नवी कंपनी जॉईन करून आता मला सहा एक महिने झाले असतील. कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये वेगळे भोवताल पाहायला मिळाले. जे आता कायमचेच आठवणीत राहणार आहे. कितीतरी आठवणी या सहा महिन्यात नव्याने तयार झाल्या. मनाला कधी हसवून तर कधी भावनिक करून भिजवून गेल्या.
कालचा दिवस विशेष होता. ऑफिसमध्ये निरोप समारंभ होता. सिनियर मॅनेजर यांचा निरोप समारंभ. त्यांच्याकडून कमी वेळात खूप काही शिकले. कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यांनी दिवसाच्या शेवटी सांगितलेली गोष्ट ऐकताना शाळेतल्या बाकावर बसून ऐकलेली गोष्ट आठवली. पुन्हा लहान व्हावे असे वातावरण आपोआप तयार झाले. गोष्ट खरच छान होती त्यामुळे लिहायचा मोह आवरला नाही. हळूहळू सगळ्यांचे तन, मन त्या गोष्टीने वेधून घेतले होते.
गोष्ट अशी होती तर, हळूहळू वडिलांची जबाबदारी ओघा ओघाने त्या घरातील लहानाकडे जाते. मग तो यशस्वी उद्योजक असो चाकरमानी असो किंवा चोर. तशीच ही चोराची गोष्ट.
कुख्यात चोर भोला आता वयस्कर झाला होता. तो आपले कौशल्य, आपले काही डाव पेच, चोरवाटा आणि जमवलेले धन आपल्या मुलाच्या हाती सुपूर्त करण्याच्या विचारात होता. चोरीचे कौशल्य आणि हातचलाखी मध्ये तो एव्हाना निपुण झाला होता. त्याचा स्वतः वर इतका विश्वास होता की कोणी सहजा सहजी त्याची चोरी पकडू शकत नव्हते. आता हे सगळं मी माझ्या मुलाला कसे शिकवावे असा ही प्रश्न त्याच्या मनात होता.
एकदा मुलानेच पुढाकार घेऊन भोलाला विचारले. “ ही हुशारी आणि चलाखी, त्यातले डावपेच मला पण शिकायचेत. “ असे म्हणून त्याने हट्ट केला. भोला ने मुलांकडे पाहून त्याला शिकवण्याचे आश्वासन दिले आणि “ रात्री तयार राहा “ म्हणले. इतके सांगून भोला तिथून निघून गेला. दिवसभर मुलगा विचारात होता “ रात्री नक्की काय होणार ? “ त्याच्या मनात थोडी भीती ही होती. भोलाने एक घर हेरले. रात्री घरात कसे शिरायचे हे ही आपल्या मुलाला सांगितले आणि जसा मुलगा त्या घरात शिरला, भोलाने त्या खोलीचे दार बाहेरून लावून घेतले. काय करावं सुचेना. वडिलांनी आत गुपचूप शिरायचे कसे ते शिकवले पण तिथून सगळ्यांची नजर चुकवून निघायचे कसे ते काही सांगितले नाही. त्यावेळी त्याला भोलाचा खूप राग आला. थोड्याच वेळात खोलीचे दार उघडले. मुलगा बाहेर पडला पण त्याच्या मागून आता आजूबाजूची माणसे होती. हळूहळू माणसे वाढत गेली. दहा बारा माणसे आपल्या मागे आपला पाठलाग करतात हे बघून त्या मुलाला घाम फुटला. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक विहीर दिसली. त्याच्या शेजारी मोठे झाड. मागून माणसे आरडा ओरडा करत येतच होती. निदान जीव तरी वाचला पाहिजे या आशेवर त्या मुलाने एक मोठा दगड उचलून विहिरीत टाकला आणि वाऱ्याच्या वेगाने झाडावर जाऊन बसला. पुढच्या क्षणाला तिथे विहिरीच्या आजूबाजूला माणसे जमा झाली. चोराने आत विहिरीत उडी मारली असणार या निष्कर्षावर येऊन रात्रीच्या अंधारात सगळे जमलेले लोक परत गेले. रात्रभर झाडावरच वास्तव्य केल्यावर दुसऱ्या दिवशी मुलगा घरी आला. येऊन पाहतो तर भोला निवांत आराम खुर्चीत बसला होता. त्याने रागा रागात भोलाला विचारले, “ असे कसे तुम्ही मला अडकवून निघून गेलात “ असं विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले. “ तू तिथे जेव्हा अडकलास तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तू स्वतः शोधून काढला, निवडला. आणि तू परत घरी आलास... “
“ तुला ते वेगळे शिकवायला लागणार नाही, याचा अंदाज मला होता. फक्त तू मोठ्या संकटात येणार नाहीस याची मी काळजी घेतली. काही गोष्टी तर तुझ्यात आधीपासूनच आहेत. ज्या तुला ही माहीत नसतील पण त्या कधी कशा वापरायच्या हे तुला अनुभवावरून कळेल. आता कळले अगदी तसे ! मी ही असाच शिकलो. जर मी तुला सगळेच शिकवले तर तुझ्यात असलेले वेगळेपण तू कधी वापरणारच नाहीस. त्यामुळे अशा वेळी तुझे अंतर्मन तुला मी किंवा कोणीही जवळ नसतानाही मार्ग दाखवेल जसे काल झाले, त्याचे लक्षपूर्वक ऐक. “ आपला मुलगा आता स्वावलंबी झाल्याचे समाधान भोलाकडे होते.
गोष्ट इथेच संपते. गोष्ट चोराची असली तरी गोष्टीतून सांगायचं असं कि आपण इतरांची मते, आपली बुद्धी आणि आपले अंतर्मन यात किती वेळा गल्लत करतो! कधी कधी आपल्या समोर असंख्य वाटा असतात. खूप साऱ्या गोष्टी समोर असतात. त्यात ही आपल्याला नक्की काय हवे आहे हे आपले अंतर्मन आपल्याला सांगत असते. ती गोष्ट मिळाली की ती रिकामी जागा भरून जाते. तेच ऐकण्याची गरज असते. मग आपली वाट आपल्याला मिळून जाते.
4 comments:
मस्त लेख
छान
मस्तच तुम्ही सुद्धा मांडला अनुभव....💐
Thanks😊✌️
Post a Comment