Thursday, 17 September 2020

रोजगार मेळावा

        वयाच्या एका टप्प्यावर आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रिय जनांसाठी, आपल्याला काहीतरी करायचंय. ही भावना आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. कधी गरज म्हणून तर कधी स्वतः च्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणून आपण त्यासाठी हवे ते कष्ट घेतो. एकदा ही जाणीव मनात घर करून बसली की मग दुसरे सगळे विचार आपोआप दूर होतात आणि ती एकच गोष्ट समोर दिसू लागते. अनेकांच्या आवडी निवडी , स्वप्न, मौजमजा कधी कधी मागे पडत जातात. तेव्हा आपला प्रगतीचा वेग, त्यासाठी मिळणारी किंमत सारेच मोजले जाते. अशा आयुष्याच्या वळणावर असणारे सारे एकत्र एका छताखाली येतात ते रोजगार मेळाव्यात.
काही येतात छोटी – मोठी स्वप्न घेऊन. काही फक्त अनुभव घ्यायला. काही परिस्थितीला कंटाळून. काही नवी सुरवात करायला. ते ही दोन – चार तासाचा प्रवास करून. मेळाव्याची सुरवातच पुढार्यांच्या भाषणाने होते. विकासाच्या दिशेने जाताना आपण काहीच पाऊले दूर आहोत असे चित्र आपोआप डोळ्यासमोर तयार होते.
साग्रसंगीत स्वागत झालं की आलेल्या युवाना रांगेत उभे राहायच्या सूचना माईक वरून दिल्या जातात. त्या सूचना ऐकून झुंबड उडते आणि शाळेतल्या दिवसांची आठवण डोळ्यासमोरून जाते. मोठाले बॅनर्स, कंपन्यांचे स्टोल दिसतात तेव्हा एखाद्या एक्सिबिशन ला आल्याचा भास ही होतो. प्रत्येकाच्या डिग्री प्रमाणे दहावी पासून एम बी ए पर्यन्त सगळ्यांना वेगवेगळ्या वाटा दाखवल्या जातात. तुमचं करियर आणि तुमचा स्टोल तुम्ही निवडायचा असे धोरण असते. दोन मजली वास्तूत खालच्या मजल्यावर सगळ्या कंपन्या कळतात. त्यात आवड आणि निवड पक्की झाली की दुसऱ्या मजल्यावर मुलाखतीसाठी जायचे.
भाषण ऐकताना माझ्या शेजारी एक गृहिणी बसलेली होती. तिच्यासोबत चार वर्षाचा मुलगा होता. त्याला ती समजावत होती. “आत गेल्यावर मुलाखत घेताना विचारलं तर सांग मी एकटा राहीन. घाबरणार नाही.” त्याने ही मान डोलावली. संघर्ष कुठून सुरु होतो हे त्या मुलाने मूकपणे सांगितले.
काही वेळाने मी तिथून निघाले, निघताना वाटेत एक ताई याच रोजगार मेळाव्याचा कागद घेऊन शोधत शोधत समोर आली. “ ताई हे नक्की कुठल्या दिशेला आहे. मी रात्रीच्या गाडीने आले, इथले काही माहिती नाही ?”
मी म्हणाले “ हो हो, इथून सरळ जाऊन डावीकडे वळा... तिथे बोर्ड लावला आहे बाहेरच... तिथून आत जायचे. “
त्यावर त्या ताईने विचारले, “ थँक्स ताई , तिथे नोकरी मिळते ना...”
मला काय बोलावे ते सुचले नाही. स्मित हास्य करून मी तिथून निघाले.
जेव्हा “ इथे नक्की नोकरी मिळते का ?” असा विचारले, तेव्हा असे वाटले, जिथे लोकांची आयुष्य क्षणाक्षणाला बदलत असतात. तिथे नोकरीची शाश्वती!
असा हा रोजगार मेळावा नोकरीच्या शोधात अनुभव घेता घेता बरेच काही शिकवून गेला.

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...