“ गोष्टी माणसांच्या “ हे नुकतंच वाचनात आलेलं पुस्तक. मूळ लेखिका सुधा मूर्ती. लीना सोहोनी यांनी अनुवादित केलेले इंग्रजीमध्ये असलेलं मूळ पुस्तक “ how I tought my grandmother to read stories “
विचारांना भाषिक भिंत मुळी नसतेच. हे त्यातील एक एक पान वाचताना जाणवते. त्यातले मर्म हे तसेच स्थायी असते.
सुधा मूर्ती यांनी आपल्या आयुष्यातील निवडक प्रसंग गोष्टी रूपात या पुस्तकात मांडले आहेत. सुधा मूर्ती यांच्या विषयी लिहिण्याचा मोह आवरला नाही आणि पेन- वही समोर घेऊन लिहायला सुरुवात केली.
पुस्तकाच्या सुरुवातीला अर्पण पत्रात वाचायला मिळते “ माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना ...ज्यांच्या मुळे या वयातही माझं मन तरुण राहिलं आहे. “ हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव ह्या पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत आपल्याला जाणवतो. सुरवातीची पाने वाचताना मी माझ्या गावी पोहोचले. लहान असताना सुट्टीत दूरदर्शनवर पाहिलेली कथा सरिता आठवली. त्या पुस्तकात केलेले वर्णन त्यामुळे हुबेहूब डोळ्यासमोर आले. त्यात आपलं ही बालपण शोधण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला. सगळी पात्र आपोआप समोर उभी राहिली.
निरक्षरतेवर भाष्य करणारा पहिला भाग म्हणजे सुधा मूर्ती यांची संघर्षाची आणि साक्षरतेची पहिली लढाई होती. त्यांची पहिली वहिली विद्यार्थीनी त्यांची आजी होती. याची सुरुवात साप्ताहिकातील गोष्टीतून झाली. आजीला काशी यात्रेला जाण्याची प्रचंड इच्छा पण त्या काशीचे दर्शन आजी साप्ताहिकात छापून आलेल्या एका काशिक्षेत्रे या कथेतुन घेत होती. ती कथा सुधा जी त्यांना वाचून दाखवत. एक दोन दिवस सुधा घरी नसल्याने काशीक्षेत्रे पुढे वाचले गेले नाही. त्या साप्ताहिकातील काशिक्षेत्रे या गोष्टीतल्या दुमडलेल्या पानावर हात फिरवताना आजीला आपण निरक्षर असल्याची खंत वाटली. आपल्याला अक्षर ओळख नाही म्हणून तिच्या डोळ्यातून पाणी आले आणि त्याच जिद्दीने तिने परातीतल्या धान्यावर, पिठावर गिरवून अक्षर ओळख शिकून घेतली. हळूहळू त्यात सातत्य येत गेले आणि आजीने काशिक्षेत्रेचा शेवटचा भाग वाचून दाखवला. त्या क्षणी आजीच्या डोळ्यात पाणी होते.
आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती मग ते ज्ञान पिपासू कलाम असतील नाहीतर पहिल्या महिला इंजिनियर कर्मचाऱ्यांवर विश्वास टाकणारे जे आर डी टाटा. या प्रवासात भेटणारे सर्व दिग्गज व्यक्ती आणि आपले विद्यार्थी. प्रत्येकाने सुधाजींना लिहीण्यासाठी, नवे टिपण्यासाठी प्रवृत्त केले आहे.
यात फक्त त्यांचे अनुभव त्या सांगत नाही तर त्यातून काय घ्यायचे ते त्याच्यातली शिक्षिका शिकवते. एक उद्योजिका त्यातून यशाचा मंत्र देते. टेल्को कंपनीतली पहिली महिला कर्मचारी हे श्रेय आहे पण जे आर डी टाटा यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास इथे त्यांना जास्त महत्वाचा वाटतो. नारायण मूर्ती फक्त आपले जोडीदार नाही तर त्यांच्यात खूप चांगला मित्र त्यांना भेटतो. त्यात ही आपले स्वप्न “ इन्फोसिस “ साकार होत असताना आलेल्या अडचणी त्यांना आणखी खंबीर करतात.
