शेवटच्या वर्षाची परीक्षा होऊन बराच काळ लोटला होता. सकाळी रपेट मारायला जवळच्या पार्कात गेले होते. तिथे बसल्या बसल्या माझ्या जवळ दोन मुली आल्या आणि सोबत खेळण्यासाठी हट्ट करू लागल्या. मी हि त्यांना नाराज न करता हातात चेंडू घेऊन निघाले. बघता बघता खेळ रंगत आला आणि एक जोरदार चेंडू भिरकावला तो थेट पार्काच्या बाहेर गेला. नंतर खूप प्रयत्न करूनही तो चेंडू काही मिळाला नाही. त्यानंतर नाईलाजाने सगळे आपापल्या वाटेला गेले. जाताना त्या मुलींचा हिरमुसलेला चेहरा पाहून थोडे वाईट ही वाटले. पण त्यानंतर लहानपणचा असाच अनुभव तेव्हा चालता चालता आठवला.
दिवाळीच्या सुट्टीत गावी असताना त्याच जोशात चेंडू भिरकावला होता, तो थेट रस्त्यावरून येणाऱ्या बसच्या उघड्या खिडकीतून आत गेला आणि त्यानंतर झालेली धावपळ अजून ही लख्ख आठवते. चालता चालता मी माझं गावचं घर आणि तो प्रसंग आठवत त्यात रमुन गेले. घरी पोहोचले. जुन्या आठवणीचा अल्बम उघडून पुन्हा जगायची इच्छा काही स्वस्थ बसू देईनात. दोनच दिवसात गावाला भेट दिली. आजोळी, आजी-आजोबांकडे.
खुप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गेल्यावर गाव थोडं बदललेलं असतं. सगळं जुनं स्मरणात असतं आणि बदलेले चित्र पहायची उत्सुकता असते. आठवणी असतात आणि त्यात रंग भरणारी माणसं असतात. बऱ्याचदा आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढणं शक्य नसतं, गावाची ओढ लागली तर ही गाठ भेट होते. अशी बरीच अव्यक्त कारण असतात जी आपल्याला बोलावत असतात. नवे अनुभव घेण्यासाठी... तशीच मी ही निघाले.
“ सातारा “ या नावाप्रमाणे ताऱ्याचे गाव. तिथे जाऊन निरभ्र आकाशात एक नजर फिरवली कि चमचमणाऱ्या आकाशात ठळक सात तारे “ सप्तर्षी “ दिसतात, त्यावरून हे नाव दिले असावे. सप्तर्षी म्हणजे एकत्र सात ताऱ्यांचा पुंजका ज्यात जोतिषशास्त्रातले धागे दोरे मिळतात. तसेच सातारा सात डोंगरांनी वेढलेलं शहर आहे. हा ही नावामागचा आणखी एक संदर्भ असू शकतो. अशाच एखाद्या पठारावर रात्रीचं आकाश दर्शन घेण्याच साहस इथे नक्कीच एकदा तरी करायला हवे. हे सारं नावाबद्दल झालं. साताऱ्याला जाण्याचा रस्ताही तसाच आहे. घाटमाथ्यावरून वळणा वळणाच्या रस्त्याने बराच वेळ लागतो पण विकासाच्या वेगामुळे हा हि वेळ आता कमी झाला आहे. रस्त्यात बरेच बोगदे आणि डोंगरकडा आपलं स्वागत करायला सज्ज असतात. जाता जाता पेटपुजा करायला ढाबे, फूडमॉल खुणावत असतात. तीन-चार तासाचा प्रवास संगीत ऐकत निसर्गाचा आस्वाद घेत कधी संपतो आणि साताऱ्यात कधी दाखल होतो कळतही नाही. सातारा शहरात दाखल होताच दूरवर उंचावरून अजिंक्यतारा किल्ल्याचे दर्शन होते. अजिंक्यतारा सुरुवातीचा दुर्ग. तो दिसला कि समजायचं साताऱ्यात प्रवेश झाला. तिथं पोहोचल्या वरही कसरत असते बरं. भूपृष्टाला समांतर रस्ता इथे पाहायलाच मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी डोंगर चढाईचे अनुभव येतात. कधी वरून खाली तर कधी खालून वर. रोलर कोस्टर रस्ते पार करत दिसते ते माझे आजोळचे घर. अंगण, झाडं, माती, स्वच्छ हवा आणि आपली माणसं आपली वाट पाहत असतात. बोचरी थंडी आणि राक्षसी कोसळणारा पाऊस आजही अंगावर शहारे आणतो. अशा डोंगराच्या कुशीत वसलेलं सातारा त्यातलं लहानसं आमच घर म्हणजे गोल्डन रिंग विथ डायमंड असंच वर्णन करता येईल.
