Monday, 19 January 2026

प्रतीक्षा

“ आपली कुणी तरी वाट पाहतय...” हे चित्र डोळ्यासमोर आणलं ना, की आई डोळ्यासमोर येते. पुढे हळूहळू त्यात बदल होत जातात आणि आपल्या जवळच्या माणसाला आपण ती जागा देत जातो. कवी संदीप खरे यांचे “ नसतेस घरी तू जेव्हा ... “ हे गाणं या प्रसंगी आठवल्याशिवाय राहत नाही. त्यातून डोकावणारी उत्कटता, काळजी आणि हताश मन म्हणजेच वाट बघणे का ? असा प्रश्न मला पडला. त्याचे उत्तर शोधता शोधता पुढे पुढे लिहीत गेले.

वाट पाहण्यातला तो एक नकोसा सूर कधी आनंद देणारा होऊ शकतो? कुणासाठी उत्सुकता. कुणासाठी वाट पाहणे हवे हवेसे वाटू शकते ! म्हणजे पहा ना ...

आज अपयश आले तरी उद्या पुन्हा प्रयत्न करायचेच हे मनाचे वाट पाहणे किती आशावादी असते ! उद्या मोठा प्रवास करायचा आहे, म्हणून आज रात्र सरण्याची वाट पाहणे यात आलेच की. कुण्याच्या तरी जन्माची वाट पाहणे. नव्या कुणाच्या तरी भेटण्याची वाट पाहणे. कुणाच्या तरी बोलण्याची वाट पाहणे. कधी कधी फक्त एखाद्याच्या दिसण्याची वाट पाहणे. वाट पाहणारी आशेवर असलेली अशी मने भोवताली असतात. ती ही आला दिवस कुठल्या तरी वाटेवर वाट पाहत काढत असतात. पण आनंदाने...

डोळ्याला पट्टी लावलेली सुषमा. तिचे कुटुंब तिच्या समोर होते. जन्मापासून दृष्टी नव्हती. तिने तिच्या आयुष्यातली बारा तेरा वर्षे वाट पाहत काढली होती. तिच्या समोरचा झाकलेला पडदा आज तिच्यासाठी उघडणार होता. आज पहिल्यांदा ती पाहणार होती. तिच्या आजूबाजूचे सगळे जग, तिच्या जवळची माणसे. नवीन जागा, नवे रंग आणि नवीन स्वप्न. पण त्याला एक रितेपणाची किनार होती. हे सारे जग तिच्या बाबांच्या डोळ्यांनी ती पाहणार होती. तिच्या समोर तिच्या वाट पाहण्याचा अखंड बारा वर्षाचा तप होता. पाहता क्षणी ती आईला बिलगली. असे हे वाट पाहणे... संयमांचे... सुख दुःखाच्या क्षणाचे तिच्या समोर होते.

रोजच्या प्रवासात आपली कोणीतरी वाट पाहतय... आपण कोणाची तरी वाट पाहतोय... सारे धावणारे विश्व ज्या एका ठिकाणी स्थिर होते. जिथे धरणी सागरा मिळते अशा ठिकाणी कोणीतरी वाट पाहतय. हेच असेल कदाचित ते हवे हवेसे वाट पाहणे !


No comments:

पर्यावरण संवर्धन

आपल्या भोवतालचे वातावरण, आजूबाजूचा परिसर आणि पर्यावरण यांचा आपल्या विचारांवर, प्रगतीवर आणि जगण्यावर दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात ...