Monday, 3 August 2020

मृगजळ


     
   मृगजळ...भास आभासाचे विश्व. जे कधी असते कधी दुरून भासते आणि जे दिसते ते नसतेच. भास आभासाच्या या लपंडावात जिथे सीता ही सुवर्ण मृगाच्या मोहात पडली, असे मोहित करणारे रंगीत चित्र म्हणजे मृगजळ. कल्पनांची किनार घेऊन हे मृगजळ स्वप्नी यावे. दुष्काळातही पावसाची चाहूल घेऊन यावे. रिकाम्या ताटी भरलेली ओटी घेऊन यावे. उन्हात पावसाच्या शिडकाव्यात तुषारानी आकाशात सुंदरशी कमान घेऊन यावे.
समुद्राकाठी अलगद उतरणारा नारंगी, केशरी रंगाचा सोन्याचा गोळा पाहुन सुखवणारे डोळे आणि भरून येणारे मन म्हणजे मृगजळ.. मृगजळ पाहण्याचे असे योग प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असतात. कधी ते दुसऱ्या अनोळखी जागेसाठी तर कधी अनोळखी व्यक्तीसाठी असतात. अनाथाश्रमात बागडणाऱ्या मुलांसाठी आई वडिलांचा सहवास हे हि मृगजळ. एखाद्या गोष्टीसाठी केलेला हट्ट आणि ती गोष्ट अचानक समोर येणे हे मृगजळ असू शकते. एकंदरीत पाहिलं तर मृगजळ ही कल्पना नाही. ती स्वप्न आहेत. जी आपण भास आभासाच्या विश्वात पूर्ण होताना बघतो. आणि हीच स्वप्न आपल्याला भुरळ पाडत जातात. कधी गरज म्हणून बोलवत राहतात, तर कधी मोहित करून घेतात. पहाडी कड्यावरून उंच आकाशात विहार करणाऱ्या घारीची लहानशा सावजावर असलेली रोख ठोक नजर. हे ही धाडसी मृगजळ. सुकलेल्या बुंध्यातून आलेल्या आंब्याच्या डहाळीला आलेला मोहोर हे ही निर्मितीचे मृगजळ. एकाच मातीत दिवसा फुललेल्या जाई जुईचा आणि रात्रीच्या रातराणीचा एकाच वेळी आलेला सुगंध हे ही सुगंधित मृगजळ.

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...