सातारा आणखीन प्रसिद्ध आहे ते तिथल्या कंदी पेढ्यासाठी. बसस्थानकाबाहेर लांबच लांब दुकानाच्या रांगा. पेढ्याची चव चाखल्याशिवाय सातारा सोडण इथल्या लोकांच्या नियमात नाही. भेटायला आलाय, बघायला आलाय किंवा फिरायला आलाय कंदी पेढा सगळ्याचीच मनं गोड करतो. जवळपास पाहण्यासारखी बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत; जिथं निसर्ग आपली जादू दाखवतो. सातारच्या रस्त्यावर फिरताना दर वळणावर मंदिराचा कळस नाही दिसला तर नवल, त्यामुळे सगळी मंदिर आणि बागबगीचे आजी आजोबांनी आणि लहान मुलांनी फुललेले दिसतात. गावी गेल्यावर बरोबर पाठमोरा नजरेस पडतो तो आमच्या घराजवळचा भैरवनाथाचा डोंगर. डोंगरा वर शंकराच देऊळ आणि लांबलचक पठार. इथे जाण्यासाठी कधीच प्लानिंगची गरज लागली नाही. पहाटेच्या कडक थंडीत उठायचे आणि डोंगर चढायचे धाडस घेऊन निघायचे. खिशात भरलेली चॉकलेट, तीन चार पाण्याच्या बाटल्या, घरून बनवलेली भेळ आणि एक उत्तम गाईड इतकही पुरेसं असतं. लहानपणी आम्ही भावंडे भैरवनाथ डोंगर चढायला जाण्याचा विचार आला कि निघायचो आणि कधी एकदा ते टोक गाठतोय याची जणू शर्यतच लागायची. सगळे भान विसरून नवे रस्ते शोधत नवी माणस आणि नवे अनुभव घेत हिंडायचो.
एकदा सहज गेल्या असताना तिथे भेटलेली एक अठरा-एकोणीस वर्षाची मुलगी पोलीस भरतीसाठी रोज दोन दोन किलोचे गोळे घेऊन चढाई करताना पाहिली. तिच्या हातातला एक गोळा आमच्या दोन हातात घेऊनच आमची आहे नाही ती शक्ती संपली आणि तिच्यातील ध्यर्य आणि धाडस पाहून तिचा अभिमानही वाटला. असेच अवलिया आपल्या आयुष्यात बदलासाठी खारीचा वाटा टाकतात आणि प्रेरणा देतात.
साताऱ्याजवळच आहे परळीचा किल्ला. ज्याला सज्जनगड म्हणूनही ओळखतात. थोडी नागमोडी वळणे आणि पायऱ्याची रांग. जेव्हा जेव्हा ट्रीप निघते तेव्हा हमखास ठरलेलं हे ठिकाण. श्री रामदास स्वामी आणि श्रीधर स्वामींचे समाधी स्थान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दगडी बांधकाम तिथे आज ही पहायला मिळते. गडाची रचना अतिशय आखीव रेखीव अगदी लहान खेड्याप्रमाणे असून या ठिकाणची खासियत म्हणजे तुमच्या फोर जी ची स्पीड इथे झिरो होते आणि या जागेशी तुम्ही एकरूप होतात. तिथले वातावरण तुम्हाला स्वतःची स्वतः शी हरवलेली कनेक्टीवीटी परत मिळवून देते. गड चढताना वाटेत झाडावरची माकडं तुमच्या स्वागताला सज्ज असतात; त्यामुळे मोकळ्या हातानी जाणच योग्य. डोंगरावर एका बाजूला अंगाई देवी तर दुसऱ्या बाजूला मारुती मंदिर आणि त्याला लागुनच असलेला मोठा जलाशय. उंचावरून वाहणारे वारे स्वतः वर घेत तासान तास उरमोडी धरणाचा प्रवाह पाहत घालवलेला वेळ आज ही स्मरणात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने चांगली पावले उचललेली आहेत. जुने दगडी बांधकाम इतिहासाची साक्ष देत सदोदित पणे उभे आहे. तिथल्या वातावरणातील निस्सीम श्रद्धेचा सुगंध आजही कमी झालेला नाही. सकाळ संध्याकाळ होणारी दासबोधाची पठणे वेगळीच सकारात्मकता देतात. दरवेळी नव्याने आणि उत्साहाने जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन इथूनच मला मिळतो.
