कालची गोष्ट आहे, बाप्पाच्या विसर्जनाला जोरजोरात
ढोल, ताशाच्या ठेक्यावर नाचणाऱ्या लहानग्यांच्या टोळीत एक चिमुरडी अचानक घेरी येऊन
पडली, जवळपास साखर लिंबू पाणी असे काही नव्हते. शेवटी बाप्पाला वाहिलेला प्रसाद तिच्या
तोंडात पडला आणि क्षणभरात उठली. उत्साहात चिमुरडी बाप्पाला
निरोप ही देऊन आली. " पुन्हा कधी येणार बाप्पा " असे आर्जवी प्रश्न ही विचारू
लागली. अचानक कुठून ही शक्ती आली ? जेव्हा
तो येतो, कोणत्या रुपात माहीत नाही पण येतो तसा आपले गडबडलेले, विस्कटतलेले सावरून
जातो. नुकताच झालेला पावसाचा प्रकोप आणि त्यातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी मिळालेले मदतीचे हात कोणी पाहिले, पण मदत करणारे दानशूर हात आपोआप एकत्र येतात. अनोळखी नात्याच्या
आधाराने का होईना आपल्या ताटातली भाकरी दुसऱ्याच्या ताटात घालावी वाटते. असा हा विघ्नहर्ता विघ्न आणत नाही असे नाही, पण त्यातुन बाहेर पडण्यासाठी
हात ही तोच देतो. सुखांची गणती तेव्हाच होते जेव्हा विघ्न दारात उभी असतात अन देव्हाऱ्यात बाप्पा हे सारं पाहत असतो. जेव्हा विदारक दुःखातून
त्याच्या असण्यावर शंका घेणारे नास्तिक मन व्हायला लागते तेव्हा आणि तेव्हाच या शक्तीची
प्रचिती येते आणि मग इलाज करून थकलेले आई- वडील त्याच्या मुलाला बरे होताना , निर्विकार हसताना पाहतात.
गरिबीचे चटके बसलेले हात लक्ष्मीने भरून वाहू लागतात. आईच्या मायेला पोरके झालेल्या
कुणाला मातृत्वाचे छत्र मिळते. वासनेच्या आहारी गेलेले
मन बाप्पाच्या नामस्मरणात मग्न होते. कोरडे पडलेले अंगण
मुलाबाळांनी भरून निघते. उदासीनता संपून उत्साहाला
उधाण येते. विघ्नहर्ता तेव्हा फक्त मूर्तीत नाही तर माणसात,
या निसर्गात किंवा निर्जीव वस्तू मध्ये ही दिसायला लागतो. असा हा विघ्नहर्ता प्रत्येकाला
आयुष्यात कधी ना कधी भेटतो. गरज असते त्या विश्वासाची आणि श्रद्धेची, म्हणून एके ठिकाणी म्हटले आहे,
“गणाचा गणपती, विघ्नाचा विघ्नहर्ता, तू सुखकर्ता, तूच कर्ता आणि करविता”

No comments:
Post a Comment