Wednesday, 9 September 2020

पालची यात्रा

       बऱ्याच दिवसांची घरच्यांची इच्छा, आजी आजोबांचा दृढ निश्चय आणि आमचा उत्साह सगळेच योग जुळून आले आणि पालच्या खंडोबाचे जागृत देवस्थान पाहण्याची योजना आखली. तिथून पुढे कोल्हापूरला जाण्याचे बेत आखले होते. मावशीचे नवे घर पाहण्याची उत्सुकता होती. त्यामुळे पहाटेच्या प्रहरी ठरल्याप्रमाणे आम्ही सामानाची बांधाबांध केली आणि सातच्या सुमारास नेहमीच्या ठोक्याला " धावडशी " ला जाणारी बस घरासमोरून गेली. ती पुन्हा चार प्रवाशांना घेऊन दारासमोरून जाणार होती. तेवढा वेळ आमच्याकडे होता. सगळे सामान समोर असताना ही त्याची चार वेळा पडताळणी झाली. काही मागे सुटायला नको म्हणून किती तरी वेळा उजळणी केली. " चला चला निघू लवकर " म्हणत म्हणत बस आली आणि धावडशीने धावत्या वेगात सातारा बस स्टँड गाठले.
प्रवास म्हणले की काही ना काही साहसी खेळ येणारच याची अंधुक चाहूल लागलेलीच होती. मागच्या सीटवर काही लहान मुले बसली होती. नऊ दहा वर्षाची असतील. बस मध्ये चढल्यापासून त्यांचा गोंगाट काही कमी होत नव्हता. जास्त प्रवासी नसल्याने चालत्या बस मध्ये नुसता धुडगूस सुरू होता. त्यांच्या मातोश्री " सोन्या गप बस इकडे..." म्हणून थकल्या. सोन्या काही ऐकेना. शेवटच्या सीटवर बसून काहीतरी मजा मस्ती करताना अचानक सोन्या आणि त्याची भावंड एकदम घाबरली आणि मोठ्याने रडूच लागली...झालं ना ! नक्की काय झालं बघायला मातोश्री मागे आणि कंडक्टर सकट सगळ्या प्रवाशांच्या नजरा मागे, सोन्या " उंदीर ...उंदीर " ओरडतच आई जवळ येऊन गप गुमान बसला. छोटेसे उंदराचे पिल्लू आणि सगळा गोंधळ शांत अगदी सोन्या ही. वातावरण शांत झाले ना झाले धावडशी स्थानकात बस दाखल झाली.
पुढे ठरल्याप्रमाणे काशीळ गावी जाण्यासाठी आम्हाला बस पहायची होती. नियोजित वेळापत्रकानुसार त्यावेळी ती आमची वाट पाहत तिथे हजरच होती. पटापट बस मध्ये बसलो. सातारा स्टॅन्ड वर गेलं की सगळ्यात आधी आठवतं ते " सातारचे कंदी पेढे " इतके दिवस इथेच होतो तरी पुन्हा पेढे घेण्याचा मोह काही आवरता आला नाही. सगळे गाडीत बसले आणि मामानी पेढे आणायला दुकान गाठले. कंडक्टर आले, बस सुरू झाली तरी मामा काही आला नाही. तेव्हा फोन ही आमच्यासाठी नवा पाहुणा होता. त्यामुळे खिडकीतूनच मामा कुठे नजरेस पडतो का पाहिले. बस जवळ जवळ निघाली आणि स्थानकाबाहेर गेल्यावर मामाने बस थांबवुन सिंघम एन्ट्री घेतली. कंदी पेढ्याचा गोडवा तेव्हा थोड्या वेळासाठी कमी झाला होता. गाडी सातारा सोडून पुढे आली होती. माझा आवडीचा छंद म्हणा किंवा उत्सुकता म्हणून वाटेत जी छोटी छोटी गाव लागतात त्यांची नाव वाचायचे. काही अगदीच मजेशीर होती ती लक्षात राहायची. अशीच नवी गावं एक्सप्लोर करताना तिथं " अतीत गाव " ही वाचलं आणि नवल म्हणजे तिथे बस थांबली. हातात तिखट मीठ लावलेला पेरूचा तुकडा आणि आपल्या आडनावाचे गाव सापडल्याची खुशी चेहऱ्यावर घेऊन तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. काहीच नाही तर किमान या प्रवासात आपलं गाव मिळाल्याची ही एक अचिव्हमेंट होती. तुम्ही कुठले म्हणल्यावर द्यायला एक उत्तर आता माझ्याकडे होते.