रशियातील विशिष्ट पद्धतीने केलेला लग्नसोहळा आणखी एक विशेष आठवण, लग्नानंतर सहसा मंदिर, देवस्थान गाठले जाते. तर इथे मात्र सगळ्या जवानांना आदरांजली या निमित्ताने देण्याची पद्धत होती. देशासाठी बलिदान देऊन अमरत्व मिळालेल्या जवानांच्या प्रति संवेदनशीलता दाखवणारी ही प्रथा इथे त्यांना दुर्मिळ वाटते. इतर देशातील टापटीपपणा, स्वच्छता, यश आणि अपयश, पैसे त्यापेक्षा त्यांना आपले ऋणानुबंध, आपल्या देशातील लोकांचा दानशूर, कनवाळू स्वभाव जास्त भावतो. प्रत्येक “ का “ ला कारण शोधण्याची वृत्ती बरोबर की चूक ? हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावताना त्यांनी दिलेली उदाहरणे वाचता वाचता आपण आपल्या ही अनुभवाशी सहज रिलेट करू लागतो.
एका ठिकाणी रक्ताच्या नात्यामध्ये कलहाचे सुर आणि दुसरीकडे तान्ह्या बाळाची भूक भागवण्यासाठी दूध पाजून आपसूक जोडले गेलेले एक नाते. वेगळ्या दोन कुटुंबातील एकत्र झालेले दोन “ दूध भाऊ “ यातला फरक आपल्याला नात्यांची ओढ शिकवून जातो. परोपकारी वृत्ती आणि अति धनसंचय त्यामुळे विस्कटलेले आयुष्य. चुकांमधून शिकण्याची वृत्ती, संकटातही हसण्याची कला, जबर इच्छा शक्ती आणि सहृदय भाव. कामावरची निष्ठा आणि त्यातून मिळणारा आनंद अशा बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या कथेच्या रुपात मांडून व्यक्तिमत्व विकास, जीवनमूल्य शिकवत बलशाली मनाचा पाया सुधा मूर्ती यांनी रचला आहे.
आयुष्यात येणारे समाधान, तृप्ती, लाल भाताच्या कणगीच्या निमित्ताने शिकलेले दानाचे महत्व आपल्यात आपसूक झिरपत जाते. एक उत्तम मार्गदर्शक, समाजसेविका, एक शिक्षिका आणि एका मोठाल्या संस्थेला, माहिती आणि तंत्रज्ञानातील विश्वाला आपला बहुमोल वेळ देऊन कामात स्वतः ला वाहून घेणारी ही उद्योजिका. सोबत कुटुंबाचा भाग सांभाळत सामाजिक भान ठेवणारी प्रेरणादायी महिला. मुलाच्या सुयोग्य संगोपनात ही आनंद मानणारी आई. सुधा मूर्ती. आजीला बाराखडी शिकवण्यासाठी उचललेली लेखणी आणि पुढे विश्वाला अनुभवाची शिदोरी देणारी लेखिका असा त्यांचा प्रवास पुढे येणाऱ्या स्वप्नाळू, मेहनती, महत्वाकांक्षी मुलांपर्यंत, युवकापर्यंत पोहोचावा यासाठी हा छोटासा प्रयत्न.

6 comments:
पुस्तकाचे फार सुंदर विवेचन केले आहे
मी यातील काही गोष्टी वाचल्या व मला बोअर वाटलं पण एके दिवशी आमच्या वडिलांच्या हातीहे पुस्तक पडलं व त्यांनी ते अक्षरशः झपाटल्यागत वाचलं नव्हे आम्हांस वाचायला सांगितलं... मी पुन्हा काही गोष्टी वाचल्यात....अगदी सहज असे सोपे अनुभव सुधाताईंनी सांगितले आहेत.... म्हटलं तर काहीच नाही आणि म्हटलं तर खूप काही असं जीवनास उपयोगी येईल असं अगदी.
अतिशय वाचनीय पुस्तक. जसे वाचून पूर्ण झाले त्यावर काही तरी लिहावेसे वाटले. 🙂
मनःपूर्वक धन्यवाद प्रणिता ताई 😊
Post a Comment