“ सुख म्हणजे नक्की काय? “ प्रत्येकाचा एक प्रश्न आणि त्याला मिळालेली प्रत्येकाची आपापली उत्तरं. या उत्तराच्या शोधात आपण आपला आला दिवस जगत असतो. येणाऱ्या अनुभवातून त्याची उत्तर आणि आपली मतं आपण ठरवत असतो. या प्रश्नाचं उत्तर शोधायला लावणारी ही एक छोटीशी गोष्ट.
एक लहानस गाव. पिंपळगाव. तिथे राहणारे एक शेतकरी कुटुंब. एक लहानसा जमिनीचा तुकडा गाठीशी आणि त्यावर पीक पाणी करून राहणारे हे कुटुंब. रमाई आणि आशा या दोघी बहिणी. रमाई अठरा वर्षाची आणि आशा तिची मोठी बहीण. आशा शेतीच्या कामात बाबाला मदत करणारी तर रमाई नुकतीच कॉलेजात शिकायला जाऊ लागलेली. रमाईला घरी “ रमा “ म्हणत. दोघीना ही शिकायची आवड. रमाला वाचनाची आवड असल्याने तिला पुस्तक जशी मिळायची तशी ती भराभर वाचून काढायची. त्यात ही मराठी आणि इतिहास तिचे आवडीचे विषय होते. त्यामुळे शिकवायच्या आधीच तिचे ते वाचून झालेले असायचे.
कोऱ्या करकरीत पुस्तकात कोणत्याही पेन किंवा पेन्सिलने रेघोट्या केलेल्या नसायच्या. सगळ्या गोष्टी आहेत तशा नीटनेटक्या ठेवण्याचा स्वभाव तिने आशाकडून घेतला होता.
शेतकरी कुटुंब असले तरी शिक्षणाला घरात वरचे स्थान होते. मुलींच्या शिक्षणात कोणतीही कसूर नव्हती. त्याची जाणीव रमा आणि तिची बहीण आशा दोघींना होती. त्यामुळेच पुढे नवे शिकण्याचे त्यांचे प्रयन्त कधीच थांबले नाहीत. नेहमी काही तरी नवीन शिकण्याची संधी मिळाली की त्याचा पुरेपूर वापर त्या करून घ्यायच्या. त्याच हुषारीवर आशाने शेतीची कामे शिकली आणि वडिलांना त्यांच्या शेतीकामात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रमा समोर एक उदाहरण उभे केले.
रमाच्या आवडी निवडी आणि स्वभावावर आशाचा खूप मोठा प्रभाव होता. आपली बहीण जशी धडाडीने सगळी पुरुषांची कामे करते. तिच्यात ओतप्रोत भरलेला उत्साह आणि कामाविषयी दृढ निष्ठा रमाला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन द्यायची.
रोज दिवे लागणीच्या वेळी रमा कॉलेजातून आली की घरची साफ सफाई करून एका विषयाचा धडा मोठ्याने वाचायची. आज तिने तिच्या कॉलेजच्या ग्रंथालयातून एक पुस्तक वाचायला आणले. त्या पुस्तकातली पहिली गोष्ट तिने वाचायला घेतली. “ सुख म्हणजे नक्की काय असतं ! “ हे त्या गोष्टीचे नाव. आशा शेतीच्या उत्पनाचे आणि विक्रीचे हिशेब करत समोर बसली होती. गोष्ट पूर्ण वाचुन झाली. पण त्या गोष्टीत लपलेले उत्तर तिला काही मिळाले नाही. तिने ती गोष्ट आशाला ही वाचून दाखवली. आशाने गोष्ट लक्ष पूर्वक ऐकली.
गोष्ट अशी होती, एका गावात एक शेटजी राहत होता. ज्याचं मौल्यवान रत्नाचे दुकान होतं. त्याचा हा व्यवसाय मंदावला होता. मोठे आर्थिक नुकसान त्याच्या समोर होते. त्यातुन बाहेर पडण्यासाठी त्याने एक युक्ती केली. आपल्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तो घरी सुख शांती राहावी असे सांगून एक एक रत्न देत असे. सुरुवातीला मोफत मिळालेलं हे रत्न मिळवण्यासाठी लोक गर्दी करू लागले. त्यासाठी पैसे मोजू लागले. हळूहळू ही बातमी गावभर पसरली. तेव्हा श्रीमंतापासून ते कर्जात बुडालेल्या कामगारापर्यन्त सगळेच त्याच्याकडे असे रत्न घेण्यासाठी येऊ लागले. हळूहळू खूप मोठी रांग त्याच्या दुकानासमोर लागली. एक वेळ अशी आली की, त्याच्याजवळ असलेले सगळे मौल्यवान रत्न संपले.
