शाळेत नव्याने रुजू झाल्या असताना पहिल्याच दिवशी मी सातवीच्या वर्गात तासाला गेले. पहिलाच तास चांगला गेल्यामुळे चेहऱ्यावर तो आनंद होता. जाता जाता एक दोन प्रश्न विचारले. एक एक जण उठून उत्तर देत होते. त्यात एक हात वर आला. तेव्हा सगळ्या मुलांत ती मला वेगळी भासली. पहिल्याच बेंच वर ती बसलेली. ओळख करून घेताना तिच्या चेहऱ्यावरच्या अढळ खळीच्या हास्यात बरंच काही दडलेले असणार हे मला तेव्हाच जाणवलं. ती एक स्पेशल चाईल्ड होती. पुढे रोज शाळेत जाण्याच्या वाटेवर ती मला भेटायची. एकदा माझ्या सोबत ही आली होती.
रुबेला मिझेल लसीकरणाच्या दिवशी तिच्या दुर्धर आजाराबद्दल मला माहिती मिळाली. त्या दुर्धर आजारामुळे तिला जास्त मेहनत करायची नव्हती. ठेंगणी, कुरळ्या केसांची, बोलकी " ती स्पेशल." बोलण्यातुन चौकस वृत्ती लगेच कळत होती. नवीन गोष्ट शिकण्यासाठी थोडा वेळ घ्यायची पण शिकण्याची आवड मात्र दांडगी होती. तिचे अक्षर तिच्यात दडलेले सौंदर्य नेहमी दाखवायचे. एकदा माझे काम करत असताना ती टेबलाजवळ आली आणि तिच्याबद्दल मला सांगू लागली. तिला मी तिचे अक्षर खूप छान आहे सांगितले, खूप कौतुक केले. त्यावर तिने तिच्या घरचे, गावाचे, घरातल्याबद्दल सांगायला सुरूवात केली. नेहमी माझ्याकडे पुस्तक घेऊन प्रश्नाची उत्तर शोधायला यायची. तिला प्रश्नांची उत्तरे शोधून देताना किती तरी प्रश्न तिच्या बद्दलचे माझ्याकडे निरउत्तरीत राहायचे. जे कायम मनातच राहिले. अशीच एक स्पेशल मला पूर्वी एकदा भेटलेली.
लहानपणी मला घरी कंटाळा आला की जवळच्या बागेत जायची सवय होती. आम्ही खूपदा उन्हाळयाच्या सुट्टीत जांभळाच्या, आंब्याच्या, खजुराच्या बिया घेऊन जायचो. तिथे मातीत रुजवून ठेवायचो. कधी तिथल्या चिमण्यासाठी दाणे, तर कधी कुत्र्याच्या पिल्लांसाठी दुपारची पोळी अस बरंच काही सोबत असायचं. तिथे ही अशी एक स्पेशल मुलगी भेटली होती. तिच्या आईसोबत ती यायची. वय पंधरा सोळा असेल. ती आली की तिला झोपाळा खेळायची भारी हौस. तिथे शाळेत शिकणारी काही लहान मुले यायची. ती आली की ती मुलं सुरवातीला लांब पळायची. एक दोन दिवस हा क्रम सुरूच होता. नंतर बऱ्याच दिवसांनी एकदा आम्ही गेल्या असताना ती त्या शाळेतल्या मुलांना झोक्यावर बसवून झोके देताना मी पाहिलं. अचानक असे काय झाले असेल ? तेव्हा प्रश्न पडला होता. मग एकदा ठरवून तिची ओळख करून घेतली. तिच्या आईने तिची ओळख करून दिली. तिने एक गाणं पण ऐकवलं. थोडा वेळ बोलले, तेवढ्यात तिथली लहान मुलं आली आणि तिला घेऊन गेली. नंतर बरेच दिवस मी बोलले तिच्याशी. आमच्यासोबत खेळली ही होती. जमेल तस तिला ही तिथले खेळ शिकवले. एक चांगली मैत्रीण मिळाली होती. तिला तेव्हा सांगायचे होते " ती खूप स्पेशल झाली तिथल्या सगळ्यांसाठी." पण नंतर ती आलीच नाही. आमची सुट्टी संपली तसे माझे जाणे ही बंद झाले. नंतर जेव्हा शाळेत त्या मुलीला पाहिले तेव्हा झपकन बागेतली हरवलेली मैत्रीण डोळ्यासमोर आली.
शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती. ती त्या दिवशी वक्तृत्व स्पर्धेत बोलू शकली नाही. तेव्हा तिला पाहिले. तिचा चेहरा पडलेला. तेव्हा आधीचे राहिलेले बोलणे आता पूर्ण करावे असे वाटले. तिला सांगावे. मी तिच्या जवळ गेले तिला सांगितले, " ती स्पेशल आहे...वेगळी आहे पण खास आहे. "
एक फिजीकली चॅलेंज तर दुसरी मेंटली चॅलेंज अशा दोन वेगवेगळ्या भेटीत मला दोन सशक्त मन भेटले. ज्यांनी इतरांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केले. या समाजाला ज्याची गरज आहे अशी ऊर्जा त्यांच्यात खर तर होती. ती जपण्याचे धाडस या व्यस्त समाजात त्यांचे आई वडील करू शकतात हे ही कमी नव्हते. ती स्पेशल होती म्हणून लक्षात राहिली. ते वेगळेपण त्यांना पुढे शक्ती देईल.
4 comments:
अशाच व्यक्ती खूप स्पेशल असतात.
खूप सुंदर दीदी👌
धन्यवाद ओमकार 🙂
खूपच छान शब्दांकन
धन्यवाद
Post a Comment