तराफा... आपल्याला वाहणाऱ्या प्रवाहातून सुरक्षित ठिकाणी नेणारा... आपल्याकडे आशेचा तराफा कायम सोबत असतो. आपली स्वप्न, ध्यास, दृढ इच्छा ज्याच्या जोरावर हा ताराफा आपल्या किनाऱ्याला लागत असतो. जेव्हा शून्यापासून सुरुवात करायची असते, तेव्हा त्या शून्याचे शंभर करण्यासाठी आपल्याकडे आशेचा दुवा असतो. नव्या दिवसाची, नव्या वर्षाची, नव्या नात्याची सुरुवात या एका शब्दावर बऱ्याचदा होत असते.
नव्या प्रवासासाठी आपण महिना आधी काढलेले तिकीट. दुसऱ्या दिवशी वेळेवर उठण्यासाठी आदल्या दिवशी लावलेला गजर. ही त्याचीच उदाहरणे.
श्री समर्थांच्या एका श्लोकात जसे सांगितले,
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥
आपल्या जवळचे दूर जाताना आपल्या मनात दुःख असते. त्याच वेळी आपला ही दूरचा प्रवास सुरु असतो. नसल्याची उणीव आणि असण्याचा ध्यास यातच आपण पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेत असतो. आशेवर जगणारी स्वप्न अशीच असतात ना ...
दुर्धर आजारावर योग्य वेळी मिळालेले औषध. अपघातातून मिळालेले जीवदान. प्रतीक्षेनंतर जन्माला आल्याचे सुख. भोवतालच्या काट्यांचा विसर पडून फुलून आलेले गुलाबाचे फुल. आशेवर पुन्हा पुन्हा जन्माला येणारी ही सृष्टी.
एक प्रसंग आठवला, रेल्वे स्टेशन बाहेर तिकीट घराजवळ एक आजी दिसायची. सत्तर बाहत्तर वयाची, सावळीशी, डोळ्यावर चष्मा आणि गडद रंगाची साडी...अगदी आपल्या आजी सारखी. पोहे, उपिट, शिरा विकायला आणायची. भरपूर लोक तिथून नाश्ता करून जायचे. एकदा घरी पोहोचायला उशिर होणार होता. स्टेशनवर असताना कडाक्याची भूक लागली होती, तिथे जाऊन काही खायला घ्यावे असा विचार माझ्या मनात आला. मी त्या आजीजवळ गेले. सर्व डबे रिकामे झाले होते. ती ते भरून ठेवत होती फक्त एक डबा शिल्लक होता, ज्यात शिरा होता. तिने त्यातूनच एक प्लेट शिरा मला दिला. भूक अनावर झाली म्हणून तिथेच तो मी उभ्या उभ्या संपवला. तिने ही आपले बस्तान बांधायला घेतले. सगळे रिकामे डबे आणि त्यात एक भरलेला डबा. शिऱ्याचा भरलेला डबा बघून मी तिला विचारले “ हा डबा पूर्ण भरलेला, एवढे आता वाया जाणार... आजी ? “ त्यावर ती आजी म्हणाली “ मी रोजच हा डबा भरून आनते ग बाय... रोजच हा राहतो, पोरं नको नेऊ म्हनतात, पर मला रोज फाटे एक सपान पडतं. या डब्यातलं खायाला एक दिस माझा पांडुरंग येईल. या येळी वारी चुकली नव्ह माझी. तो येईल कधी बी...त्यानं मला तस सांगितलंय, तवा कमी पडू नये, म्हनून आनते. अन हे राहत नई, हा राहिलेला डबा मी माझ्या पोरांना घरी गेल्यावर देते... ती संपवतात “ मी तिच्याकडे पाहत राहिले. त्या भरलेल्या डब्यातून माझी भूक भागली. ती आजी डबा पिशवीत ठेवून तिथून निघाली. एक डबा डोक्यावर आणि एक मोठी पिशवी हातात घेऊन पुढे निघून गेली. जगाची भूक भागवणाऱ्या आजीची ओढ मात्र विठ्ठल दर्शनात होती. कधी तरी तो डबा संपवायला विठ्ठल तिच्यासमोर असेल. या आशेवर खाऊ घालणारी आजी तिथे पाहिली होती.
उत्तराखंडच्या भुयारी मार्गात नुकताच झालेला अपघात हे सुद्धा तसेच उदाहरण. त्यात अडकलेले बऱ्याच दिवसांपासून बाहेर येण्याच्या प्रतीक्षेत असलेले कामगार. अचानक बंद झालेला रस्ता. डोंगरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्याला शोधणारी आशेवर जगणारी त्यांची मने. एखाद्या अंधारमय झालेल्या गुहेत प्रकाशाचा दिवा शोधत होते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यातून बाहेर आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आशेवर मिळवलेले जीवदान...अशी ही आशेवर जगणारी उदाहरणे.
आपल्या समोरचा बंद दरवाजा उघडून आपल्या मुक्कामापर्यन्त पोहोचण्याचा हा प्रवास. धडपड करत आपण तिथे पोहोचतो. जेव्हा आपण तिथे पोहोचतो, तेव्हा मनात प्रश्न ही पडतो “ हे अंतर कसे कापले ?” मागे वळून पाहिल्यावर दिसतो आशेचा तराफा.
आणखी एकाला आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचवण्यासाठी तयारीत असलेला ताराफा. आपला प्रवास पूर्ण होतो. आपल्या इच्छित जागी आशेच्या तराफ्यावरून जाण्याचा एक अविरत प्रवास म्हणजे हे जगणे. कुणासाठी स्वप्न, कुणासाठी स्वप्नांचा प्रवास.
No comments:
Post a Comment