वाढदिवसाची एक आगळी वेगळी भेट म्हणून आठ हजार फुटावरून रात्रीचे चांदणे पाहत बाराची वाट पाहत केलेली आईस्क्रीम पार्टी मला अजून ही आठवते. कडाक्याच्या थंडीत तिथलीच एक मनी माऊ आमच्या या छोट्याश्या पार्टीत सामील झाली होती आणि एका नवीन पर्वाला मी सुरवात केली होती.
तिथून जवळ कास पठार, ठोसेघर आणि सह्याद्रीच्या रांगा शानमध्ये उभे पाहायला मिळतात. कास पठार इथे येणाऱ्या अद्भुत फुलांसाठी प्रसिद्ध आहे. सप्टेंबरच्या आसपास इथे स्वर्गच अवतरतो आणि हा निसर्ग सोहळा पाहण्यासाठी देशपरदेशातून पर्यटक येतात. त्याचं जतन करण्यासाठी इको सेन्सिटीव झोन मध्ये याचा समावेश झाला आहे . साताऱ्याची तहान भागवणारी कृष्णानदी इथं वाहते. महाबळेश्वर, पाचगणी हि नेहमीची थंड हवेची ठिकाणं तर नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. तिथले वेगवेगळे स्पॉट आणि उपहारगृहे सुट्टीच्या काळात लोकांनी भरलेली असतात. शासनाच्या विविध योजनामुळे पर्यटन क्षेत्रात बरेच चांगले बदल झाले आहेत तरीही लोकांनी अजून तत्पर राहून निसर्गाचा आस्वाद घेतला तर नक्कीच त्यात भर पडेल.
कृष्णेच्या संगमावर वाई गाव वसलेले आहे, जिथे हेमाडपंथी गणपती मंदिर आहे, ज्याला तिथं ढोल्या गणपती म्हणून ही संबोधतात; साताऱ्याला लागुनच लहान मोठी अशी बरीच गावं आहेत जी शेतमळ्यानी सजलेली आहेत. टीमटीमत्या दिव्यांची हि गावं सातार्याच्या एखाद्या उंच टोकावरून चंद्र प्रकाशात पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. लहानपणी दूरवर दिसणाऱ्या दिव्यांना मोजून घरं किती ? गावं किती? नदी कुठे? आणि रस्ते कुठे याचे अंदाज बांधत बांधत शिकत गेलो. पुढे आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगात त्याची मदत झाली. आता तिथे इलेक्ट्रोनिक माध्यमे आली पण अचूक अंदाज बांधण्याची समयसूचकता तिथूनच मिळाली.
