सिंधू...ती मला वाहणारी नदीच वाटते . नावाप्रमाणे ती निर्मळ वाहणारी नदी. कधी ती आईच्या मायेने विणलेली ऊबदार रजई.
सिंधुताई... अनेकांसाठी ‘ माई. ‘ माईंचे आणि नदीचं साधं सोपं असणं किती सारखं आहे हे मला लिहिता जाणवलं. वेगवेगळ्या दऱ्या – खोऱ्यातून वाहत ती समुद्राला जाऊन मिळते. पण जिथं जिथं वाहत जाते, तिथल्या मातीला स्पर्श करत जाते. तिथे एकटी पडलेली बरीच रोपटी, झुडपे, वेली तिची काठावर वाट पाहत असतात. त्यांना ती ओलावा देत जाते. भोवतालची सृष्टी बहरत जाते. फुलवत जाते. इतके की येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला तिथे नदीकाठी दोन घटका थांबून तिचे वाहणे ऐकावेसे वाटू लागते. गोड पाण्याचा तिचा प्रवाह किती जणांची जीवनाची तहान शमवत असतो. पुढच्या वळणावर विषणणं नापीक निस्तेज वैराण माळरान असल्याचे तिला भय नसते किंवा हिरवीगार फुललेली प्रसन्न बाग ही तिला तेवढीच सामान्य असते. तिला फक्त वाहायचे असते...पुढे जायचे असते.
चित्रपटातील सिंधू पाहताना डोळे पाणावतात. हे पाहताना ही सिंधू तेव्हा कितीदा दुधडी भरून वाहिली असेल याची कल्पना येते. आणि “ चित्रपटात सगळं आयुष्य कुठे समोर येते “ म्हणत मागे टाकलेल्या किनार्यांच्या आठवणीत ती सहज एक फेरफटका मारून येते.
चार पुस्तके आणि अनुभवाने भरभरून वाहणाऱ्या माईंचे मन माणसा माणसातला जिवंत मायेचा झराच. पुढे येताना हाच एक प्रवाह नंतर नदीत रूपांतरित होत असतो फरक फक्त इतकाच की मागे गेलेले नदी काठ, काही वळणे, काही वाढवलेली रोपटी आता येणाऱ्या नव्या प्रवाहाला वाट देतात.
त्या नदी काठी गेल्यावर “ तू सकलांची आई... साता जन्माची पुण्याई...घेई पदरात आम्हा वरी छाया धर बाई...” या वैभव जोशी यांच्या ओळी सहज ओठांवर येतात. तिचा पदर फार मोठा. म्हणून कदाचित दुरदूरची एकटी पडलेली पाखरं पंख येई पर्यंत तिच्या पदराखाली विसावली...वाढली...उंच भरारी घ्यायला शिकली.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, तिच्या डोईवरच्या पदरासाठी होणार कसे उतराई... अशी माई. “
6 comments:
सिंधूताईंचे महाराष्ट्रातील अनाथ मुलांवर असलेले ऋण योग्य शब्दात मांडलेस. असं म्हणावेसे वाटते की त्या सिंधू नदीमुळे भारतीय संस्कृतीला सिंधू संस्कृती आणि धर्माला हिंदू धर्म म्हणून ओळखलं जाऊ लागले, तर ह्या सिंधू ताईंमुळे अनाथ मुले सिंधुची मुले म्हणून ओळखली जाऊ लागली -- आशिष
तूझ्या शब्दांनी त्यास श्रद्धाजली लाभेल इतके मना पासून लिहिले आहे.
माझ्याकडून आणखी एकापर्यंत माई पोहोचले तर माझे भाग्य आणि शब्द रूपात आदरांजली. Thank you nikhil🙂
Thanks aashish ...Well expressed 🙂
धन्यवाद जी 😊 - आशिष
Post a Comment