शेजारच्या दिनूचा के. जी च्या वर्गात प्रवेश झाला. शाळेत त्याचा पहिला दिवस होता. त्याने मलाही त्याच्या शाळेत येण्याचा हट्ट केला. मी दिनूला शाळेत सोडायला त्याच्या सोबत गेले. दिनूला वर्गात सोडून काही वेळ तिथेच रेंगाळत होते. राष्ट्रगीत आणि नंतर प्रार्थना कानावर पडली. मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. तेव्हा दिवसाची सुरवात सगळ्यांची एकत्र शाळेच्या हॉल मध्ये व्हायची. प्रार्थना, गायत्रीमंत्र आणि पसायदानाने ती व्हायची. दहा-बारा वर्षापूर्वीच्या आणि आताच्या परीस्थितीत झालेला बदल तिथे प्रकर्षाने जाणवत होता. मी तिथेच त्याच्या वर्गाजवळ उभी होते. म्हणता म्हणता त्याच्या नव्या मॅडम वर्गात आल्या. उंच, गौर वर्णीय, टापटीप टीचर ऐटीत वर्गात आल्या आणि वर्गात शांतता पसरली . शांतता जी माझ्या बालपणी क्वचितच वर्गात पाहिली होती. ती आज पहिल्याच दिवशी इथे दिसली. मुलांची ओळख हि झाली. ती ही इंग्रजीत आणि आश्चर्य म्हणजे मुलं देखील भलत्याच आत्मविश्वासामध्ये बोलत होती. जणू काही आधीच आई- बाबांनी सारी उजळणी करून पाठवले असावे. माझ्या बालपणी शाळेचा पहिला दिवस म्हणजे घरच्यापासून दूर जाताना विरहाचे अश्रू आणि ते थांबवण्यासाठी शिक्षकांचे अविरत प्रयत्न. मी हे बदललेलं चित्र पाहून चाटच पडले.
काळ्या कुळकुळीत पाटीच्या जागी वह्या-पुस्तके आली. फळ्याच्या जागी प्रोजेक्टरचे पडदे आले. भिंगाचा चष्मा घालणाऱ्या आणि सतत धपाटे देणाऱ्या मास्तराच्या जागी मॅडम आल्या. आता मुलांच्या हाती तासाला स्मार्ट फोन आले तरी त्यात काही नवल नाही. शिक्षण पद्धतीत हा वाऱ्याच्या वेगाने होणारा बदल लक्षणीय आहे.
तीन – साडे तीन वर्षाची चिमुकली सुद्धा अल्फाबेट आणि पोएम इतक्या वेगाने म्हणतात कि पुढची पिढी आईन्स्टाईन ची असेल असं वाटत. लहान वयातच एवढे सारे कळते. समजते यात आनंदच आहे. परंतु या बौद्धिक आणि शैक्षणिक स्पर्धेत जगण्याची मजा आणि भाबडी निरागसता कुठेतरी हरवणार नाही ना...असे ही प्रश्न पडतात. मुलांच्या न कळत्या वयात त्यांच्या भविष्याची रूपरेषा पक्की करण्यासाठी कधी अजाणतेपणी त्यांचे निरागस बालपण तर हरवत नाही ना... छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद त्यांना अनुभवता येईल का? मोठ्या स्वप्नाच्या मागे धावण्याचे धडे त्यांच्या मुखोदगत असतील का? आनंद आणि समाधानाच्या व्याख्या त्यांच्या कशा असतील? फक्त बौद्धिक क्षमतावर उजवे डावे ठरवून पुढे त्याच निकषांवर करियरची दिशा ठरवली जाणार का? त्यांच्यातल्या कला कौशल्याबद्दल त्यांना स्वतः ला ओळख असेल का अशी शक्यतांची यादी मनोमन होत जाते.
आजच्या प्रात्यक्षिक आणि स्कील डेवलपमेंट च्या युगात ज्या झपाट्याने तंत्रज्ञान वाढत आहे; त्याच वेगात आपली स्वप्न हि आणखीन मोठी मोठी होत आहेत. विकासाची कास धरून आपली प्रगती करण हे जरी आपले ध्येय असले तरी या अमूल्य जीवनाचे यांत्रिकीकरण किती व्हावे? हे ही आपल्या मनाला विचारण्याची वेळ आली आहे.
तेवढ्यात एक बाई माझ्या जवळ आल्या आणि मला वर्गांवर शिकवायला जायला सांगितले. मी त्यांना खुलासा केला. दिनूला सोडायला मी इथे आले ते सांगितले. त्यांना मी तिथली शिक्षिका वाटले. हे सांगितल्यावर त्या ही हसल्या आणि मी ही तिथून पाय काढला. शाळा भरल्याची बेल वाजली आणि मुलांनी भरलेल्या त्या वर्गात डोकावून दिनू चा निरोप घेऊन मी तिथून निघाले.
2 comments:
क्या बात है जुई, अगदी वास्तवतेला धरून लिहीलंस
धन्यवाद प्रणिता ताई 😊
Post a Comment