गाडी सुरू झाली. बस मध्ये बसायचं म्हणलं की आपली पहिली धाव असते खिडकीसाठी. आम्ही भावंड खिडकीचा प्रत्येकाला लाभ घेता येईल यासाठी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत असू. यावेळी मात्र असे झाले नाही. खिडकीतून आत येणाऱ्या बाभूळ झाडाने चांगलीच झोप उडवली. रस्त्यात घनदाट झाडी असताना नकळत एक झाडाची फांदी खिडकीतून आत आली आणि त्याची पान लागून गेली. डुलकी मारणारे खिडकीतले मुसाफिर खडबडून जागे झाले. मागे बसलेली म्हातारी आजी " भूत आला...भूत आला " म्हणून ओरडायला लागली. थोड्या वेळासाठी क्षणिक शांतता आणि नंतर सगळ्यांनी च बाभळाच्या भुताचा आनंद घेतला. आजीसोबतच्या नातवाने " भूत पुन्हा येईल " म्हणत आजीची विंडो सीट स्वतःकडे घेतली. आजी ही हसून " घे बाबा..घे तुझी शीट " म्हणत चार हात लांब झाली. गोंधळ वेगळाच पण लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे आजी पुढचा संपूर्ण प्रवास नातवाला जवळ घेऊन कवटाळून बसली.
काशीळला उतरल्यावर तिथल्या लोकल टॅक्सीने सहज पालीच्या खंडोबाचे दर्शन झाले. सगळे होम हवन, अभिषेक झाल्यावर मंदिराची कोरीव बांधणी पाहिली. तिथे खंडोबाच्या यात्रेत रथयात्रेत फिरवला जाणारा भव्य रथ पाहिला. ज्यावर हत्ती, घोडे याचे सुबक कोरीवकाम दिसले, तिथले गगनाला भिडणारे दीपस्तंभ, मंदिराचा कळस आणि मंदिर सर्वांनी हळदीची पिवळी शाल पांघरली होती. भव्य हत्तीचा ऐरावत मी पहिल्यांदाच तिथे पाहिला होता. देव दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे आलबेल आहे म्हणे पर्यन्त कुठे तरी माशी शिंकली. आम्ही ज्या गाडीत बसलो होतो त्यात जिथे आजोबा बसले होते त्याच सीटच्या खाली मोठ्या आवाजाचा स्पीकर ठेवला होता आणि त्यावर कुठल्याशा हिंदी चित्रपटातले भडक गाणे लावले होते. बिघडलेल्या नव्या पिढीवर थोडा वेळ टिप्पणी करून आजोबांनी दुसऱ्या गाण्याची फर्माईश केली. गाणं काही बंद होईना. अचानक गाण्यासोबत गाडीच बंद पडली. मुख्य रस्ता अर्धा किलोमीटर दूर होता. आजोबांनी गाणं बंद झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला पण गाडी सुरू होईल या आशेवर गाडीत बसलेल्या सगळ्या पुरुष मंडळीना गाडी ची ढकल गाडी करावी लागली. त्यात गंमत म्हणजे आमच्या सोबतचा एक प्रवासी त्या ड्रायव्हरला ओरडण्याऐवजी गाणी म्हणत म्हणत गाडी ढकलत होता " साथी हाथ बढाना ...एक अकेला थक जयेगा मिल कर धक्का लगाना " " दे धक्का " असे काहीसे शब्द तेव्हा त्याच्या मुखातून येत होते. नाही म्हणता म्हणता काशीळ गाठले. यात्रेतील रथ ओढण्याचे सामर्थ्य तेव्हा त्या सगळ्या पुरुषांमध्ये आले असावे. काशीळला पोहोचलो. तिथून पुढचा थांबा कोल्हापूर ठरवला होता पण तिथे जी गाडी आली ती होती उम्रज गावी जाणारी . पुढची गाडी तासाभराने होती. त्यामुळे मिळाली त्यात पटकन चढलो. गाडी उम्रजला येई पर्यन्त दुपारचे रखरखीत ऊन आले होते. रसवंतीच्या थंडगार उसाच्या रसाने जीव शांत झाला. पुढे कोल्हापूर गाठण्यासाठी लागणारी ऊर्जा तिथेच मिळाली. योगायोगाने कोल्हापूर गाडी ही लगेच आली त्यासाठी ही द्रुतगती मार्ग ओलांडण्याचे दिव्य करावे लागले, पण आम्ही सुखरूप कोल्हापूर गाठले. मावशीच्या नव्या घरात गृह प्रवेश झाला. सर्वांच्याच हा प्रवास लक्षात राहिला.

No comments:

पर्यावरण संवर्धन

आपल्या भोवतालचे वातावरण, आजूबाजूचा परिसर आणि पर्यावरण यांचा आपल्या विचारांवर, प्रगतीवर आणि जगण्यावर दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात ...