प्रेम आणि हट्ट या दोन भावनांमध्ये आपली कधी कधी गल्लत होत असते. या दोन परस्पर विरोधी भावना मध्ये, माणसाचं मन हे एक समुद्रासारखे लाटावर वाहत असते. ज्या वेळी ह्या परस्पर विरोधी भावनांच्या मोठमोठया लाटा येतात. त्या वेळी तो समुद्र जोरजोरात उसळू लागतो, नाहीतर एकतर शांत होतो. आपल्या समोर येणारी प्रत्येक व्यक्ती किंवा परिस्थितीनुसार या लाटा कमी जास्त अंतराने नेहमीच उसळत असतात. जर उत्कट भावनेने उसळले तर शांत करायला लागते ते प्रेम याउलट त्याचा उद्रेक व्हायला लागतो तो हट्ट.
आपलं मन एक स्क्रीन आहे ज्यावर दररोज वेगवेगळे प्रसंग दिसतात. ती नेहमी बदलत असते आणि खर तर बदलली पाहिजे कारण सगळे दिवस सारखेच नसतात. आज जे आहे ते उद्या नसेल कदाचित. किंवा आज जे नाही ते उद्या मिळेल. यात काहीच स्थिर नाही. स्थिर आहे ते मन आणि ते स्थिर ठेवण्याचे काम करते ते प्रेम.
लहानपणी एखादी वस्तू आवडली की आपल्याला ती हवी असायची मग त्यासाठी काही वाट्टेल ते करायचं हा हट्ट. पण एखादी वस्तू आवडल्यावर आपण ती आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला जर देऊ शकलो तो ही ती सांभाळून ठेवील या भरवश्यावर देणं हा विश्वास. हे झालं प्रेम.
दुपारी झाडांना पाणी देता देता थोडं पक्षांना पण शेजारी ठेवायची सवय मला आईमुळे लागली. पुढे तो दिनक्रम झाला. त्यांनी ते प्यावं ही माझी इच्छा असते. ते माझ्या नकळत येतात आणि पाणी पिऊन उडून जातात. दुसऱ्या दिवशी स्वतः हुन येतात. त्यांची काळजी आहे म्हणून त्यांना मी पिंजऱ्यात बांधून ठेऊ शकत नाही किंवा पुन्हां पुन्हा येण्यासाठी भाग पाडू शकत नाही. ते आपसूक येतात आणि सकाळ सकाळी चिवचिवाट करतात. तसेच काहीसे प्रेमाचे गणित असावे. प्रत्येकाने प्रेमात आंनदी असलं पाहिजे पण त्यात असलेला आनंद हा कोणत्यांही वस्तू किंवा माणसात नसावा. आपण इतरांना आवडू लागतो. कोणीतरी आपल्याला आवडू लागते बरेचदा हे आवडणे म्हणजे स्वभाव असू शकतो, त्याच दिसणे आणि वागणे, बोलणे असू शकते. मग जर तो स्वभाव बदलला, चेहरा बदलला तर काल आवडणारी व्यक्ती अचानक आवडेनाशी होऊ शकते, जर ते प्रेम एक गोष्टी पर्यंत सीमित ठेवलं तर ती गोष्ट नाहीशी झाली की दुरावण्याचे दुःख ही येतंच पण त्याला जर कोणत्या वस्तू किंवा व्यक्तीच्या ही पुढे नेलं तर आपोआप ही भावना वैश्विक होते, ज्या प्रमाणे एखादे घर समुद्र किनारी असेल तर लाटा येऊन ते उध्वस्त करण्याची भीती असते पण तेच घर जर लाटापासून दूर एखाद्या स्थिर ठिकाणी असेल तर कितीही लाटा आल्या तरी आपलं घर स्थिर राहील आणि आपण लाटांचा आनंद ही घेऊ शकतो. इथे आपलं घर म्हणजे मन आहे, ज्याचा आनंद हा कोणत्याही भौतिक सुखात नाही तरीही त्याला ते सगळं आनंदाने उपभोगता येते. कारण त्यात ही ते रमते. ज्याप्रमाणे लहानपणापासून आई- वडिलांचे प्रेम मिळाले तरी आपण कधीतरी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यापासून दूर जातो तसेच जर प्रेमात राहायचं तर वैश्विक राहू शकतो. प्रेम देणे हा आपण निवडलेला पर्याय असू शकतो. त्यात दुरावण्याचं भय नसतं. चुकलं तर वाट दाखवत ते प्रेम, खुपल तर काळजी करत ते प्रेम आणि वाट वेगळी असली तरी त्यावर चालण्याचं बळ देतं ते प्रेम, जग रहाटी शिकवत ते प्रेम. पण याउलट जे हवंय ते कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही थराला जाऊन मिळवणे हा हट्ट. प्रेमाला अदृश्य सीमा असतात. हट्टाला नाही. प्रेम द्यायला शिकवते तर हट्ट घ्यायला. प्रेम डोळे उघडते तर हट्टाने ते मिटतात. प्रेम माणसांना जोडते तर हट्ट ते तोडण्याचे काम करते. प्रेमात आपुलकी आणि आनंद आहे तर हट्टात अहंकार आणि असूया. त्यामुळे जर कोणाला जिंकायचं असेल अगदी स्वतः ला सुद्धा, तर प्रेमभाव ठायी ठायी रुजवावा, कारण प्रेम हे आपल्याच हृदयात असते.
5 comments:
वाहः वाहः
खुप सोप्प करुन लिहिले आहे
धन्यवाद
प्रेम स्वभावावर होतं,बंधमुक्त पक्ष्या प्रमाणे वागावावं ते परत येणारच , प्रेम अमर्याद असावं हे बोधप्रद आहेच, सर्वांचे सार म्हणजे प्रेम निरपेक्ष करावं, प्रतिसादाच बंधन नसावं, रेशीम गाठी प्रमाणे असावं, सैलसर पण तरी स्वखुशीने जोडलेले असावे.
सुंदर प्रेमाचा अविष्कार
प्रेम स्वभावावर होतं,बंधमुक्त पक्ष्या प्रमाणे वागावावं ते परत येणारच , प्रेम अमर्याद असावं हे बोधप्रद आहेच, सर्वांचे सार म्हणजे प्रेम निरपेक्ष करावं, प्रतिसादाच बंधन नसावं, रेशीम गाठी प्रमाणे असावं, सैलसर पण तरी स्वखुशीने जोडलेले असावे.
सुंदर प्रेमाचा अविष्कार - आशिष
बरोबर आशावाद घेतला आहे. धन्यवाद 😊
Post a Comment