शेठजीचा बोलबाला आणि चर्चा ऐकून त्या गावातील श्रीमंत सावकार त्याच्याकडे आला आणि सुख समृद्धी मिळवून देणारे ते रत्न मागितले पण तेव्हा मात्र त्या शेठजीकडे एक ही रत्न शिल्लक नव्हते. काय करावे त्याला काहीच सुचत नव्हते, तेव्हा सावकाराला आपल्या दुकानात बसवून तो दुकानाच्या बाहेर आला. बाहेर गडी माणसांचे बोलणे सुरू होते. ते सावकाराच्या कानावर पडते “ साहेबांकडे काहीच कमी नाही तरी त्या दामू नोकरांच्या सांगण्यावरून इथे जादूचे रत्न घ्यायला आले आहेत. काय अजब प्रकार आहे हा !” अगदी दबक्या आवाजात चाललेले बोलणे सावकाराच्या कानावर पडले. काही वेळाने शेटजी आत आला आणि सावकारासमोर एक आकर्षक रंगवलेली दगडी मूर्ती ठेवली. सावकाराने त्या मूर्तीला हातात घेऊन शेठजीला विचारले “ याने माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येईल का शेठजी? “ शेटजी म्हणला “ होय दादा, तुम्ही ही मूर्ती घ्या आणि तुमच्या घरी जो खूप काम करतो ना अशा व्यक्तीच्या समोर ठेवा. पहा तुम्ही कधीच दुःखी होणार नाही. माझा शब्द आहे हा, असे नाही झाले तर ही मूर्ती परत घेऊन या “ सावकार ती मूर्ती घेऊन गेला. खूप दिवस शेटजीने वाट पाहिली पण सावकार मूर्ती परत घेऊन आला नाही. शेठजीची त्याच्या व्यवसायात आणखी भरभरात झाली.
अशी ही गोष्ट इथे संपली. पण रमा मात्र त्यात लपलेलं सुख शोधता शोधता संभ्रमात पडली. सावकार पुन्हा का येत नाही ? दुकानाबाहेर एवढी मोठी रांग कशी लागते. बाकीचे ठीक आहे पण मूर्ती ठेवल्याने सावकाऱ्याच्या घरात कसे सुख आले. रमा स्वतः शीच बोलताना आशाने ऐकले आणि ती उठून तिच्या जवळ आली. पुस्तक बाजूला ठेऊन तिने रमाला एक प्रश्न विचारला. “ असे समज हे पुस्तक म्हणजेच ती मौल्यवान मूर्ती आहे. जर तू हे पुस्तक एका निरक्षर माणसाला दिले आणि सांगितले ते वाच म्हणजे सुख तुझ्या दारात येईल. तर सुख येईल का ? “ रमा म्हणली “ त्याला वाचताच येत नाही, मग त्याला न वाचताच कसे सुख मिळणार ? “ आशा म्हणाली “ बरोबर, त्याला जरी वाचता आलं नाही तरी आपल्याकडे ते पुस्तक आहे, कधी तरी आपल्याला ते वाचता येईल, त्यामुळे तो ते पुस्तक मूर्ती सारखेच जपून ठेवेल. म्हणजे जेव्हा सावकाराने त्याच्या नोकरांच्या सांगण्यावरून ती मूर्ती घेतली तेव्हा तो सावकार सुखी नाही हे सिद्ध झाले तसंच आता मूर्ती घेतल्यावर ती सतत काम करणाऱ्या व्यक्ती समोर ठेवल्यावर त्याला नोकराची ही दया यायला लागली. जो पूर्ण दिवस काम करून ही दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहात त्याला सलाम करतो. तो आनंदी चेहऱ्याने समोर येतो तर आपण आनंदी का नाही? हे त्याच्या मनाला पटले नाही आणि त्याने स्वतः आनंदी राहायचं ठरवले.
कदाचित सुख हे मूर्ती किंवा दगडावर अवलंबून नव्हतेच ते तिथल्या लोकांमध्येच लपलेले होते. त्या गावात किती लोक नैराश्यात आहेत आणि सगळे असून ही आपण अजूनही सुखी नाही हे या गावात सर्वाना कळले. त्यांनी तो बदल स्वतः मध्ये केला. त्याची आठवण म्हणून ते मिळालेलं रत्न आणि मूर्ती त्यांनी परत केली नाही तर ती सांभाळून ठेवली.
खरे तर सुख कशात आहे हे ज्याचे त्याचे उत्तर असते. सुखी तो शेटजी ही नव्हता कारण आपण दिलेला रत्न आणि मूर्ती घेऊन गावकरी, सावकार कधीही परत येईल आणि आपले पितळ उघडे पडेल याची भीती त्याला होतीच पण इथे गावकरी किंवा सावकार परत आले नाही आणि शेटजी पण त्याची वाट पाहत राहिला.
“ रमा सुख हे खरंच त्या मौल्यवान रत्नासारखे असते. जे फक्त आपल्याकडे आहे असे आपण समजतो. सांभाळतो, जपतो आणि आशेवर राहतो.”
गोष्ट संपली. रमाला सुख म्हणजे काय कळले. ही सुखाची गोष्ट सांगायला रमा माईकडे गेली. तिची माई चुलीवर भाकऱ्या करत होती. गोष्ट सांगून झाली की तिची चार इयत्ता शिकलेली माई तिला म्हणाली. “ चुलीवरच्या जळत्या निखाऱ्यावर भाजली जाणारी भाकरी बघतेस नव्ह तेच खरं सुख ... !”
3 comments:
सुख जाणल्याने मिळते, प्रत्येक गोष्टीत आनंद असतो तो घेता आला की आपण आयुष्य सुखाने जगतो...
सुंदर आणि समर्पक कथा आहे दीदी...छान👌💐
धन्यवाद ओमकार. समर्पक आशय दिला.😊
शब्द नाही 🙏
Post a Comment