Sunday, 20 September 2020

एक इच्छा

   
 बस स्टॉपवर दोन मित्रांचे संभाषण सुरू होते. अशोक आस्तिक आणि सुधीर नास्तिक विचारधारेचा. तेव्हा शेजारून दोन बायका डोक्यावर पदर, त्यावर टोपली आणि त्यात अंबाबाईची मूर्ती असं घेऊन दक्षिणा मागायला समोर आल्या. त्यांच्या तोंडून वाक्य आले “आईची इच्छा, बाबा...पुरी कर...बाबा. “ अशोकने पाच दहा रुपये टोपलीत टाकले. त्या बायका टोपलीत किती पैसे पडले न बघता आनंदून पुढे निघून गेल्या. त्यावर सुधीर थोड्याश्या नाराजीच्या स्वरात म्हणाला “ इच्छा यांची असते आणि नाव तेवढं त्या देवीचं, तुही सहज देऊन टाकलेस पैसे? अगदीच भोळा आहेस.” अशोकला थोडे वाईट वाटले. त्यावर अशोकने त्याची लहानपणची आठवण सुधीरला सांगितली,
“ लहानपणी एकदा माझी आजी तिच्या आजारपणात मला म्हणालेली, ज्ञानेश्वरी तेवढी वाचायची होती पण ती इच्छा राहिलीच रे... माझ्या कमजोर दृष्टीने आता हे शब्द ही वाचता यायचे नाहीत. माझी शेवटची इच्छा आहे अशोक... ही ज्ञानेश्वरी माझ्यासाठी वाचशील का?” तिचे ते शेवटची इच्छा म्हणून घातलेले गाऱ्हाणे ऐकून मला ही तेव्हा भीती वाटलेली.
शेवटी न राहवून मी म्हणालो “ तुझ्यासाठी वाचतो गं, मला कळणार नाही पण माझ्या आवाजात तु ऐक. “ वयाच्या बाराव्या वर्षी रोज एक एक पान करत तिला मी संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचून दाखवली “
त्यावर सुधीर म्हणाला “ अरे पण तुला कळत तरी होत का काय वाचतोय ते ? “
अशोक म्हणाला “ नाही... सुरवातीला ते वाचायला ही जड गेलं, पण फक्त आजीची शेवटची इच्छा म्हणून मी ते करत राहिलो, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या जिवलगासाठी करायची असते तेव्हा कोणताही विचार न करता आपण ते करतोच आणि तेच मी केलं “
“ मी जसे वाचायचो तशी आजी तिच्या शब्दात मला ते समजावून सांगायची. हळूहळू आजीने तिची शेवटची इच्छा म्हणून असं बरच काही माझ्या तोंडून वाचून घेतलं, नंतर कॉलेजच्या परीक्षेत मला जेव्हा पहिल्यांदाच अपयश आले. तेव्हा तिनेच मला तारले. निराषेच्या अंधारात मी चाचपडत असताना तिने माझ्याकडून भगवतगीता वाचून घेतली. कुतूहलाने मी त्यातल्या श्लोकांचे अर्थ शोधून काढले. स्वतः कडे पाहण्याची माझी दृष्टी मी त्यामुळे बदलू शकलो. मनात साक्षात्कार झाला. त्याचे निमित्त आजीची इच्छा होती. पण पुण्य माझ्या ही पदरात पडले. पुढे अपयशाची भीती कमी झाली आणि ज्यासाठी कष्ट घेतले त्याचं फळ मिळालं.”
“ आपल्या लहान सहान इच्छा आणि स्वप्न पूर्ण व्हावीत आणि ती आपण आपल्या डोळ्यांनी पूर्ण होताना पहावी हीच तर आपली मानसिक भूक असते. मग ते पूर्ण करण्यासाठी घेतलेले कष्ट अशा वेळी आपली जबाबदारी होऊन जाते. त्याला आपण आपले कर्मफळ म्हणतो. आपण हाती घेतलेले काम जर सदकारणी लागणार असेल तर त्याची कारणे शोधत बसू नयेत.... सुधीर, आता आजी पंच्याणवची आहे. आता ही घरी ती माझी वाट पाहते. काही तरी माझ्या कडून वाचून घेते मग निजते. “
आजीबद्दल अशोक कडून हे ऐकून सुधीरला नवल वाटले. त्यांचं संभाषण संपले आणि सुधीरने अशोकला गाभाऱ्यातल्या गणपतीला करतात तसा हात जोडून नमस्कार केला. “ देव इथेच दिसला रे... तुझ्यात “ असे म्हणत दोघे ही हसले. तेवढ्यात बस आली. ते दोघे ही बस मध्ये चढले आणि पाहता पाहता बस नजरे आड झाली.
प्रत्येक गोष्टीकडे आपण आपापल्या दृष्टिकोनातून पाहतो. अशोकने ही तेव्हा तिची शेवटची इच्छा म्हणून सुरवात केली होती, खरं सांगायच तर आपल्या इच्छा, स्वप्न आणि भीती या विस्तीर्ण आभाळाखालीच आपल्याकडून या गोष्टी घडतात. आपण रचनाकर्त्याने घडवलेले प्यादे असतो.

2 comments:

Siddhi said...

खूप छान मांडणी

जुईली अतितकर said...

मनःपूर्वक धन्यवाद 🌺😊

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...