११ जानेवारी २०१७,
त्याच नेहमीच्या रस्त्यावर बोचणाऱ्या थंडीत कॉलेजचं अंतर पार करणं. दाट धुक्याच्या दुलईतून रस्ता काढत तिथवर पोहोचणं म्हणजे मनावर दगडच. एका क्षणासाठी पुन्हा उलट्या पावली जाऊन जाडसर रजईच्या उबदारपणात गुडूप होऊन जावे आणि सूर्य डोक्यावर येई पर्यंत ती रजई वितभर ही अंगावरून सरकू नये असे अनेकदा वाटले पण तसा योग आला, तो फक्त सुट्टीच्या दिवशी.
नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये एका मागोमाग एक लेक्चर झाले. वातावरणात पसरलेल्या थंडीमुळे सगळेच गारठून बसले होते. अर्ध निद्रेत सुरू असलेले लेक्चर किमान ऐकण्याचा सगळे प्रयत्न करत होते. काही दिवसांपूर्वी कॉलेज आणि डिपार्टमेंट कडून अनाथाश्रम आणि शाळांसाठी मदत म्हणून आम्ही काही डोनेशन काढले होते. ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आज दिवस होता. काहीची तिथे जाण्यासाठी निवड केली, त्यात मी ही होते. शैक्षणिक साहित्य आणि शाळेच्या आवारात वृक्षारोपण अशी दोन आवडती कामे तिथे जाऊन करायची होती, त्यामुळे उत्साह दांडगा होता. फक्त वाटप करून आणि झाडे लावून येण्याची माहिती आधी दिली होती. अचानक जाण्याआधी आम्हाला एकत्र बोलवून काही झाडे, वह्या, पेन्सिली आमच्याकडे सोपवल्या. हे सगळे करताना आपण त्यांना स्वच्छतेविषयी आणि झाडांविषयी थोडी माहिती द्यायची आहे, अशी खबर मिळाली. ती शाळा मराठी माध्यमाची होती; त्यामुळे हिंदी किंवा मराठीत हे सगळे सांगायचे होते. आजवर पूर्वतयारी करून दिलेले भाषण किंवा माहिती आठवणीत होते. अचानक तयारी न करता बोलणे अवघडच; पण त्यात ही मराठी मातृभाषा असल्याने जमेलच अशी आशा होती.
पंधरा ते वीस मिनिटात ती शाळा आलीच. पनवेलच्या झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणात मला एक अशी ही शाळा पहायला मिळाली. कौलारू छपरात झाकलेली शाळा, जाण्यासाठी लांब अरुंद वाट, लहान लहान वर्ग, शाळेसमोर छोटसं मैदान, त्याच्या कडेला वड - पिंपळाची झाडं, दगडात बांधलेलं कुंपण, जीर्ण झालेल्या वर्गाच्या भिंती. काही क्षणासाठी मला मी ग्रामीण भागात असलेल्या शाळेमध्ये आल्यासारखं वाटलं.
ती मुलींची शाळा होती. तिथे पहिली ते पाचवीच्या मुली मैदानात खेळताना दिसल्या. आम्ही जसे शाळेच्या गेट मध्ये प्रवेश केला. तसे प्रत्येकीच्या डोळ्यात आमच्या विषयी कुतूहल स्पष्ट दिसत होतं. सगळे सामान एका वर्गात ठेवून आम्ही ही मैदानावर आलो. आम्ही येईपर्यंत सगळ्या मुली एका रांगेत एका हाताचे अंतर ठेवून अगदी शिस्तीत आमच्या समोर उभ्या होत्या. आमच्यातल्या एकाने त्यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. त्यावर ही त्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिली. जवळपास दाताच्या स्वच्छतेपासून वेगवेगळी साबणाची नाव, त्यांच्या जाहिराती पर्यंत चर्चा झाली. नंतर मी त्यांना काही शब्दात झाडांचे महत्व, वृक्षारोपण म्हणजे काय ? त्याचे औषधी उपयोग वगैरे जशी आठवेल तशी माहिती दिली. कोणत्याही रीतसर प्लॅनिंग शिवाय दिलेलं हे माझं पहिलंच भाषण. आणि ते त्यांनी अगदी शांत पणे ऐकलं त्यामुळे एक वेगळाच उत्साह.
