Friday, 25 September 2020

पाणी...बिन भिंतीची शाळा


पाणी ....उंचावरून पांढऱ्याशुभ्र झऱ्यातून कोसळणारं. संथपणे नदीतून वाहणारं. खोल सागरातून लाटांवर उसळणारं. नळातून पडणार नाहीतर मातीतून झिरपणारं...पाणी.
ज्याला स्वतःचा ना रंग, ना गंध, ना आकार ना रूप. एक मात्र गुण आहे मिसळण्याचा आणि एकरूप होण्याचा, म्हणूनच निर्जीव भूमीवर जीवन फुललं आणि बहरत गेलं याच पाण्याच्या थेंबातुन. पाणी लोकांना जगायला शिकवतं. कधी गुडघाभर पाण्यातून वाट काढून तर कधी एका थेंबासाठी कोसावर पायपीट करून. कधी संकट बनून तर कधी संजीवनी बनून.
पाणी... जिथे वाहत जाईल तिथे नव्याने जीवन निर्माण करेल. पूर्वीपासून पाण्यासाठी प्राणीमात्रांनी धडपड केली. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. पाण्यासाठी कधी वणवण केली. त्याची साठवण केली. माणसं, पशुपक्षी पाणवठयाशेजारी एकवटली. नदी शेजारी गाव निर्माण झाली. समाज जीवन फुलत गेले. वाढत गेले. पशुपक्षांनी, मानवानी पाण्याच्या दिशेप्रमाणे कधी आपली दिशा बदलली तर कधी आपल्या सोयीनुसार पाण्याची दिशा बदलली.
आपली स्वतःची ओळख बाजूला ठेऊन इतरामध्ये विलीन व्हावं. जिथे वाट मिळेल तेथे वाहत जावं आणि शेवटी अथांग समुद्राला मिळावं हे पाण्याचं तत्व माणसाला साचेबद्ध जीवनात रुतून बसण्यापेक्षा नव्या रुपात इतरांच्या कामी येऊन जगण्याच सार्थक करायला शिकवतं. जिथे पडेल त्याचा आकार घेऊन नव्या बदलांना आत्मसात करायला शिकवतं. नवनिर्मितीच हेच वरदान देऊन इंद्र देवाने या आणू रेणूला पृथ्वीवर धाडलं असाव. यातल्या बऱ्याच गोष्टी माणसाला रोजच्या जगण्याचा भाग वाटू शकतात.
पाण्याची किती रुप आपण पाहिली असतील. कधी शांत आणि स्तब्ध. कधी उसळणार. कधी पानाफुलावरच्या दवात किंवा आळवावरच्या थेंबात साठलेलं. कधी महापूर तर कधी दुष्काळ. पावसामुळे होणारं नुकसान काही नवं नाही पण त्यासोबत महाप्रलयाची ती काळ रात्र आजही लोकांना सुन्न करते. दिवसरात्र कोसळणारा आणि हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत जाणारा पाऊस. जणू कुठल्याशा अतीव दुःखात सततच्या वाहणाऱ्या अश्रुमध्येच अनेकांनी जलसमाधी घेतली. गरजेपेक्षा जास्त आला आणि सारं काही उध्वस्त करून गेला. सध्याच उदाहरण घ्यायचं झाल तर जपान मध्ये आलेली त्सुनामी आणि त्यातून पुन्हा एकदा चिकाटीने सगळं सावरण्याचा प्रयत्न करणारे तिथले रहिवासी. या महाप्रलयामुळे या न त्या प्रकारे प्रत्येकाने काही तरी देण्याचा प्रयत्न केला आणि हे आलेलं जल संकट पळवून लावलं. कुठे तरी माणसांच्या मनातला मायेचा ओलावा मनं उबदार करून गेला.
या पाण्याचे ना ना तऱ्हा, कधी उद्रेक तर कधी दुर्भिक्ष. याच्या बरोबर उलट परिस्थिती गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात भीषण दुष्काळामुळे झाली. जमिनीला पडलेल्या भेगा आणि पसरत चाललेलं वाळवंट अंगावर काटा आणून गेलं. विहिरीच्या तळाशी गेलेलं पाणी आणि त्यासाठी लागलेल्या लांबलचक रांगा, मैल दोन मैल पायपीट करून कुटुंबाची तहान शमवणारी आई, पाण्यावाचून अर्धमेली झालेली जनावरे, करपलेली पीक पाहून हताश झालेला शेतकरी, निष्पर्ण झाडाचे सुकलेले बुंधे. सगळच सुन्न करणार. अजाणतेपणी आपल्या कडून ही झालेल्या या जखमा आज जमिनीत खोलवर कोरल्या गेल्या आणि वेदना सर्वांच्या वाट्याला आल्या असे वाटून जाते. दुष्काळाचे चटके सोसलेली करपून गेलेली मन सगळीकडे माणुसकीचा ओलावा शोधत होती.
