशीबशी लोकल पकडली. सुटण्याची वेळ होती त्यामुळे नेहमी प्रमाणे जनसागर स्टेशनवर उतरला होता. शिस्तीचे धडे आणि आपल्यातला संयम अशा वेळी प्रत्येक मुंबईकरांच्या डिक्शनरीमधून आपसूकच दूर जातो आणि त्या डब्यात सगळ्या जनसागरातुन वाट काढत एकदाचे स्थानापन्न झाले की जीव भांड्यात पडतो. दैव कृपेने तेव्हा ही मला बसायला चांगली ऐसपैस जागा मिळाली आणि गाडी सुरू झाली. दिवसभराचा शिणवटा आणि दगदग बाजूला सारून मी समोर बसलेल्या चार वर्षाच्या मुलीकडे पाहत होते. ती गालातल्या गालात हसत होती. माझ्याशी गप्पा ही मारत होती. तिचं निरामय हसू आणि बोबडे बोलणे आपोआप जगाचे प्रश्न विसरून तिच्यामध्ये गुंतवून ठेवत होते. क्षणभरात ती माझ्याशी बोलायला लागली आणि तिच्या हातात असलेलं एक रुपयाचं चॉकलेट तिने सहज मला देऊन टाकलं. मी ही ते हातात लपवून तिला शोधायला सांगितलं, आपली आवडती गोष्ट मिळवण्यासाठी ती ही सगळा जोर एकवटून माझी मूठ खोलण्याचा प्रयत्न करत होती. किती अविरत प्रयत्न केले पण रडली नाही. जवळपास पंधरा वीस मिनिटं आमचा असाच टाईम पास सुरू होता. तिच्या शेजारी बसलेली तिची आई सुद्धा तिला खेळताना पाहून निर्धास्त होती. एवढ्या गर्दीत आपल्या लहानगीला खुश पाहून तिचा ही जीव भांडयात पडला. तेवढयात एक काळ्या बुरख्यातील धष्टपुष्ट महिला आमच्या डब्ब्यात चढली आणि माझ्या शेजारी येऊन बसली. मी आत सरकले आणि ती तिच्या समोर आली अन हसणारी ती अचानक रडायला लागली. बराच वेळ तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ही छकुली काही रडायची थांबेना. आजूबाजूचे तिला रडताना पाहत होते. शेवटी तिचे गालावरून ओघळणारे अश्रू त्या शेजारी बसलेल्या महिलेला पाहावले नाही आणि स्वतः हुन उठून तिथून ती दुसरीकडे गेली. पुढच्या सेकंदात पुन्हा ती हसायला लागली. आता याला कोणता चमत्कार म्हणायचा बुवा! गाडी शेवटच्या स्टेशनवर थांबली आणि मी तिच्या सोबत उतरले, आता पुन्हा कधी भेटणार असं म्हणत त्या छोटीने मला ते हातातलं चॉकलेट पून्हा दिले आणि तिच्या बोबड्या शब्दात म्हणली, "ते चॉकलेट आताच खाऊन टाक नाहीतर ती येऊन घेऊन जाईल." ( इथे ती म्हणजे काळ्या सदरातली बाई ) मी फक्त तिचे गोबरे गोबरे गाल खेचले आणि " होय ग राणी " म्हणत तिचा निरोप घेतला. तिची आई आणि मी हसलो. एक ना अनेक बऱ्याच लहान सहान कहाण्या इथे कळतात, जुळतात आणि रंगतात. एका यात्रेमध्ये इतके विविध रंगी , विविध ढंगी अनुभव घडवणारी ही लोकल भन्नाटच म्हणावी लागेल, जी एवढ मोठ विश्व निर्माण करते आणि अशाच आंबट गोड, कच्चा बच्चा, लहान मोठ्या अनुभवातून माणसाला जगायला शिकवते. म्हणूनच म्हणलंय "चलती का नाम गाडी..." ओर एक दिन इस गाडी कि सफर होनी ही चाहीये.
2 comments:
लोकल मधली एक एक गोष्ट अतिशय उत्तम सादरली आहे🙌🌺
धन्यवाद ओमकार 👍😊
Post a Comment