त्यांनतर आपण ज्या गोष्टीसाठी येथे आलो ती म्हणजे " झाडे लावण्याचा कार्यक्रम " पार पडला. सुरवातीला शिस्तबद्ध एका एका मुलीने येऊन मदत केली. नंतर मात्र कोणाच्या हातात कुऱ्हाड, कोणाकडे काठी, कोणाकडे झाड, कोणाकडे पाणी असे सगळ्यांचेच योगदान या वृक्षारोपणाला मिळाले. अशा प्रकारे साग्रसंगीत वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. दोन वेण्यांच्या त्या चिमण्यांचा उत्साह पाहून मला ही स्फूर्ती मिळाली. त्याच्या या अंगणात आमचं एक छोटसं रोपटं त्या रोज पाहतील, पाणी घालून त्याला जगवतील, जेव्हा त्याला बहर येईल, फुले येतील, फळे येतील, त्याची मिळणारी फळेच या उपक्रमाचे यश असेल नाही का ...!
त्यांच्या सोबत मनसोक्त खेळून झाल्यावर आम्ही आणलेला खाऊ आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खारीचा वाटा म्हणून आणलेले शैक्षणिक साहित्य त्यांना वाटलं. ते देताना ही " thank you " म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव त्यांच्या कोऱ्या निर्मळ मनाची पावती देत होते. लिहिण्यासाठी आणलेल्या पेन्सिलचे वाटप झाले, पेन्सिल वाटताना आवडत्या नावडत्या रंगावरून त्यांच्यात चाललेली चर्चा मी ऐकली. त्याची ती चूळबुळ पाहून माझ्या शाळेच्या आठवणी समोर आल्या. अचानक मोठे झाल्यासारखे वाटले. काहीच वेळात बरंच काही बद्दलल्यासारखं वाटलं. आजवर ज्या जबाबदारीचे दडपण वाटले होते. ती स्वतः हुन अंगावर घ्यावीशी वाटली. पुन्हा एकदा त्याच माझ्या शाळेच्या रस्त्यावरून फेरफटका मारावासा वाटला. सगळ्या कार्यक्रम झाल्यावर " आठवणींचा खजिना " म्हणून फोटो काढले. तो दिवस कॅमेरात कैद करून त्या मुली पुन्हा वर्गाकडे निघाल्या. जाताना त्यातल्या काहींनी बाय ताई... बाय मॅडम...म्हणत आमचा निरोप घेतला. त्यातल्याच एकीने " मला पण मोठं होऊन दुसऱ्या शाळेत जाऊन तुमच्यासारखे भाषण द्यायची, खाऊ द्यायचा ...मी तुमच्या शाळेत येऊ का ? " विचारलं. तिच्या या वाक्यावरून अचानक एवढ्या लहान वयात तिची सामाजिक जाणीव वाढल्यासारखं वाटलं. आपल्या लहानशा कृतीची दाखल इवले मन घेत असते. याची जाणीव तिच्या प्रश्नातून झाली. आम्ही ही त्यांना आनंदाने निरोप दिला. त्या गेल्यावर उरलेलं सामान आणायला आम्ही वर्गात गेलो तेव्हा त्यांच्या भरलेल्या वर्गातून येणारा गोंगाट, त्यावर शिक्षकांची त्यांच्या पुढे मागे होणारी पळापळ, रांगेत लावलेले लाकडी बेंच , काळ्या कुळकुळीत फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेला दिनविशेष आणि सुविचार, सगळ्यावर नजर गेली. एक ना अनेक प्रत्येक गोष्टीत रमायचे होते. पण निघायची वेळ झाली. मी थेट घरीच गेले. जाताना बॅगमध्ये पैसे काढायला हात घातला तेव्हा एक चॉकलेट मिळालं. ते तेच चॉकलेट होतं, जे मुलांना द्यायला आम्ही आणलं होतं आणि जाता जाता त्या मुलीने माझ्या हातात दिलं होतं. तिला आमच्या शाळेत येऊन भाषण आणि खाऊ द्यायचा होता ... हो तीच.
1 comment:
Mastach
Post a Comment