जेव्हा पाण्यावाचून हिरव्यागार झाडाची पाने गळून त्याची होळी होते. पाणी आणि चाऱ्यावाचून जनावरांना बाजार किवा कत्तलखाना निवडावा लागतो. एक दिवसाआड भाकरी भाजण्याची वेळ घरच्या आईवर येते. दहा वीस रुपयासाठी शेतकऱ्याला सावकाराचे पाय धरावे लागतात. त्याच्या लेकरांची लहान लहान स्वप्न सुद्धा डोंगराएवढी मोठी आणि अशक्य वाटतात आणि या दुष्ट चक्रातून वाट काढत तो जगत असतो. जगण शिकत असतो.
इतकं सगळ शिकवून जाणार हे पाणी आज क्षणा क्षणाला जगणे शिकवत आहे, त्यातून धडा घेऊन हे अमृत वाचवण्यासाठी कुठेतरी कोणीतरी पुढे येतंय. घाम गाळतय, समाजाला योग्य दिशा दाखवतंय, लोक संघटित होऊन नवा इतिहास घडवतात, लोकं स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करत आहेत, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था अशा प्रसंगी त्यांच्या पातळीवर योगदान देत असतातच त्यात आपण आपले लहानसे दान मग ते श्रमदान असो किंवा आणखी काही. या चळवळीला दुहेरी बळ दिल्याशिवाय राहत नाही आणि जिथे अशी सेवाभावी वृत्ती एकवटते तिथे निसर्ग ही आपला चमत्कार दाखवायला लागतो. याच एकजुटीतून कोरडी पडलेली ती भूमी पाण्यानी नाहून निघते. मातीच्या एक एक कणाकणात नवा उत्साह संचारतो. पुनर्निर्मितीचा सुगंध चहूकडे दरवळू लागतो. निष्प्राण झालेल झाड नव्याने सज्ज होते. जुने तण आपोआप गळून पडतात. भेगाळलेल्या जमिनीतून लहानसं अंकुर डोकं वर काढतं. सुकलेल्या फांद्यावर हिरवीगार कोवळी पान दिसू लागतात. चैतन्याने सारी भूमी बहरून निघते आणि असे अनेक सृष्टीचे चमत्कार पाहणारे आपण साक्षीदार सगळं पाहून हवालदिल होतो. ज्याप्रमाणे पाण्याच्या एक थेंबाने एकवटून संपूर्ण सागर ढवळून निघतो आणि कठीण दगडातून आपली वाट काढतो त्याच प्रमाणे अनेकांचे सकारात्मक विचार एकत्र येऊन त्याचा महासागर होतो आणि संपूर्ण परिस्थिती ढवळून काढतो. संकटातून वाट काढत अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो. या सगळ्या उदाहरणावरून एकच संदेश मिळतो तो म्हणजे एक चांगला आदर्श समाज निर्माण करण्यासाठी लागते ती फक्त दृढ इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी आणि मग हे असे चमत्कार घडतात. डोळ्यातील अश्रुची जागा जेव्हा मेहनतीच्या घामात परावर्तीत होते तेव्हा नद्या, विहिरी आणि माणसांची मन सुद्धा काठोकाठ भरतात. पाण्याने माणसांची माणुसकीची तहान शमवली. थोडासा का होईना वाटा आपण ही द्यावा असं जेव्हा प्रत्येकाला वाटत त्यासाठी लोक निरपेक्ष भावनेने पुढे येतात आणि एकत्र येतात. तेव्हाच या निसर्गाच्या शाळेत आपण कुठेतरी उत्तीर्ण होतो. हा बदल घडवण्याची ऊर्जा आपल्यात च दडलेली असते. याची प्रचिती येते.
पाण्याचा एक थेंब, माणुसकीची तहान, सकारात्मक विचार आणि एकसंघ समाज सारच सोपं आणि सहज करतो. जे शिक्षण कोणत्याही पुस्तकात, ग्रंथात, शाळेच्या चार भिंतीत मिळणार नाही अशी शिकवण तो निसर्ग रोजच्या जीवनात देतो. अशी ही बिन भिंतीची शाळा...

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...