Tuesday, 20 January 2026

तळ्याकाठी


कधी कधी समोर असंख्य गोष्टी असतात त्यात काय निवडायचं ? हे मनात द्वंद्व सुरू असते. अशा वेळी या मनाची स्थिती त्या गाण्यासारखी होते “ मन तळ्यात मळ्यात ...”

ही तळ्यात मळ्यात असणारी मने अशीच एखाद्या तळ्याकाठी एकत्र येतात. ती तळ्यांची सहल होते.

अशीच तळ्यांची सहल आम्हा युवाशक्तीच्या प्रमुख दीपा ठाणेकर मॅडम यांनी पुढाकार घेऊन आम्हाला साऱ्यांना सोबत घेऊन पार पाडली. सगळ्याच मैत्रिणींनी त्यांचा आनंद घेतला. या संपूर्ण सहलीतले काही क्षण पानावर उतरवताना या आठवणी कायमच्या मनावर कोरले गेल्या आणि माझं आणखी एक आठवणीतले पान भरले.

वर्षा सहल म्हणलं की पाणी आणि पाऊस आला. त्या दिवशी सहलीत पाऊस फक्त डोकावून गेला मात्र पाण्याचा संपर्क आला तो प्रत्येक तलावात. पाण्याकडे नुसतं पाहण आणि पोहण इतकं नसून त्यातून शिकणं, त्याला समजून घेणं गरजेचे आहे. ते लेखिका नूतन बांदेकर यांच्यामुळे या सहलीतल्या चर्चेतून समजले. त्यांनी लिहिलेल्या “ मुक्काम पोस्ट तलाव “ या पुस्तकाची सोबत होती आणि त्यांनी स्वतः आम्हाला प्रत्येक तळ्यात दडलेले मर्म सांगितले.


या सहलीत विशेष म्हणजे काही शिकणारे, काही शिकवणारे असे विद्यार्थी आणि शिक्षक हे एक समीकरण इथे जुळून आले होते. मला माझ्या शाळेतल्या वर्षा सहलीचा दिवस तेव्हा आठवणे अगदी साहजिक होते. दुपारच्या जेवणासाठी गोल वर्तुळात बसताना आपले शाळेतले दिवस मी शोधत होते.

या सहलीत मला आणखी सोबत मिळाली ती वनश्री, ज्योती मॅडम, स्वाती मॅडम, मनीषा मॅडम, प्रथमेश, आकाश आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी मैत्रिणींची. प्रवासातला अनुभव लिहिताना त्याची सुरुवात झाली ती “ ओम जय जगदीश हरे “ ने. एका शंकराच्या मंदिराला भेट दिल्या असताना जसे आम्ही गाभाऱ्यात एकत्र येऊन आरतीचा सुर लावला. मागे आपोआप काही माणसे येऊन या सुरात सूर मिसळून गेली. नकळत. एकमेकांना जोडण्याचे माध्यम प्रार्थना झाली होती. मंदिराच्या बाजूलाच तळे होते. पण येणाऱ्या जाणार्यांनी मंदिराचे पावित्र्य जपता जपता त्या तळ्याला मात्र दुर्लक्षित केले होते. तिथे देव कोणाला दिसला नसावा का ? या प्रश्नाला सोबत घेऊन मी तिथून निघाले. एक एक करत आम्ही काही रानातली तळी, काही गावातली तळी, काही शहरातली तळी पाहिली. काही तळी हसणारी होती ज्यावर फुलपाखरे बागडत होती. पक्षी फिरकत होते. तळ्यात जीवन फुलत होते. काही तळी रडणारी होती, ज्यात कचऱ्याची काळी सावली होती. प्रकाशात येण्याची त्यांना नितांत गरज होती. काही धार्मिक तर काही भावनिक अशा नात्याने सारे बांधले गेले होते.

मी मात्र शोधत होते मनातलं तळं जे अजून ही तळ्यात मळ्यात करत होते. या प्रवासात आम्ही गेलो एका रंगीत शाळेत. तिथल्या रंगवलेल्या भिंती, तिथले वर्ग आणि तिथलं टेरेस गार्डन पाहिले. तिथे शाळेतल्या मुलांनी लावलेली बरीच झाड होती. झाडांचे वेगवेगळे प्रकार होते. मुलांनी कलाकुसर केलेल्या बऱ्याच गोष्टी होत्या. एक छोटंस झाड जेव्हा अशा योग्य हातात येत, ते मातीत रुजलं जात. जपलं जातं. तेव्हा ते छोटं झाड एका सुंदर बागेची शोभा होऊन जातं. ते रोपं लावण्याचे काम त्या शाळेत नुतन मॅडम यांनी केलं होतं. आपल्या मनात ही छोटं झाड असतं जे हाताची वाट पाहत असते. एक तळं जे फुलांची, पक्षांची वाट पाहत असते.


एका तळ्याकाठी कवितेच्या ओळी म्हणताना पाठीशी इंद्र धनुष्य तयार होत होते. आपल्यात दडलेल्या रंगांची ते साऱ्यांना आठवण करून देत होते.
पक्षी वा झाड असो किंवा आपलं मन असो ओलावा शोधत शोधत येतं ते एका तळ्याकाठी. सगळं विसरून आपल्यासारखं कोणाला तरी शोधतं. तळ्यावरच्या गप्पा मनाचा तळ गाठतात. अशा वेळी मनातलं कधी कोरडं होतं चाललेलं तळं आपसूक भरून वाहू लागतो.

वाटेत आहे एक तळे
त्या निळ्या तळ्याकाठी
रोज पाहुणे येते कोण
कोण येते कशासाठी
तळ्याकाठी डोलत असती
इवली पिवळी गवतफुले
झाडांच्या असतात कमानी
सजते त्यात निळे तळे
तळ्यात असते मध्ये मध्ये
कमळाची लोभस नक्षी
तळे पाहते आकाशीचे
उडणारे सुंदर पक्षी
तळ्यास पडते आता
मनामध्ये एक कोडे
कशासाठी, कोणासाठी
कोण येते माझ्याकडे
तळे म्हणजे एक जग
एक विश्व कोणासाठी
तेव्हा कळले तळ्याला
येती कोण तळ्याकाठी

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...