Monday, 22 November 2021

पुऱ्या

     
       कढई तापलेली होती. तेलाने भरली होती. पुरी त्यात बुडी मारणारच होती. खालून वरून फुलणार होती. शेजारी सुपर “ व्हिजन “ साठी आई उभी होती. तेल खूप गरम झाल्याची सूचना कानावर आली आणि त्या पुरीने तेलात “ तेल समाधी “ घेतली. मी हात पटकन मागे घेतला. इकडून तिकडून तेलाचे चटके अंगावर घेणारी ती पुरी अखेर तेलात बुडाली. यावेळी पुरी थोडी मोठीच झाली होती. एकाच आकाराच्या पुऱ्या लाटणे ही कौशल्य आहे. ज्यात अजून पारंगत व्हायचे असे स्वतः ला च प्रोत्साहन दिले. आकारावरून थोडा हिरमोड झाला पण पुरी फुगली तेव्हाचा आनंद त्याहून मोठा होता. ती फुगलेली पुरी बाहेर काढताना आईचे मौखिक प्रशिक्षण सुरु होते. सर्व पुऱ्या तळून झाल्यावर याच विषयावर लिहायचे ठरले.
       स्वयंपाक करणे आणि मन लावून त्यात उतरणे म्हणजे पुरीची जागा घेण्यासारखेच नाही का ! जी त्या कडकडीत तेलात एखाद्या योध्या प्रमाणे उतरते आणि बाहेर येते तेव्हा आणखी चवदार होऊन येते. खमंग होऊन येते. चंद्रासारखी गोल आणि गोरीपान भाकरी कवितेत संघर्ष आणते. प्रेम आणते. कष्ट कऱ्याची पोटातली आग शांत करते. पण तेलाच्या मंद आचेवर सोन्यासारखी तांबूस होणारी पुरी ही कौतुक सोहळे घेऊन येते. तेव्हा त्या तांबूस पुरीत ही “ पंढरपुरी “ दिसते.
      आणखी पुऱ्या करताना पुढे त्यातले वेगळेपण समोर आले. वेगवेगळ्या आकाराच्या पुऱ्या मला जोडली गेलेली वेगवेगळी माणसे वाटू लागली. काही लहान, काही मोठी, काही चपटी, काही फुगलेली... काही तांबूस, चवदार, खुसखुशीत. काही थोडी फिक्या रंगाची नव्याने किंवा अगदी थोड्याच वेळासाठी तेलात डुबकी मारून आलेली. पण प्रत्येक पुरीची चव ताटातले इतर पदार्थ वाढवतात. मग ती पुरी कोणासोबत आपल्या ताटात येते त्यावर तिचे स्थान...असे ही काही.
      बघता बघता सगळ्या पुऱ्यांचा कढई ते ताटा पर्यन्त चा प्रवास पूर्ण झाला. हे सारं पुरीचे पुराण पूर्ण करताना वाटले पुरी तळून काढणे म्हणजे “ जगन्नाथ पुरीचा “ रथ ओढण्यासारखेच दिव्य आहे. जितक्या काळजीपूर्वक तो रथ ओढला जातो तितक्याच काळजीने ती पुरी कढाईतून काढावी लागते.
    आता असे वाटते; विश्व खरंच गोल आहे, जे कष्ट ती पुरी गोल लाटताना घेतले ...तोच आंनद तिला सगळ्यांच्या ताटात पाहताना झाला. पुरी आणि बनवणारी परी दोन्ही खुश असल्या की स्वयंपाक घर बोलायला लागते. हसते आणि दरवळते.

6 comments:

Things and Thoughts said...

पुरीची कहाणी खरंच स्वादिष्ट आहे, प्रत्येक पुरीला आपलं अस्तित्व माहीत असलं तरी भवितव्य मात्र माहीत नसतं, कुणाच्या ताटात तिनं पडावं हे ही नाही, पण पुरी होऊन फुगनं आणि आरामात श्रीखंडाच्या बाजूला विराजमान होऊन आपला स्वाभिमान जपनं मात्र तिच्याच हातात....
फार सुंदर लेखन केलं आहे

जुईली अतितकर said...

पंगतीतला एक घास तिच्यासाठी ज्या हातांनी तिला गिरवायला शिकवले ...
माझ्या सगळ्या ..ताई ...आई आणि गृहिणींसाठी ❣️
खूप छान मत मांडले 🙂

ANAGHA said...

लोकांच्या दृष्टीने तसं बघितलं तर साधा पुरी तळायची! पण या अनुभवाला जुईली तू अगदी खमंग बनवलं आहेस. वाचताना मजा आली.

Ashish said...

अन्नपूर्णेला पूरीच दिलेलं रुपक समर्पक आहे. कारण अन्नपूर्णा ज्या तन्मयतेने स्वयंपाक करते, तेव्हाच तो रुचकर होतो. तसेच पुरीच्या वेगवेगळ्या आकाराला आणि प्रकाराला माणसाचं दिलेलं रुपक हि छान, जसे ह्या वेगवेगळ्या माणसांना आपण सामावून घेतो तसंच त्यांनी हि आपल्याला सामावून घ्यावं ह्यासाठी आपणही पूरी सारखं लवचिक व्हावं असा विचार प्रत्येकाच्या मनात यावा - आशिष

जुईली अतितकर said...

Thanks anagha🙂

जुईली अतितकर said...

अगदी खरे
Thanks आशिष

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...