साताऱ्यात आणखी एक सदाबहार ठिकाण म्हणजे ठोसेघर. ठोसेघर हे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेले गाव. आजूबाजूच्या पर्यावरणावर आणि सृष्टीवर साक्षात ब्रम्हदेवाचा हात असावा इतके विलोभनीय आणि अविश्वसनीय. इथला धबधबा पाहण्यासाठी दूरदूरचे पर्यटक येथे येतात. कोणी मित्र मैत्रिणीसोबत मजा करायला, कोणी कुटुंबासोबत तर कोणी चिकिस्तक वृत्तीने साऱ्याचा अभ्यास करायला. उंचच उंच डोंगर रांगा, निमुळता होत जाणारा कालगंगा नदीचा प्रवाह सर्वांची तहान भागवत संथपणे पुढे जाताना दृष्टीस पडतो. पावसाळ्यात पंधरा वीस धबधबे उंचावरून कोसळताना फुललेला श्रावण पाहताना डोळे दिपून जातात. पक्षाचा किलबिलाट आणि मधूनच येणारा रातकिड्याचा आवाज सारेच ताल धरतात. धरणीवरची हि हिरवी शाल किती अनमोल आहे, याची जाणीव होते. जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गाच तत्व आपण विसरत तर नाही ना! असे तिथला प्लास्टिक आणि इतर कचरा बघून वाटते. निसर्गाबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर मला माझ्या गावानेच दिला. चाळकेवाडीची पवनचक्की विज्ञान आणि तंत्रज्ञान देखील पंचमहाभूताशिवाय अपूर्ण आहे याचा दाखला देते.
निसर्गाप्रमाणे कला कौशल्यात सांगायचं झालं तर साताऱ्यात जवळच औध म्हणून देवीचे जागृत देवस्थान आहे, जिथे शाहू महाराजांनी कलेला वाव मिळावा म्हणून बांधलेल्या संग्रहालय आहे. त्या ठिकाणी विविध रंगाचे, आकाराचे पुतळे, चित्रं, कोरीवकाम केलेले पौराणिक साहित्य आणि त्यांचे अवशेष जतन करून ठेवले आहेत. तेथील रवी वर्माचे सुरेख चित्र, त्या रंगामधील तजेला कोणत्याही कलाकाराला मोहित करेल. कलाकारांच्या हातातील जादू पाहण्यात कसा वेळ जातो कळतही नाही. सगळं सातारा फिरून शेवट होतो तो राजवाड्यात. इतिहासाची साक्ष देणारा राजवाडा आज जरी बंद असला तरी त्यावरील कोरीव काम बाहेरूनच आकर्षित करते. सगळं सातारा फिरून सहा माणसांच्या सिक्स सीटर मधून अठरा जणासोबत घर गाठतो तेव्हा हा प्रवास पूर्ण होतो.
गाव माझं चांगल, तिथं छोटसं घर आपलं
माणसांनी सांधलं आणि नात्यांनी जोडलं
कच्चे बच्चे जमले जेव्हा एका छताखाली
माझ्या या गावामध्ये जगाचं दर्शन घडलं
गावाकडच्या गोष्टी सांगायच्या बऱ्याच असतात पण सांगण्यापेक्षा अनुभवायच्या जास्त असतात. अंगणात घेतलेल्या जेवणाचा आस्वाद, लपाछपी खेळताना झालेल्या जखमा, झाडावरून तोडून खालेली आंबा, पेरू, चिक्कू. उंचावरची नारळ काढण्यासाठी केलेली मेहनत. चूल पेटवून पाणी तापवणे आणि त्यावर चटका लागेल मिळालेला प्रसाद. तशी गावी जायची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात. कोणी गरज म्हणून तर कोणी आवड म्हणून जातोच. तिथे गेल्यावर प्रत्येकाच्या आवर्जून करायच्या हि बऱ्याच गोष्टी ठरलेल्या असतात. भेळ, कुल्पी आणि गोळा, उसाचा रस याची मजा काही औरच. गाव जरी म्हंटल तरी विकासाच्या झोतात आता बरच बदललं. पार्क आणि कॉमप्लेक्स आले. थ्री जी, फोर जी स्पीड आता इथवर पोहोचली आहे. त्यात वाईट काहीच नाही फक्त त्याच स्पीडने गाव बदलू नये.
आपलं गाव देशाच्या नकाशावर एखादा ठिपका जरी असला तरी चार लोकांत तुमच गाव कोणतं? विचारल्यावर ज्या उत्साहात उत्तर बाहेर पडत तीच गावाची ओढ आणि तीच कारणं पुन्हा गावाकडे जाण्यासाठी...
1 comment:
हृदयस्पर्शी, अभ्यासपूर्ण, सजीव चित्र डोळयांपुढे उभं करणार वर्णन - आशिष
Post a Comment