Tuesday, 15 September 2020

श्रावण

        रोजच्या रिपरिपणाऱ्या पावसाच्या सरींनी हवेत गारवा आणला होता. हवेतील उबदारपणा सकाळच्या प्रहरी प्रकर्षाने जाणवत होता. भेगाळलेल्या जमिनीवर नव्याने अंकुर फुटत होते. डोंगर कड्यावरून कोसळणारा प्रवाह सृष्टीमध्ये सुंदरता आणत होता. झाडाझुडपांना, वेलींना बहर आला होता. कणाकणातुन या सृष्टीत नव्याने जीवन फुलत होते. ही सारी तो आल्याची चिन्ह होती. तो म्हणजे “श्रावण.”

 

आता ही धरा पुन्हा नव्याने नवं वधूप्रमाणे सजणार होती. पानाफुलांमध्ये, नदीनाल्यात, चराचरात, पशु पक्षांच्या किलबिलाटामध्ये, भोवताली वातावरणात नादमाधुर्य निर्माण झाले होते. नवी उमेद, नवा उत्साह आणि पावित्र्य घेऊन श्रावण उंबरठयावर आला होता . हा सुंदर साजीरा श्रावण  घराघरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. घराघरात उत्साह भरभरून वाहत होता. नागपंचमी, गोपाळकाला, नारळी पौर्णिमा असे सण एका मागोमाग एक सज्ज होते. प्रत्येक सणाचे वेगळं पौराणिक महत्व आणि वेगळा ढंग. स्वतः मध्ये आणि सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा रुजवली जात होती. स्त्री वर्गात श्रावणातले वेगळे महत्व असते ते “ मंगळागौरीचे.”  लग्न होऊन दूर गेलेली लेक या सणाच्या निमित्ताने पुन्हा आपल्या माहेरी आली होती. सैल झालेले ऋणानुबंध पुन्हा जोडले जात होते.   गाठीभेटीनी नात्यामधला रेशमी बंध बहरत होता. नात्याचा ओलावा एकमेकांना जोडून ठेवत होता. नवा उत्साह आणि चैतन्य प्रत्येकात भिनत गेले होते. माणसा माणसामध्ये निर्माण होणाऱ्या या दृढ विश्वासामुळे समाज एक संघ झाला होता आणि नवं निर्मितीकडे वाटचाल सुरु झालीच होती. माणसामध्ये आणि सृष्टीमध्ये होणारे बदल हा श्रावण सोबत घेऊन आला होता.

 

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...