Monday, 28 September 2020

मनोगत : " माझी जीवनयात्रा - ए. पी. जे. अब्दुल कलाम "


         मावळत्या सूर्याकडे पाहत मी बराच वेळ त्या बागेतल्या बाकावर बसले होते. संध्याकाळचा केशरी लाल रंग आकाशात पसरत होता. हळूहळू सूर्य डोंगराआड लपत होता. सकाळ पासून तापणारा आगीचा गोळा अखेर अस्ताला गेला. चंद्र आज थोडा लवकरच आकाशात कोपऱ्याला शांतपणे उभा होता. आताशा हवेमध्ये गारवा पसरला होता. मंद वारा वाट काढत वाहत होता. अचानक मंद झुळूक माझ्या समोरच्या झाडाला स्पर्श करून गेली. पानांची सळसळ स्पष्टपणे कानावर पडत होती. दिवसभर आकाशात स्वच्छन्दीपणे विहार करणारे पक्षांचे थवे परतताना गडद आभाळात सुंदर नक्षी तयार करत होते. एकीकडे बालगोपाळांचा खेळ रंगला होता. चिमुरड्यांच्या चिवचिवाटाने वातावरण प्रसन्न झाले होते. गडद होणाऱ्या अंधारात लपाछपीची रंगत आणखीनच वाढली होती. कॉलेजच्या तरुणांपासून ते वृद्ध आजी आजोबा पर्यन्त सगळे आपापल्या विश्वात दंग होते. त्यात ही टी व्ही वरच्या मालिकेतल्या भागापासून ते जागतिक विषयावर चर्चा रंगली होती. कुणाचा तरी मध्येच फोन वाजला आणि या चर्चेला पूर्ण विराम लागला. सायंकाळ सरली आणि आकाशात तारे चमचमणाऱ्या गालिचाचे आच्छादन करु लागले. निमिषात सारे बदल झाले. माणसाचं आयुष्य ही असंच असतं ना अनप्रेडिक्टेबल, निमिषात बदलणारं.
नुकत्याच वाचलेल्या ए. पी.जे अब्दुल कलाम यांच्या “ माझी जीवनयात्रा “ या पुस्तकाचा विचार मनात सुरू होता. सुप्रिया वकील यांनी अनुवादित केलेल्या त्या पुस्तकाने माझ्या विचार सरणीत बरेच बदल केले. ज्या भूमीवर संतांची आध्यात्मिक शिकवण मातीत रुजली आहे. त्याच भूमीवर विज्ञानाचे पुजारी, थोर अभ्यासक आणि विचारवंत जन्माला आले, हे या मातीचे किंवा भूमीचे मोठेपण.
माणसाला जन्माला येऊन हे महात्म्य प्राप्त होत नाही. जन्मापासून ते आयुष्यभर त्याला ते मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आपल्या अंगी असलेल्या कला गुणांमुळे आणि संस्कारातून, मार्गदर्शनाने आणि अथक प्रयत्नामुळे ते महात्म्य आपसूक त्याला मिळत जाते.
या पुस्तकात कलामांना जेव्हा आयुष्याला डिफाईन करायला सांगितले, त्यातल्या त्या वाक्याने दिलेले उत्तर खरंच त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा दाखला देते. ते म्हणतात “ माझ्या आयुष्याबद्दल म्हणता येईल की भरभरून प्रेम लाभलेलं लहान मुल...संघर्ष आणि संघर्ष ...दुःखाचे कढत अश्रू ...मग आनंदाश्रू ...आणि अखेर सुंदर व सुफल आयुष्य ...पूर्ण चंद्र बिंब उमटताना पहावं तसं ! “ या वाक्यात त्यांच्या आयुष्याची रूपरेषा कळून जाते.
माणूस हा विचारी प्राणी आहे. स्वप्ने पाहतो. ती सत्यात येण्यासाठी त्यांचा पाठलाग करतो. कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यावर विचार करणे गरजेचे असते. त्याला सत्यात उतरवण्यासाठी दृढ निश्चय, धाडस, चिकाटी अंगी असावी लागते. जीवनात येणारी दुःखाची वादळे न डगमगता पार करावी लागतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी आणि अपेक्षित उंची गाठण्यासाठी बरेचदा इतर गोष्टींचा त्याग करावा लागतो. जिद्दीने पुढे जावे लागते. अपयश पचवून त्यातून यशाचा मार्ग शोधावा लागतो.
नियती कधी कधी आपल्याला वेगळ्या वाटेवर सोडते. पुढे येणाऱ्या यशासाठी अपयशाचे सुरुंग पेरते. आपले या समाजातले स्थान आणि अपेक्षित कार्य कधी कधी तीच करवून घेते. या संपूर्ण प्रवासात अनेक मार्गदर्शक भेटतात. आपल्याला दिशा दाखवण्याचे काम करतात. त्यात ही हुशारीने आपण तिथवर जायचे असते. आपल्या या भावी यशामध्ये आपल्या आई वडिलांचा आपल्यावर मोठा परिणाम होतो. तोच आपल्याला जगण्याची स्फूर्ती देतो. ही सगळीच मूल्ये त्या पुस्तकात हर एक पानावर वाचताना मनात रुजत गेली.
खरंच लहानशा खेड्यात राहणाऱ्या एका मुलाला कधी वाटलं असेल का...या देशाचे नेतृत्व करायची संधी आपल्याला मिळेल. त्यांना लोक “ मिसाईल मॅन “ म्हणून ओळखतील. पण त्यांनी अशी प्रचंड देश सेवेची स्वप्न नक्कीच पाहिली आणि ती सत्यात येण्यासाठी कठोर मेहनत ही घेतली. म्हणूनच त्यांच्या पुस्तकात ते म्हणतात “ स्वप्न अशी असावीत, जी आपल्याला कधी झोपुच देणार नाही.”
अशा या विलक्षण बुद्धिमान शास्त्रज्ञाची जीवनयात्रा वाचून नक्कीच माझ्या यशाच्या व्याख्या बदलल्या. जीवनात थोडा मोकळा वेळ काढून अशा थोर विचारवंतांच्या आठवणी वाचाव्यात. त्यावर चिंतन करावे. या बुलंद व्यक्तिमत्वाचे विचार भावी आयुष्यात मार्गदर्शक, स्फूर्तिदायी आणि प्रेरक नक्कीच ठरतील. यात शंका नाही. बागेतून निघताना त्या काळोखात ही मला अखंड तेवणारी ज्वलंत ज्योत दिसत होती. जी वाटसरूना योग्य मार्ग दाखवत होती. तेच काम या शास्त्रज्ञाने आयुष्यभर केलं आणि अखेर पर्यन्त करतच राहीले आणि प्रत्येकाच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केलं. कदाचित यालाच त्यांच्या जीवन यात्रेने यश म्हणले.

4 comments:

Kavihemanta said...

अब्दुल कलाम हे माझे आयडॉल आहेत..... असा देव माणूस होणे आता लवकर शक्य नाही.... छान लेख....👌👌👌

--- हेमंत भोये, नाशिक

Only Roopesh said...

जबरदस्त 👌👌👌👍👍👍

जुईली अतितकर said...

मानवता आणि विज्ञान याची सांगड घालणारे व्यक्तिमत्व

जुईली अतितकर said...

धन्यवाद

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...